प्रजननविरोध

Submitted by प्रजननविरोधी on 21 July, 2020 - 13:30

कोणत्याही कृतीचे, विचाराचे किंवा विचारसरणीचे तर्कसंगत विश्लेषण करणे, हे एका विवेकी समाजाचं लक्षण आहे. कोणताही विचार आणि त्याच्या बाजूने किंवा विरोधात मत व्यक्त करण्याची मुभा समृद्ध सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असते. असं असूनही अनेक विषय आपल्याकडे अजूनही वर्ज्य आहेत. साधारणतः शाळा, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुलं, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने, नातवंड, जमलेच तर पंत्वंड आणि शेवटी मृत्यू अश्या धोपट मार्गाव्यतिरिक्त काही पर्याय सुचवणाऱ्या विषयांना धार्मिक मुलामा दिल्याशिवाय उघडपणे चर्चेला सहसा मान्यता मिळत नाही. प्रजननाबाबतही ह्याच प्रकारची वृत्ती दिसून येते. आज भारताची लोकसंख्या सर्व जगात(चीनहूनही) जास्तं होऊ पहात असताना, दोन कोटींहून अधिक अनाथ मुलं असताना, जवळ जवळ १८कोटी भारतीय दारिद्र्यरेषे खाली आणि दोन तृतीआंश लोकं मूलभूत स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असताना लोकसंख्या नियंत्रण, संततिनियमन आणि त्या संदर्भात प्रजननाच्या मुद्द्यांवर आवश्यकतेपेक्षा अगदीच तोटकी जनजागृती होताना दिसते. ह्याउलट अजूनही प्रजननाला आपल्याकडे निर्विवाद महत्व आहे. प्रजनना च्या विरोधात बोलणे अजूनही विचित्र आणि निषिद्ध मानले जाते.

प्रजननाच्या विवेचनाबद्दल असलेल्या सामाजिक अनास्थेचे एक कारण हेही आहे, की सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी पर्येंत सहज, स्वस्त आणि विश्वसनीय गर्भनिरोधकांची अनुपलब्धता, धार्मिक गैरसमज आणि शिक्षणाच्या अभावामुळे, प्रजनन आणि संभोग ह्यांमध्ये फारकत करणे अवघड होते. परंतु आज लैंगिक सुखांवर कोणतीही मर्यादा न आणता प्रजननाचं नियंत्रण करणे सहज शक्य आहे. लोकसंख्येविषयी किंवा पर्यावरण संवर्धनाबाबत किंवा अगदी वैयक्तिक आर्थिक मर्यादेतून निर्माण होणाऱ्या प्रजननाच्या परिणामांची पुरेशी नसली तरी किमान थोडी तरी जागरूकता असल्याचे जरी मान्य केले, तरी देखील प्रजननाच्या तात्विक बाबींकडे किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक अडचणींकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले दिसून येते.

वास्तविक पाहता हिंदू आणि बौद्ध धर्मात प्रजननविरोधा बद्दल काही तात्विक अंगाने विचार मांडल्याचे म्हणले जाऊ शकते. Anti-Natalism: Rejectionist Philosophy from Buddhism to Benatar - ह्या "Ken Coates" अश्या टोपण नावाने लिहिलेल्या पुस्तकात रमेश मिश्रांनी हिंदू आणि बौद्ध धर्मात प्रजननविरोधा विषयी अप्रत्यक्षपणे मांंडलेल्या विचारांचा संक्षिप्त आढावा सादर केला आहे.

आधनुिक काळातील प्रजननविरोध
धार्मिक गैरसमज वगळून १९व्या शतकात आर्थर शोपेनहावर आणि त्यानंतर जैविक उत्क्रांतीचा शोध लागल्यानंतर अनेक नास्तिक तत्वज्ञांनी प्रजननविरोधा विषयी अनेकविध अंगांनी विचार मांडले आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय मुद्दे दक्षिण आफ्रिकी तत्वज्ञ डेव्हिड बेनेटार ह्यांनी मांडले आहेत. प्रजननाच्या प्रक्रियेत आपण एक नवीन व्यक्ती अस्तित्वात आणत असतो. त्या अगोदर ती व्यक्ती अस्तित्वात नसते. अश्या अवस्थेत कोणीही आयुष्याच्या संभाव्य सुखांपासून वंचित नसते. एका नवीन व्यक्तीला अस्तित्वात आणून आपण तिच्या ठिकाणी सुख आणि दुःख, दोन्ही निर्माण करत असतो. म्हणजे ज्या सुखांपासून मुदलातच कोणीही वंचित नाही ती सुखं प्रदान करण्यासाठी आपण एक नवीन व्यक्ती तयार करून तिच्या ठिकाणी दुःख निर्माण करत असतो. इथे आयुष्यात सुख अधिक की दुःख अधिक ह्या वादाचा काहीही संबंध नाही. कितीही कमी किंवा अधिक सुख असले तरी जन्मा अगोदर त्यापासून कोणीही वंचित नसते आणि प्रमाण कितीही कमी असले तरी आयुष्यात गंभीर दुःख असतेच ज्यापासून वाचण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो.

