घड्याळात बघितल्यावर लक्षात आले की साडे आठ वाजले, म्हणून तो गडबडीतच उठला, मेस बंद होण्यास पंधरा मिनिटे बाकी होते, म्हणून गडबडीनेच तो मेस च्या दिशेने निघाला. तेथे पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की मोबाईल रूमवरच विसरला आहे, म्हणून पाच मिनिटे इकडे तिकडे बघत बसला. जवळच त्याच्या मेसची मालकीन जी गुजराती होती ती तिच्या मुलाला तिथेच जेवू घालत होती, प्रत्येक घास भरवल्यावर ती आपल्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवत होती, हे पाहून त्याला त्याच्या आईची आठवण झाली. आजही ज्या बाईचा तेलकट व बेचव जेवण देते म्हणून राग येत होता, त्या बाईचे आईसारखे रूप बघून तो भारावून गेला . घरी असताना आई त्याच्यासाठी प्रेमाने आवडती खीर करत असे व त्याच्या समोर बसून त्याला खाऊ घालत असे, हे आठवत असतानाच त्याच्या समोर जेवण ठेवण्यात आले, नेहमीप्रमाणे आजही जेवणात बेचव व तेलकट पदार्थ होते पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू होते, थोड्यावेळापूर्वी तो आपल्या आईला व स्वतःला त्या ठिकाणी बघत होता, ते क्षण आठवत होता, जेवण आटपून तो रूम कडे निघाला, वाटेत त्याच्या कानावर ढोल ताशांचा आवाजघुमत होता, तो आवाज ऐकल्याक्षणी त्याला कळाले कि आज शिवजयंती आहे, खरेतर त्याला मिरवणुकीमध्ये नाचायला खूप आवडायचे, गावामध्ये कोणाचेही लग्न असो, तो व त्याचे मित्र तेथे हजर असायचे. लेट होत असतानाही मिरवणूक बघण्यासाठी तो पुढे सरसावला. ढोल-ताशांच्या गाजरावर नाचणारे पाय बघून त्याचेही पाय थिरकत होते, पण जवळच नाचणाऱ्या एका मुलाने त्याच्याकडे अशा नजरेने बघितले की तो रूमकडे जाण्यास निघाला. आज रात्रीची झोप काहीशी वेगळी होती कारण तो उद्या आपल्या गावी जाणार होता, पेपरच्या आधीच्या सुट्ट्यामुळे त्याला जायला मिळणार होते. सकाळी लवकर उठून आवरून तो तयार झाला, घरी जायच्या आनंदाने त्याची झोपही झाली नव्हती, केसांना तेल लावून आपल्या वाढलेल्या दाढीमध्ये तेलाचा हात घालून तो निघाला. आज लवकर निघाल्याने त्याला बस मध्ये जागाही मिळाली होती. कानात हेडफोन घालून डोळे मिटून त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण
झोप लागत नव्हती, कशीबशी झोप लागली, पण बाजूला एक लहान बाळ रडायला लागल्याने तीही मोडली होती, ते बाळ सतत रडत होते, काय झाले म्हणून त्याने बघितले तर एक तरूणी हातात तान्या बाळाला घेऊन उभी होती व रडणाऱ्या बाळाला शांत करत होती, सोबतच आजूबाजूच्या लोकांचा कटाक्षही सहन करत होती.
