ह्या पावसाची एक काय भानगड आहे ते कळत नाही. आभाळ झाकोळून गेलं, भणाणा वारा सुटायला लागला, टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली की आतल्या आत मिटून बसावंसं वाटतं. एखाद्या खोलीत जोराने पंखा लावला की खोलीच्या कानाकोपर्यात दडलेल्या केरकचर्याने चोहो बाजूंनी बाहेर येऊन फेर धरावा तसं कुठलं कुठलं काय काय आठवायला लागतं. काही दिवसांपूर्वीचं, काही महिन्यांपूर्वीचं, काही वर्षांपूर्वीचं....कदाचित काही मागच्या कुठल्याश्या जन्मीचंही असेल. एकमेकांशी कुठलाही ताळमेळ नसलेल्या गोष्टी. मनाच्या कोपर्यात अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी. सांधीकोपर्यात दडवून ठेवलेल्या गोष्टी. आपल्याला हे अजून लक्षात आहे हे सुध्दा आपण विसरून गेलेलो असतो अश्या गोष्टी. कुठुन तरी हे सगळं गोळा करून आणतो हा पाऊस आणि आपल्यासमोर ठेवून म्हणतो हे घे, आता बाहेर पडता येत नाहीये ना. मग आत बघ जरा डोकावून आणि साफ कर हे सगळं. मी सगळा आसमंत धुवून टाकतोय. तू बघ मनाचा आरसा कितपत स्वच्छ करता येतो ते.
किती पावसाळे आले गेले. माझ्या मनाचा आरसा अजून स्वच्छ व्हायचाय......
---
'अरे बाप रे! अमिताभ आणि अभिषेक कोव्हिड पॉझिटीव्ह. नानावटीत दाखल. ऐश्वर्या आणि आराध्याही पॉझिटीव्ह. घरात क्कारंटीन. ह्या लोकांना कसा झाला बुवा करोना' मी 'आजकी ताजा खबर' ऑनलाईन वाचून दाखवत म्हणाले.
'तरी मी तुला सांगत होते. हा हवेतून पसरतोय' आमच्या आईसाहेब डोनाल्ड ट्रंपच्या सल्लागार असत्या तर तो बिचारा जागेपणीच काय पण झोपतानाही एक सोडून दोन मास्कस लावून झोपला असता.
'ऐश्वर्याचा फोटो आलाय मुलीबरोबर. किती मोठी झालेय'
'फोटो आलाय? बघू'
'अगदी बापावर गेलीये नाही? आईचं काहीच आलं नाही अगदी' मी फोटो बघत म्हणाले.
मग कोणाचा तरी फोन आला. नंतर वर्किंग फ्रॉम होमच्या गडबडीत मी हे सगळं विसरूनही गेले. पण आपण रात्री बिछान्यावर पडलो की मन आपला दिवसभराचा पसारा आवरून घेतं अशी एक वेळ असते. तेव्हा आईने सांगितलेली एक जुनी आठवण नेमकी आठवली. माझा जन्म झाला तेव्हा आईबाबा बाबांच्या आईवडिलांसोबत रहात होते. नवसाने झालेलं मूल म्हणून दोन्ही आजीआजोबांकडून भरपूर लाड झाल्याचं ऐकून आहे मी. आजीला दोन्ही मुलगेच. मुलीची हौस राहूनच गेलेली त्यामुळे पहिली मुलगी झाली तरी आनंदच झाला होता. खरं तर मी आईचा गोरा रंग घेतला नाही. बाबांसारखी सावळी झाले. पण भारतीय मानसिकतेनुसार वाटतो तो खेद कोणालाच वाटला नाही.
आजीआजोबांच्या घरासमोर एक गुजराती कुटूंब रहायचं. आईवडिल, ३ मुली आणि एक मुलगा. संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात मला खेळवत आई बिस्किटस भरवायला लागली की कधीकधी ती गुजराथीण बोलायला यायची. एकदा बोलता बोलता तिने बाँब टाकला - आप जैसी गोरी नही हुई आपकी बेबी, डॅडी पर गयी है'. आईला वाईट नाही वाटलं, राग आला. मलाही पहिल्यांदा तिने ही गोष्ट सांगितली तेव्हा मी तिला रागाने विचारलंही होतं की त्या गुजराथणीचा किती उजेड पडला होता म्हणून. 'कुठला पडायला? ती पण सावळीच होती की' आई म्हणाली.