जन्मा अगोदर कोणीही जन्मदात्यांच्या पायाशी जन्माची भीक मागायला आलेला नसतो. केवळ आणि केवळ आपल्या सुखांकरता जन्माला येणाऱ्या व्यक्तीवर आपण आयुष्य लादत असतो. प्रजननविरोधाच्या अनेक पैलूंपैकी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे.

बऱ्याच जणांना वरील मीमांसा फारच नकारात्मक वाटेल. केवळ आयुष्यातल्या दुःखाकडे बघून केलेला एकांगी विचार असल्याचे काही जण म्हणतील. परंतु तसे आजिबात नाही. आयुष्यात भरपूर सुखे आहेत, जीवनात बरेच सौंदर्यही आहे ह्यात दुमत नाही. पण ह्या सुखांपासून जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणी वंचित नसते हा मुखबिंदू आपल्याला डावलून चालणार नाही.

प्रजननविरोध म्हणजे आत्महत्या नाही
डेव्हिड बेनेटार ह्यांच्या मते प्रजननाच्या प्रक्रियेतून जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हानी पोहोचत असते. ही हानी गंभीर स्वरूपाची असते. असे असल्यामुळे आपले अस्तित्व टाळण्याकरता आपल्याला आता जरी उशीर झालेला असला, तरीही भविष्यात जन्माला येणाऱ्या संभाव्य जीवांना आपण अस्तित्वाच्या हानीपासून वाचवू शकतो.

"अस्तित्वात असलेले आयुष्य चालू ठेवणे" आणि "नवीन आयुष्य सुरु करणे" ह्यात बेनेटार भेद करतात. समजा काही गंभीर व्याधीमुळे एखाद्या व्यक्तीचा एक पाय कापावा लागणार आहे. तसे केल्याने ती व्यक्ती उर्वरित आयुष्य जगू शकणार असेल, तर पाय कापण्याचा उपाय योग्य असल्याचे आपण मान्य करू. केवळ एका पाया करता त्याने जगणे थांबवावे असे कोणी म्हणणार नाही. ह्या उलट जर एखाद्या स्त्रीला भविष्यात आपल्याला होणारे मुल मगाशी म्हणलेल्या गंभीर व्याधींनी ग्रस्त जन्माला येणार असल्याचे ठाऊक असेल, तर तिने त्या मुलास जन्म न देणे योग्य असल्याचे बहुतेक जण मान्य करतील. म्हणजे सध्या सुरु असलेले आयुष्य थांबवण्याकरता वापरलेले नैतिक निकष नवीन आयुष्य सुरु करण्या अथवा नकरण्या करता वापरलेल्या निकषांपेक्षा अधिक कडक असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या (वेदनाक्षम)सजीवांमध्ये आपलं अस्तित्व पुढे सुरु ठेवण्याची (जैविक उत्क्रांतीच्या फलस्वरूप)ओढ असते. ती इच्छा भविष्यात जन्माला येणाऱ्या संभाव्य जीवाच्या ठिकाणी नसते. त्यामुळे प्रजननाचा विरोध करणे म्हणजे आत्महत्येचे प्रोत्साहन करणे असं होत नाही. सध्या अस्तित्वात असलेले आयुष्य थांबवणे आणि नवीन आयुष्य निर्माण न करणे ह्यात तफावत आहे आणि प्रजननविरोधात केवळ नवीन आयुष्य निर्माण करण्याला विरोध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

सुख-दुःखातील असमानता
बेनेटार ह्यांचा मुख्य मुद्दा सुखं आणि दुःखांमधील (इतर अनेकांपैकी)एक प्रमुख असमानता आहे. ही असमानता ४ गृहीतकांवर आधारित आहे.