विस्कटलेले केस व मळकट साडी आणि हातात तान्या बाळाला घेऊन ती उभी होती. तो तिच्याकडेच बघत होता, बस मध्ये जागा नव्हती बाहेर कडक ऊन असल्याने गरम होत होते, जवळच असलेल्या एका वयस्कर आजीबाईने तिला बाळाची शाल काढण्याचा सल्ला दिला, त्यामुळे बाळाचे रडणे थांबले, तिच्याकडे स्मित हास्य करत आजीबाईने तरुणीला विचारले , " कुठे चालली आहेस तू ?", "मी नगरला माहेरी चालली आहे" तिने हसतच उत्तर दिले, "संक्रांतीला चाललीस का?" बाईने विचारले, "नवऱ्याने भांडण करून काढून
दिलं त्यामुळे आईकडं चालले" तरुणी उत्तरली, ती जवळच उभी असल्याने त्याला ते ऐकु येत होते, तरुणी पुढे सांगू लागली, "एका वर्षापूर्वी लग्न झाले, घरी फक्त आई, नवरा रिक्षाचालक आहे, लग्नानंतर काही दिवसांनी त्याला व्यसन आहे हे कळाले, दारू पिऊन शिवीगाळ करायला लागला व मारहाणही, कदाचित बाळ झाल्यावर हे सगळं थांबेल अस वाटल पण थांबल नाही, आईकडून पैसे आण म्हणून मारहाण केली व पैसे आणले नाही तर परत येऊ नको, अस सांगून घरातून हाकलून दिले" सांगताना तिच्या चेहऱ्यावर स्मित होते पण डोळे अलगद भरलेले होते, तो हे सगळं ऐकत होता, या गोष्टींचा विचार करत असतानाच बस थांबली, नगर आले होते, सगळ्यांकडे हसून बघत ती बाळाला घेऊन खाली उतरत होती, तो हे सगळं बघत होता, त्या पंधरा मिनिटात ती तरुणी त्याची ताई झाली होती, त्याला आपल्या
ताईशी बोलायचं होत, जागा द्यायची होती, तिच्या बाळाला जवळ घेऊन शांतही करायचे होते, तिची व्यवस्थित विचारपूस करायची होती, पण का मला बोलण्याची हिम्मत झाली नाही ? का मला माझ्या ताई शी बोलताना भीती वाटली, लाज वाटली ? हा विचार करत भरलेल्या डोळ्याने तो तिला बघत होता, त्या अफाट गर्दीतून वाट काढत ती तरुणी निघून गेली, पण अनोळखी असलेल्या तरुणीची आपण मदत करू शकलो नाही, कदाचित मी तिची विचारपूस केली असती, काही चांगलं सांगितलं असतं तर किती चांगलं झालं असतं हा विचार त्याला सतावत होता पण बस पुढे निघालेली होती, तेवढ्यात त्याला त्याचा मित्र विनयचा फोन आला, "मी तुला घ्यायला येतो बसस्थानकावर, कारण गावात रात्रीची लाइट गेलेली असते व
तुला अंधार पडेल" म्हणून विचारत होता, नेहमी विनयच घ्यायला यायचा त्यामुळे तुला त्रास नको म्हणून त्याने फोन ठेवला, बस तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली, गडबडीने खाली उतरून तो रिक्षा शोधू लागला, तेवढ्यात त्याला मिठाईचे दुकान दिसले, आईला कलाकंद आवडते म्हणून त्याने कलाकंद व काकाच्या मुलीची आवडती इमरती ही घेतली. बऱ्याच दिसांपासून आवडती मटण बिर्याणी खाल्ली नव्हती, आईला सरप्राइज देऊ म्हणून त्याने मटण व बाकी समान घेतले व रिक्षामध्ये बसला.
रस्त्याने जात असताना त्याला जाणवले की नेहमी अंडा भुर्जी ची गाडी लावणारे अब्दुल काका आज दिसले नाही.
रिक्षावल्याने त्याला गावाबाहेर सोडले, सोबतचे सामान घेऊन तो गावाच्या दिशेने निघाला. काही अंतरावर त्याला गावातील मंडळाच्या मुलांचा घोळका आपल्याकडे येताना दिसला. "पिशवीमध्ये काय आहे ?" त्यांनी विचारले, " मिठाई व इतर सामान आहे " तो उत्तरला.
रात्री जेवत असलेल्या विनयचा फोन वाजला, " " विनय, तूने शाहिद को फोन किया था क्या , वो अभी तक घर नही आया ? " काळजीच्या स्वरात ती स्त्री बोलत होती.
प्रतिक्षा
Submitted by Anonymous_लेखक on 6 May, 2020 - 13:31
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रमशः आहे का ?
क्रमशः आहे का ?
निवेदक शाहिद मुस्लिम आहे आणि
निवेदक शाहिद मुस्लिम आहे आणि मारला गेला असे वाटत आहे हे वाचून... अब्दुल चाचा पण मारला गेला किंवा पळाला...
निवेदक शाहिद मुस्लिम आहे आणि
निवेदक शाहिद मुस्लिम आहे आणि मारला गेला असे वाटत आहे हे वाचून... अब्दुल चाचा पण मारला गेला किंवा पळाला... >>>>
बरोबर....
++ शिवजयंती मिरवणुक मधिल "नाचणाऱ्या एका मुलाने त्याच्याकडे अशा नजरेने बघितले" हा प्रसंग
हेलावून टाकणारी कथा.
हेलावून टाकणारी कथा.
मला नाही समजली.
मला नाही समजली.
एकदम सटल !!! आणि सॅॅड.
एकदम सटल !!! आणि सॅॅड. च्रप्स , king_of_net यांच्या मार्गदर्शना मुळे समजली.
लिहा अशाच गोष्टी अजून.
वाइट वाटलं वाचून!
वाइट वाटलं वाचून!
अवांतर --> संक्रांतीच्या काळात कॉलेजेसला PL नसते.. (sorry for the useless correction!!)