मी आनंद यात्री!

Submitted by चिन्नु on 26 April, 2020 - 05:41

छंद! या विषयावर माझ्या पेक्षा मातेकडे जास्त असेल सांगायला! माझी माता- अतिशय गुणसंपन्न. कुठं काही ओझरतं पाहीलं तरी हुबेहूब किंवा कांकणभर जास्त चांगले करायचा तिचा हातखंडा! शिवण, embroidery, knitting, crochet, drawing, हस्तकला, रांगोळ्या, पाकसिद्धी, लेखन, वाचन, teaching... म्हणजे you name it and she has it! तर अशा मातेचे आम्ही शेंडेफळ. यातील बरंच काही तिनं शिकवण्याचे प्रयत्न केले पण आस्मादिकांनी बर्याच वेळा यू टर्न करून तिचे सगळे बेत यशस्वी रित्या हाणून पाडले!

माझे बाबा- खूप छान लिहायचे, भजन, प्रवचन, अध्यात्म, ज्योतिष्यविद्या या सगळ्या गोष्टीत पारंगत होते. काही काही पदार्थ देखील ते खूप छान बनवायचे. जसं खिचडी, कढी...
तर अश्या प्रकारे छान बघायची, छान पदार्थ चाखायची आणि सुंदर वचने ऐकायची सवय लागत गेली. बाबा रात्री उशिरा आले तरी ते मला रोज एक गोष्ट सांगत आणि मगच झोप येई. या गोष्टी रामायण महाभारताच्या असत. कित्येक श्लोक, कविता आम्ही मिळून म्हणत असू. माझी नवीन पुस्तकं आणणे, त्यांना कव्हर घालणे ही आमची मिळून करायची कामं. बाबांची संध्या करून झाल्यावर ते राम नाम लिहत असत. कितीतरी कोटी राम नाम त्यांनी लिहिले आणि मथुरेला कुठंतरी पाठवलेत देखील. आमच्या कडे गीतरामायणाच्या कॅसेट्सचा पूर्ण संच होता. ते लावलं की आमच्या घराला एक प्रसन्न कळा येई! बाबांना बोर्डने रहायला दिलेली बिल्डींग तीन मजली होती. वरच्या मजल्यावरच्या एका भागात आमचं घर, त्यासमोर बाबांच ऑफिस, दुसर्या बाजूला बॅक आणि खाली त्या घरमालकांचं घर आणि गोठा! आईने गोठ्याच्या बाजूच्या गॅलरीत गुलाब, चीनी गुलाब, शेवंती अशी कितीतरी झाडं लावली होती. सकाळी तिथं गाईंचं हंबरणं, घंटानाद आणि वार्याच्या झुळूकेवर डोलणारी फुलं असं सुंदर वातावरण असे. बाबांच्या ऑफिसमध्ये असलेल्या अबब फाईली, त्यांच्या इंजिनिअर्स डायर्या, पेन, पंचिंग मशीन! सारं काही आवडीचं. बाबांकडे कुठलं नं कुठलं काम घेऊन आलेल्या लोकांची रांग जिन्यातून पार रस्त्यावर पर्यंत असे. कुणाला नवीन मीटर हवं असे, कुणाची कंप्लेट असे, कुणी भरीतपार्टीला आमंत्रित करायला आलेले तर काही परिस्थितीने गांजलेले लोकं. बाबा सर्वांना भेटत. त्यांच्या मृदु बोलण्यामुळे आणि सर्वांना जमेल तशी मदत करून ते सर्वांना आपलेसे करत. आजही जुनी लोकं बाबांना 'दादा ' म्हणूनच ओळखतात. त्यांची आठवण काढतात.
रोज शाळेत वर्ग शांत ठेवणे, समस्या ऐकणे, त्या टिचर्सकडे मांडणे हे येत गेलं. अशात एका दिवशी मराठीच्या निबंधाचा विषय मिळाला- मी चिमणी झाले तर.. घरी आल्यावर आई पोळ्या करत होती. तिला विषय सांगितला. ती हसून म्हणाली- तू चिमणी झालीस तर आधी भुर्र्कन उडून बाबांच्या ऑफिसमध्ये जाशील आणि त्यांच्या फाईलवर टकटक करशील, पण ते तुला ओळखणारच नाही. कारण तू तर तेव्हा चिमणी असशील ना! मी लिहिलेला हा निबंध शाळेत प्रत्येक वर्गात वाचला गेला. संध्याकाळी मराठीच्या टिचर शहानिशा करायला घरी! आईने सांगितले की ही लिहिते. मग एक दिवस सहजच एक कविता लिहिली. मग कविता, लेखन, भाषण, वादविवाद सगळीकडे पाय पसरवणे सुरू झाले. वर्तमानपत्र, मॅगझिन मधून कविता छापून येत. एकीकडे वाचन ही चालूच होते. दर महिन्याला किशोर, चांदोबा, काही मासिकं अशी माझ्या हातातपण न मावणारी पुस्तकं घेऊन मी स्टडी मध्ये बसत असे. सगळं वाचून होईपर्यंत बाहेर निघत नसे. भर म्हणून बाबा भरपूर काॅमिक्सही आणून देत. ते कमी पडायचं मग आईची लायब्ररीची पुस्तकं वाचायची. मग आई काही selective pages वाचायला द्यायची. पण तिला न कळू देता पूर्ण पुस्तक वाचून काढायचे! नववीत असताना बर्म्युडा triangle चा अनुवाद वाचून भारी वाटलं होतं. कितीतरी चरित्र आत्मचरित्र त्या काळात वाचली असतील.