  • १. दुःख/यातना असणे वाईट असते
  • २. सुखं असणे चांगले असते
  • ३. नसलेली दुःख भोगायला कोणीही नसले तरी देखील, दुःख/यातना नसणे चांगले असते
  • ४. नसलेल्या सुखांपासून कोणीही वंचित नसेल तर ती सुखं नसणे वाईट नसते

वरील गृहीतकांपैकी क्र.१ आणि क्र.२ सोपी आहेत परंतु क्र.३ऱ्या आणि क्र.४थ्या कडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यात मांडलेले विचार एका उदाहरणा द्वारे समजावून घेऊ. समजा एका जोडप्याला मुल हवे आहे, परंतु काही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी कुटुंबनियोजन करून ५ वर्षांनंतर प्रजनन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची प्रतिकुल परिस्थिती आर्थिक, अनुवंशिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची असू शकते. उदाहरणा दाखल समजा मातेला काही आजार असेल जो बरा होण्या अगोदर प्रजनन केले असता मुल व्याधिग्रस्त अवस्थेत जन्माला येणार असल्यामुळे त्यास जबर यातना भोगाव्या लागणार असतील. तो आजार काही वर्षांनंतर बरा होऊन ते सर्वसामान्य बालकास जन्म देऊ शकणार असतील, तर तोवर थांबण्याचा निर्णय आपल्यापैकी बहुतेकांना योग्य वाटेल.

इथे २ वेगळे घटनाक्रम संभवतात -

  • १. त्यांनी जर थांबण्याचा निर्णय घेतला नसता तर त्यांना आत्ताच एक मुल झाले असते. उदाहरणा दाखल आपण त्याचे नाव "अमित" ठेऊया.
  • २. वर म्हणाल्या प्रमाणे आजाराचा उपचार पूर्ण करून मग जर त्यांनी प्रजनन केले तर होणाऱ्या मुलाचे नाव आपण "सुमित" ठेऊया.

सुमित आणि अमित दोन भिन्न वेळी, भिन्न शुक्राणू आणि बीजांडयांपासुन निर्माण होणाऱ्या व्यक्ती आहेत, तेंव्हा त्यांच्या अस्तित्वाची किंवा अस्तित्वात न येण्याची चिकित्सा आपण स्वतंत्र पणे करू शकतो. त्याच्या आईवडिलांच्या कुटुंबनियोजनाच्या निर्णयामुळे अमित अस्तित्वातच आला नाही. हे चांगले मानण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतीकुल परिस्थितींमुळे होणारे त्याचे हाल आणि त्याच्या वाट्याला येणारे दुःख टाळले हे आहे. म्हणजे अस्तित्वात येण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या वाट्याला येणारे संभाव्य दुःख टळणे हे तो प्रत्येक्षात अस्तित्वात आला नसला तरी सुद्धा चांगले असल्याचे आपण मानतो. हाच मुद्दा गृहीतक क्र.३ मध्ये मांडला आहे. ह्या उलट तो अस्तित्वातच आला नसल्यामुळे आयुष्याच्या संभाव्य सुखांपासून वंचित राहिल्याबद्दल आपण शोक करत नाही. कारण अत्सितावत नसलेली व्यक्ती कशाही पासून वंचित राहू शकत नाही. म्हणजेच तो अस्तित्वात न आल्यामुळे संभाव्य सुखांना मुकणे आपण वाईट मानत नाही. हा विचार गृहीतक क्र.४ मध्ये मांडला आहे.
AsymmetryMarathi.png
ह्या चारही गृहीतकांची मांडणी आकृती १ मध्ये केलेली आहे. त्यात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची तुलना प्रजननातून भविष्यात येणाऱ्या परंतु सध्या अस्तित्वात नसलेल्या संभाव्य व्यक्तीच्या परिस्थितीशी केलेली आहे. (१) आणि (३) मध्ये दुःखांची तुलना केलेली आहे. इथे (३)ची स्थिती सरळ सरळ लाभदायक असल्याचे निष्पन्न होते. (२) आणि (४) मध्ये मात्र वरकर्णी (२)ची स्थिती लाभदायक असल्याचे वाटू शकते परंतु ते खरे नाही. त्यासाठी एक उदाहरण पाहू.