आज इतक्या वर्षांनी मला एकदम जाणवलं की त्या बाईवर भडकायचा मला कोणताच नैतिक अधिकार नव्हता. तिने जे केलं तेच मीही करत आले होते. तिने निदान जे वाटलं ते तोंडावर बोलून दाखवलं होतं. पण ते दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ होतं ना म्हणून मला बरोबर दिसलं.
स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दाखवणारा चष्मा अजून बाजारात यायचाय.
--
गोष्ट मागच्याच १-२ वर्षातली. अजून मनाच्या कोपर्यात जाऊन न दडलेली. तुमच्यासारखीच मीही शाळेच्या, कॉलेजच्या alumni group ची सभासद. तिथे येणारे इमेल्स एकाच पठडीतले - अमक्याचा वाढदिवस, तमक्याचा जॉब चेंज, कोण अमुक कॉन्फरन्ससाठी तमुक शहरात येतंय आणि गेटटूगेदर ठरतंय, कोणाला अमुक कारणासाठी मदत हवी आहे तर कोणाला तमुक माहिती हवी आहे.
पण एके सकाळी एका ग्रूपवर एक वेगळाच इमेल मेसेज आला. ज्याने तो टाकला होता त्याला आपण अमित म्हणू यात. तर अमितने लिहिलं होतं की त्याच्या आईला एक गंभीर आजार झालाय. त्याने मेलमध्ये त्या आजाराची सगळी इत्यंभूत माहिती दिली होती. त्यावर आता फक्त एकच treatment शक्य होती. आणि तिचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. बरं होण्याचे चान्सेस फार होते अश्यातलाही भाग नाही. पण तो हे करायला तयार होता. अर्थात त्याच्यापुढे दुसरा पर्याय काहीच नव्हता म्हणा. Crowdfunding चालूही केलं होतं त्याने. पण तरी त्यातून हवे तितके पैसे जमणार नाहीत ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती. म्हणून तर तो college alumni group कडे मदतीसाठी आला होता. झालं. ह्यावरून आधी आमच्या क्लासच्या व्हॉटसअॅप ग्रूपवर मेसेजेसचा पाऊस पडला - हा ऑथेंटिक मेसेज आहे का, ह्याची आई खरंच आजारी आहे का, का खरंच आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे का वगैरे वगैरे. एव्हढं होईतो कॉलेजच्या alumni group वर आणखी इमेल मेसेजेस आले. कोणीतरी कॉलेजला कॉन्टॅक्ट करून हे सगळं खरं असल्याची शहानिशा केली होती. Alumni group वरच्या डॉक्टर्सनी त्याच्याशी आणि त्याच्या आईच्या डॉक्टर्सशी बोलून ती ट्रीटमेंट, खर्चं वगैरेची खात्री करून घेतली होती. केस जेन्युईन आहे हे कळताच मात्र मदतीचा ओघ सुरु झाला हे अमितच्या पुढल्या इमेल्सवरून कळलं. मीही खारीचा वाटा उचलला. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला व्हॉटसअॅप मेसेज करून ते कळवलं. त्यावर त्याचा आभार मानणारा मेसेज आला त्यालाही मी उत्तर दिलं ‘I will keep your mother in my prayers. I am sure she will recover soon’ हे माझे शब्द.
