आज खूप दिवसांनी दादाबरोबर सकाळी गप्पा मारत बसायचा योग आला. गेले अनेक दिवस संध्याकाळी आषाढात पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे आमचे संध्याकाळी आट्ट्या पाट्ट्या , विट्टी दांडू खेळणे बंद होते. मग सूर्यास्तानंतर पश्चिमेच्या वाऱ्याबरोबर रंगणाऱ्या गप्पा गोष्टी पण बंद होत्या. आषाढी एकादशी साठी आमच्या गावातून पण वारीसाठी लोक जात. माझे काका आणि आजोबा नेहमी वारीला जात असत. बाबांना शेतीच्या कामांमुळे गावातच राहावे लागत असे. मी पण मोठा झाल्यावर वारीला जाईन असे नेहमी ठरवत असे.
आषाढ सरून श्रावण आला तशी आमच्याबरोबरच पावसाची पण लपाछपी सुरु झाली. आज रविवार, शाळेला सुट्टी मग आम्ही सकाळीच खेळायला एकत्र आलो. सकाळी सुखद उन्हाची किरणे अंगावर पडत होती, थोड्या वेळाने पावसाची सर येऊ लागली तसे आम्ही ओसरीवर जाऊन बसलो. श्रावण महिना सगळ्या सणांचा महिना.. आषाढी एकादशी होऊन गेल्याने अजून ज्ञानेश्वर माउली तुकाराम तुकाराम चा गजर अजून मनात रेंगाळत असतो.. अशा एका पावन वातावरणात ऊन पावसाच्या लपाछपी मध्ये आम्ही शाळेच्या कट्ट्यावर खूप दिवसांनी दादा बरोबर बसलो होतो.. या पावसाळ्यात शाळेच्या मागच्या टेकडीवर लावलेल्या झाडांना खत घालण्यासाठी शेणखत घेऊन एक बैलगाडी टेकडीवर चढू लागली.. "येवढी वजनदार गाडी चढावर ओढून नेणे किती जड जात असेल?.. ", गाडीकडे बघून अश्रफ म्हणाला.
"आमच्या जवळच्या तालमीत व्यायाम म्हणून तिकडचे मल्ल चढावर गाडी ओढून नेत असत.. ", पंड्या म्हणाला..
"अरे हो, त्यावरून गाडीवान आणि सैतानाची गोष्ट आठवली.. ", दादा म्हणाला.. आम्ही लगेच सगळे कान देऊन ऐकायला लागलो..
"आटपाट नगर होतं.. टेकडीच्या पायथ्याशी जवळ वाहणारी नदी.. गावातली लोक खाऊन पिऊन सुखी होती.. ", दादा सांगू लागला.. " एकदा उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते, पावसाळा येऊ घातला होता.. गावातल्या भगताने सांगितले कि, बाबांनो आज ऊन तापतंय पण या वर्षी मोठा पूर येणार, सगळं गाव वाहून जाणार.. तुम्ही वरती डोंगर माथ्यावर जाऊन वस्ती करा.. "
"या भाकिताने सगळेच घाबरले, आपले गाडे तयार केले, त्यात सामान-सुमन, कपडा - लत्ता बांधला.. आणि डोंगर माथ्यावर गाडे ओढून नेऊ लागले.. ज्यांच्याकडे बैल होते त्यांचे गाडे बैल ओढत, ज्यांच्याकडे बैल नव्हते त्यांच्या घराचे पुरुषमाणसे गाडा ओढून नेऊ लागले.. डोंगर माथ्यावर जाताना भयंकर चढ होता.. दुपारचे ऊन तापले होते .. बैलही थकले होते.. गडी माणसांची तर दैना पाहवत नव्हती.. घामाच्या धारा वाहत होत्या, तोंडाला कोरड पडलेली... श्वास घेणं अवघड... चढावर गाडी थांबवता येईना.. नाहीतर ती मागे घसरू लागली.. "
"त्यातल्या एका गाडीत एक तरुण मुलगा आपल्या कुटुंबासमवेत होता, त्यांच्या आणि शेजारच्या घराचे आजे - आज्या त्या गाडीत होते.. सामान-सुमन होत.. पुढच्या गाडीत बाया-बापड्या होत्या आणि घरातली बैलं गाडी ओढत होती तर ही गाडी घरातला गडी ओढत होता.. त्याची अवस्था बघवत नव्हती.. "
"त्याच्यासाठी काय करता येईल... तरुणाने विचार केला.. ", इतक्यात हे सैतानाने ऐकले... त्याने लगेच त्या तरुणाला सांगितले.. "अरे त्या समोरच्या म्हाताऱ्याचं सामान दे टाकून दरीत... तेवढाच गाडीवानाचा भार कमी.. या म्हाताऱ्याला काय करायचंय एवढे सामान.. ", मुलाला पटले, त्याने समोरच्या म्हाताऱ्याचं सगळे सामान खाली दरीत टाकून दिले,, म्हातारा चिडला, आरडा ओरडा करू लागला. मी माझ्या सामानाशिवाय कसा राहणार म्हणून आक्रन्दन करू लागला.. शेवटी सगळ्यांनी गाडी थांबवली आणि गड्याला सांगू लागले चल परत खाली दरीत पडलेले सामान घेऊन परत वर जाऊ. चढावर गाडा ओढून थकलेला गडी संतापला मुलाला शिव्याशाप देऊ लागला..