समजा सुनीता आणि अनिता दोन बहिणी आहेत. सुनीताला सतार वाजवण्याच्या छंद आहे आणि त्यात ती बरीच निपुणही आहे. रोज काही वेळ तरी सतार वाजवल्या शिवाय तिला चैन पडत नाही. ह्या उलट अनिताला ना असा काही छंद आहे न तिला सतार वाजवण्यात काही रुची आहे. अश्या परिस्थितीत सुनिताकडे सतार नसती तर ती तिचा छंद पूर्ण कारण्यापासून मुकली असती. ह्या उलट अनिताचे सतारी वाचून काहीही वाईट होत नाही. म्हणजे सतार नसण्याच्या तुलनेत सतार असणे जरी सुनीतासाठी लाभदायक असले तरी देखील तो अनिताकडे सतार नसण्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे सुख नसण्याच्या तुलनेत सुख असणे हे अस्तित्वात असलेल्या व्यक्तीसाठी जरी चांगले असले तरी देखील तो सध्या अस्तित्वात नसलेल्या संभाव्य व्यक्तीच्या ठिकाणी सुख नसल्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. तेंव्हा आकृती १ मध्ये (२)ची स्थिती (४)च्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही.

ह्या तुलनांच्या परिणामांवरून असे दिसून येते की प्रजननाची प्रक्रिया जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी नेहेमीच अपायकारक असते. त्यामुळे तसे करणे नैतिक दृष्ट्या अयोग्य ठरते.

लाभ आणि हानी
सुख आणि दुःखाच्या असमानते ऐवजी शॉना शिफ्रीन लाभ आणि हानी ह्यांच्यातील असमानता मांडतात. त्यांच्या मते आपण करत असलेल्या क्रियांमुळे जर कुणा इतर वेदनाक्षम व्यक्तींवर परिणाम होणार असेल तर तिला होत असलेला लाभ आणि हानी विचारात घेतली पाहिजे. हा हिशोब करताना लाभ आणि हानी ह्यांतील एका प्रमुख असमानतेकडे लक्ष दिले पाहिजे.

  • १. समजा एक व्यक्ती अर्धवट शुद्धीवर आहे आणि तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही काहीच केले नाही तर ती व्यक्ती भीषण यातनांत तडफडून मरणार आहे. तिला वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे तिचा एक हात कलम करणे एवढाच आहे.
  • २. समजा एक सुदृढ व्यक्ती तुमच्याकडे आली आहे. त्या व्यक्तीला काहीतरी अनन्यसाधारण जादुई शक्ती प्रदान करण्याची तुमच्या क्षमता आहे. उ.दा. खूप मोठ्या प्रमाणात धन किंवा स्वेच्छेने अदृश्य होण्याची शक्ती ई. परंतु त्यासाठी तुम्हाला त्याव्यक्तीची परवानगी न विचारात तिचा एक हात कलम करावा लागणार आहे.

शिफ्रीन ह्यांच्या मते सदर व्यक्तीच्या परवानगीविना केवळ क्र.१. मध्ये क्रिया करणे नैतिक दृष्ट्या योग्य आहे. खरं तर दोन्ही संभाव्य घटनांमध्ये त्या व्यक्तीला पोहोचत असलेली हानी समान आहे. परंतु तिला क्र.१ मध्ये अजून मोठी हानी टाळण्यासाठी तुलनेनी छोटी हानी केलेली आहे तर क्र.२ मध्ये काही विशेष लाभ प्रदान करण्याकरता त्या व्यक्तीचा हात कापला गेला आहे. शिफ्रीन ह्यांच्या मते परवानगीशिवाय केवळ कोणतीतरी मोठी हानी टाळण्याकरता केलेली तुलनेनी छोटी हानी योग्य आहे परंतु काही विशिष्ट लाभ प्रदान करण्याकरता परवानगीशिवाय कितीही छोटी हानी करणे अयोग्य आहे.

त्यामुळे सुख-दुःखाची असमानता घटकाभर बाजूला ठेवली आणि जन्माला येणाऱ्या व्यक्तीला प्रजननाच्या प्रक्रियेतून लाभ होतो असे जरी मानले, तरी देखील शिफ्रीन ह्यांच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या परवानगी शिवाय आयुष्यातल्या दुःखांची हानी तिच्यावर लादून, तिला आयुष्याच्या सुखांचा लाभ प्रदान करणे नैतिक दृष्ट्या अडचणीचे होते. जन्मा अगोदर त्या व्यक्तीची परवानगी घेणे अशक्य असल्यामुळे प्रजनन करणे अनैतिक होऊन जाते.

शिफ्रीन ह्यांच्या मीमांसेवरून एक आणखीन मुद्दा उपस्थित होतो. आयुष्यात अनेक धोके असतात. अनेक प्रकारचे रोग, शारीरिक आणि मानसिक व्याधी, अपघात, अन्याय, गरिबी, कुपोषण, ई.ची जोखीम किंवा संभावना आणि मृत्यूची निश्चितता आपण दुसऱ्या व्यक्तीवर लादत असतो.

