निघे पंढरीची वारी, सज्ज सारे वारकरी
अद्भुत तो सोहळा, विठ्ठल विठ्ठल गजरी
आळंदीची ग माउली, पालखीत विराजित
तुकोबाची पालखी, देहूमधून निघत
विठू दर्शनाची हाव, मनी भक्तीचा तो भाव
सद् वृत्तीचा स्वभाव , वारकरी त्याचे नाव
गळा तुळसीची माळ, तुळशीवृंदावन डोई
टाळ वाजवीत चाले, नाम विठोबाचे घेई
अनवाणी तो चालत, ऊन अन पावसात
भाव भोळा तो भक्तीत , ठेवे हरी स्मरणात
हाती पताका भगवी, रिंगणात तो नाचवी
‘ज्ञानोबा तुकाराम’, मुखे गजर करवी
अश्व दौडे रिंगणात, विठ्ठलाच्या भजनात
मृदुंगाच्या गजरात, वारी पंढरीस जात
वारी भक्तीत तल्लीन, गाती विठूचे भजन
पाय चालतात वाट, ते सतत रात दिन
आषाढी एकादशी, गाठे पंढरीचे स्थान
चंद्रभागेतले स्नान, मग विठूचे दर्शन
मूर्ती पाहुनी विठूची, मिठी पायाशी घालत
मिळे भक्तीचे ते फळ, भेट शिवाशी घडत
साठवून त्याचे रूप, डोळा आसवे ढाळीत
माझ्या विठूची ग गाठ, आता पुढील वारीत
माझ्या विठूची ग गाठ, आता पुढील वारीत !!!
- मानसी बर्वे
१० जून २०२०