आपण या गड्यासाठी येवढा धोका पत्करला आणि वर शिव्याशाप ऐकायला मिळाले या विचाराने मुलगापण निराश झाला... मग सैतानाने त्याला सांगितले... "बघ पाहिलेस ना... असं होतं..म्हणूनच आपण आपले मजेत राहावं.. उगीच का चार लोकांना मदत करायला जावं? ते त्यांचं बघून घेतील... जो तो आपल्या कर्माची फळ भोगत असतो... " मुलाला हे पटलं .. तसाच गाडीत टेकून आरामात थोडावेळ बसला.. आता गाडीवानाची परिस्थिती दयनीय झाली होती, तोच चढ त्याने दोनदा चढवला होता... आता पुढे गाडी ओढवेना.. कधी मधी गाडी मागे जाऊ लागली... हे पाहून मुलगा घाबरला. देवाचा धावा करू लागला..
देव म्हणाला, "अरे तुला गाडीवानाला मदत करायची असेल तर तू पण गाडी ओढायला लाग... एक तर गाडीचं वजन कमी होईल आणि गाडीवानाच्या हाताला दुसऱ्या हातांची मदत... " मुलाला आपली चूक समजली, त्याने गाडीवानाला गाडी डोंगरमाथ्यावर न्यायला मदत केली..
दादा,, पुढे सांगू लागला... "आमचे पण असच होतं.. इतरांच्या भल्यासाठी आम्ही अधर्माचा, अनीतीचा मार्ग वापरतो... आणि मग त्यातून नवीन समस्या निर्माण होतात... आणि मग आम्हाला वाटते कि आम्ही इतरांचं भलं करायला जायलाच नको होत... म्हणून आम्ही परत.. आमच्या छोट्या जगात परत जातो... गरजवंतांना विसरतो... देवाला विसरतो... इतरांना मदत अवश्य करावी पण नीती, धर्म विसरू नाही... अगदी अशक्यच असेल तर आपण काही दुराचरण करतो का? , काही अनीती करतो का? याचा विचार करावा...
आम्ही सगळी कान देऊन ऐकत होतो... दादा, तू सांगितलेली येशू ख्रिस्ताची आणि चिडलेल्या माणसांची गोष्ट सांग ना... पंड्या म्हणाला... "येशूने पकडलेल्या स्त्रीला मारण्याआधी आपली कर्म तपासायला सांगितले होते.. तीच ना.. ?" गोविंद म्हणाला..
"हो, तीच... ", अश्रफ म्हणाला..
"संतांनी, आत्मशुद्धीचा मार्ग समाजाला सांगितला..", दादा सांगू लागला.. संत गोरा कुंभार सांगतात,
देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म ।
सदाचार नीतिविण आगळा न धर्म ।
तुला आठवावे गावे, हाच एक नेम ।
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ।।
..सदाचार.. नीती... जीवनात उतरली की.. धर्म जीवनात उतरला...दादा.. सांगत होता आणि आम्ही रंगून जाऊन ऐकत होतो.. तेवढ्यात आमच्या आया जेवायला घरी बोलावू लागल्या..
पोटात भूक असली तरीही आज सकाळी दादाकडून मिळालेली शिदोरी आयुष्यभर पुरणार होती..
छान !
छान !
खूप छान....
खूप छान....
आज खूप दिवसांनी लेख लिहायला आहे तुम्ही खूप छान वाटले वाचून.