मी सुरुवातही केली - रोज रात्री झोपताना 'सर्वे संतु निरामया:' मध्ये अमितच्या आईचा खास उल्लेख करायला. छान वाटतं आपण कधीही न भेटलेल्या कोणासाठी तरी प्रार्थना करायला. नेहमीच्या प्रार्थनेत दोन शब्द जास्तीचे. त्यात काय एव्हढं? पण १ महिन्यात मी स्वतःच स्वतःला शॉक दिला. अमितच्या आईचा उल्लेख करायचा चक्क कंटाळा यायला लागला. माझा स्वतःवरच विश्वास बसेना. जे करायला काही कष्ट पडत नाहीत, पैसे लागत नाहीत ते करायचासुध्दा मला कंटाळा यावा हे माझ्याही आकलनापलिकडलं होतं. एव्हाना अमितच्या मेल्समधून ट्रीटमेंट यशस्वीरीतीने पूर्ण होऊन त्याच्या आईला पुढल्या महिन्यात घरी हलवतोय अशी अपडेट होती. मग काय विचारता? आता बरी आहे की त्याची आई, प्रार्थना करायची गरज नाही आता अशी पळवाट मन शोधून काढायला लागलं तेव्हा मात्र मला स्वतःचीच खूप लाज वाटली.
आपण आपली स्वतःचीच एक इमेज जपलेली असते आपल्या मनात. तिला तडा जातोय हे मान्य करणं खूप अवघड असतं. पण मला मान्य करावं लागलं ते. अमितच्या आईसाठी प्रार्थना करायचं मी पुढे कित्येक महिने चालू ठेवलं. पण स्वतःचीच भयंकर लाज वाटायचा तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही
म्हणतात ना - बूंदसे गयी सो हौदसे नही आती.
----
'तो खडे मीठ विकणारा येतो का ग आता तुमच्याकडे?' आईने आमच्या कामवाल्या बाईंना, आपण त्यांना सुलूताई म्हणू, विचारलं.
'नाही हो, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गायब आहे तो. गावी गेला असेल'
'ह्या बारीक मिठाचा अंदाज येत नाही मला. कुठे वाण्याकडे मिळतं का बघ' शेवटचं वाक्य लॅपटॉपवर खाटखुट करत आपलं ह्या संवादाकडे लक्षच नाही हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असलेल्या मला उद्देशून होतं.
दुसर्या दिवसापासून मॉर्निंग वॉकला जाताना रस्त्यात दिसेल त्या वाण्याला 'जाडं मीठ आहे का तुमच्याकडे?' हा प्रश्न विचारायचा सपाटा सुरू झाला. काही दिवस त्यात यश आलं नाही. आणि मग एका विकांताला काहीतरी दुसरंच घ्यायला गेले होते तेव्हा एका नव्या रस्त्याच्या बाजूच्या एका दुकानात विचारून पहावं म्हणून सहज शिरले. त्या वाण्याला आधी मी काय मागतेय तेच कळेना. कारण तो गुजराती आणि मी मराठी बाणा सोडायला तयार नाही. त्याने बारीक मीठाचं पाकिट समोर ठेवलं. 'हे नाही हो, जाडं मीठ हवंय...जाडं' मी ठासून सांगितलं. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि त्याने आणखी एक पाकिट समोर ठेवलं. ब्रँड काही ओळखीचा नव्हता त्यामुळे मी थोड्या संशयानेच त्याच्याकडे पाहिलं. बरं पिशवी transparent नाही त्यामुळे आत काय आहे ते पहाता येत नव्हतं.
'सुट्टं मीठ नाही का विकत तुम्ही?'
'नही. वो खराब हो जाता है. अब ऐसे पॅकेटमे ही मिलेगा ये नमक आपको'.
अडला हरी. आपल्याला पाहिजे ते हेच मीठ आहे का ह्याची खात्री नसतानाही १ किलोला १६ रुपयेच किंमत त्यामुळे अंदाज चुकला तरी फारसा चुना लागणार नाही असा विचार करून विकत घेतलं.
घरी आल्यावर ते मीठ पाहून मातोश्रींना झालेला आनंद अवर्णनीय होता. उद्या मी हरवले (हे अशक्यच दिसतंय!) किंवा कोणी मला किडनॅप केलं (हे तर त्याहूनही अधिक अशक्य!) आणि मग मी सापडले तरी तिला एव्हढा आनंद होईल असं मला वाटत नाही. आनंदाचा भर ओसरल्यावर 'कितने आदमी थे' च्या चालीवर प्रश्न आला 'काय किंमत ह्याची'
'१६ रुपये' मी मास्क धुता धुता म्हणाले.
