दुसरा आदमी मी पाहिलाही असेल कदाचित पण लक्षात राहिलंय ते हे गाणं. अनेक कारणांसाठी. एकतर यात तीन दिग्गज एकत्र आले आहेत. लता, किशोर आणि रफी. पडद्यावर कपूर काका पुतण्या आणि राखी. हेही तिघे कसलेले अभिनेते. हिन्दी चित्रपटांचं हे वैशिष्ट्य म्हणता येईल की असे कलाकार पडद्यावर आणि पडद्यामागे आणून अनेकदा आतिषबाजी केली जाते. आणि ती बघणे हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो. अभिनयाची जुगलबंदी पडद्यावर आणि गायनाची जुगलबंदी पडद्यामागे. गीत लिहिलंय मजरूह सुलतानपुरींनी. एक प्रौढा आणि तिच्याहून तरुण नायकाची प्रेमकहाणी ही हिन्दी पडद्यावर नेहेमीची गोष्ट नव्हे. तर या नवलाईच्या नात्यात हा बिनधास्त तरुण म्हणतोय "कोई हमदम हो, चाहत के काबिल तो किसलिये हम सम्हल जायें..." यावर ती प्रौढा उत्तर देताना शांतपणे जणू त्याला समजावतेय "अच्छा है सम्हल जायें...". हा संवाद पडद्यावर पाहण्यातही मजा आहे. राजेश रोशनने लावलेली गोड चाल आणि त्याचे या तिघा गायकांनी केलेल सोने, त्याचबरोबर या गायक, संगीत दिग्दर्शक आणि गीतकार यांनी केलेले गारुड पडद्यावर तसेच जादुई सादर केले आहे ते राखी, शशी कपूर आणि ऋषी कपूर यांनी.
गाण्यात म्हटलं तर फार काही नाही. निसर्गाच्या सानिध्यात दोघेही हिंडत आहेत. धूके पसरले आहे. माझ्या आठवणीत या चित्रपटात राखी ही कॉर्पोरेट जगताशी संबंधित असते. त्या गॉगल्समुळे ती थेट तशीच दिसली आहे. अतिशय देखणी. तिला जगाचा जास्त अनुभव आहे. हा तरुण तिच्या मनात भरला असला तरी जगाचा अनुभव तिला पटकन निर्णय घेऊ देत नाही. ऋषी कपूर आणि राखी या दोघाही कलाकारांनी फक्त देहबोलीतून आपापले स्वभाव दाखवले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावरून उड्या मारत चालणारा ऋषी कपूर. त्याच्या देहातच नृत्यासाठी आवश्यक असलेला एक र्हीदम आहे. ते चालणेही नृत्यासारखेच वाटते. आणि त्या चेहर्यावरचे लगेच पालटणारे भाव तर खास पाहण्याजोगे. हे त्याचे वैशिष्ट्य त्याच्या प्रत्येक चित्रपटातून दाखवता येईल. आताच आपल्याला प्रतिसाद देणारी ही आपली प्रिया अचानक शांत झाली हे त्याच्या लक्षात येतं आणि तो एकदम मागे वळून तिच्याकडे पाहतो. तेव्हा त्याच्या चेहर्यावर हे झरर्कन बदललेले भाव दिसतात. तरी हा सळसळणारा उत्साह असलेला तरुण आहे. उड्या मारत आपल्या मस्तीत गात चालला आहे. आणि राखीची चाल मात्र अगदी संथ एखाद्या शांत नदीप्रमाणे आहे. त्या चालीत अवखळपणा नाही.
निसर्गाच्या सहवासात आता मात्र तिला तिचे पूर्वायुष्य आणि त्या आयुष्यातील प्रियकर आठवत आहे. "झूमके जब जब कभी दो दिल गाते है..चार कदम चलते है और खो जाते है..." तिचा अनुभव हा असा उदासवाणा आहे. त्यामुळे हे नकोच. आपण स्वतःला सावरुयात हे तिचे मन सांगत आहे.आणि समोरचे उत्साहाने भारलेले, बागडणारे तारुण्य म्हणते आहे "ऐसा है तो खो जाने दो मुझको भी आज..." तिने आपल्या अनुभवाने केलेले मांडलेल मत आणि त्याला त्याने दिलेले प्रत्युत्तर हेच या गाण्याचे स्वरुप आहे. लताने घेतलेल्या आलापी जिवघेण्या आहेत. संथपणे चालणारी राखी कुठेतरी त्याच्यात गुंतत चालली आहेच. किशोरने "क्या मौसम है...मध्ये तो नेहेमी ऋषी कपूरसाठी जो खास आवाज लावतो तो लावल्याबरोबर जणू काही त्याला साथ करण्यासाठीच लताची आलापी सुरु होते. हे कुठेतरी प्रतिकात्मक आहे.एक जण गाताना दुसरा साथ देऊ लागला तर समजावे इथे कुठेतरी हृदयाचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. बाकी शशी कपूर जेव्हा येतो ते दृष्य म्हणजे दिग्दर्शकाला खास सॅल्युट ठोकण्याचेच. ही सगळी कपूर मंडळी कुठेतरी एकमेकांसारखी दिसतात, त्यांच्यात काहीन काही सारखेपणा असतो. राखी तो चालत असताना त्याला पाठमोरा पाहते. धूक्याचे पडदे तिच्यासमोर येतात. आणि नेमका येथे ऋषीकपूर काहीसा शशीसारखा चालला आहे. ती पाहतच राहते.
