जाळं (भाग५)

Submitted by मोरपिस on 13 June, 2020 - 05:53

जाळं(भाग ४) - https://www.maayboli.com/node/75038

"तनिष्का!" विनीत जोरात किंचाळत तनिष्काच्या डेड बॉडीकडे झेपावला. पण विराज त्याला थांबवत म्हणाला,"विनीत, प्लिज, सांभाळ स्वतःला! पोलीस येईपर्यंत बॉडीला हात लावायचा नसतो".
विनीत रडत म्हणाला,"ही, ही बॉडी नाहीये, माझी तनिष्का आहे! माझी बायको! माझा जीव!' तो हमसून हमसून रडत खाली बसला.
विराजने लगेच पोलिसांना कॉल करून रिसॉर्टमध्ये घडलेल्या सर्व घटनांची माहिती दिली. आणि फॉरेन्सिक एक्सपर्टसह रिसॉर्टला यायला सांगितलं. थोड्या वेळातच पोलीस आले. आतापर्यंत दिवसाचा प्रकाश चारी दिशेला पसरला होता. फॉरेन्सिक एक्सपर्ट लगेचच त्यांच्या कामाला लागले. पोलीस इंस्पेक्टरनी त्यांच्या सहकार्यांना पूर्ण रिसॉर्टची व्यवस्थित तपासणी करायला सांगून विराजला विचारलं,"मला पूर्ण तपशीलवार सांगा की काल रात्री आम्ही गेल्यानंतर रिसॉर्टमध्ये काय-काय घडलं?"
विराज थोडा विचार करत म्हणाला,"घडलंय तर बरच काही! काहीतरी विचित्र, भयानक, रहस्यमय! तुम्ही गेल्यानंतर आम्ही सगळे आपापल्या रूममध्ये गेलो झोपायला. पण थोड्या वेळाने कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. कोण रडतंय हे बघण्यासाठी मी आणि नीरजा बाहेर आलो. तेवढ्यात टेरेसवर काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं. नंतर संतोष आणि नुपूरसुद्धा आली. रेहानसुद्धा आला होता. नुपूर आणि निरजाला तिथेच थांबवून आम्ही टेरेस आणि बाल्कनीची पहाणी केली. पण एक बियरची बाटली आणि सँडलच्या हिलशिवाय तिथे आम्हाला काहिच मिळालं नाही. जेव्हा आम्ही पहाणी करून खाली आलो तेव्हा आम्हाला नीरजा आणि नुपूर दोघीही दिसल्या नाहीत. आम्हाला वाटलं रूममध्ये गेल्या असतील. मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. थोड्याच वेळात नुपूर रूममध्ये नसल्याचं संतोषने मला सांगितलं. आम्ही त्यांना शोधत शोधत विनीतच्या रूममध्ये गेलो तेव्हा समजलं की तनिष्कासुद्धा गायब आहे. आम्ही जेव्हा गौतमच्या रूममध्ये गेलो तेव्हा तिथे तनिष्काची सँडल मिळाली… ज्याची एक हिल तुटलेली होती".
"ही केस खूप गुंतागुंतीची होत चाललेय!" इन्स्पेक्टर विचार करत म्हणाले.
संतोष इंस्पेक्टरसमोर हात जोडून रडवेल्या स्वरात म्हणाला,"सर! तुम्ही प्लिज माझ्या नुपुरला शोधून द्या. काय माहीत कशी आणि कोणत्या अवस्थेत असेल माझी बायको!"
विराज संतोषला धीर देत नरमाईने म्हणाला,"डोन्ट वरी! नुपूर रिसॉर्टमध्येच असेल कुठेतरी. आता पोलीससुद्धा रिसॉर्टच्या कानाकोपर्यात तिला शोधतायय. ती लवकरच भेटेल आपल्याला!"
संतोष त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला,"नुपूर एकदा मिळू दे. मी लगेच तिला घेऊन माझ्या शहरात परत जाईन".
त्यांचं बोलणं मध्येच थांबवत इन्स्पेक्टर म्हणाले,"जस्ट मिनिट मिस्टर संतोष! जोपर्यंत ही केस सॉल्व होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे शहर सोडून कुठेही जाता येणार नाही. ओके!"
संतोष विरोध करत हळू आवाजात म्हणाला,"पण सर! आम्ही इथे कसे काय राहू शकतो? इथे प्रत्येक क्षणी आमच्या जीवाला धोका आहे".
"संतोष! आपल्याला इथे रहावं तर लागेलच!" विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
तेवढ्यात विनीत त्वेषाने म्हणाला,"सर! तुम्ही माझ्या तनिष्काच्या खुन्याला लवकरात लवकर शोधून काढा. मी शोध लागेपर्यंत रिसॉर्ट सोडून कुठेच जाणार नाहीये".
इंस्पेक्टरनी विराजला विचारलं,"एक गोष्ट मला समजत नाहीये की मिस्टर गौतम अजूनपर्यंत आपल्या रूममधून बाहेर कसे आले नाहीत? तनिष्काचा मर्डर झालाय हे त्यांना माहीत नाहीये का?"