'आपली सुलूताई आणते ते १ किलोला २० रुपये. ४ रुपयांचा फरक आहे.'
'फक्त ४ रुपयांचा' मी जाम कावून म्हणाले.
'थेंबे थेंबे तळे साचे' अशी वाक्यं फक्त आयाच तोंडावर फेकू शकतात.
तेव्हा नाही लक्षात आलं पण नंतर एक जाणवलं. लहानपणी कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही आम्हा भावंडांना. तरी पण एका माणसाच्या पगारात घराचे हप्ते भरत, दोन मुलांना वाढवताना महिन्याच्या बजेटची तोंडमिळवणी करताना आईला त्रास झालाच असेल. मात्र तो त्रास आईबाबांनी आमच्यापर्यंत कधी पोचू दिला नाही.
'४ रुपयांचा फरक' आणि 'फक्त ४ रुपयांचा फरक' ह्यात फरक आहे तो हाच.
---
'वो जब याद आये बहोत याद आये' स्वयंपाकघराच्या खिडकीत ठेवलेल्या Caravan मधून ६३ सालच्या पारसमणी मधल्या गाण्याचे सूर झिरपत होते. त्या तालावर आमचं जेवण सुरू होतं.
'नीलामावशीला हे गाणं फार आवडायचं' डाव्या हाताने फोनवर काहीतरी करत असल्यामुळे माझं आईच्या बोलण्याकडे अर्धवट लक्ष होतं.
'कोण आवडायचं तुझ्या नीलामावशीला? महिपाल?' मी भेदरून विचारलं. काही वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहताना अनेक शतकं जगलेल्या त्या चेटकिणीने ह्या बाबात काय पाहिलं असा विचार पूर्ण चित्रपटभर मला सतावत राहिल्याचं स्पष्ट आठवत होतं.
'महिपाल नाही ग. हे गाणं....तिला भारी आवडायचं'
आईच्या ह्या नीलामावशीला जाऊन किती वर्षं झालीत ते आता मला आठवत नाही पण तिची आठवण मात्र बर्याचदा निघते. 'हा पिक्चर मी नीलामावशीबरोबर पाहिला होता', 'ही भाजी नीलामावशीला भारी आवडायची', 'अमुक तमुक हिरॉईनची नीलामावशी अगदी फॅन होती'.....असं आणि बरंच काही.
खरं तर आईच्या ह्या नीलामावशीला मी फक्त फोटोतच पाहिलंय. आईही तिला शेवटची कधी भेटली होती कोणास ठाऊक. काही वर्षांपर्यत तिचे फोन यायचे. मी आईला बर्याच वेळा म्हटलंही होतं की एकदा भेटून ये तिला. पण ह्या ना त्या कारणाने राहून गेलं. मग अचानक तिचे फोन येणं बंद झालं. माझ्या मावशीने आईला सांगितलं की नीलामावशीला स्मृतिभ्रंश झालाय. कोणालाच ओळखत नाही. आता तिच्याकडे जाऊनही काही उपयोग नव्हता. ५-६ महिन्यांत गेली ती नंतर.
आईच्या फोनमध्ये अजूनही तिचा नंबर सेव्ह्ड आहे. त्या नंबरवरून कधीही फोन येणार नाही हे माहित असतानाही. माझ्यासाठी मात्र पारसमणीतल्या त्या गाण्याशी नीलामावशीची आठवण कायमची जोडली गेलेली आहे.
कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं.
They say you die twice.
Once when you stop breathing and the second, a bit later on, when somebody mentions your name for the last time.
---
रोशनी होगी इतनी किसे थी खबर
मेरे मनका ये दर्पन गया है निखर
साफ है अब ये दर्पन दिखाता हू मै
बघायच्या यादीत असलेल्या 'लाल पत्थर' नावाच्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या ह्या ओळी.
दर वेळी एक अधुरा पन्ना लिहून तुमच्या समोर ठेवते तेव्हा मनाचा एक कोपरा स्वच्छ झाल्यासारखा वाटतो मला. इथून निघायची वेळ होईपर्यन्त मनाचा आरसा पूर्ण लख्ख व्हायची चिन्हं कमीच दिसताहेत.
