जाळं (भाग ३)

Submitted by मोरपिस on 9 June, 2020 - 05:16

जाळं (भाग २) - https://www.maayboli.com/node/75001

          "विराज, गेट अप! कम ऑन!" नीरजाचा गोड आवाज ऐकताच विराज झोपेतून जागा झाला. त्याची नजर घड्याळाकडे गेली.
"ओ गॉड! एवढा वेळ कसा झोपून राहिलो मी!"
"काल तू किती उशिरा झोपला होतास, म्हणून आज तुला उठायला उशीर झाला. आता उठ पटकन!"
विराजला अचानक काल रात्रीची गोष्ट आठवली. तो परत मनात विचार करू लागला,"काल कोणाच्या किंचाळण्याचा आवाज आला होता? आणि ही निरजासुद्धा काल एवढ्या रात्री कुठे गेली होती?"
तेवढ्यात रूमची डोअरबेल वाजली. निरजाने दरवाजा उघडल्याबरोबर गौतम, विनीत आणि संतोष तिघही आपापल्या वाईफबरोबर बुके घेऊन आत घुसले.
"हॅपी बड्डे नीरजा!" सगळे उत्साहात निरजाला विश करू लागले.
विराजसुद्धा आपल्या बेडवरून उठून स्वतःचे कपडे ठीक करत म्हणाला,"वा! तुम्ही सगळे लवकर तयार झालात आज! हॅप्पी बड्डे रुही!"
गौतम चेहऱ्यावर खोटा राग आणत म्हणाला,"काय यार! अजून झोपला आहेस तू? आम्हाला तर असं वाटलं की तू सकाळी-सकाळी उठून, तयार होऊन नीरजाला विश केलं असशील!"
विराज म्हणाला,"काय माहीत यार असं कसं झालं ते. नाहीतर मी सकाळी ६ वाजताच उठतो".
रुही म्हणाली,"ओके ओके! लवकर तयार होऊन बाहेर लॉनमध्ये या तुम्ही दोघं".
"ओके!थोड्या वेळाने आम्ही सगळे तिकडेच भेटतो आता तुम्हा दोघांना". असं म्हणून सगळेजण बाहेर निघून गेले.
विराजने प्रेमाने निरजाला बॅगमधून एक बॉक्स काढून दिला. "हॅपी बड्डे माय डियर!"
जेव्हा नीरजाने उघडलेल्या बॉक्समध्ये असलेली N लेटरवली रिंग बघितली तेव्हा तिला खूप आनंद झाला.
"ओ! सो स्वीट ऑफ यु!"
विराज स्टाईलने खाली झुकत म्हणाला,"युअर मोस्ट वेलकम!"
          थोड्या वेळाने ते दोघं लॉनमध्ये पोहोचले तेव्हा तिथली सुंदर सजावट बघून दोघही मंत्रमुग्ध झाले. रंगीबेरंगी फुलांनी पूर्ण लॉन सजलं होतं. आणि लॉनच्या मधोमध गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या हार्टमध्ये 'हॅपी बड्डे नीरजा&रुही"असं लिहिलं होतं. गौतम म्हणाला,"काय नीरजा, आवडली का सजावट?"
नीरजा काही बोलणार इतक्यात रुही म्हणाली,"निरजाला रेड रोज खूप आवडतात. म्हणून मी रेड रोजचं हार्ट चुझ केलं".
नीरजा तिला प्रेमाने मिठी मारत म्हणाली,"थँक यु सो मच! खूप छान आहे सजावट".
          नंतर सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला आणि फिरायला निघाले. गौतमनेच प्लॅन केला होता की जेव्हा संध्याकाळी सगळेजण फिरून परत येतील तेव्हा पूर्ण रिसॉर्ट एकदम नव्या नवरीसारखं सजलेलं दिसलं पाहिजे. दिवसभर फिरून जेव्हा सर्वजण परत आले तेव्हा रिसॉर्टची सजावट बघून सर्वाना खूप आनंद झाला.
गौतम म्हणाला,"सगळ्यांनी तयार होऊन पार्टीसाठी डायनिंग हॉलमध्ये पोहोचा. ओके!आणि लवकर तयार व्हा!"
सगळे आपापल्या रूममध्ये गेले. निरजाने आणलेला पिंक कलरचा इविनिंग गाऊन बॅगेतून बाहेर काढला आणि विराजला म्हणाली,"तू हॉलमध्ये जाऊन थोडा वेट कर! मी येते थोड्या वेळाने".
          विराज तयार होऊन एकटाच हॉलमध्ये गेला. थोड्या वेळाने नीरजा हॉलमध्ये आली. ती एखाद्या प्रिन्सेससारखी दिसत होती. विराज तिच्याकडे एकटक बघतच राहिला. नीरजाचं सगळेजण तोंड भरून कौतुक करत होते.