काॅलेज सुरू झालं आणि काॅलेजची लायब्ररी मिळाली! Reading room मध्ये बसून पुस्तकं पिंजून काढायची, भावगीते, हिंदी गाणी म्हणायची. वार्षिक महोत्सवात भाग घ्यायचा.
नाटकाची प्रॅक्टीस पहायची. मग काॅलेज मॅगझिनची प्रतिनिधी म्हणून काम पाहताना वेगवेगळ्या stream च्या विद्यार्थ्यांना भेटले. माझ्या मराठीच्या उत्तर पत्रिकेचं वर्गामध्ये मोठ्या कौतुकानं वाचन होई. आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. या सगळ्या प्रकारात स्वयंपाक करणे, शिवण, कार्यानुभव या ठिकाणी आमची डाळ काही शिजली नाही. त्याबद्दल माता अजूनही सुनावत असते!
हिंदीच्या almost सगळ्या परीक्षा मी दिल्या. अजूनही हिंदी साहित्य खूप आवडतं. मैथिली शरण गुप्त, अमृता प्रितम, कवी नीरज यांच्या कविता तोंडीपाठ तर दुसरीकडे वर्डस्वर्थ आणि किट्सच्या कविता भरभरून वाचायच्या. उठता बसता पुलं आणि राम कदम यांचे लेखन जणू आमच्या साठीच लिहिलंय अशी बतावणी करत फिरायचं!
एन सी सी नेही खूप दिलं. नॅशनल लेव्हलवर मेडल मिळालं. स्वतःच स्वतःसाठी कसं उभं रहावं हे तिथंच शिकले.
College मॅगझिन, वार्षिक महोत्सव, सूत्रसंचालन तसेच कमी तिथं आम्ही म्हणून स्टेजवर गाणी देखील गायचं काम होतं!
Computer programming चं वेड लागलं. माझ्या programs ची तीस तीस printouts निघायला लागली. केव्हाही लॅबमध्ये computer हाताळण्याची परवानगी मिळाली. मी सेमिनार arrange करू लागले. Computer इतरांना शिकवायला आवडू लागले. तसेच इतरांना माझं शिकवणंही आवडू लागले.
Computer science मध्ये post graduation करायला मिळालं. Project report submission चा शेवटचा दिवस उजाडला. मी design simple निवडल्यामुळे माझा report ready होता पण पूर्ण क्लासचा मात्र screen printing होऊन आला नव्हता. कुणीच सबमिशन्स करू शकणार नव्हते. सगळे hod च्या केबीन बाहेर जमले होते. मी रिपोर्ट घेऊन पुढे झाले. मला अडवलं गेलं तसं मी क्लासला शांत केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवायला सांगितले. आत जाऊन रिपोर्ट दाखवला पण submit करू शकत नसल्याबद्दल माफी मागून आमच्या सरांना घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांसाठी मुदत वाढवून घेतली. बाहेर आल्यावर सगळ्यांच्या चेहर्यावरचा आनंद अजूनही आठवतो!
नोकरीच्या offers येऊ लागल्या. ध्यानीमनी नसताना एका interview मध्ये selection होऊन आयटी कंपनीत रूजू झाले. नवीन जागा, नवीन चेहरे आणि नवीन स्किल्स! शिकायचे दिवस. कंपनीची चावी देखील माझ्या कडे असायची. तरी ती कंपनी multinational कंपनीमध्ये काम करण्यासाठी सोडली. माझा experience पाहून ज्या दिवशी join झाले त्याच दिवशी project मिळाला. मिळाला तर मिळाला पण तोही असा की त्याचं काही documentation नव्हतं. क्लायंटला तो project run करून हवा होता. तोही माहित नसलेल्या भाषेत coding असलेला. मग काय, घेतलं challenge! Library मधून पुस्तकं शोधून तो कोड re-engineering करावा लागला. ज्या दिवशी मॅनेजरला सगळे components run करून दाखवले त्या दिवशी त्यांनी कंपनी च्या मधोमध उभे राहून announcement करून माझ्या achievement साठी टाळ्या वाजवल्या!
नंतर हैद्राबादच्या एका कंपनीने approach केलं. सगळ्या शर्ती मान्य करून कंपनीने offer दिली. आमच्या biodata वरच्या महतीनुसार challenging काम मिळत गेलं आणि एक दिवस होणारा नवरा अमेरिकेहून घोड्यावर बसून आला आणि स्वप्न बघितल्या सारखं आठ दिवसात लग्न झाले. विसा काढून रवानगी अमेरिकेला झाली!

