विरही प्रीत

Submitted by Asu on 29 June, 2020 - 06:47

विरही प्रीत

कोरोनाचा कहर होता
रस्तेही होते सुने सुने
लपून घरात बसले सगळे
कुणी अधिक कुणी उणे

तशात ठरले लग्न माझे
माझेच मला झाले ओझे
त्याची सांगतो चित्तरकथा
ऐका मित्रहो मनीची व्यथा

भेटी-गाठी कुठले फिरणे
चार चार हात दूर राहणे
मुसक्या आड ओठ सुकले
हसणे लाजणे तेही लपले

तृषार्त आम्ही विरही प्रीत
कोरोनाची विपरीत रीत
पाणीच पाणी जरी चहूकडे
दोघेच आम्ही परी कोरडे

आठवले मज बैल बिचारे
हिरव्यारानी मुख बंद का रे?
बांधले मुसके मुखावरती
हिरवा चारा खाऊ न शकती

लहानमोठे कुणी न घाईत
झाली आमचीच पंचाईत
म्हणाले कोरोना जाऊ देऊ
एक वर्षांनी म्हणे लग्न ठेवू

सॅनिटायझरने मेहेंदी मिटली
रंगण्याआधीच रुसून बसली
धुऊन धुऊन हात थकले
डोळ्यांमधले स्वप्नही पुसले

कठीण शब्द:
मुसकं- उभ्या पिकात काम करतांना व मळणी करतांना बैलांनी ते खाऊ नये म्हणून बैलांच्या तोंडास बांधावयाची दोऱ्यांची जाळी.

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.29.06.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults