नेमका रात्रीच त्याही जागलो मी

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 2 July, 2020 - 14:47

बंद केले पापणीला साचलो मी
आग झाली आसवांची भाजलो मी

वेदनांचा कैफ आता काय सांगू
भान जाण्या वेदनाही प्यायलो मी

दूर जा तू फार माझ्या सावलीच्या
ना तसाही फार कोणा लाभलो मी

रात्र नेली तारकांनी चोर वाटे
नेमका रात्रीच त्याही जागलो मी

खूळ होते आंधळे डोक्यात काही
काय होतो रे जगाशी भांडलो मी

अर्थ का केव्हा कधी शब्दास होता
जो फुकाचा खूप तेव्हा गाजलो मी

टाळले होते कुणी का आरशाला
तेवढा होतो मलाही लाजलो मी

राहिलो ना मी जुना हा बोल त्यांचा
वेगळा होतो कधी का वागलो मी

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त: मंजुघोषा
(गालगागा गालगागा गालगागा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"दूर जा तू फार माझ्या सावलीच्या
ना तसाही फार कोणा लाभलो मी" ---> अप्रतिम निलेश दादा कसलं भारी लोहीलय. पोळलं दादा, पोळलं !!

"टाळले होते कुणी का आरशाला
तेवढा होतो मलाही लाजलो मी" ---> आई आई गं!!

हे मला असलं खरं आवडत नाही ख्याल निवडून सांगायला.
हे असं सांगणं म्हणजे एकाच आईची लेकरंं आणि त्यांत कोण चांगल कोण वाईट निवडण्यासारखं आहे.
अख्खी गझल बाप लिहीलीय!

प्रगल्भ
खूप खूप धन्यवाद
मी आत्ताकुठे गझल शिकतोय.
असे प्रतिसाद म्हणजे माझ्यासाठी टॉनिक आहे
Happy