देशी फुलझाडांच्या मालिकेतील सहावे फुल ताम्हण.
एक मे महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करतात . विधान भवनावर रोषणाई करतात . महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आढळते अशावेळी ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात आपले स्वागत करायला रस्त्याच्या दुतर्फा ताम्हण आपली जांभळी तुरे घेऊन आपल्याला खुणावत असतो . एक मे महाराष्ट्र दिनाच्या काळात तो बहरून येतो. तो आहे आपला ताम्हण , म्हणजेच महाराष्ट्राचे राज्य फुल.
आपल्या लालसर ,जांभळ्या ,गुलाबी पांढरट रंगामुळे ताम्हण उन्हाळ्यात उठून दिसतो. गोल डेरेदार आकाराचा मध्यम उंचीचा फुलतो ताम्हण. ताम्हणाचे वैशिष्ट्य असे की लहान लहान झाडांना फुलं येतात . फुलातील रंगसंगती अप्रतिम असते . शांत शीतल प्रसन्न रंगाच्या पाकळ्या त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे नाजूक पुंकेसर . फुलात पुंकेसर थोडे जास्तच असतात स्पर्श केला तर हाताला पिवळ्या रंग चिकटतो,पाकळ्या खूप भुसभुशीत असतात .पाकळी बहुतेक जांभळट गुलाबी मउसुत एकदम तलम. फुलं उगवण्याआधी फुलोरा बंद कळीच्या आवरणात दडून बसलेला असतो. त्यातून गडद जांभळी पाकळी बाहेर डोकावून अंदाज घेत असते .तिसऱ्या दिवशी पटापटा मुलं वर्गाबाहेर पडतात तशा सर्व पाकळ्या कळीतून बाहेर येतात आवरण झिडकारून देतात आणि मग दिसते प्रसन्न ,शांत ,कातीव डहाळी .पूर्ण फुल उमलल्यावर सहा सात सेंटीमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. ताम्हणाला वसंतात नवी पालवी फुटते. पालवी फुलल्यावर झाड पोपटी रंगाचे दिसू लागते. तकतकीत , कोवळा तजेलदार पोपटी रंग.पालवी फुलली की लगेच मागोमाग ताम्हणाची फुलं येण्याची घाई करतात . 25 ते 30 सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्याजवळ येऊ लागतात.ताम्हण विदर्भात सर्वत्र आढळतो .गडचिरोली चंद्रपूर नागपूर जंगली भागात उष्ण दिवसात डोळ्यांना शांत करायला आणि वनसौदर्यात भर घालायला ताम्हण येतो . नागपूरला रामनगर चौकातील बाजीप्रभू देशपांडेच्या पुतळ्या कडून वर हिल टॉप ला जातांना आणि अंबाझरी मार्गाला येताना दोन्ही बाजूनी फुललेला दिसतो. अगदी नजरेत भरण्यासारखा. वनांची शोभा वाढवण्याचे काम ताम्हण सांभाळतो. आणि म्हणूनच राज्य फुलांचा दर्जा सांभाळण्यासाठी तो योग्य आहे. ताम्हण बुंद्रा ,बोंद्रा ,जारूळ या नावानेसुद्धा ओळखला जातो . मोठा बोंडारा असेही याचे नाव आहे. हिंदीत त्याला जारुल असे संबोधतात .लॅटिन नाव लँगस्ट्रोमिया रेजिनी आहे. रेजिनी म्हणजे राणीचा, स्पेसिओसा म्हणजे अतिशय सुंदर .बंगालीत याला जारूल, अजहार असे नामाभिधान आहे. याचे खोड आणि खांद्याची साल पिवळसर करड्या रंगाची गुळगुळीत असते. निलगिरीच्या खोडासारखी खोड दिसते . सालीचे पापुद्रे आणि पातळ ढलप्या गळून पडतात .पाने एकासमोर एक साधी मोठी लांबट व टोकदार असतात. वरवर बघितलं तर सिताफळाच्या पानांसारखी दिसतात . पाने वरच्या बाजूने गडद हिरवी गार आणि खालून फिकट हिरवी दिसतात . शिशिरात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात . झाडाचे रूप अत्यंत देखणे असते. फुलांचा बहर दोन ते तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या उन्हातही हे फुल सर्वांना हवेहवेसे वाटते. झाडाचे लाकूड उंच , मजबूत टिकाऊ, चमकदार ,लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही ते लवकर कुजत नाही ,त्यामुळे बंदरांमध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी लाकूड वापरतात . त्याचा वापर इमारती पूल आणि विहिरीचे बांधकाम जहाज बांधणी रेल्वे वॅगन अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी होतो . झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास सालीचा काढा देतात .
फुल कोमेजले की झाडावर बोंडे तयार होतात .काळपट रंगाची हलकी बोंडे तुर्यासारखी असतात. पावसाळ्यात वाऱ्याने इकडेतिकडे पसरून रोपे उगवतात. या बियांपासून नर्सरीत रोपे तयार करतात . फळे आधी हिरवी ताठ असतात नंतर काळी पडतात व हलकी होतात. घुंगरा सारखी वाजतात. ताम्हण हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे .आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडातील जंगलाच्या सर्व प्रकारात आढळतो. साल व पाने रेचक असून बिया मादक आहेत .पानात व फळात हायपोग्लिसेमिक हे मधुमेहावर गुणकारी द्रव्य आहे .या लाकडाला उधई लागत नाही. याच्या पानांपासून व वाळलेल्या फळांपासून चहा सारखे पेय बनवतात.कोकणात, मुंबईत ताम्हण आढळतो. ताम्हणाला पाणी भरपूर हवे.भरपुर पाणी आणि योग्य हवामान असले तर ताम्हण कधी दोनदाही फुलतो.महाराष्ट्रात सर्वत्र आढळणाऱ्या ताम्हणाचे चित्र इयत्ता पाचवीच्या बालभारती पुस्तकाच्या मुखप्रुष्ठावर आहे.पुस्तकाची ओळख करून देतांना या ताम्हणाची माहिती आधी सांगाविच लागते. अशा प्रकारे मुलांना ताम्हण परिचयाचा आहे.
महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण
Submitted by मंगलाताई on 19 July, 2020 - 11:03
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फुलापेक्षाही याच्या
फुलापेक्षाही याच्या फांद्यांमुळे महाराष्ट्राचा वृक्ष केला असावा.
याच्या पानांपासून व वाळलेल्या
याच्या पानांपासून व वाळलेल्या फळांपासून चहा सारखे पेय बनवतात.
-- पेय बनवायची कृती माहित आहे का? इथे बंगळुरात घरासमोर आहे. चिक्कार फळं/फुलं येतात.
छान माहिती.
छान माहिती.
हे राज्य फूल असल्याची माहिती नव्हती
फुलापेक्षाही याच्या
फुलापेक्षाही याच्या फांद्यांमुळे महाराष्ट्राचा वृक्ष केला असावा.
>>>
पण ते राज्य फूल आहे ना.. राज्य वृक्ष नाही
छान माहीती!
छान माहीती!
निगडीत बरीच झाडे आहेत याची