एखादे जाडजूड पुस्तक चाटत अख्खा विकेंड रूमबाहेर न पडणारी मी, नवराकृपेने कार आणि पर्यायाने रोडवरंच भटकंती करत राहू लागले! नवर्याला इतिहास, भुगोल, खगोलशास्त्र, राजकारण, गणित अशा अनेक गोष्टीत रस असल्यामुळे अमेरिका त्याच्या दृष्टीने बघतांना मजा आली.
पुढे जाॅब मिळाला. जाॅब दुसर्या काउंटी मध्ये असल्यामुळे व बसेस तिथपर्यंत नसल्याने driving करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी सकाळी 5.30 ला कार घेऊन बाहेर पडले की 7पर्यंत ऑफिस गाठता येई. सेंट्रल टाईम झोनमध्ये असल्यामुळे मला इंडीया, USA आणि Canada टीम बरोबर संपर्क ठेवता येत असे. कॅलिफोर्निया टीमला जाग येईपर्यंत अर्धे काम झालेले असायचे. सर्वांना धरून चालत असल्यामुळे मला usa आणि Canada टीम हॅडल करायला मिळाली. काम वेळेत पूर्ण करणे. Discrepancy report करणे, नवीन features dev team आणि users बरोबर discuss करणे, suggestion देणे, release support करणे, UAT आणि user training अशी अनेक कामं असायची. त्या संदर्भात वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संपर्क साधावा लागे. एका project वर काम करताना खूप तफावत आढळली. मी ते सिस्टीममध्ये रिकाॅर्ड करू लागताच माझ्या केबीन मध्ये एक उंचापुरा माणूस आला व म्हणाला - प्लिज रिपोर्ट करू नकोस. मी चक्रावले. त्याने गयावया केली. परिस्थितीच तशी होती. तो माणूस आधी एका ख्यातनाम कार कंपनीमध्ये कार्यरत होता. त्याला काॅलेजला जाणारी मुलं होती. कितीतरी वर्षे तिथं काम केल्यावर कंपनीचं दिवाळं निघाल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकलं होतं. मोठ्या खटाटोपीने काही कोर्स करून तो आमच्या कंपनीत रूजू झाला होता. माझ्या रिपोर्टींगमुळे त्याचा जाॅब जाण्याची शक्यता होती. पण रिपोर्ट न करता राहणं शक्य नव्हतं. मी तोडगा काढला. त्याच्या कामातल्या चुकांची एकच फाईल केली. त्यामुळे त्याला चुका दुरुस्तीही करता येणार होत्या आणि त्या मॅनेजमेंटच्या लक्षात येणार नव्हत्या! विल्यमच्या चेहर्यावरचा 'सुटल्या'चा आनंद अजूनही आठवतो.
एका रिलीजच्या वेळी आमची dev manager लिन आजारी पडली. मला औषधं आणायला जाते म्हणून लिन् बाहेर पडली आणि तिच्या कामाशी संबंधित फिचर सपेशल भुईसपाट झालेले मला आढळले. त्याशिवाय रिलीज होणं शक्य नव्हतं. मी तातडीने लिनला फोन लावला पण ती बहुतेक औषध घेऊन झोपली होती! एका तासात release go-no go meeting होती. मी तातडीने लिनच्या टीम मधल्या लोकांना संपर्क साधायला सुरूवात केली. पण कुणालाच त्या कोडची खात्रीलायक जबाबदारी घेता येईना! मिटींग सुरू झाली! मी ते फिचर under testing आहे व वेळ लागेल असं सांगून सगळ्या user managers चा रोष ओढवून घेतला. शेवटी एका consultant च्या मदतीने कोड काढून बसले. पण सगळी authority लिन्नला असल्यामुळे मला फक्त कोड वाचून glitch शोधायचा पर्याय उरला होता. मी शेवटी कंपनीचा मेसेंजर उघडून लिन आणि तिच्या टीम सोबत problem discuss करायला सुरुवात केली. तासचे तास गेले. आम्ही फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो. संध्याकाळ होत आली होती. आज रिलीज काही होणार नाही आणि त्याचं खापर माझ्यावर फोडलं जाईल हे स्पष्ट दिसत होतं. मी हताश होऊन कॅटीनमधून काॅफी आणायला गेले. परत येऊन पाहते तर चक्क लिन मेसेंजर वर! तिने आम्ही केलेलं सगळं analysis वाचलं होतं. भराभरा कोड फिक्स झाला आणि तासाभरात आम्ही सर्व नीट करून कोड चेक इन केला. रिलिज successful झालं! दुसर्या दिवशी भेटताबरोबर लिन हातात हात घेऊन मला म्हणाली- What could I do without you! तू वाचवलंस.
