"न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर" म्हणजे काय रे भाऊ ?

Submitted by SureshShinde on 2 May, 2020 - 08:22

नुकताच आपणा सर्वांचा आवडता हरहुन्नरी कलाकार ईरफान खान 'न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर' या आजाराने निवर्तला. पंधरा वर्षांपूर्वी, महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्व, डॉ. श्रीकांत जिचकार यांना देखील आपण याच आजाराने गमावले. अशाच एका बाधित रुग्णाच्या सत्यकथेमधून या आजाराविषयी थोडी माहिती जाणून घेवू या .....
******
600px-Blausen_0699_PancreasAnatomy2.png
******
"शिवाजीराव, बोला काय होतय आपल्याला ?"
सुमारे दोन वर्षे झाली असतील या प्रसंगाला! श्री. व सौ. शिवाजीराव पासलकर हे जोडपे माझ्या क्लिनिक मध्ये तपासणीसाठी आले होते. उभयतांच्या चेहेर्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती. शिवाजीरावांचे वय सुमारे तीस वर्षे असावे. शरीरयष्टी स्थूलतेकडे झुकलेली.
सौ. नी बोलायला सुरुवात केली,
"यांच्या तब्बेतीच्या तक्रारी खूप आहेत, कोठून सुरुवात करावी तेच कळत नाही."
त्यांच्या बोलण्याचा थोडक्यात सारांश असा होता,
चार ते पाच वर्षे अधून मधून त्रास होत होता. भूक जास्त लागत होती व त्यामुळे वजन वाढत चालले होते. सतत डोके दुखत असे. न जेवले तर चक्कर येत होती. जेवणाला थोडासा जरी उशीर झाला तरी हात थरथर कापत व छातीमध्ये धड-धड होत होती. कधी कधी तर सर्वांगाला दरदरून घाम सुटत असे. एक दोनदा चक्कर येऊन पडले देखील होते. साखरपाणी पाजल्यावर थोड्याच वेळात एकदम नॉर्मल होत होते.
सासवड मधील प्रथितयश डॉ. साबळे यांना ही सर्व लक्षणे 'हायपोग्लायसेमिया'ची म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत असल्याची वाटल्यावरून पुढील तपासणीसाठी माझ्याकडे पाठवले होते.
मला शिवाजीरावांच्या शारीरिक तपासणीमध्ये काहिही दोष आढळला नाही. पण त्यांच्या ब्लड शुगर तपासणीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण मात्र खूपच कमी दाखवत होते. आपली रक्तातील साखर सुमारे ८० ते १२० असावी लागते. आपल्या मेंदूला काम करण्यासाठी कमीत कमी ६० पर्यंत साखर असणे आवश्यक असते. अन्यथा चक्कर येऊन बेशुद्ध अवस्था म्हणजेच 'कोमा' होण्याची शक्यता असते. यांची साखर होती फक्त ४५! बहुतेक त्यांच्या मेंदूला कमी साखरेची सवय झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास होत नव्हता.
ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला व त्यांच्या सौ.ना म्हणालो,
"हे पहा, यांची रक्तातील साखर खूपच कमी आहे व त्यामुळे यांना पुढील तपासण्या कराव्या लागतील. आपल्या पोटामध्ये स्वादुपिंड म्हणजे 'पॅनक्रियास' नावाचा एक अवयव असतो. त्यामध्ये इन्सुलिन नावाचे एक हार्मोन तयार होते जे रक्तामधील साखर नियंत्रित करते. यांच्या शरीरामधील इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले दिसते आहे. त्याचे कारण शोधण्यासाठी आपणाला चारपाच दिवस दवाखान्यात दाखल होणे आवश्यक आहे. त्यानंतरच पुढील उपचार सुचवता येतील."
" आम्हाला साबळे सरांनी तशी कल्पना दिली असल्याने आम्ही ऍडमिट होण्याच्या तयारीनेच आलो आहोत. पण तेथे आपण काय तपासणी करणार त्याची थोडी कल्पना दिलीत तर बरे होईल." सौ.
"हे पहा, या तक्रारी लक्ष्यात घेतल्यानंतर यांच्या स्वादुपिंडामध्ये प्रमाणपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करणारी गाठ म्हणजेच 'इंसुलीनोमा' असण्याची शक्यता वाटते."
"अरे बाप रे, म्हणजे कँसर की काय ?" शिवाजीराव उदगारले.
" हे पहा, घाबरू नका. ज्याअर्थी हा त्रास गेली चार पाच वर्षे चालू आहे त्यावरून मला तर ही गाठ १०० टक्के साधीच म्हणजे 'बिनाइन' असण्याची शक्यता वाटते. पण दुर्लक्ष्य करून चालणार नाही. तेथे प्रथम आपण पोटाची सोनोग्राफी करू. सोनोग्राफी म्हणजे आपला तिसरा डोळाच जणू. त्यामध्ये आपणाला स्वादुपिंडामध्ये असलेला आजार दिसण्याची शक्यता आहे. शिवाय डॉक्टरांच्या देखरेखीखाली बहात्तर तास उपास करायला सांगून साखर खरोखर किती कमी होते व काय त्रास होतो याचा अभ्यास हि करावा लागेल. त्या अनुषंगाने रक्ताच्या इतरही तपासण्या कराव्या लागतील. इतके करून आजाराचे निदान न झाल्यास सिटी स्क्यान देखील करावा लागेल."
आता मात्र शिवाजीरावांनी डोक्याला हात लावून मटकन बसूनच घेतले. त्यांच्या सौ मात्र धीराच्या बाई, म्हणाल्या," अहो, असे घाबरून कसे चालेल. वाघ आपल्या समोर येऊन उभा आहे. डोळे झाकून घेतल्याने संकट टळेल का? काहीतरी उपाय हा शोधलाच पाहिजे." शिवाजीरावांचा हात धरून सौ बाहेर पडल्या.

दाखल झाल्यानंतर दोन दिवसातच शिवाजीरावांचे सर्व रिपोर्ट तयार झाले. त्यांच्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण खूपच वाढले होते. स्वादुपिंड ज्याप्रमाणे पाचक रस तयार करून अन्नाचे पचन करतो तसेच शरीरातील अन्नपदार्थांपासून ऊर्जा तयार करण्यासाठी लागणारी अनेक हार्मोन्स देखील तयार करतो. हार्मोन्सच्या या क्रियेला इंग्रजीमध्ये 'एंडोक्राइन' क्रिया म्हणतात. बरीचशी हार्मोन्स तयार करणाऱ्या पेशी या मेंदूपेशींवर क्रिया करतात म्हणून त्यांना 'न्यूरो-एंडोक्राइन' पेशी म्हणतात.
एंडोक्राइन पेशीसमूहाला मराठीमध्ये ग्रंथी असे संबोधन आहे. आपल्या शरीरातील ग्रंथी-संस्थेमध्ये अनेक ग्रंथी येतात. मेंदूच्या तळाशी असणारी 'शीर्ष-ग्रंथी' (Pituitary gland), मानेतील थायरॉईड, पोटातील किडनीजवळच्या अड्रेनल व आपल्या प्रजनन-ग्रंथी या इतर ग्रंथी आहेत. कधी कधी या सर्व ग्रंथींचे ट्युमर एकाच व्यक्तीला होऊ शकतात. म्हणून आपल्या पेशंटची आम्ही या सर्व देखील तपासण्या केल्या ज्या सर्व नॉर्मल आल्या.
त्यांच्या रिपोर्टचा अभ्यास करून मी त्यांना म्हणालो,
"शिवाजीराव, आपण नशीबवान आहात. आपल्या स्वादुपिंडामध्ये एक अगदी लहान म्हणजे चिंचोक्याएव्हढी गाठ आहे. तिचे ऑपरेशन करून काढणे अगदी सोपे आहे. ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता दिसत नाही. पण तरीदेखील खात्री करण्यासाठी Dotatate PET-CT नावाची एक तपासणी करणे आवश्यक आहे ज्यामध्ये या गाठीचे १०० टक्के निदान होईल व ऑपरेशनसाठी त्याची मदत होईल. आपण उद्याच स्कॅन करून घेऊ."