...भूतकाळातील आठवणींचे तरंग वर यावेत तसा एक व्हायोलिनचा सुरेख पीस वाजतो आणि पडद्यावर पटकन वळून शशी कपूर गाताना आपल्याला दिसतो. ये मस्तीयां ये बहार....येथे मात्र राखी जास्त तरुण दाखवली आहे आणि येथे ती तरुणासारखेच बोलत आहे. "दुनिया को अब दो नजर क्यों आये हम..इतने करीब आओ के इक हो जायें हम..." शशी नावाचे वादळ बर्फात ..मै गिरता हूं मुझे थाम लो...असे जेव्हा रफीच्या आवाजात म्हणतो तेव्हा हिन्दी गाण्याच्या रसिकांना आतून हे नक्की जाणवले असेल की लता आणि किशोरने इतक्या उंचीवर पोहोचवलेले गाणे आणखी वर नेण्यासाठी येथे रफीच हवा. या काही सेकंदांमध्ये शशी कपूरने केलेला धसमुसळेपणा हा खास पाहण्याजोगा आणि त्याचबरोबर तो धसमुसळेपणा रफीच्या आवाजात खास ऐकण्याजोगा देखिल. पुन्हा तसाच एक व्हायोलिनचा पीस राखीला वर्तमानात घेऊन येतो....आणि या प्रेमी युगुलांचे कूजन सुरु होते. तो स्वप्नाळू तरुण तिला सांगत राहतो "चल कहीं दूर निकल जायें..." आणि ती समजावत राहते.."अच्छा है सम्हल जाये...
आज हे सारे लिहिण्याचे कारण "चल कहीं दूर निकल जायें..." म्हणणारा हा गडी परवा एकटाच दूरच्या प्रवासाला निघून गेला...
अतुल ठाकुर
रफी ला जो गाण्यातील पीस दिला
रफी ला जो गाण्यातील पीस दिला आहे तो ऐकून रसभंग होतो
(मला रफीच्या तुलनेत किशोर फारच अति आवडतो या माझ्या मताचा या वरील वाक्यावर यत्किंचितही प्रभाव नाही)
'गाण्यात म्हंटल तर फार काही नाही' या वाक्याने सुरू होणारा पॅरा मस्त आहे, पण खरे तर गाण्यात प्रचंड व खूप काही आहे हे आपले माझे वैयक्तिक मत!
सतत driving करत असल्यामुळे हे गाणे विशेष आवडते
सुरेख, भावोत्कट लेख
धन्यवाद.
धन्यवाद.
सुंदर आहे गाणं.. बरेचदा ऐकलंय
सुंदर आहे गाणं.. बरेचदा ऐकलंय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच लिहिलेय.
मस्तच लिहिलेय.
आधीच, रिषी कपूर गेल्याने जरासे खट्टूच झालेय मन... का कोणास ठावूक...
मस्त लिहीलयत, परत
मस्त लिहीलयत, परत गाण्याबरोबर फिरून आले. अख्खं गाणं उभं केलंत डोळ्यासमोर.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
फक्त गाण्यात म्हटलं तर फार काही नाही, हे खरं नाही. चित्रपटाचा अर्क या गाण्यात उतरलाय.
हा चित्रपट अर्धवट पाहिल्याचं आठवतंय. राखी जाहिरात क्षेत्रातली प्रथितयश व्यक्ती आणि नवी अॅड एजन्सी सुरू क रणारा ऋषी तिला आपल्या फर्ममध्ये घेण्यासाठी तिच्या मागे लागतो. एवढंच आठवतंय. (चित्रपटातला) ऋषी राखीपेक्षा फार कमी वयाचा आहे. शशी तिचा आता हयात नसलेला प्रियकर. म्हणूनच ते "चार कदम चलते हैं फिर खो जाते हैं."