इकडे भारतात परतल्यावर टीमची मॅनेजर झाले. प्रतिनिधी म्हणून जर्मनीला रवाना झाले. मी कुठलंही टीम structure ठेवलं नसल्याने सर्व मला directly approach करू शकत होते. Dev team जर्मनीत असल्यामुळे मी आमच्या टीमच्या 2 शिफ्ट केल्या. त्यामुळे जर्मन टीमला आमचा केव्हाही सपोर्ट मिळणं शक्य झाले. एका रिलीजसाठी युध्दपातळीवर काम करायचं असल्यामुळे रविवार असूनही सर्व टीम हैद्राबादच्या ऑफिसमध्ये हजर होती. पण हाय रे दैवा! जर्मनीतले सगळे सर्व्हर झोपी गेलेले. मॅनेजर म्हणून ज्या कुणाला संपर्क करता आला तो मी केला. पण व्यर्थ! शेवटी मी hr ला फोन करून टीमच्या खानपानाची व्यवस्था केली. आणि जर्मनीतल्या मॅनेजमेंटला खरमरीत इमेल धाडले. असला गलथान कारभार करून पुन्हा कुणाचा वेळ वाया न घालवण्याबद्दल सुनावलं. उशीर झाला होता. टीम मधल्या मुलींची घरी जाण्याची व्यवस्था केली. मॅनेजमेंटने हे खूप सिरियसली घेतलं आणि हा प्रकार परत उद्भवला नाही. एवढंच काय हैद्राबाद टीमला in house servers मिळालीत! नंतर कंपनीतर्फे मिळालेल्या फोटो मग वर एका टीम मेंबरने memorable moments म्हणून मी व पूर्ण टीमचा फोटो छापून घेतला त्याच्या फोटो मग वर! It was very happy and touching! इतकी वर्षे झाली मी ही कंपनी सोडून पण मला अजूनही मदर्स डे ला विश करणारी ईमेल्स येतात!
एका दिवशी इथल्या मराठी कट्ट्याचा शोध लागला. अॅलेक्सा या नाटकाचं फडणीस सरांनी केलेलं अभिवाचन attend करायचा योग आला. गंमत म्हणून अॅलेक्साचं पाळणागीत लिहिलं. ते मैत्रीणीने गुणगुणून दाखवले. दिग्दर्शकाने ते गीत असं काही transform केलं आणि कलाकार मैत्रीणींनी ते इतकं सुंदर सादर केलं की हे गीत या नाटकाचा high point ठरला! हैद्राबाद मध्ये हाऊसफुल प्रयोग झाल्यानंतर अभिनंदनाच्या वर्षाव झाला! पाळणागीत सादर करणार्या एका मैत्रीणीने मिठीच मारली आणि म्हणाली- केवळ तुझ्या या गीतामुळे आमच्या वाट्याला हे कौतुक आलं! अजून काय हवे!
मुंबईत असताना मी निव्वळ एका स्तंभाकरता रविवारचा सामना विकत घेत असे. कधीतरी त्या लेखकाला जाऊन भेटायची इच्छा अपुरीच राहिली. काही महिन्यांपूर्वी मुलांची पुस्तकं विकत घेत असताना त्यांचं नाव दिसलं. त्यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी त्यांच्या कथा अनुवाद करण्याविषयी सुचवलं! ज्यांना आपण मानतो अश्या थोर लोकांबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली हा केवळ ईश्वरी संकेत!
आता मला विचारलंत की नक्की काय आवडतं? तर मी सांगेन मला लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवायला आवडतात. आपल्या बदलत्या हावभावांबरोबर त्यांचे फुलणारे चेहरे पाहताना जो आनंद मिळतो तो केवळ अवर्णनीय!
माझे विनम्र बाबा, कलाकार आई, ताई, विनोदबुद्धीचा मोठा स्रोत असलेला दादा, बहुरंगी बहुढंगी नवरा मिळून हा हाडामासाचा ठोकळा बनला आहे! आपण सर्व विद्वान दिग्गजांची संगत लाभायला नक्कीच माझे पूर्वजन्मीचे सुकृत आहेत!
मी कोण? - मी आनंदयात्री! माझा छंद आनंद देण्याचा व घेण्याचा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदर लेखात बरंच मी-मी झालंय Happy माझा छंद या विषयावर हैद्राबादच्या एका साहित्य गृपसाठी लिहिलेला हा लेख.