नव्वद टक्के रुग्णामध्ये या पेशींच्या गाठी हळू हळू वाढणाऱ्या व न पसरणाऱ्या असतात. पण १० टक्के रुग्णांमध्ये त्या भरभर वाढतात व शरीरात इतरत्र पसरतात म्हणजेच त्यांचे कॅन्सरमध्ये रूपांतर होते. न्यूरोएंडोक्रिन पेशींना काही विशिष्ठ प्रकारची केमिकल्स खूप आवडतात व त्यांना त्या पटकन शोषून घेतात. या गुणधर्माचा वापर शास्त्रज्ञांनी मोठया खुबीने करून घेतला आहे. या केमिकल्सना प्रक्रिया करून किरणोत्सारी केले जाते व त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिओ-किरणांचा उपयॊग निदान करण्यासाठी व त्या पेशी जाळून टाकण्यासाठीदेखील केला जातो. त्यांचे इंजेक्शन देऊन स्कॅन केल्यानंतर या पेशी शरीरामध्ये कोठे कोठे आहेत ते शोधता येते. तसेच या किरणोत्सारी संयुगांचा मोठ्ठा डोस दिल्याने त्या पेशी मारून शरीरातून कॅन्सरचा समूळ नायनाट करता येतो.
दुसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो असताना शिवाजीरावांचा स्कॅन रिपोर्ट तयार होता. अपेक्षेप्रमाणे ती गाठ कोठेही पसरलेली नव्हती.
"गुड मॉर्निंग, शिवाजीराव, चांगली बातमी आहे. ही गाठ अगदी साधी म्हणजे बेनाईन आहे, कॅन्सरची मुळीच नाही. आता आपल्याला ऑपरेशनचा विचार करावा लागेल. तुमची हरकत नसेल तर मी माझे मित्र डॉ. शशांक शहा यांना तुमचे ऑपरेशन करण्यासाठी बोलावणार आहे. त्यांनी अशी अनेक ऑपरेशन्स यशस्वीरीत्या केली आहेत. शिवाय स्थूल व्यक्तींचे ऑपरेशन करण्यात त्यांचा हातखंडा आहे."
दोन दिवसांनंतर शिवाजीरावांचे ऑपरेशन झाले. दोन दिवस अतिदक्षता कक्षात राहून त्यांना सामान्य वॉर्ड मध्ये आणल्यानंतर सौ. पासलकरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना लपविता येत नव्हता. शिवाजीरावांच्या न्यूरो-एंडोक्राइन ग्रंथींच्या इंसुलीनोमाचा ग्रंथ आटोपल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर आता तुमच्या-आमच्यासारखीच म्हणजे '१००' होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, तुमचं नवीन लेखन खूप दिवसांनी वाचायला मिळत आहे.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेखन.

छान माहीती . खूप दिवसांनी तुमचा नविन लेख वाचायला मिळालाय.

नेहमीप्रमाणे छान आणि माहितीपूर्ण लेख! बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख वाचून बरे वाटले!

बोर्डवर तुमचं नाव पाहिलं आणि अधीरतेने पहिला तुमचा धागा उघडला. मोजक्या शब्दांत रोगाचे कारण, कार्य, परिणाम आणि निदान छान उलगडून सांगितलंय.

नेहमीप्रमाणे छान आणि माहितीपूर्ण लेख! बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख वाचून बरे वाटले!

छान

छान माहिती
आपले लिखाण मिस करतो सर..

बोर्डवर तुमचं नाव पाहिलं आणि अधीरतेने पहिला तुमचा धागा उघडला. मोजक्या शब्दांत रोगाचे कारण, कार्य, परिणाम आणि निदान छान उलगडून सांगितलंय.>>>>+१.

धन्यवाद सर, जेव्हापासून या शब्दबद्दल वाचले तेव्हापासून हा मेंदूत रुतून बसला होता. आज त्याचा अर्थ कळला. तुम्ही लिहिते राहा, आत्ता लोकडॉऊन मध्ये चांगले लेख वाचायला मिळतील.

Pages