तेवढ्यात विराज म्हणाला,"रुही कुठे आहे? अजून आली नाही ती?"
गौतम म्हणाला,"अरे! येईलच ती एवढ्यात!"
पंधरा मिनिटं झाली तरीही रुही न आल्यामुळे नीरजा म्हणाली,"बहुतेक आज काहीतरी खास तयारी करतेय वाटत रुही!
तनिष्का हसत म्हणाली,"आय होप! आज तरी ती काहीतरी न्यू ट्राय करेल!"
गौतम म्हणाला,"मी जाऊन बघतो".
          गौतम रूमच्या दिशेने गेला. सगळेजण हॉलमध्ये केलेली सजावट बघता बघता गप्पा मारायला लागले. तेवढ्यात गौतमची काळजाचा ठोका चुकवणारी किंकाळी ऐकू आली.
"काय झालं? गौतम का किंचाळला?" म्हणत सगळेजण धावत गौतमच्या रूमकडे निघाले. ते सगळे जेव्हा गौतमच्या रूममध्ये गेले. तेव्हा समोरचं दृश्य बघून सगळ्यांची दातखीळ बसली. रुहीचं मृत शरीर फरशीवरच्या कार्पेटवर पडलं होतं. तिचे डोळे सताड उघडे होते आणि गळ्यात एक पिंक स्कार्फ घट्ट आवळला होता. गौतम चक्कर येऊन पडणार इतक्यात विराजने त्याला संभाळलं आणि संतोषला इशारा केला. त्याने गौतमला आधार देऊन बेडवर बसवलं. विराजने नीरजाला तनिष्का आणि नुपुरला बाहेर घेऊन जायला सांगितलं. त्या तिघी बाहेर जाताच विराजने पोलिसांना कॉल केला. मग धावत्या नजरेने रूमची झडती घ्यायला सुरुवात केली. रूममध्ये इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर एका चमकत्या वस्तूवर गेली. त्याने ती वस्तू रुमालाने उचलून पाहिली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. ती एक रिंग होती! त्याच्यावर N लिहिलं होतं.
"ओ माय गॉड!" तो पुटपुटला. हळूच त्याने रुमालासोबत ती अंगठीसुद्धा पॉकेटमध्ये ठेवली. आणि रूममधून बाहेर आला. तेवढ्यात पोलिसांची गाडी रिसॉर्टमध्ये आली. पोलीस इंस्पेक्टरसह काही हवालदार रिसॉर्टच्या लॉबीमध्ये आले.
          इन्स्पेक्टर येताच विराजने स्वतःची ओळख करून देत घटनेची माहिती दिली. आणि त्यांना रुहीच्या रूमच्या दिशेने घेऊन गेला. रूममध्ये पोचताच इंस्पेक्टरने विराजला विचारलं,"इथे कोणी कशाला हात तर लावला नाहीये ना?"
विराजने नकारार्थी मान हलवली पण खोलीत मिळालेल्या अंगठीची गोष्ट मात्र लपवली.
          काही वेळातच पोलिसांनी पंचनामा केला. मृत शरीराचे फोटो घेतले. आणि नंतर बॉडीला पोस्टमार्टमसाठी पाठवून दिलं. बघता-बघता बड्डे पार्टीचं आनंदी वातावरण दुःखात बदललं होतं. पोलिसांना तपासातून एवढंच समजलं की इथे आज बड्डे पार्टी होती. आणि ज्या व्यक्तीसाठी ही पार्टी होती त्या व्यक्तीलाच निर्घृणपणे मारण्यात आलं होतं. रिसॉर्टमध्ये फक्त गौतम आणि त्याचे फ्रेंड्सच होते. कारण गेल्या एका आठवड्यापासून गौतमने कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची बुकिंग केली नव्हती. रिसॉर्टमध्ये फक्त मोजकीच माणसं असताना रुहीची आशा प्रकारे हत्या होऊच कशी शकते? हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. गौतमला मोठा धक्का बसल्याने तो पोलिसांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून  गौतमला कोणावर संशय आहे का हे विचारण्याचा प्रयत्न करेन असं विराजने पोलिसांना आश्वासन दिलं. पोलीस रुहीची खोली सील करून निघून गेले.
