खेळ: भाग ३.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 July, 2020 - 10:18

खेळ: भाग २ https://www.maayboli.com/node/75159

तसा दादूचा विचार क्लीअर होता. गुन्हेगारी विश्वाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी वाचून बघून त्या जगाची बरीच माहिती होती. जगण्याचा हक्क नसलेली अनेक माणसे गुन्हेगारीच्या राजकारणी आधाराच्या जोरावर ज्यांनी जगायला पाहिजे अश्या लोकांचा जीव घेत होती, त्यांचे जगणे मुश्किल करत होती. लाटकरांच्या मदतीने कोवळ्या वयात पहिली सुपारी वाजवल्यावर दुसरी जोखीम त्याला लवकर घ्यायची नव्हतीच, आणि म्हणूनच सोबत घेतलेला भाजीपाला इमानेइतबारे विकून आलेल्या पैशाचं काय करायचं याचा विचार करत तो आपल्या खोलीवर परतत होता. घरापासून बऱ्यापैकी दूर असलेला तो देशी- गावठी दारूचा गुत्ता बरेच दिवस त्याला खुणावत होता. तिथली रंगीत दुनिया, उदार होऊन खर्च करणारी गरीब मंडळी बघून त्याचे डोळे लकाकले. खिशातल्या पैशाचं काय करायचं याचं उत्तर त्याला मिळालं होतं.

बापापासून लपवलेल्या पैश्यातून दुसऱ्या दिवशी पुन्हा ठोक बाजारात जाऊन दादुने भाजीपाला घेतला. संध्याकाळी लवकरच आवर सावर करून दादू त्याच्या घराशेजारच्या भोई मावशीकडे पोचला. फुटाणे, दाणे, खारवलेल्या/ तळलेल्या डाळी, शेव आणि कुरमुरे घेऊन त्याने डब्यात घातले. बाजारातून आणलेली मटकी, कांदे लिंबू आणि टमाटे कापून घेतले. दादू आता त्याचा वेगळाच चकणा घेऊन गुत्त्यावर पोचला. सारख्याच किमतीत चांगलं चटपटीत खाऊन रोज पिणारे बेवडे खुश झाले. होणारी कमाई पाहून दादू पण खुश झाला. तास दीड तासात आणलेला सगळा माल संपला आणि दादू खिशातले पैसे चाचपत घरी पोचला. हेच दादूचं रोजचं आयुष्य झालं. दादूचा बाप पण पोरगं कमावतय असं पाहून खुश होता.

असं सगळं निवांत सुरु असलं तरी रोजच्या बातम्यांवर, उडणाऱ्या अफवांवर दादूचं व्यवस्थित लक्ष होतं. लाटकरांनी निर्धास्त केलं असलं तरी त्याच्याकडून दादू पूर्ण काळजी घेत होता. लाटकर अधून मधून सुपारी कुणी दिली विचारत, पण दादू मूग गिळून गप्प बसत असे. अर्थात लाटकरांना कल्पना होतीच! तरीही ते उगाच त्याला पिळत होते. अनेक प्रकारे बोलतं करण्याचा प्रयत्न करूनही दादाराव हुं कि चूं करत नसे. एक दिवस मात्र थोडा वेगळा उगवला.

लाटकरांनी दादारावच्या बापाला कोठडीत घेतला होता. काहीतरी फालतू कारण होते, पण जसे दादारावला आपल्या बापाला कोठडीत घेतल्याचे समजले तसा तो हादरला. गुत्त्यावरचा आपला धंदा सोडून तो पोलीस स्टेशन कडे धावत सुटला. धावत धावत त्याची विचारचक्रे सुरूच होती, आणि अचानक तो थांबला. मोठा श्वास घेऊन रमत गमत पुन्हा स्टेशनच्या दिशेने चालू लागला. आपल्या बापाला कोठडीत घेण्याचे कारण त्याला समजले होतेच. लाटकरांनी हरप्रकारे विचारून देखील दादुने तोंड उघडलं नव्हतं. अखेरीस त्यांनी दादाराव आणि त्याच्या बापाला सोडून दिलं. दुसऱ्याच दिवशी होता नव्हता तो संसार गोळा करून दादाराव आणि एकनाथराव पाटील मम्बाई सोडून गावी रवाना झाले.

खिशातले उरले सुरले १८-२० हजार वाणीशेठला देऊन बापलेकांनी जमीन पुन्हा ताब्यात घेतली. एका तुकड्यात माळवं करून आणि राब राब राबून बरीचशी रक्कम त्यांनी मोकळी केली होती. आताशा दादाराव शेतात खपून झाल्यावर संध्याकाळी पाखरं हुलायचा बराच सराव करत होता. मुंबई सोडून वर्ष झालं होतं.तसं शेतमाल घेऊन/ काही ना काही कामाने दादाराव मुंबईत जात होता. पण जुन्या वस्तीकडे जाणं त्याने टाळलं होतं. रंग्याच्या गॅंगचं विरोधी गॅंग सोबत गॅंगवॉर होऊन बरेचशे खलास झाले होते. पोलिसांना डोकेदुखी झाली होती, पण तरीही काही प्रमाणात कानाडोळा सुरू होता. अर्ध्याहून अधिक गॅंग संपली तेव्हा अशी कुणकुण उठू लागली कि हे गॅंगपैकी कुणाचंच काम नव्हतं! अर्थात रंग्या सारखे मेले काय जगले काय कुणाला फरक पडत नसल्याने, हि कुणकुण हवेत विरून गेली.

पण.... ज्यांना फरक पडलेला असतो ते लोकी मात्र विसरत नसतात.

- राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पु भा ल टा...

(तुमच्या पंगे घेण्यामुळे वाचक दुरावले बघा!)

वाचणारे वाचतील, प्रतिक्रियांनी हुरूप येतो खरा.. पण नाही आल्या म्हणून लिहिणे थांबत नाही.. असो, पुढील भाग येत्या शनिवारी.. रविवारी the end!

एका तेलगू चित्रपटाशी साम्य असणारे कथानक ठरवले गेल्याने आणि चित्रपट पाहिल्यावर ते काही अंशी खरे वाटत असल्याने ही कथा थांबवली होती. पण वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून कथा पुढे लिहिणार आहे. बघू कधी मेळ लागतोय ते