थिजल्या नजरेने समोर पडलेल्या अचेतन देहांकडे ती सगळी पाहत होती.
"काय करायचं?" बाक्रे गुरुजी स्वत:शीच पुटपुटले.
"’ऑफ’ झाले पाहता पाहता." बाक्रे वहिनी मृतदेहांकडे निरखून पाहत होत्या.
" ’ऑफ’ काय? बटण आहे का माणूस म्हणजे? काहीही तारे तोडता." बाक्रे गुरुजींचा अगदी संताप संताप झाला.
"सगळे तेच म्हणतात म्हणून म्हटलं." वहिनींची नजर अजूनही आजूबाजूला पडलेल्या देहांकडेच होती. कसेबसे त्या दोघांनी सगळे मृतदेह एकाठीकाणी आणले होते.
"काय करायचं ते सांगितलं नाहीत." गुरुजी खेकसले.
"खेकसू नका. आपल्या हातात आता आणखी आहे काय? तो सांगेल ते करायचं." आकाशाकडे पाहत वहिनींनी हात जोडले.
"हो. त्यानेच हे संकट आणलं; आता तो सांगेल ते खरं." अचेतन देहांना अग्नी द्यायला हवा हे कळत होतं पण आता काही करावं असं दोघांनाही वाटत नव्हतं. बसल्याबसल्या गेल्या काही आठवड्याच्या घटना दोघांच्या डोळ्यासमोर येत होत्या.
"आर्तेचा मुलगा आला बाहेरून तेव्हा अख्ख्या वाडीला आनंद झाला होता. आर्ते कॉलर ताठ करून फिरत होता सगळीकडे."
"दुर्देशा ओढवली गावावर. रवी आल्यापासून घरातच होता. त्याला कशाला उगाच जबाबदार धरायचं."
"आई, रवीदादा मागल्या दारानं बाहेर पडला होता." बाक्रे गुरुजींचा मुलगा कुजबुजला.
"अगबाई, काय सांगतोस विज्या? त्यामुळेच पसरला की काय तो विषाणू?"
बाक्रे वहिनींनी अचंब्याने विचारलं पण कुणीच उत्तर दिलं नाही. विज्या आणि संज्या तिथेच इकडे - तिकडे करत राहिले.
"गावच ओसाड पडलं. वेळेवर बाहेर पडले वाडीतले." गुरुजींनी सुस्कारा सोडला.
"आणि हे..." समोर पडलेल्या मृतदेहांकडे बघत बाक्रे वहिनींनी विचारलं.
"आपल्यासारखे. गाव सोडायचं नाही हेका धरलेले. आता आपणच करायला हवेत अंत्यसंस्कार. वाडीतले लोक परततील तेव्हा..." त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं.
"हेलिकॉप्टर." विज्या आणि संज्या ओरडायला लागले. दोघांनी वर पाहिलं. झाडांच्या शेंड्यांवरून हेलिकॉप्टर घिरट्या घालत होतं.
"कशाला घिरट्या घालतायत? मदत आली की काय?" दोघंही माना वर करून बघत राहिले. मदत म्हणजे काय ते त्यांनाही नक्की माहीत नव्हतं. खाली काही पडेल, हेलिकॉप्टर कुठेतरी उतरेल याची बराचवेळ ते वाट पाहत राहिले. मध्येच हेलिकॉप्टर नाहीसं होत होतं. अर्ध्या - एका तासाने परत येत होतं. दोघांच्या माना वर बघून दुखायला लागल्या तेवढ्यात संज्या धावत आला.
"रिपोर्टर आहेत. बॉड्या दाखवतायत."
"प्रेतं म्हण." दातओठ गुरुजी म्हणाले.
"ओरडताय काय? मोबाईल आला, टी. व्ही. आला तरी तुम्ही आपले जुनेच. ट्रेंड आहे बॉड्या म्हणायचा." वहिनींना आपण मुलांच्या बरोबरीने शब्दप्रयोग करतो याचा अभिमान होता.
"करा कौतुक चुकीच्या गोष्टीचं. कुठे दिसल्या तुम्हाला बॉड्या?" बॉड्या शब्दात जितका उपहास मिसळता येईल तितका गुरुजींनी मिसळला.
"आम्ही कांबळ्यांच्या घरातला टी. व्ही. लावलाय." मुलांना त्या दोघांच्या वादात रस नव्हता. संज्या आणि विज्या पळालेच तिथून.
"मरा. इथे सगळा हाहाकार माजलाय आणि या कार्ट्यांना टी. व्ही. सुचतोय. हे, हे यांना घिरट्या घालायला सुचतायत. लेकाचे मध्येच नाहीसे कुठे होतायत पण? मरा, काय करायचं ते करा." गुरुजींच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले इतका त्यांच्या रागाचा पारा चढला.
"आपण द्यायचा का अग्नी?" बाक्रे वहिनींनी सवयीने त्यांच्या रागाकडे दुर्लक्ष केलं. त्या उठल्याच. अचेतन देह एकाठीकाणी आणण्यात कितीवेळ गेला ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. प्रत्येक शरीराबरोबर मनात कितीतरी वर्षांच्या आठवणी दाटून येत होत्या. पन्नास उंबरठ्यांचं गाव. सगळी ओळखीतली. सुखदु:खात, गरजेला उपयोगी पडणारी. नाही म्हटलं तरी वहिनींना काही कडवट, वादाचे प्रसंगही आठवत होते पण माणूस गेला की वैर, कटुता संपली हे त्या स्वत:लाच समजावीत होत्या. जशी प्रेतं एकाठीकाणी जमा केली होती तशी लाकडंही. जमतील तशी. मनात हजार शंका होत्या पण कुणीतरी अग्नी देणं भाग होतं. हेलिकॉप्टरचा आवाज अधूनमधून येत होता. निर्जीव देहांना भरल्या डोळ्यांनी दोघांनी अग्नी दिला. कितीतरी वेळ दोघं सुन्न बसून होते. संज्या - विज्या बाजूला कधी येऊन बसले तेही त्यांना कळलं नव्हतं. आपलं काय होणार हा प्रश्नही भेडसावत होता.
"चला." डोळे पुसत बाक्रे गुरुजी म्हणाले. कुठे ते माहीत नसतानाही सगळ्यांची पावलं गुरुजींच्या मागे वळली. गुरुजींना आता या गावात थांबण्याचीच इच्छा नव्हती. ते भराभर पावलं टाकत होते. चालता-चालता कानावर पडलेल्या आवाजाने ते थबकले. टी. व्ही. चा आवाज होता.
"टी. व्ही. बंद नाही केलात." कांबळेच्या घरात गुरुजी टी. व्ही. बंद करायला गेले आणि तिथेच बसले. त्यांच्यामागोमाग आत आलेली ती तिघंही तिथे टेकली. वहिनी कोपर्यात ठेवलेल्या माठातलं पाणी प्यायला जाणार तेवढ्यात गुरुजी कडाडले.
"काय बरळतायत हे. किती चुकीची माहिती." गुरुजी तणतणत बाहेर गेले. मागून तिघंही.
"अहो, झालं काय? बघूच दिलं नाहीत. माठातलं पाणी लावणार जरा तोंडाला तर निघाले तणतणत बाहेर. आवरा तुमच्या तोंडाचा पट्टा." बाक्रेवहिनी भडकल्याच. त्या प्रचंड थकल्या होत्या. शरीराने, मनाने. आयुष्यात कधी अशी मंत्राग्नी द्यायची वेळ येईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. गुरुजी वहिनींना दाद देणारे नव्हते.
"काय झालं काय विचारतेस? आत्ता आपण काय केलं? पटकन सांग, काय केलं?" बाक्रे गुरुजींनी तारस्वरात विचारलं.
"काय केलं म्हणजे? शेजार्यापाजार्यांवर अंत्यसंस्कार केले." वहिनी चांगल्याच गोंधळल्या.
"केले ना? अंत्यसंस्कारच केले ना?" गुरुजींनी दरडावत विचारलं.
"हो. केले. पण असे अंगावर ओरडताय का?" घाबरून त्यांना चिकटलेल्या संज्या - विज्याच्या डोक्यावर हात फिरवला वहिनींनी.
"ओरडणार. आग लावा त्या टी. व्ही. ला. या टी. व्ही. वाल्यांना ना, सांगा, सांगा रे कुणीतरी." ते किंचाळले.
"काय सांगायचंय टी. व्ही. वाल्यांना?" स्वत: शांत झालो तरच काही उपयोग होईल हे वहिनींना ठाऊक होतं. त्या गुरुजींना शांत करण्याचा प्रयत्न करायला लागल्या.
"शरीरातून आत्मा गेला तरी आम्ही आमचा धर्म सोडलेला नाही म्हणं. मेल्यावरही माणूसकी सोडलेली नाही आपण, पण आपल्या कामाला किंमत शून्य. नालायक कुठले. घिरट्या घालतायत वरून. खाली उतरा, द्या आम्हाला अग्नी. नाहीतर चढतोच आता आमचे आम्ही चितेवर." गुरुजींच्या डोळ्यातून रागाने घळाघळा पाणी व्हायला लागलं.
टी. व्ही. वरच्या बातम्या अजूनही चालूच होत्या. काही वेळापूर्वी प्रेतांचा खच दाखवणारे वार्ताहार बुचकळ्यात पडले होते. आता त्या जागी फक्त चार मृतदेह होते आणि जळणार्या चिता. बेंबीच्या देठापासून ओरडत वार्ताहार आपलं आश्चर्य व्यक्त करत होते. त्याचवेळी मेल्यावरही कर्तव्य बजावल्याची कुणाला पर्वाच नाही म्हणून बाक्रे गुरुजी संतापले होते.
.
.
कल्पना आली होतीच.
कल्पना आली होतीच.
P२ प्रेडिक्टेबल आणि पकाऊ
P२
प्रेडिक्टेबल आणि पकाऊ
नाही कळली. चार मृतदेह आणि
नाही कळली. चार मृतदेह आणि जळणाऱ्या चिता म्हणजे कोणी कोणाला अग्नी दिला. ते सगळे गेलेत ते कळलं मला. भयंकर आहे गोष्ट. कसंतरी झालं वाचताना.
बाक्रे गुरूजींच्या फॅमिलीने (
त्याचवेळी मेल्यावरही कर्तव्य बजावल्याची कुणाला पर्वाच नाही म्हणून बाक्रे गुरुजी संतापले होते. >>>> इथे क्लिअर झालय
बाक्रे गुरूजींच्या फॅमिलीने ( आत्म्यांनी ) बाकीच्या सगळ्यांना.
त्यामुळे त्यांचेच ४ शव राहीलेत.
हो. पण आत्म्यांना ती जड शरीरे
हो. पण आत्म्यांना ती जड शरीरे उचलता कशी आली?
अप्रतिम, खूप दिवसांनी काहीतरी
अप्रतिम, खूप दिवसांनी काहीतरी वेगळं वाचल्याची फिलिंग आली.
जबरदस्त!!!!!
जबरदस्त
जबरदस्त
बापरे! वाचताना कसंतरीच झालं.
बापरे! वाचताना कसंतरीच झालं.
जगावर आलेलं हे संंकट लवकर जावं.
अचाट आणि जबरी!!
अचाट आणि जबरी!!