यूं ना शरमा फैला दे अपनी गोरी गोरी बाहें...

Submitted by अतुल ठाकुर on 23 May, 2020 - 00:29

96720825_2230013740477019_6369992414764990464_o.jpg

झाले गेले विसरून जावे, नव्याने सुरुवात करावी, मागे वळून पाहू नये, कुणी कुणासाठी थांबत नाही. या तर्‍हेची भाषा ही समजूतदारपणाची झाली. पण आपण जळून खाक होणार हे माहित असूनदेखिल ज्योतीवर धडक देणार्‍या पतंगाला ही भाषा कळेल का? एखादा असा निघतो की तो एकाच आठवणीला कायम धार लावत राहतो आणि त्या लखलखत्या धारेला कुणीतरी बळी पडतं. १९७१ सालच्या "परवाना" चित्रपटात अमिताभ बच्चनच्या बाबतीत हेच घडतं. अमिताभची ही खलनायकाची शेड असलेली बहुधा पहिलीच भूमिका. आणि बच्चनसाहेबांनी वाईट माणसाचा अभिनयही अगदी सुरुवातीच्या काळात किती जबरदस्त केला होता हे पाहण्यासाठीतरी हा चित्रपट पाहायलाच हवा. हिरोचे नाव विकी, विजय किंवा सनीच असायला हवे अशी जबरदस्ती नसलेले ते सुखी दिवस होते. अमिताभचे नाव आहे कुमार सेन. योगीता बालीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बच्चनला कळतं की आपली प्रेयसी तिचे हृदय नवीन निश्चलला देऊन बसली आहे. मूर्तीकार असलेला हा हळवा माणूस हा धक्का पचवू शकत नाही आणि त्यातून जन्म घेतो एक गुन्हेगार. मी हा चित्रपट अगदी लहानपणी एकदाच पाहिला असला तरी नक्की सारं कसं घडतं हे मी येथे सांगणार नाही इतका मी या चित्रपटाच्या प्रेमात आहे.

पण बच्चनसाहेब एक शेवटचा प्रयत्न करून पाहतात. योगीता बालीच्या अंकलला म्हणजे ओमप्रकाशला कुमार सेन गळ घालतो की त्याने आपल्या भाचीचा हात आपल्या हातात द्यावा. ओमप्रकाश तयार होत नाही. आणि अमिताभच्या मनात एक भयंकर प्लान आकार घेऊ लागतो. या अंकलचा काटा काढायचा आणि आळ नविननिश्चलवर येईल अशी व्यवस्था करायची. हा काटा काढताना अमिताभने निरनिराळी वाहने बदलून केलेला प्रवास आणि पद्धतशीरपणे तडीस नेलेला प्लान पाहण्याचा थरार आपण अनुभवलाच पाहिजे. तो सस्पेन्स खुला करण्यात मजा नाही. पण हे सारं करूनही घडतं उलटच. आपल्या अंकलला नवीन निश्चलने ठार मारलं यावर योगीताबालीचा विश्वासच बसत नाही इतकं तिचं त्याच्यावर प्रेम असतं. उलट त्याची निर्दोष सुटका करण्यास मदत केली तर आपण तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहोत असे ती अमिताभला सांगते. हा या चित्रपटातला मास्टर स्ट्रोक आहे. आपल्या प्रेयसीने दिलेला हा दुसरा धक्का मात्र अमिताभला उध्वस्त करून जातो. जिच्यासाठी सारं केलं ती दुसर्‍याच्या इतकी प्रेमात आहे की त्या प्रेमासाठी ती नको असलेल्या माणसाचा स्विकार करायला तयार झाली आहे. इथे बच्चन संपूर्णपणे हरतो.आणि परवान्याच्या नशीबी जे असते त्यालाच तो सामोरा जातो...

