खरं सांगायचं तर ज्याला भावखावू रोल म्हणतात तो या चित्रपटात टूकोचाच आहे अशी माझी समजूत आहे. त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग पाहिले म्हणजे हे लक्षात येईल. अगदी सुरुवातीला टुकोचा सामना जेव्हा “द गुड” असलेला क्लिंट इस्टवूड याच्याशी होतो तेव्हादेखिल त्याचे वर्तन एखाद्या खोडकर लहान मुलाप्रमाणेच असते. त्याला हा “ब्लांडी” जेव्हा बांधून घोड्यावर टाकून नेतो तेव्हा त्याने दिलेल्या शिव्या आणि संतापही अस्सल असतो. आतून बाहेरून स्वच्छ असणार्या माणसांचा आपल्याला राग येत नाही. आणि आलाच तर तो तेवढ्यापुरताच येतो. कारण कुठेतरी ही माणसे निरागस असतात याची आपल्याला खात्री पटलेली असते. इलायी वलाचच्या अभिनयाची सर्वात मोठे यश म्हणजे सुरुवातीपासूनच त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला निरागसपणा अतिशय यशस्वीपणे बिंबवला आहे. तो लोभी आहे हे त्याने लपवलेले नाही. पण तो हलकट नाही. आपल्याकडे हिन्दी चित्रपटात एक डायलॉग फार प्रसिद्ध आहे. “चोरोंकेभी उसुल होते है” तसा हा उसूल असलेला चोर आहे. त्याला शक्य असला तरी उगाचच रक्तपात मंजूर नाही. सुरुवातीला इस्टवूड त्याला पकडून शेरीफच्या हवाली करतो. आणि त्याला फासावर लटकवण्यासाठी बांधले जाते. तेव्हाही त्याच्या चेहर्यावर काही केल्याची खंत नसते. जे समोर येईल त्याला तोंड द्यायचे, येईल त्या संकटांमधून मार्ग काढायचा. आपल्या वकूबानूसार जगाशी मुकाबला करायचा हा त्याचा जीवनमार्ग आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांना नकळत पण निश्चितपणे टूको आपला वाटायला लागतो आणि त्याच्याबद्दल सहानूभुतीही वाटू लागते.
त्यानंतर दुसरे महत्त्वाचे दृष्यही टूकोच्या व्यक्तीरेखेचा आणखी विकास करणारे आहे. द गूड त्याला हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेतच सोडून जातो आणि टूको सूडाने पेटतो. या वेळी ज्या तर्हेने तो धडपडत एका गन शॉप मध्ये येऊन हवी तशी गन बनवतो आणि त्या दुकानदारालाच लुटून निहून जातो तो सीन एक क्लासिक म्हटला जावा असा आहे. पिस्तूलाबद्दल टूकोला बरीच तांत्रिक माहिती आहे. तो पाचसहा पिस्तूलांचे निरनिराळे भाग वेगळे काढून त्याला हवे तसे पिस्तूल बनवतो. हा भाग पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा. आपल्या नेमबाजीचा सार्थ अभिमान त्याला आहे. बॅकयार्डमध्ये जाऊन त्याने तो किती पट्टीचा नेमबाज आहे हे देखिल सिद्ध केले आहे. पुढे इस्टवूडला पकडून तो आपल्या अपमानाचे उट्टे दामदुपटीने वसूल करतो. मात्र नंतर टूकोला कळतं की खजिना कुठल्या स्मशानात आहे त्या स्मशानाचं फक्त नावच आपल्याला ठावूक आहे मात्र तो कुठल्या थडग्यात दडवला आहे हे फक्त ब्लांडीलाच माहित आहे. हे त्याला कळतं मात्र आणि टूको एकदम हूमजावच करतो. हा त्याचा लोभीपणा आहे. तेव्हा आपल्याला हसु येते. मात्र राग येत नाही. कारण तोपर्यंत टूकोने आपल्याला काबिज केलेले असते.
एकदा ब्लांडीला आपले म्हटल्यावर मात्र टूकोने त्याची शेवटपर्यंत पाठराखण केलेली आहे. त्याला कधीही एकटे टाकलेले नाही. हा टूकोच्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक लोभस पदर. यामुळेच असेल कदाचित पण त्याने स्मशानभूमीचे नाव सांगावे म्हणून आधी त्याला खा खा खायला घालून नंतर केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचे दृष्य अतिशय अंगावर येते. पाहवत नाही. तेथूनही तो निसटतो. ते ही एक क्लासिक गणले गेलेले दृष्य. टूकोच्या वाट्याला अशी अविस्मरणीय दृष्य बरीच आलीत. त्यानंतर “व्हेन यू हॅव टू शूट…शूट, डोन्ट टॉक” हा जबरदस्त प्रसंग येतो. हे सारे प्रसंग इलायी वलाचने आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केले आहेत हे मान्य आहेच. पण हे प्रसंग उठावदार करण्यात सर्जियो लियॉनिच्या सूक्ष्म बारकावे पकडून केलेल्या दिग्दर्शनाचा महत्त्वाचा वाटा आहे हे नाकारता येणारच नाही. शिवाय इनियो मोरीकॉनीचे संगीतही त्या जोडीला आहेच. त्यावर वेगळ्याने लिहायचे असल्याने येथे आताच काही लिहित नाही. एवढेच बोलतो की या चित्रपटाचे आजदेखिल तितकेच लोकप्रिय असलेले संगीत हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे असे मला वाटते.
शेवटच्या प्रसंगावरही खास लेख लिहावा लागेल तेव्हा तेथेही पुन्हा टूकोचा उल्लेख येईलच. तेव्हा आता हे टुकोपुराण आवरते घेत्तो. पण संपवण्याआधी चित्रपटातील त्याच्या एकंदरित गबाळ्या आणि कळकट अवतारामुळे त्याला अग्ली म्हणण्यात आले असावे असेच वाटते. बाकी हा माणूस आपल्याला आवडूनच जातो. हा ओबडधोबड आहे. याच्यात कसलिही आधूनिकता नाही. ज्याला पॉलिशनेस म्हणता येईल असं त्याच्यात काहीही नाही. अगदी मातीचा आणि मातीतला असा आहे हा टूको. आणि या मातीतल्या माणसाच्या हृदयात त्यानेही दडपलेले एक दु:ख आहे. त्यालाही प्रेमाची ओढ आहे, आस आहे. इलायी वलाचने त्याच्या पाद्री असलेल्या भावाबरोबरीच्या भेटीचा प्रसंग फार सुरेख रंगवला आहे. यावेळी तो प्रेक्षकांच्याच नव्हे तर ब्लांडीच्याही मनात आपले स्थान निर्माण करतो. वेस्टर्नपटाच्या इतिहासातच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटाच्या इतिहासातही चिरस्मरणीय राहिल अशी ही व्यक्तीरेखा आहे.
यापुढचा लेख लिहिताना मला वारंवार श्वास रोखून धरावा लागणार आहे. कारण तो आहे “द बॅड” एंजल आय बद्दल. ली वान क्लिफ बद्दल लिहायचे म्हणजे धडकीच भरते. नूसत्या नजरेने पडद्याला भोक पाडणारा माणूस आहे तो…
(क्रमशः)
अतुल ठाकुर
रुमाल
रुमाल