          रात्र खूप झाली होती. विराजने सगळ्यांना झोपायला जायला सांगून स्वतः रिसॉर्टच्या कानाकोपर्यात तपास करू लागला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की रिसॉर्टमध्ये एवढी माणसं असतानासुद्धा अशा प्रकारे रुहीची हत्या होऊच कशी शकते! आणि या हत्येतून कुणाला काय फायदा झाला असेल! तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर तनिष्काचा चेहरा आला. तनिष्कासाठीची गौतमच्या मनातली भावना रुहीला तर समजली नाही ना… त्यासाठीच तर तिचा खून… या गोष्टींचा विचार करून त्याला काही सुचेनासं झालं.
          थोडा वेळ तपास करून तो परत त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. सगळीकडे निरव शांतता होती. सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते. तेवढ्यात अचानक विराजला काहीतरी सावलीसारखं दिसलं. विराज लगेच पिलरच्या आड लपून सावलीला पाहू लागला. ती सावली वेगाने पुढे जाऊन समोर लॉबीत दिसेनाशी झाली. विराजसुद्धा पटकन लॉबीच्या दिशेने धावला. पण तिथे कोणीच दिसत नव्हतं. तो आश्चर्याने इकडे-तिकडे बघू लागला. तेव्हा त्याला कॉर्नवर असलेल्या एका रूमचा दरवाजा हलताना दिसला. तो विचार करू लागला,'अरे, हा तर माझ्याच रूमचा दरवाजा आहे! मग काय ती सावली नीरजाची होती?… पण एवढ्या रात्री ती अशी कुठून येत होती!" विचारात अडकलेला विराज जेव्हा रूममध्ये आला तेव्हा नीरजा बेडवर झोपली होती. तिचे डोळे बंद होते. असं वाटत होतं की ती गाढ झोपली आहे. पण तरीही विराज तिच्या जवळ जाऊन मोठ्याने ओरडला,"नीरजा! उठून बस! मला माहितेय की तू जागी आहेस!"
नीरजा डोळे चोळत म्हणाली,"काय झालं विराज? तू अजून जागा आहेस?"
"हे बघ, बास झाला हा ड्रामा! खरं खर सांग! हे काय चाललंय तुझं? काल रात्रीसुद्धा तू रूममधून बाहेर गेलेलीस! आणि आता तर तू माझ्यासमोरून येऊन झोपायचं नाटक केलंस! कुठे गेलेलीस तू आता या वेळी?"
"तुसुद्धा हद्द करतोस विराज! तू पोलीस ऑफिसर आहेस म्हणून काय प्रत्येक वेळी मला गुन्हेगारांसारखे प्रश्न विचारणार आहेस का? काल रात्रीसुद्धा मी तुला म्हणाले होते की मी फक्त शतपावली करायला गेलेले! आणि आज तर मी कुठेही गेले नाहीये. मी गाढ झोपले होते पण तू मला उठवून काहीतरी चित्रविचित्र प्रश्न विचारायला सुरुवात केलीस".
विराजचं डोकं काम करेनासं झालं. तो बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. आणि सकाळी उठताच ती अंगठी निरजाला दाखवेन असं त्याने मनात ठरवलं. थोड्या वेळातच विचार करता करता त्याला झोप लागली. निरजासुद्धा शांतपणे झोपी गेली.
          थोड्या वेळाने बेडखालून एक सावली बाहेर आली आणि हळूच दरवाजा उघडून निघून गेली. ती सावली धावत लॉबीमधल्या पहिल्या रूमच्या दिशेने जाऊ लागली. ती सावली दरवाजा उघडून हळूच आत शिरली. ती रूम होती…… विनीत आणि तनिष्काची!!

          कोणाची होती ती सावली? विनीत? की तनिष्का? की कोणी तिसरंच? कोणी मारलं असेल रुहीला तिच्याच बड्डे पार्टीत? आणि ती अंगठी! ती निरजाच्या बोटातून निघून रुहीच्या खोलीत कशी गेली?

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults