देखणे ते हात ज्यांना सेवेचे डोहाळे

Submitted by मंगलाताई on 7 May, 2020 - 03:38

हात आहेत प्रत्येकाला दोन .
त्याचं काही कौतुक नाही ,कारण हात सगळ्यांनाच आहेत . सगळ्यांनाच असणारे दिवस-रात्र सोबत असणारे हात ईश्वरी रुपांप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतात.
चला हातांची विविध रूपे आपण पाहूया.
स्वतःचं पहिलं अपत्य हातात घेऊन नर्स येते आणि आपल्या हातावर आणून ठेवते ,आपण त्याला उराशी कवटाळतो ते हात .
पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करणाऱ्या बाळाचा हात हातात घेऊन चालवणारे हात.
लेखनाचा श्रीगणेशा करताना लेखणी हातात धरून लिहायला लावणारे हात आणि लिहून घेणारे हात.
प्रेयसीचा हात हातात धरून प्रेमाची पावती मागणारे प्रियकराचे हात .
नमस्कारासाठी परमेश्वरापुढे जोडलेले हात.
आशीर्वादासाठी पाठीवर पडणारे मोठ्यांचे हात. दूर जाणाऱ्या आप्तांना निरोप देण्यासाठी उंच केलेले हात . ऑफिसला निघताना नातवांनी टाटा करण्यासाठी वर केलेले चिमुकले हात . देशाच्या सीमेवर अहोरात्र जिवाचे रान करणाऱ्या बंदूकधारी सैनिकांचे हात . शेतातल्या मातीत स्वतः माती होऊन खपणार्या कास्तकाराचे हात ,मातिच्या उदरातून बिजाचे रूपांतर रोपटयात करणारे हात . न्यायदानाचे उच्च कर्तव्य बजावणाऱ्या न्यायाधीशाचे निर्णय लिहून पूर्णविराम लिहिणारे हात . शिवाजीराजांच्या मनातले स्वराज्य साकार करणार्‍या मावळ्यांचे तलवारधारी हात .
स्वयंपाक घरात राबणाऱ्या सुगरणीचे हात. कारखान्यात निर्मिती करणाऱ्या श्रमिकांचे हात . कुंचल्यातून अनोखी सृष्टी चितारणाऱ्या चित्रकारांचे हात . दगडातून मूर्ती अलगद करणाऱ्या शिल्पकारांचे हात . ऑलिंपिक मध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचे हात . सुंदर रचना करणाऱ्या कवींचे लेखकांचे साहित्य कारांचे लेखणी धारी हात. बँकेत कॅश मोजणार्‍या कॅशियर चे हात आणि मते मिळावीत म्हणून मतदारांपुढे जोडलेले छद्मी हात.
असे अनेक हात आपण अनुभवले आहेत . या हातांना त्यांचे मोल आहेच......
पण देशावर आलेल्या संकटात राबणारे हात बघा. यात पोलिसांचे ,कचऱ्याची गाडी ओढून देणार्‍यांचे ,नर्सचे हात ,आरोग्य कर्मचाऱ्यांचे हात ,वाहनचालकांचे हात, सेवाभावी संस्थेतील कार्यक्षम व्यक्तींचे हात, डॉक्टरांचे हात हे ,अहोरात्र राबत आहेत .शिवाय उपाशीपोटी गावाकडे परतणाऱ्या मजुरांना अन्न शिजवून खाऊ घालणारे हात आहेत . हे राबणारे श्रमणारे हात परमेश्वराच्या सेवेचे हात आहेत . या हातांना पूजा करायची गरज नाही ते स्वतः पूज्य हात आहेत. देशावर , समाजावर प्रेम काय असते हे दाखवून दिले या राबणाऱ्या हातांनी. मनगटावरच्या घड्याळात किती वाजताहेत याचा विचार न करता दिवस रात्र सतत कार्यात गुंतलेले हे हात आहेत सर्वात सुंदर हात .
सानेगुरुजी म्हणतात तुम्हाला देवपूजा करताना फुलं वाहण्याची गरज नाही . तुमची कर्म फुले तुम्ही ईश्वराला वाहा. ही कर्म फुले वाहण्याचे काम करत आहे ही सेवाभावी मंडळी.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रोग्यांची, सैनिकांची शुश्रूषा करणाऱ्या सेविकांनी नर्सेसनी जगाला दाखवून दिले होते की सेवेचा संकल्प हा काळालाही मागे टाकू शकतो. देशात व जगात राबणाऱ्या या सेवाभावी हातांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की शांतते कडे नेणारा मार्ग हा कठीण असेल पण तो सेवेच्या पाय वाटेवरूनच पुढे जात असतो . सेवा हृदयाला हात घालते, सेवेला मर्यादा नाही ,जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भाषा नाही ,वेळ नाही ,रात्रं दिवसातील फरक नाही . सेवेसाठी मन तयार होणे ही ईश्वरी देणगी आहे . सेवा करणाऱ्याच्या मनात किती उदात्त भाव असतील याची कल्पनाच केलेली बरी. मानवाचे सर्वात सुंदर रूप कोणते असेल तर सेवा भाव .
सीमेवर लढणारा सैनिक सतत पहारा देतो आणि सीमेचे रक्षण करतो . तो रक्षण करतो म्हणून भारतीय नागरिक आनंदाने जगू शकतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून प्रत्येक भारतीयाच्या पोटाची भूक भागते आहे. जवानाला आणि किसानाला विसरून भारताचे भविष्य कधीच सुधारू शकणार नाही . वर्तमान परिस्थितीत covid-19 विरुद्ध लढा देणारे हात हे वरदहस्त आहेत . या हातांनी आम्हाला मोठ्या संकटातून वाचवण्याचा प्रण केला आहे. सारे जग घरात बंदिस्त असतांना देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लढणारे हे सीमेच्या आतले सैनिक आहेत . लढा देण्यासाठी या सैनिकांना कोणतेही शस्त्र व आयुधं लागत नाही तर सेवा करणारे दोन हात हेच शस्त्र आहेत.
संकट समयी लढा देताना कोणतीही बाह्य परिस्थिती जेवढी परिणामकारक असते त्यापेक्षा आपली उर्जितावस्था जास्त परिणामकारक असते . मानवता ,सहृदयता ही ऊर्जिता'वस्थेची रूपे आहेत . माणसातला चांगला विचार संकटावर मात करू शकतो आणि प्रत्येकाच्या हृदयातला सद्वविचार सामूहिक स्वरूपात किती बळ देऊ शकतो याची कल्पना फार सुखद आहे . मानवाला स्वतःच्या सद् विचारांचा उपयोग हा मानवी कल्याणासाठी तर आहेच शिवाय जगातल्या सर्व सजीवां करीता उपयोगी आहे . या समयी आम्ही एकजूट होऊन लढा दिला तर अजिंक्य कर ठरू , अन्यथा डायनासोरसारखे आमची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही . संतांनी समाजाला नैतिक बळ दिलं आणि समाज उभा राहिला .आज हे सेवाभावी हात आम्हाला बळ देत आहे समाजस्वास्थ्यासाठी . चला आपण त्यांना आपला हात देऊया .करोडो हातांची मालिका तयार करून दूर करूया भारतावरील संकट तरच खऱ्या अर्थाने सार्थ होतील
कविवर्य बा भ बोरकर यांच्या ओळी.....
" देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंध आलेले आलेले सुंदराचे सोहळे".

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults