देशी फुलझाडांच्या मालिकेत दुसरे फुलं .मागे चाफा लिहीला.
मनावरची मरगळ दूर करून प्रसन्नता आणायची असेल तर ओंजळभर पारिजातकाची फुले घ्या आणि भरभरून सुवास घ्या खोलवर आतपर्यंत . बघा जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सगळी मरगळ दूर होते. पारिजातकाचे फुललेले रूप बघायचे असेल तर भाद्रपदात बघावे. भाद्रपदातले सण आणि पारिजात यांच सख्य आहे .बहरलेला पारिजात बघायचा असेल तर पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान बघावा .पारिजात अभिजात सौंदर्याचे दर्शन मुक्तहस्ते उधळून देतो स्रुष्टीला , त्याच्या पुढ्यात नुसते उभे रहा काहीही न करता तुमच्या मनाला स्वर्गात पोहोचण्याचा भास आपोआप करून देतो तो. शेंड्यापासून खोडा पर्यंत अखंड लगडलेली केशरी दांडीची नाजूक पांढरी फुलं नजर तृप्त होते दर्शनाने. सुवासानं रंध्रे त्रुप्त होतात .
पारीजाताचे खोड फार मोठे नसते, विशिष्ट असा आकारही नसतो त्याला . उंच उंच वर जातो तो , माझ्या काकांकडे तर उंच पोहोचत तो गॅलरी पर्यंत गेला आणि गॅलरीत जाऊन विसावला ,बहरला , मुक्काम केला त्याने तिथे.पारिजातकाची पाने फार विरळ असतात आणि फार सौंदर्य वगैरे नसते पानांना. थोडी हिरवट, भुरकट ,खरबरीत एक सारख्या सारख्या आकाराची पण थोडी लहान-मोठी अशी असतात पाने. पानांच्या कमतरतेमुळे खोड स्पष्ट दिसतं पण भाद्रपदात मात्र त्याचं सौंदर्य नखशिखांत बहरून येतं . नव्या नवरीचा साज लेऊन सृष्टी तयार होते असेच वाटते .खरंच सृष्टीच्या अनंत रूपात पारिजातकाचे एक रूप लक्षात घेण्याजोगे आहे वार्याच्या झोताने परिजात डोलतो, लवतो वाकून नम्र होतो ,पण तरी फुलांना मात्र ताठा आहे बरं का. एवढेसे नाजुक सहा पाकळ्यांचे फुल असे समजू नका त्याला. राग त्याच्या नाकावर टिच्चून भरलेला आहे आणि या रागातच देतो स्वतःला खाली झोकून .पारीजाताची अशी कथा आहे की , एकदा सृष्टी कर्त्याने सर्व फुलांची सभा घेतली. प्रत्येकाला विचारले तुला काय हवे? रंग की सुगंध ? कुणी रंग मागितला तर कुणी सुगंध मागितला . कुणी गप्पच बसले .गुलाबाला ,कमळाला ,झेंडूला जास्वंदला छान रंग दिले स्रुष्टीने आणि मोगऱ्याला ,निशिगंधाला, मधुमालतीला, लीलीला सुगंध दिला . कुणाला टपोरा आकार दिला ,कुणाला बारामाही बहरणे दिले. कुणाला विशिष्ट महिन्यातच फुलण्याची देणगी दिली. कुणाला देव्हाऱ्यात जागा दिली. पारिजात बसला शांत त्याने काहीच मागितले नाही.घुश्शात होता तो . सगळे आपले -आपले रूप -रंग घेऊन परत आपल्या जागी गेले . पारिजात बसला रुसून मला का विचारले नाही म्हणून .मग सृष्टीने त्याला मोहक असा नाजूक आकार दिला ,सुगंध दिला , देठ दिले केशरी रंगाचे पांढरीशुभ्र पाकळी दिली तर याने बालहट्ट सोडलाच नाही. अधिकच रूसला मला काही नको जा .