विराज लगेच म्हणाला,"अरे हो! याचा तर मी विचारच केला नाही. चला गौतमच्या रूममध्ये जाऊया. कदाचित त्याला काहीतरी माहीत असेल नुपूर आणि तनिष्काबद्दल! कारण तनिष्काची सँडल गौतमच्याच रूममध्ये मिळाली होती".
"असं असेल तर आम्हाला पूर्ण रूमची तपासणी करायला लागेल". इंस्पेक्टरने गौतमच्या रूमकडे जात म्हटलं.
विराज आणि इन्स्पेक्टर दोघही गौतमच्या रूममध्ये पोचले. गौतम अजून झोपलेलाच होता. इन्स्पेक्टर तिखट स्वरात म्हणाले,"घ्या! साहेबांच्या रिसॉर्टमध्ये मर्डरवर मर्डर होतायत आणि हे आरामात घोरत पडलेत!"
विराज हळूच म्हणाला,"इन्स्पेक्टर, हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपलाय. तुम्ही हे विसरताय की सर्वात आधी गौतमच्याच वाईफचा मर्डर झाला होता".
इन्स्पेक्टर नरमाईने म्हणाले,"मला समजतंय पण…… पण चौकशी तर करायलाच पाहिजे ना! कारण रिसॉर्ट तर यांचंच आहे आणि तनिष्काचं सँडल आपल्याला याच रूममधून मिळालंय. आता यांना जागवावंच लागेल आपल्याला!"
विराजने होकारार्थी मान डोलवली. नंतर बाजूच्या टेबलवरचा पाण्याचा ग्लास घेऊन त्यातल्या पाण्याचा शिडकावा गौतमच्या चेहऱ्यावर केला. काही क्षणातच गौतमने हळू हळू डोळे उघडले आणि म्हणाला,"अरे विराज! माझ्या रूममध्ये काय करतोयस तू?"
विराजने त्याला आधार देत उठवलं आणि म्हणाला,"विराज! शुद्धीवर ये. आणि आठव, काल रात्री रुहीचा खून झाला होता. मग त्यानंतर… त्यानंतर काय घडलं होतं या रूममध्ये? कोण आलं होतं? काही आठवतंय का तुला?"
गौतमच्या डोळ्यात पाणी आलं. तो लहान मुलासारखा रडू लागला. "रुही! तुला कुणी असं निर्घृणपणे मारून टाकलं गं! आता मी कसा जगू तुझ्याशिवाय!'
विराजने त्याला पाणी दिलं. त्याच्या पाठीवर हात फिरवत शांतपणे म्हणाला,"प्लिज गौतम! असं कमजोर राहून रुहीच्या खुन्याला पकडणं कसं शक्य आहे? प्लॉझ! काहीतरी आठव… काल अर्ध्या रात्रीनंतर या रूममध्ये कोण आलं होतं का? किंवा तनिष्का आली होती का? की नुपूर आलेली रूममध्ये?"
गौतम थोडा वेळ डोळे बंद करून डोक्यावर हात ठेऊन बसून राहिला. थोड्या वेळाने म्हणाला,"मला नीटसं आठवत नाही. पण हा! एकदा मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या रूममध्ये रडतंय".
विराजला आश्चर्य वाटलं,"काल रात्री आम्हालापण कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला होता. म्हणूनच तर आम्ही आमच्या रूममधून बाहेर आलो होतो. तेवढ्यात काहीतरी हालचाल जाणवली म्हणून आम्ही टेरेसवर गेलो".
गौतम आश्चर्याने सगळं ऐकत होता. तेवढ्यात इंस्पेक्टर थोड्या कडक आवाजात म्हणाले,"मिस्टर गौतम, हे जे काही घडतंय ना, ते सगळं तुमच्यामुळे!"
गौतम चिडत म्हणाला,"तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? माझ्याच पत्नीचा खून झालाय आणि तुम्ही मलाच दोषी ठरवताय?"
"याचं कारण हे की तुम्ही तुमच्या रिसॉर्टमध्ये एकही सीसीटीवी कॅमेरा बसवलेला नाहीये" इन्स्पेक्टर कडक आवाजात म्हणाले.
विराजसुद्धा समर्थन देत म्हणाला,"गौतम, तू सीसीटीवी लावला नाहीस ही खूप मोठी चूक केलीस! तुला जरातरी अंदाज आहे का, की तू जर रिसॉर्टमध्ये सीसीटीवी कॅमेरे लावले असतेस तर कधीच आपण रुहीच्या खुन्याला पकडलं असत".
"आणि तनिष्कच्या खुन्यालासुद्धा!" इन्स्पेक्टर म्हणाले.
गौतम गोंधळात पडला. "काय?? तनिष्काचा खुनी? तनिष्काचा खून झाला? कधी? कसा?"
विराज त्याच्याकडे लक्षपूर्वक बघत म्हणाला,"तनिष्काची बॉडी स्विमिंग पुलमध्ये मिळाली. फॉरेन्सिक एक्सपर्ट तपास करतायत! पण हे कळलं नाही की तनिष्काची सँडल तुझ्या रूममध्ये कशी आली?'