इतर
आयुष्यात बहुतेक सुखांसाठी आपल्याला झटावे लागते परंतु दुःख काहीही न करता चालून येतात. उ.दा. मी नुसताच बसून राहिलो तर तहान, भूक, कंटाळा, शारीरिक व्याधी न बोलावता येतात. सुखांच्या मागे मात्र मला सतत धावावे लागते. ही आणि अश्या अनेक असमानता आणि प्रजननविरोधा संदर्भात अनेक प्रश्न आहेत. प्रजननाचे व्यक्तीस्वातंत्र्य, गर्भपात, गर्भनिरोधक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन, नारीवाद, लैंगिक गरजा व प्रजनन, मानव प्रजातीचे भविष्य, लोकसंख्या विषयक प्रश्न, जैविक उत्क्रांती, मनुष्येतर प्राण्यांचे प्रजनन, नैसर्गिक प्रजनन, कृत्रिम रेतन, जीवनाचा अर्थ आणि मूल्य वगैरे बऱ्याच मुद्द्यांमुळे हा विषय खूप व्यापक आणि तितकाच खोल असला तरी वरील लेखातून प्रजननविरोधाची किमान तोंडओळख तरी व्हावी ही आशा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओरांग-उटानने प्रजनन केले म्हणून मानव निर्माण झाला. गुहेतल्या रानटी मानवाने प्रजनन केले म्हणून आजचा प्रगत मानव निर्माण झाला. हा मानव प्रजनन करेल तर अजून हजारो वर्षांनी देवासमान मानव निर्माण होईल. ह्या मानवाने संगीत, कला, साहित्य, शास्त्र आणि गणित ह्याची निर्मिती केली. विचार करा शेक्सपिअरच्या आई बाबांनी नियोजन केले असते तर काय झाले असते?
त्या सर्वांच्या खांद्यावर उभे राहून असे कद्रू विचार करणार्या लोकांना साष्टांग नमस्कार !
आपण थोडे पैसे कमावले तर लगेच गरीब लोकांचे अधिकार काढायला लागलो. खर तर एखादा सुपर रिच आपल्याकडे बघून हासत असेल काय हे लोक ११०० square feetच्या खुराडयांत कसे रहातात? असा थोडा विचार करा.
पूर्वी पुरुष स्त्रियांना ' लांब केस आखूड बुद्धी ' असेे म्हणून हिणवत असत. वरच्या जातीतले लोक अस्पृश्याना असेच वागवत असत. अमेरिकन लोक निग्रो लोकांना गुलाम म्हणून वापरत असत. तृतीयपंथी लोकांची अजूनही यथेच्च टिंगल टवाळी होत असते.
काही लोकांचे प्रजनना बद्दलचे विचार ह्याच धर्तीचे वाटतात. हा मुद्दा अत्यंत वैयक्तिक आहे ज्याने त्याने फक्त आपल्या बद्दल विचार करावा. त्यांना इतर लोकांची उठाठेव करण्याचा अधिकार कुणी दिला आहे ?
.

हा मानव प्रजनन करेल तर अजून हजारो वर्षांनी देवासमान मानव निर्माण होईल.>> मग पुढे काय? नेमकं काय साध्य होणार त्याने?

प्रभुदेसाई, apes पासून जिला मानवाच्या सर्व नामशेष झालेल्या आणि आज अस्तित्वात असलेल्या प्रजातींची पूर्वज मानतात, त्या Lucy पर्यंत पोहोचायला/उत्क्रांती व्हायला साधारण एक कोटी वर्षे लागली. उत्क्रांती खूप हळूहळू घडते. आजचा मानव हा अनेक serendipitous घटनांमुळे उत्क्रांत झाला आहे. तेव्हा आपण अजून एक कोटी वर्षे टिकलो तर देव वगैरेला स्कोप आहे! मला विचाराल तर आधी पुढची दोनशे वर्षे टिकलो तर मगच काही चान्स असेल.

युटोपिया! शेवटी
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः हा एवढाच हेतू आहे.

