फुल

Submitted by दिव्यल on 24 July, 2020 - 13:45

फुल

सारेच कसे गुलाब होतील,रुबाब घेऊन जन्माला येतील!
ताठ पाकळ्या, उंच फांद्या आणि दांडीवर काटे,
आपणच आहोत फक्त या बागेत, असेच त्यासी वाटे.
मोहक लाल रंग आणि क्लिष्ट पाकळ्या जोडीला,
भासवतो असे कि आहे इतकेच त्याच्या देहाला.
पण तो कुठे कुणाला शिरू देतो आपुल्या अंतरंगात,
लपवून ठेवतो सारे पराग त्याच्या दलांच्या आतल्या थरांत.
ठाव नाही लागला अजून त्याच्या मनीचा कुणास,
कसा जगतो कुणास ठाऊक घेऊन काटेरी सहवास.

पण मी ठरवले आपण व्हायचे प्राजक्ताचे फुल,
सूर्यफूल वा डेझी अथवा व्हावे एखादे रानफुल.
प्राजक्ताचा सडा होऊन वर्षांवे एखाद्या बाळावर,
असंख्य डेझी होऊन पसरावे एका हिरव्या गार कुरणावर.
मग त्या लहान फुलांसवे जगावे निश्चिन्त खरेच,
पाकळ्या उघडून पूर्ण, करावे जवळ सर्वेच.
वाऱ्याप्रमाणे डोलावे, उन्हामागे धावावे,
नजरेत येताच कुणाच्या, अदृश्य राहून परी दृश्याला
नवनवीन रंग द्यावे.

-दिव्यल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users