चिन्नू, अतिशय कौतुकास्पद आहे हे. इतकी टॅलेंटेड असूनही तू किती साधी आहेस.

आणि हो, अजिबात मी-मी नाहीये. लेख मला फार आवडलाय.

कॉफी झाली की मग ताजेतवाने होउन, हा लेख वाचायचे ठरव;ए आहे.
>>>>>>>>>>आमच्या कडे गीतरामायणाच्या कॅसेट्सचा पूर्ण संच होता. ते लावलं की आमच्या घराला एक प्रसन्न कळा येई! >>>>>>> या वाक्याने जिंकलत!!
_________
>>>>आता मला विचारलंत की नक्की काय आवडतं? तर मी सांगेन मला लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवायला आवडतात. आपल्या बदलत्या हावभावांबरोबर त्यांचे फुलणारे चेहरे पाहताना जो आनंद मिळतो तो केवळ अवर्णनीय!>>>> वाह!!!

अतिशय सकारात्मक लेख आहे. Happy
आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

फारच छान लेख , तुम्ही अडचणींवर सहज मात केली आहे बर्याच ठिकाणी.
तुम्हाला शुभेच्छा . I am really impressed by your achievements. अभिनंदन. Happy

खूप खूप धन्यवाद आदिश्री!
मला वाटतं जर तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्हीही मात केली असती किंवा तोंड दिलं असतंच किंवा आपल्या पैकी काही देत ही असतील. मी काही वेगळं केलं नाहीये, फक्त शेअर केलं इतकंच. तुम्हाला सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! _//\\_