दहा कोटी वर्षे ? मला वाटते काहीतरी गफलत आहे, पृथ्वीचे वय आहे 4.543 billion years!!!! विश्वाचे वय १३,४ billion years
अर्थात माझे मराठी कच्चे असल्याने कोटी आणि billion चा हिशेब मला समजत नाही .तरी देखील --
14 million years ago
Orang-utans branch off from the other great apes, spreading across southern Asia while their cousins remain in Africa.
7 million years ago
Gorillas branch off from the other great apes.
6 million years ago
Humans diverge from their closest relatives; the chimpanzees and bonobos.
Shortly afterwards, hominins begin walking on two legs.
अर्थात हादेखील मोठा कालावधी आहेच. शक्य आहे की मानव जात लवकरच नष्ट होईल
शेवटी माल्थसचा सिद्धांत आहेच. मग आपण त्याला हातभार कशाला लावायाचा.
In any case -''IT;S A WONDERFUL LIFE " हा सिनेमा अवश्य पहा.

सॉरी! माझं नेहमी हे confusion होतं! 10 million years हवं. मिलियन म्हटलं की मला who wants to be a millionaire आठवतं आणि मग कौन बनेगा करोडपती! मग असे गोंधळ होतात. वरची पोस्ट दुरूस्त करते आता. धन्यवाद माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल!

@ Filmy
हेतू ?
दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||

हे म्हणजे पायाला घाण लागेल/ पाय दुखतील म्हणून मी घरातून बाहेर पडणारच नाही असे अर्ग्युमेण्ट झाले...

नॉर्मल अपत्य असेल तर अपत्याला दुःख भोगावे लागेल का सुख हे त्याच्यावर आहे...

ईतर प्राणीमात्र प्रजनन करावे की नाही असा विचार करत असतील का?
अर्थात विचार केला तरी शरीरसंबंध प्रस्थापित करूनही अपत्य होऊ न देणे किती प्राणीमात्रांना जमत असावे?
निसर्गाला कदाचित त्यांच्या कितीही पैदाशीने काही प्रॉब्लेम नसावा.
हा माणूसच स्वतःच फसाद की जड आहे .

एक विचार म्हणून प्रजनन विरोध समजू शकतो ती एक बाजू झाली
पण ठराविक वया नंतर मानवी शरीराची ताकत कमी होते,असंख्य आजार माणसाला दुबळा बनवतात,अपघात माणसाला दुबळा बनवतो .
तेव्हा हॉस्पिटल मध्ये काळजी घेण्यासाठी तरुण स्टाफ हवा
गाडी चालवण्यासाठी तरुण चालक हवा.
शेती करणे आणि बाकी मेहनतीची काम करण्यासाठी तरुण कामगार हवा.
खूप सारी कामं करण्यासाठी तरुण पिढीची गरज असते ती प्रजनन न करण्या मुळे कशी उपलब्ध होईल.
अगदी जागे वरून उठून संडास करण्याची ताकत माणसात राहत नाही तेव्हा तरुण व्यक्ती च मदतीला हवा.
ज्या देशात वृध्द लोकांची संख्या वाढेल आणि तरुण लोकांची संख्या कमी होईल तो देश प्रगती करू शकणार नाही अशी भीती आताच व्यक्त होत आहे.

सध्या जगात असलेल्या मानवांपैकी किती टक्के मानव आई वडिलांनी मला का जन्माला घातले म्हणून त्यांना दोष देत असतील?.
स्वतःच्या सुखदु:खाला ते कधी कधी आई वडिलांना जबाबदार धरत असतीलही, पण जन्माला का घातले म्हणून किती?. क्वचितच. यातच प्रजजन विरोधी विचाराचे उत्तर दडलेले आहे.
नसलेले दु:ख जरी निर्माण होत असले तरी त्याबरोबर निर्माण होणारे सुख जास्त आहे. त्यामुळे या एवढ्याच कारणासाठी असलेला प्रजजन विरोध हा विचार चुकिचा वाटतो.
Entropy of the system always decreases, but it does not and can not stop creating work. Happy

entropy
1.
PHYSICS
a thermodynamic quantity representing the unavailability of a system's thermal energy for conversion into mechanical work, often interpreted as the degree of disorder or randomness in the system.
"the second law of thermodynamics says that entropy always increases with time"
All things trend toward disorder. More specifically, the second law of thermodynamics states that “as one goes forward in time, the net entropy (degree of disorder) of any isolated or closed system will always increase (or at least stay the same)

प्रभू तुम्ही बरोबरच आहात. मला increases असेच म्हणायचे होते. (entropy सारखे दु:ख वाढतच जाते ही अ‍ॅनॉलॉजी) चुकून decreases झाले. Happy
चूक दुरूस्त.

Pages