गौतम विचार करत म्हणाला,"बहुतेक ही सँडल जेव्हा आधी कधीतरी तनिष्का रुहीला भेटायला आली असेल तेव्हाची असेल!".
विराज म्हणाला,"नाही! ते शक्य नाही! या सँडलची हिल तुटलेली आहे. आणि ती हिल आम्हाला रात्री बाल्कनीमध्ये मिळाली".
इंस्पेक्टरनी त्यांच्या दोन कॉन्स्टेबल्सना बोलावलं. आणि पूर्ण रुममधल्या प्रत्येक वस्तूची व्यवस्थित तपासणी करायला सांगितलं. तेवढ्यात फॉरेन्सिक एक्स्पर्टने इंस्पेक्टरना बाहेर बोलावलं. इंस्पेक्टरबरोबर गौतम आणि विराजसुद्धा बाहेर आले. स्विमिंग पुलाजवळ पोहोचताच फॉरेन्सिक एक्सपर्टनी सांगितलं,"सर! तनिष्काच्या डोक्याच्या मागे बियरच्या बाटलीने वार केला गेला आणि तिला स्विमिंग पुलमध्ये टाकलं गेलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला".
विहान डोळे विस्फारत म्हणाला,"काय? बियरची बाटली?… मला टेरेसवर एक बियरची बाटली मिळाली आहे".
इन्स्पेक्टर म्हणाले,"कुठेय ती बाटली?"
विराज म्हणाला,"ती मी सांभाळून ठेवलेय. आत्ता देतो फॉरेन्सिक एक्सपर्टना! पण मला वाटतं की आपण एकदा दिवसाच्या उजेडात बाल्कनीत जाऊन पाहिलं पाहिजे".
इंस्पेक्टरनी होकार दिला. "गुड आयडिया!"
थोड्याच वेळात सगळेजण बाल्कनीत गेले. दिवसाच्या उजेडात सर्वजण बाल्कनीत जाताच सगळ्यांचा चेहरा घाबरा झाला. बाल्कनीच्या भिंतीवर रक्ताचे डाग होते. जे काल रात्री अंधुक प्रकाशात दिसू शकले नव्हते. विराज त्या रक्त लागलेल्या भिंतीजवळ उभा राहिला आणि म्हणाला,"ओ गॉड! खुन्याने तनिष्काला बियरच्या बाटलीने मारून तिला याच बाल्कनीतून खाली फेकल होतं आणि त्यानंतर तिला ओढत ओढत स्विमिंग पुलमध्ये टाकलं".
इंस्पेक्टरनी खाली वाकून बघितलं. बाल्कनीच्या खाली जमिनीवर रक्त सांडलेलं होतं.
तेवढ्यात रेहान म्हणाला,"पण सर! काल आपण आलो तेव्हा आपल्याला फक्त तुटलेली हिलच मिळाली होती. आणि कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचं निशाणसुद्धा नव्हतं".
विराज त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला,"मग तुला अस म्हणायचंय का, की तनिष्काने आधी स्वतःला बियरची बाटली मारून घेतली. आणि बाल्कनीतून उडी मारली".
रेहान गप्प बसला. तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणाले,"मी लगेच फॉरेन्सिक टीमला टेरेस आणि बाल्कनीतून बोटांचे आणि शुजचे ठसे घ्यायला सांगतो. आणि त्या बाटलीवर कुणाचेतरी ठसे मिळतीलच ना!"
नंतर सगळेजण बाल्कनीतून परत खाली आले. आणि बाल्कनीच्या खालच्या भागात येऊन निरीक्षण करू लागले. तेवढ्यात इंस्पेक्टरना एक कानातलं दिसलं. त्यांनी ते उचललं. ते पाहून विराज म्हणाला,"हे कानातलं तर तनिष्काच्या एका कानाचं आहे. मघाशी मी तनिष्काची डेड बॉडी बघत असताना नोटीस केलं होतं की तिच्या फक्त एकाच कानात तिचं कानातलं होतं. आता हे तर नक्की की तनिष्काला बाल्कनीतून खाली फेकलं गेलं होतं". तेवढ्यात संतोष जवळजवळ रडतच विराजजवळ आला. विराजचे हात पकडून म्हणाला,"विराज, प्लिज! नुपुरलासुद्धा शोधायला हवं! प्लिज काहीतरी कर ना! नाही म्हटलं तरी तनिष्काचा आता मृत्यू झाला आहे. त्यांचा खुनी आज नाही तर उद्या पकडला जाईलच. पण नुपुरपर्यंत जर आपण वेळेवर नाही पोहोचलो तर अनर्थ होऊ शकतो".
काहीतरी बोलण्यासाठी विराज तोंड उघडतच होता इतक्यात दोन हवालदार धावत येऊन इंस्पेक्टरना म्हणाले,"सर! लवकर, लवकर इकडे या आमच्याबरोबर डायनिंग हॉलमध्ये!"

बापरे! आता काय पाहिलं हवालदारांनी डायनिंग हॉलमध्ये! काय घडलं असेल तिथे! नुपूर सापडेल का? कोण आहे जो रिसॉर्टमध्ये खुनाचा खेळ खेळत आहे?

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults