मोठी हो म्हणावंसं वाटत नाही

Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 May, 2020 - 01:08

नाजूक निळे डोळे
शोधतात कुणाला,
श्वासांमागचे निःश्वास
बोलवतात कूणाला..

निरागस भाव किती,
झाले डोळ्यात गोळा,
चाफेकळी नाक ते
कित्येकांना लावे लळा...

का कुणास ठाऊक,
तू अशीच राहावीस वाटते..
कसं सांगू तुला दुनियेत,
काळोखी कशी दाटते...

बरबटलेल्या दुनियेत तुला,
हे लोक लहान राहु देणार नाहीत
पण खरं सांगु पोरी तुला,
मोठी हो म्हणावंसं वाटत नाही..

राव पाटील!

पार्श्वभूमी :
जवळपास ६ वर्षांपूर्वी बसने प्रवास करत असताना सुचलेली, तेव्हाच लिहिलेली हि कविता. उन्हाळ्याचेच दिवस, अंगाची लाहीलाही होत होती, कायम गर्दीने वाहणाऱ्या महामंडळाच्या गाड्या सुद्धा बऱ्यापैकी रिकाम्या होत्या. कंडक्टरच्या मागच्याच खिडकीत पाण्याच्या बाटलीतलं थोडं पाणी रुमालावर टाकून तो रुमाल नाकापासून गळ्यापर्यंत झाकून मी बसलेलो होतो. बाहेर बघितलं तर डोळ्यांची आग होत होती, तरी सवयीने बघत होतोच. उजाड माळरान, एखाद दुसरं बाभळीचं वय होण्याआधीच वठलेलं, म्हाताऱ्यासारख्या सुरकुत्या अंगावर बाळगून उभं असलेलं तेवढं दिसत होतं. गावाच्या नावाऐवजी कोणत्यातरी बीटी कापसाच्या जाहिराती वागवणाऱ्या पाटीपाशी, डोक्यावरून गळ्यापर्यंत काळ्या पदराने तोंड झाकून एक साधारण पंचविशीतली लमाण स्त्री, तिच्या तीन चिल्ल्यापिल्लयांना घेऊन उभी होती. कंडक्टरने बंजारा भाषेत त्या स्त्रीला कुठं जायचं विचारून दार उघडलं. पायऱ्या चढून आल्यावर बसमध्ये बरीच जागा रिकामी असल्याचे पाहून कदाचित त्या बंजारणीला हायसं वाटलं असावं. आज तिला पाहून हटकणारं, बाजूला बसू न देणारं असं कुणीच बसमध्ये नव्हतं कदाचित. माझ्या शेजारच्या रांगेतल्या सीटवर २ पिल्ल्यांना घेऊन ती बसली, तिसऱ्या सर्वात मोठ्या म्हणजे अदमासे ७-८ वर्षाच्या मुलीला तिला बसवायचं होत, पण ती चिमुरडी ऐकेना. तिला पूर्म स्वतंत्र सीटवर बसायचं होतं, आणि ती बसली... वर्षानुवर्षे तेलाचा मागमूस नसल्यामुळे कि उपजत कळत नव्हतं, पण तिचे केस पिंगट सोनेरी होते, आणि डोळे, निळसर झाक असलेले. डोळ्यांचा रंग तिने आईकडून घेतला होता का हे कळायला मार्ग नव्हता कारण अजूनही डोक्यावरचा काळा पदर हटला नव्हता. घाटातून गाडी जाताना त्या चिमुरडीच्या केसातून सूर्याची किरणे आरपार निघून ते केस अजूनच चमकत होते. एव्हाना त्या मुलीच्या आईचा डोळा लागला, एव्हाना मागच्या सीटवरून नकळत एक मध्यमवयीन माणूस माझ्या मागच्या सीटवर येऊन बसला. गाणी ऐकत ऐकत बंद आलेल्या माझ्या मोबाईलच्या काळ्या स्क्रिनवर त्या माणसाचा चेहरा चमकला. त्यातून दिसली त्याची नजर, त्या स्त्रीच्या उघड्या पाठीकडे, कंबरेकडे रोखलेली.. मी एकदा निळ्या डोळ्याच्या चिमुरडीकडे, एकदा स्क्रीनमधून मागे बसलेल्या बुभुक्षित नजरेच्या माणसाकडे आणि एकदा सर्व जगाची काळजी सोडून, डोळ्यावर काळा पडदा ओढून झोपलेल्या त्या स्त्रीकडे पाहताना सुचलेल्या ह्या ओळी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम>>>>>+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

+१

वा कविता फार छान जमली. प्रसंग मात्र चीड आणणारा होता. निसर्गाने पुरुषाला वासनेचा शाप दिलेल्या पहिल्यापासून च दिलेला आहे.

निसर्गाचा दोष नाही यात. कारण असे वागणे हे नैसर्गिक नाही. ही मनोवृत्ती आहे, विकृती आहे. ही प्रकृती नाहीच तर विकृती आहे.

:'(