असे म्हणून दिले झटकून स्वताला. म्हणून पारीजाताची फुलं जमिनीवर पडलेली दिसतात आणि अती रागामुळे देठ जास्त केशरी झाले. एक ते दोन तासच फुल झाडांवर असतात .असा हट्ट ,रुसवा शोभतो याला. बालहट्ट आहे तो. लहानपणी आम्ही ओचे भरून- भरून फुलं आणायचो आणि बसायचो ओवत सुई दोर्यात ,कधी कडुलिंबाच्या काडीत कधी गवताच्या काडित, आणि माळा करायचो. एक तासातच निरोप घेतो पारिजात.मरगळ येते त्याला , खूप हाताळलेले आवडत नाही त्याला. अलवारपणे फुलं सोडतो पहाटे , त्याच अलवारपणे फुलं वेचावी लागतात. धुसमूस , रागीटपणा चालत नाही त्याला. पारिजात स्वतः रागीट आहे पण इतरांनी मात्र त्याच्याशी प्रेमाने वागावे लागते .ओंजळभर फुलं घरी आणून तबकात ठेवली तर अख्खा दिवस सुगंधी करून टाकतो तुमचा. मागचा पुढचा राग विसरून दोन्ही हाताने मुक्त उधळण करतो तो सुगंधाची. बालपणी पारिजात वेचला नाही तर बालपण जगले नाही असे वाटते . पारिजातकाला मिरवून घेणे आवडत नाही, देव्हाऱ्या पलिकडे इतर कुठेच दिसत नाही . बारामाही फुलत नाही पण अल्पकाळातच पूर्णत्वास पोहोचतो परिजात . पारिजातकाचे नैसर्गिक औषधी गुणधर्मही आहेत . उष्णतेवरचा जालीम उपाय आहे तो. आयुर्वेदात प्रमुख भूमिका आहे त्याची .याच्या बिया खुळखुळसारख्या वाजत असतात. उन्हाळ्यात शुष्क निष्पर्ण होतो पारिजात पण भाद्रपदाच्या स्मृती असतात त्याच्या. देशी फुल झाडांमध्ये अव्वल स्थान आहे पारीजाताचे .
बालपणी कविता होती मराठी तिसरीला टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे . पारीजाताचे वैशिष्ट्य असे की तो जिथे असेल तिथून तुम्ही त्याच्या कडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत नाही , स्वतःहून तो तुमचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतो . सुगंधाला ओलांडून दुर्लक्ष पुढे जाऊ शकत नाहीत आणि एकदा का त्याच्या पुढे गेलात पुढे गेलात तर तुम्ही तुमचे राहत नाही, तिथेच घुटमळत ओंजळभर फुलं घेतल्याशिवाय राहतच नाही . पारिजातकाला हरसिंगार , शेफालिका ,नालकुंकुमा , राजपुष्पी खरपत्रक अशी अनेक नावे आहेत . पारिजात पारिजातक ,प्राजक्त ही मराठीत ऐकु येणारी नावे आहेत . " बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी "हे तर मराठी नाट्यगीत ऐकिवात आहे . मराठी नाट्यसृष्टीतही प्रवेश केला प्राजक्ताने . प्राजक्ताला कृष्णाने पृथ्वीवर आणले. रोप कुठे लावायचे या वादात सत्यभामा आणि रुक्मिणीला समजावून सांगत कृष्णाने सत्यभामेच्या अंगणी लावले रोप आणि फुले पडू लागली रुक्मिणीच्या अंगणात . असा हा चिमुकला जीव पण लोभसवाणा आहे . मराठीत हिंदीत मुलींची नाव ठेवतात प्राजक्ता परिजात अशी . पारिजात स्वतंत्र आहे कुणाशी स्पर्धा बिर्धा नाही आवडत त्याला . फुलावे बहरावे, गळून पडावे आणि हसत रहावे असा आहे याचा स्वभाव .फुलझाडांच्या समृद्ध विश्वात एक अविस्मरणीय नाव प्राजक्त.
रुसलेला पारिजात
Submitted by मंगलाताई on 30 May, 2020 - 05:12
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त! प्राजक्ताच्या रागाची
मस्त! प्राजक्ताच्या रागाची गोष्ट गोड आहे. देठ केशराच्या ऐवजी वापरतात. आसामात असताना ह्या फुलांची भाजी करतात असं ऐकलं पण खायला मिळाली नाही.
छान वाटलं वाचून,लहानपणच्या
छान वाटलं वाचून,लहानपणच्या खूप आठवणी निगडित आहेत पारिजातकाशी..
हं आता एकेक फुलं घेते लिहायला
हं आता एकेक फुलं घेते लिहायला. तुम्ही आणि मंजूताई पण काही विषय सुचवा.धन्यवाद
या लेखात एक राहिलचं.पाटण ला
या लेखात एक राहिलचं.पाटण ला पाटली पटोला साडी तयार करतांना केशरी रंगाचा उपयोग म्हणून पारिजातकाचे देठ वापरतात. इतर नैसर्गिक रंगात ही वापर करतात.
छान वाटलं वाचून,लहानपणच्या
छान वाटलं वाचून,लहानपणच्या खूप आठवणी निगडित आहेत पारिजातकाशी.. >>>>> +1000000.
पारिजातकाच्या देठात असलेली
पारिजातकाच्या देठात असलेली रसायने आणि केशराच्या काडी तील रसायने सारखीच आहेत असे संशोधनातून आढळले आहे. त्यांचे औषधी गुणधर्म ही सारखेच आहेत.
सुंदर. घरच्या पारिजातकाची
सुंदर. घरच्या पारिजातकाची आठवण झाली
अगदी सुगंधी झालाय लेख..
अगदी सुगंधी झालाय लेख.. मनापाशी, लहानपणींच्या आठवणींपाशी नेणारा सुगंधी लेख..
सुंदर! लहानपण आठवले...
सुंदर!
लहानपण आठवले...
मंगलाताई ,
मंगलाताई ,
वा सुरेख लेख हादेखील !
हे आवडलं -
या लेखात एक राहिलचं.पाटण ला पाटली पटोला साडी तयार करतांना केशरी रंगाचा उपयोग म्हणून पारिजातकाचे देठ वापरतात. इतर नैसर्गिक रंगात ही वापर करतात.
बालपणी पारिजात वेचला नाही तर बालपण जगले नाही असे वाटते .
इथेही थोडा नम्र आगाऊपणा करतो , क्षमा असावी .
कृपया खालील कथा आपण वाचावी . आणि इतरांनीही .
https://www.maayboli.com/node/72908
सुंदर लेख.
सुंदर लेख.
खूप खूप खूप सुंदर लेख.
खूप खूप खूप सुंदर लेख.
मला पण पारिजातक फार आवडतो. फार सुंदर फुले. वास तर भूल पाडतो अगदी.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
धन्यवाद. विपीनजी नक्की वाचते.
धन्यवाद. विपीनजी नक्की वाचते.
खुप छान लेख. यात दिलेली
खुप छान लेख. यात दिलेली फुलांची गोष्ट आज्जीकडून ऐकल्यासारखी वाटते आहे.
खूप सुंदर लेख !!!माझ्या चार
खूप सुंदर लेख !!!माझ्या चार ओळी लाडक्या पारिजातासाठी ,
सत्यभामेच्या अंगणी दरवळला गंध मोहक फुलांचा
वारा घेऊन आला निरोप श्रीकृष्णच्या आगमनाचा
रुक्मिणीच्या अंगणी होता प्रवेश श्रीकृष्णाचा
वाऱ्यासांगे प्राजक्त करी अभिषेक दूध-केशराचा
मस्तच!
मस्तच!