पण इथे मला लिहायचंय ते एका मला वाटणार्‍या जबरदस्त गाण्याबद्दल. "यूं ना शरमा फैला दे अपनी गोरी गोरी बाहें.." गाणे सुरु होते आणि पार्टीत योगीता बाली नवीन निश्चल हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले जोडपे एकमेकांच्या बाहुपाशांत स्वतःला गुंफून घेते. नवीन निश्चलला दिलेला किशोर कुमारचा प्रसन्न मूडमधला आवाज. आनंदी मूडमधला किशोर आणि त्यातच गाणे प्रेयसीचे, प्रेमाचे वर्णन करणारे म्हणजे सोन्याला आलेला सुगंधच. त्यातही कैफी आझमीचे धूंद करणारे शब्द.

काली जुल्फों वाले
ज़रा ज़ुल्फ़ों को बिखरा दे
मेरी दुनिया को महका दे
एक नशा सा छाया है
आओ चलें अब न रुकें
खुलीं हैं दिल की राहें

नीली आँखों वाले
तेरी आँखों में क्या क्या है
नए सपनों की दुनिया है
दिल इन्हीं में डूबा है
बात जो हम कह न सके
कह रहीं हैं ये निगाहें

के तुझी को हम चाहें...

किशोरकुमारच्या आवाजाने वातावरणात प्रसन्नता, प्रेमातला सळसळता उत्साह पसरतो. वातावरण भारून जाते आणि अचानक सूर्याला ग्रहण लागावे आणि अवकाळी अंधार पसरावा त्याप्रमाणे सूर बदलतात, पियानोचे स्वर उदासीनता पसरवू लागतात. आणि रफीचा आक्रोश ऐकू येतो...हो आकोशच...

अरे हसनेवालो, कभी ये भी सोचो
जिन्हें प्यार मिलता, नहीं जीते हैं कैसे
साथ जियें साथ मारें, ऐसा कभी चाहा था
प्यार मिले प्यार करें, ऐसा कभी सोचा था
दिल को किसने तोडा, अपना बनाके छोड़ा
उतना हमें रोना पड़ा, जितना हसीं सपना था

जिनको मिली दिल की ख़ुशी, खुशियां मना सकते हैं
अपने ये ग़म दुनिया को हम, कैसे सुना सकते हैं
सपने सजाने वालों, हसने हंसाने वालों
आओ इधर ज़ख्मे जिगर तुमको दिखा सकते हैं

हे रफी गात असताना पडद्यावर अमिताभ गात नाही. पडद्यावर अमिताभचा हृदयातील वेदना दाखवणारा चेहरा आहे. त्याच्या मनात काय आहे याची योगीता बालीला कल्पना आहे त्यामुळे अचानक सूर बदलल्यावर तिच्याही चेहर्‍यावरचे रंग बदलतात. ती ही गंभीर होते. पण ती आपलं हृदय आता दुसर्‍याला देऊन बसलेली आहे. आता काही इलाज नाही. मन कुणावर जडेल हे काही सांगता येतं का? तिची मजबूरी आपल्याला कळते तरीही रफीने केलेला आक्रोश आपल्या अंगावर येतो आणि आपल्याला हेलावून सोडतो हे ही तितकेच खरे. रफीचे हे या दुसर्‍या टोकाच्या भावना व्यक्त करणारे स्वर परिणामकारक होतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे किशोरने केलेली दिलखुलास मूडमधली सुरुवात आहे हे लक्षात घेतलेले बरे. किशोरकुमार प्रियकराचा आनंदी मूड इतका अचूक पकडून गायिला आहे की दुसर्‍या बाजूला रफी तितकाच ठळकपणे उठून दिसला आहे. किशोरच्या जागी कुणी लेचापेचा असता तर हे गाणे आपले संतूलन हरवून बसले असते असे मला प्रामाणिकपणे वाटते.

भग्न हृदयाची कैफीयत मांडणारे कैफी आजमीचे शब्द आपल्या आवाजातून जेव्हा रफीसाहेब आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा प्रेमाला कायम पारखे झालेल्या माणसांचे दु:खच आपल्यासमोर मूर्तीमंत होऊन उभे राहते. ही किमया रफीच्या आवाजाचीच. वेदनेचे गाणे गावे ते रफीनेच. पण या सार्‍यात तितकाच वाटा आहे तो संगीतकार मदनमोहनचा. आपल्याकडे चित्रपटसृष्टीत इतकी प्रतिभावान मंडळी होऊन गेलीत की त्यांच्याबद्दल किती बोलु आणि किती नको असं मला होऊन जातं. एकाच पार्टीत दोन माणसं. एक प्रेमी तर दुसरा प्रेमभंग झालेला. प्रेमी आपल्या प्रेयसीचे गुणगान करण्यात मग्न तर दुसरा आपल्या मनातील दु:खाला स्वर देऊ पाहणारा. असे असताना त्यासाठी किशोर आणि रफीची निवड जेव्हा केली जाते तेव्हाच या संगीतकाराने एकंदरीत सिच्युएशनचा किती बारकाईने विचार केला असेल हे लक्षात येते. मदनमोहनने लावलेली चाल सोपी नाही. पण गाणारे दिग्गज असल्याने गाणे परिपूर्ण झालेले आहे. क्षणात उजेड तर क्षणात अंधार असा खेळ मदनमोहनने या गाण्यात केलेला आहे. मात्र शेवटी आपल्या लक्षात राहतो तो रफीचा वेदनेने केलेला आक्रोशच...सपने सजाने वालों, हसने हंसाने वालों , आओ इधर ज़ख्मे जिगर तुमको दिखा सकते हैं

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती पण कधीही बघायला मिळाला नाही.

गाणे व त्यातल्या मूडबद्दल खूप सुंदर लिहिलेय. वाचताना कित्येक गोष्टी लक्षात येत गेल्या. गाणे तर सुंदर आहेच पण पाहताना अमिताभचा जबरदस्त अभिनय डोळ्यात भरतो, अंगावर शहारा आणतो. त्याचवेळी हा माणूस कुठल्याही टोकाला जाईल असेही वाटते. खरेच जबरदस्त...

हे गाणं आणि हा चित्रपटही माहिती नव्हता. छान लिहिलंयत नेहमीप्रमाणेच!  बघायला हवा. >>> सहमत.
नायकाचे नाव चांदोबातल्या सारखे कुमार सेन !! Happy
मला वाटायचं की मी अमिताभ बच्चनचे सगळे जुने चित्रपट पाहिले आहेत. तो भ्रमही दूर झाला.
पुलेशु !

साधारणपणे ९५-९६ साली हा चित्रपट दूरदर्शनवर लागला होता तेव्हा पाहिला होता. अमिताभ च्या इंटेन्स नजरेमुळे हे गाणे तेव्हापासुन लक्षात आहे. पण का कुणास ठाऊक पूर्ण चित्रपटात नवीन निश्चल अमिताभ वर कुरघोडी करतोय असे वाटले व अमिताभ तसा बुजलेला वाटला. ह्याचे उत्तर नंतर कधीतरी मिळाले. हा काळ तो होता जेव्हा नवीन निश्चल,अनिल धवन वगैरे सर्व स्ट्रगलर होते व अमिताभ चे नशीब तसे कमजोरच असावे. व त्यानेही ते मान्य केले असावे. एका चित्रपटात अमिताभ चपराशी व अनिल धवन त्याचा बॉस अश्या भूमिका होत्या. (गहरी चाल मध्ये तर जितेद्र नायक तर अमिताभ नायिकेचा म्हणजे हेमामालिनीचा भाऊ). पुढे पिया का घर चित्रपटात अनिल धवन नायक व जया भादुरी नायिका अशी जोडी होती. त्यानंतर "जंजीर" आला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे.
तुमच्याच का अजुन कोणाच्या तरी लेखात वाचले होते कि दिवार मधला शशीकपूरचा रोल सर्वप्रथम नवीन निश्चल ला ऑफर करण्यात आला होता पण त्याला तो रोल साईड रोल वाटला म्हणुन त्याने तो करणे नाकारले पण कालचक्र पहा. अमिताभ सुपरस्टार म्हणुन एस्टॅब्लिश झाल्यानंतर व त्याच्या चित्रपटात काम करणे हे एक क्वालिफिकेशन आहे असा ट्रेण्ड सेट झाल्यावर त्यानेही देशप्रेमी मध्ये त्याच्या मित्राचा पोलिस इन्स्पेक्टरचा रोल केला. ( लिहिण्यात काही चूक भूल असेल तर आगाऊ माफी मागतो.)

पूर्ण चित्रपटात नवीन निश्चल अमिताभ वर कुरघोडी करतोय असे वाटले व अमिताभ तसा बुजलेला वाटला.
मला तसं वाटलं नाही. बहुधा ती भूमिकेची मागणी असावी. कारण तो फारसं बोलणारा दाखवलेला नाही. आणि हा मनातलं न सांगण्याचाच कदाचित परिणाम असेल की त्याच्यात संताप साठत जातो आणि त्याचा एक दिवस उद्रेक होतो.

अमिताभ बच्चन सुपरस्टार व्हायच्या आधी त्याचा अभिनयाचा कस कळतो. एकदा सुपरस्टार झाल्यावर प्रत्येक भूमिकेत पहिल्यांदा अमिताभ बच्चन दिसायचा मग त्याचे पात्र. अँथनी, डॉन किंवा अन्य कुणी. पण सुरवातीच्या काळातील ह्या अशा भूमिका जीव तोडून करताना पहायला खूप आवडते. आनंद, परवाना, सौदागर ह्या सिनेमात अमिताभ बच्चन न दिसता एक डॉक्टर, एक बंगालमधला ताडाचा गूळ बनवणारा, प्रेमात अयशस्वी ठरलेला प्रेमी असेच दिसतात.
ह्या सिनेमाला मदनमोहनने फारच चांगले संगीत दिलेले आहे. ह्या निमित्ताने पुन्हा एकदा ती गाणी ऐकायला मिळाली.

आनंद, परवाना, सौदागर ह्या सिनेमात अमिताभ बच्चन न दिसता एक डॉक्टर, एक बंगालमधला ताडाचा गूळ बनवणारा, प्रेमात अयशस्वी ठरलेला प्रेमी असेच दिसतात.
सहमत shendenaxatra Happy धन्यवाद Happy

मी खूप वर्षांपूर्वी हा सिनेमा पाहिला होता, genious plot होता,पण पुढचं काही आठवत नव्हतं,धन्यवाद जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा

>>मला तसं वाटलं नाही. बहुधा ती भूमिकेची मागणी असावी
शक्य आहे. कारण सुरवातीला सुपरस्टार अमिताभचे चित्रपट पाहिले होते व त्यानंतर त्याचे सो कोल्ड सुरवातीचे फ्लॉप चित्रपट पाहीले त्यामुळे असे वाटले असावे. तसेही जंजीर वगैरेनंतर आवाज मॉड्युलेट करुन अमिताभने आपल्या संवादफेकीत कमालीचा बदल केलेला जाणवतो. हेच कारण आहे कि अमिताभच्या आवाजाची मिमिक्री करणे फार सोपे आहे. (हीच गोष्ट शत्रुघ्न सिन्हाबाबत ही म्हणता येईल.) ठाकुरसाहेबांनी काही काळापूर्वी विनोद खन्ना व अमिताभ ह्यंची तुलना केलेला एक लेख लिहिला होता. अमिताभच्या सुरवातीच्या चित्रपटांवरही असा एक लिहिता आला तर पाहा अशी ठाकुरसाहेबांना विनंती करतो.

नक्की प्रयत्न करेन. मंझिल आवडतोच. तो अगदी सुरुवातीचा नाही म्हणता येणार कदाचित. पण रेश्मा और शेरा, फरार, संजोग, प्यार की कहानी, बंधे हाथ, गहरी चाल अशा चित्रपटांवर लिहिता येईल.