पण निदान आपला खरा चेहेरा पहाता येईल इतपत स्वच्छ झाला तरी पुरे.
नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण आहे
नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण आहे. साधे रोज घडणारे प्रसंग, पण किती काय काय दडलेलं असतं त्यात. तुझ्यासारख्या विचार करणाऱ्याला दिसतं खोलवरचं काही.
दरवेळी प्रमाणे हा ही पन्ना
दरवेळी प्रमाणे हा ही पन्ना खासच. तुमचे पन्ने नेहमीच अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. सुरेख
सुरेख लिहिलं आहेस
सुरेख लिहिलं आहेस
अहाहा! दिवस सार्थकी लागला हे
अहाहा! दिवस सार्थकी लागला हे वाचून.
आईच्या फोनमध्ये अजूनही तिचा नंबर सेव्ह्ड आहे. त्या नंबरवरून कधीही फोन येणार नाही हे माहित असतानाही. >> हे वाचून काटा आला. माझ्याही फोनमध्ये आहेत असे काही नंबर हे पुन्हा एकदा हायलाईट झालं स्वत:पाशीच
किती सुरेख लिहिलंय.
किती सुरेख लिहिलंय.
हे खूप आवडलं- They say you die twice.
Once when you stop breathing and the second, a bit later on, when somebody mentions your name for the last time.
नेहमीप्रमाणे सुरेख!
नेहमीप्रमाणे सुरेख!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
आपण आपली स्वतःचीच एक इमेज जपलेली असते आपल्या मनात. तिला तडा जातोय हे मान्य करणं खूप अवघड असतं. >>> हे अगदी पटलं.
नीलामावशीच्या किश्श्याने मला आरसाच दाखवला असं वाटलं. किती सहज विसरून जातो आपण माणसांना
नेहमीप्रमाणे खूप सुरेख!
नेहमीप्रमाणे खूप सुरेख!
नेहमीप्रमाणे सुरेख पन्ना!
नेहमीप्रमाणे सुरेख पन्ना!
अतिशय सुंदर अन् संवेदनशील मन
अतिशय सुंदर अन् संवेदनशील मन आहे तुझं स्वप्ना!
अतिशय सुंदर लिहिलं आहे.
अतिशय सुंदर लिहिलं आहे. प्रत्येक प्रसंगाशी रेंगाळले कारण प्रत्येक प्रसंग अगदी वैयक्तिक पातळीवर रिलेट झाला. खूप संवेदनशील व्यक्तीच इतकं भावपूर्ण लिहू शकेल.
पहिला पावसाळ्याचा पॅरा तुफान आवडला.
नेहेमीप्रमाणेच नितांतसुंदर
नेहेमीप्रमाणेच नितांतसुंदर आरस्पानी निखळ लिखाण
मनापासून धन्यवाद
माझ्या फोन मध्येही माझ्या
माझ्या फोन मध्येही माझ्या मामाचा no अजूनही सेव्ह आहे,अगदी अचानक आणि अकाली गेला तो,
घरगुती वादांमुळे बोलणं बरेच वर्ष बंदच होत पण तो जायच्या आधी 4 5 महिने मी त्याला व्हाट्सआप वर msg टाकले होते,बोलायचे आहे म्हणून आणि एकदा फोन पण केला पण त्याने उचलला नाही की msg ना reply पन दिला नाही,
आता कधीतरी आठवण आली की ते msg वाचते खूप वाईट वाटतं ,
थोडा अजून कमीपणा घेऊन पुन्हा फोन किंवा डायरेक्ट भेट घेतली असती तर ....