ऋषीचा रि स्क टेकिंग अॅटिट्यूड दाखवायला आणि गाण्यातल्या शब्दांना न्याय द्यायला तो रस्त्याच्या कडेला लावलेल्या दगडांव रून उड्या मारत चालतोय.
शशीच्या हालचालींतली एनर्जी दाखवायला रफीचे शब्द हॅमर करून म्हटलेत.
आता या चित्रपटाचं कथानक शोधून वाचलं तर त्यात ऋषी आणि राखी गाण्यात म्हणतात त्याच्या उलट वागलेत. चित्रपट काळाच्या खूप पुढे होता.
ऋषीने अंगात घातलेलं किती तोकडं आहे? अर्थात अख्खं गाणं त्याच्यामुळे (म्हणजे ऋषीमुळे, तोकड्या अंगातल्यामुळे नव्हे
) अधिकच प्रेक्षणीय झालंय.
मस्त आहे गाणं आणि लेखही
मस्त आहे गाणं आणि लेखही अर्थात.
सुरवातीचं लोकेशन खंडाळ्याच्या ड्युक्स रिट्रिटच्या खालच्या रस्त्यावर आहे असं दिसतंय. तो बोगदाही दिसतो.
सुरवातीचं लोकेशन खंडाळ्याच्या
सुरवातीचं लोकेशन खंडाळ्याच्या ड्युक्स रिट्रिटच्या खालच्या रस्त्यावर आहे असं दिसतंय. तो बोगदाही दिसतो.
वाटलंच मला.खंडाळ्यासारखंच काहीतरी. धन्यवाद मामी.
फक्त गाण्यात म्हटलं तर फार काही नाही, हे खरं नाही.
प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या डोक्यात गोल्डीने पिक्चराईझ केलेलं दिलका भंवर करे पूकार सारखं गाणं होतं. प्रत्येक हालचालीत काहीतरी आहे त्यात. देव आनंद एकेक पायरी उतरताना नूतनचे हावभाव वगैरे. त्या अर्थाने काही नाही म्हट्लं. चित्रपटाचा अर्क त्यात आहे ते अगदी मान्यच आहे भरत
मस्त लिहीलयत, परत गाण्याबरोबर फिरून आले. अख्खं गाणं उभं केलंत डोळ्यासमोर.
किती सुरेख लिहिलेत.
थॅम्क्स धनुडी..गाण्याबरोबर फिरून आले
आधीच, रिषी कपूर गेल्याने जरासे खट्टूच झालेय मन... का कोणास ठावूक...
झंपी खरंच. कुणीतरी जवळचं गेल्यासारखं वाटलं. ही माणसं जिवंत असताना असं कधी आपल्याला हे लोक गेल्यावर वाटेल असं वाटलं नव्हतं. आपल्या जवळच्यांना आपण गृहीत धरून वागतो तसंच काहीसं असेल.
छान लेख!
छान लेख!
सुरेख चाल, सुंदर शब्द आणि पार्श्वगायकांचा सुमधुर आवाज यामुळे हे गाणे मला खुप आवडते.
>>> झंपी खरंच. कुणीतरी जवळचं
>>> झंपी खरंच. कुणीतरी जवळचं गेल्यासारखं वाटलं. ही माणसं जिवंत असताना असं कधी आपल्याला हे लोक गेल्यावर वाटेल असं वाटलं नव्हतं. आपल्या जवळच्यांना आपण गृहीत धरून वागतो तसंच काहीसं असेल.<<
ह्म्म ... तसेच असेल बहुधा.
खरे तर बाहेर सतत काही ना काही नकारात्मक बातम्या वाचून तसेही घाबरायलाच झालेय आजकाल.. त्यामुळे , त्यात आणखी भर पडली की, सुन्न होतं.
सुंदर लिहिले आहे नेहमीप्रमाणे
सुंदर लिहिले आहे नेहमीप्रमाणे. गाणं पाहिलंय, आवडतंही आहे. पण चित्रपटाची कथा माहिती नव्हती.
ऋषी कपूर गेल्याने मन काहीसं उदास झालंय हे खरं.
राखी किती देखणी दिसते आणि
राखी किती देखणी दिसते आणि तिची साडी किती मस्त आहे. ब्राउन आणि मस्टर्ड कलर प्रिंटेड साडी.
ऋषीकपूरचं पोलकं काय झेपलं नाही. खरंतर तो त्याचं पोट लपेल असे कपडे घालायचा. शशी कपूरनं सुद्धा कसला भयाण पिवळ्या रंगाचा शर्ट घातलाय.
रच्याकने, गाण्यात शशी आणि राखी एकमेकांसोबत अतिशय ऑकवर्ड वाटतायत. गाण्यांच्या ओळी काय आणि हे आपले दूर दूरच आहेत आणि काहीतरी विचित्र हावभाव करतायत. ३.५१ ला राखी जेव्हा 'दुनिया को अब दो नजर क्यु आयें हम' म्हणते तेव्हा शशीनं किती मजेशीर हात केलेत. असो, गाणं एकदम सुंदर आहे.
सुंदर लिहिलं आहे. वाचता वाचता
सुंदर लिहिलं आहे. वाचता वाचता नकळत गाणं गुणगुणलं गेलं.
ऋषि कपूरचं नैसर्गिक आणि ग्रेसफुल नृत्य नेहमीच आवडलं.
सरगम मधील गाण्यांमध्ये जणू तो खरोखरच डफली वाजवतो असं वाटतं. त्याचप्रमाणे' एक चादर मैली सी' मधील त्याचा अभिनय उल्लेखनीय होता.
त्याचप्रमाणे' एक चादर मैली सी
त्याचप्रमाणे' एक चादर मैली सी' मधील त्याचा अभिनय उल्लेखनीय होता.
>>>
वाह. सुंदर चित्रपट आणि ऋषीचे काम खरंच चांगलं होतं.
एक चादर मैली सी हा अंगावर
एक चादर मैली सी हा अंगावर येणारा चित्रपट होता. फारच दाहक.
गाणं आणि चित्रपट दोन्ही माहित
गाणं आणि चित्रपट दोन्ही माहित नाहीत. गाण्याची लिंक दिली असतीत तर बरे झाले असते. ऋषीचा फोटो बघून काळजात कळ उठली. त्याचे काही स्वेटरमय चित्रपट ज्यात तो गोल मटोल दिसतो, ते आवडत नाहीत. हे तुमचे लिखाण वाचून जाणवतंय की त्याचे सुरुवातीचे आणि शेवटच्या काळातील बरेच चित्रपट मी बघितलेले नाहीत. आता सुरुवात करते. एक चादर मैली सी डालो केला आहे.
लेख आवडला. हे गाणं नुसतंच
लेख आवडला. हे गाणं नुसतंच ऐकलं होतं, पण बारकावे लेखातून वाचून कळले आणि मग युट्युबवर गाणं पाहिलं. पूर्वी कधी पाहिल्याचं आठवत नाही.
ऋषी कपूर क्युट दिसतो आहे आणि ( मला कधीच न आवडलेली ) दगडी मख्ख चेहऱ्याची राखी यात खूप सुंदर आणि एक्सप्रेसिव्ह वाटते आहे.
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
सगळ्याच कपूर लोकांची नृत्ये बघण्यासारखी असत. नृत्य करताना त्यांची देहबोली वेगळीच असे. आ गले लग जा मध्ये शशीची रोलर स्केट्सवरची गाणी पुन्हा पुन्हा बघावीशी वाटतात. ऋषि कपूरचे डफली गाणे असेच तालाचे उत्तम भान दाखवणारे.
माझे खूप आवडते गाणे. पण मला
माझे खूप आवडते गाणे. पण मला ऐकायला जास्त आवडते कारण पडद्यावर राखी व ऋषी मला गाण्याकडे लक्ष द्यायला देत नाहीत, शशीकपूर फारतर मिनिटभर दिसतो.
चित्रपटाचे कास्टिंग परफेक्ट आहे. शशी गेल्याच्या दुःखामुळे दीर्घकाळ नैराश्याशी सामना करणारी राखी ऋषीचे शशीशी दिसण्यात असलेले साम्य बघून त्याच्याकडे ओढली जाते आणि त्याच्यात शशीला शोधते. तिचे ऋषिकडे लक्ष नसतेच पण ऋषीला ती शशी समजून देत असलेल्या विशेष भावामुळे तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागते आणि त्या भानगडीत बायकोकडे दुर्लक्ष व्हायला लागते. शेवट आशावादी केलाय हे मला खूप आवडले, नायिका मानसिक आजारावर औषधोपचार घेते. नाहीतर त्या काळात दोघे नायक अथवा नायिका असल्यास शेवटी एकाला बलिदान देणे मंडेटरी होते.