पण ही रुखरुख आता आयुष्यभर पुरेल मला
पन्ना नेहमीप्रमाणेच खूप छान
पहिला प्रसंग खूपदा ऐकला आहे ,खूप जास्त गंमत तेव्हा वाटते जेव्हा आई गोरी नि बाबा सावळे(कॉमन कॉम्बिनेशन)असतात,तेव्हा मुलं आईवर गेलीत हा असं म्हटलं की आई बाबा दोघे खुश होतात,आणि बाबा वर गेली म्हटले की दोघ पण कसनुस तोंड करतात
आपल्याकडे सावळ्या रंगा कडे असं बघणं खूप कॉमन झालंय, असो
अवांतर झालं बहुतेक,पण तो प्रसंग वाचल्यावर पटकन डोक्यात आलं
नका हो असं लिहु. तीळतीळ तुटतो
नका हो असं लिहु. तीळतीळ तुटतो जीव आत कुठे.(नीला मावशीचा पॅरा वाचुन)
आईच्या फोनमध्ये अजूनही तिचा नंबर सेव्ह्ड आहे. त्या नंबरवरून कधीही फोन येणार नाही हे माहित असतानाही.
माझा एक स्वीस काऊंटर पार्ट वारला कॅन्सरने. लिंकडीनवर/स्काईपवर आठवणीने मेसेज टाकतो. माहित आहे की तो मेसेज कोणी वाचणार नाही किंवा कधीच त्याचं उत्तरही मिळणार नाही तरीही
आपल्या आयुष्यात आलेला कोणी व्यक्ती पुन्हा कधीच दिसणार भेटणार नाही ही भावनाच हृदयविदारक असते.
खुप छान हा पन्ना
खुप छान हा पन्ना नेहमीप्रमाणेचं.
खुप जवळची माणसं अचानक गमावल्यामुळे नीलामावशीचा किस्सा वाचताना आतून तुटल्यासारख झालं,
शेवटची वाक्ये ही सुरेख !
सगळेच प्रसंग सुरेख
सगळेच प्रसंग सुरेख
नेहमीप्रमाणेच सुरेख!
नेहमीप्रमाणेच सुरेख!
स्वप्ना, अतिशय खरंखुरं
स्वप्ना, अतिशय खरंखुरं लिहिलंयस. तरल पण काही तरी टोचणी लावणारं.
जगासमोरचं रुप, अभिनय उतरवुन खर्या खर्या स्वतःचं रुप बघावं असं वाटतं तुझे पन्ने वाचताना.
अनया , निल्सन , चैत्रगंधा,
अनया , निल्सन , चैत्रगंधा, कविन , सनव , स्वाती२, rmd, मंजूताई , जिज्ञासा, मऊमाऊ , मीरा.. , हर्पेन , आदू, जेम्स बॉन्ड, आसा. , ए_श्रद्धा, चनस , सस्मित....सर्वांचे मनापासून आभार
खूप सुरेख
खूप सुरेख
नेहमीप्रमाणे तरल आणि सच्चे
माझे आणी आईचे बोलणे रोज
माझे आणी आईचे बोलणे रोज व्हायचे , कधी कधी 3 4 वेळेस सुद्धा, मग मला खूप कंटाळा यायचा बोलण्याचा, मग चिडून आईला म्हणायची की बंद कर फ़ोन मला खूप काम आहे, यानंतर माझी आई अचानक गेली गेल्या ऑगस्टमध्ये कॅर्डीक आरेस्ट ने, आता आईच्या landline वरून कधीही फोन येत नाही, खूप वाट पाहते त्या फोन ची , तो आजून तसाच सेव आहे,
नेहमीप्रमाणेच खूप छान!
नेहमीप्रमाणेच खूप छान!
नेहमी प्रमाणेच हृद्य
नेहमी प्रमाणेच हृद्य
हा पन्नादेखील सुंदर लिहिला
हा पन्नादेखील सुंदर लिहिला आहे.
मला हे काहीतरी पिक्चर बद्दल
मला हे काहीतरी पिक्चर बद्दल असेल असे वाटल्याने कधी वाचले नव्हते, पण आज चुकून उघडले अन वाचले तर खूपच आवडले, आता वेळ मिळेल तसे बाकीचे पनने वाचेन
पन्ना खूप छान, हृदयस्पर्शी
पन्ना खूप छान, हृदयस्पर्शी अगदी.
हा पन्ना........ नंबर अजूनही
हा पन्ना........ नंबर अजूनही सेव्ह!!!!!!!!! जियो