त्या बाईंचा बीएस्सी आयटी झालेला मुलगा गेले दोनतीन वर्षे ड्र्गच्या अधीन गेलेला आहे. लॉकडाऊनमध्ये ड्र्ग्ज मिळत नसल्याने तो हिंसक झाला आहे. काही दिवसापूर्वी त्याने आईवडिल आणि त्याच्या बारावीत असलेल्या बहिणीवर हात उगारला. बहिणीला बराच मार बसला. इतका की ती घरातून बाहेर पळाली आणि पाचेक तास बाहेरच होती. तेही या लॉकडाऊनच्या काळात. घरच्यांनी मग पोलीसांकडे तक्रार केली. तेथेही काही झाले नाही. बहिणीला आता मामाकडे पाठवले आहे. पण आईवडिल मात्र जीव मुठीत धरून राहात आहेत. एक तर मुलगा मारझोड करेल म्हणून भीती. आणि दुसरे म्हणजे तो दिवस दिवस बाहेर राहतो. बाहेर काय पराक्रम करत असेल ही चिंता आणि कदाचित घरी करोनाचा संसर्ग आणेल ही दुसरी रास्त चिंता.
मला फोन आल्यावर मी माझे काही काँटॅक्ट्स वापरले. पण लॉकडाऊनच्या काळात उपचारकेंद्रे बंद आहेत. नवीन भर्ती अजूनही सुरु झालेली नाही. समुपदेशन करता येणे कठीण आहे कारण मुलगा फोन वर येण्याची शक्यता जवळपास नाहीच. मग एए मिटिंगचा पर्याय सांगितला. त्या मिटिंग्ज जरी बंद असल्या तरी त्यातील कुणी कार्यकर्ते शेजारी पाजारी असले, कार्यरत असले आणि काही मदत होऊ शकली तर पाहता येईल. व्यसनाधीन असलेल्या आणि व्यसन मिळत नसल्याने हिंसक झालेल्या या मुलाच्या हातून काही भयंकर घडू नये हीच देवीजवळ प्रार्थना आहे. मात्र अशा हातघाईच्यावेळी सर्व इंटेलेक्चुअल चर्चा फोल वाटतात. कृती काय करता येईल याचाच विचार मनात असतो. मुलाला नाही तर आईवडीलांना समुपदेशनाची काही मदत होऊ शकेल का हा पर्याय मी सध्या पाहतो आहे. कदाचित त्यांचे समुदेशन झाले तर त्यांना आपल्या मुलाच्या समस्येला नीट तोंड देता येईल. स्वतःच्या चिंता कमी करता येतील. बघु या कसे काय जमते ते...सध्या त्या लोकांच्या संपर्कात आहे. हात वर करून मोकळं होणं जमणार नाही. फार अपराधी वाटेल.
पण या निमित्ताने काही दु:खद गोष्टी समोर आल्या.या बाईंना आधीपासूनच मुलाला उपचारकेंद्रात दाखल करावे म्हणून सल्ला देण्यात आला होता. तेथे त्यांनी दुर्लक्ष केले. आपल्याकडे व्यसनासंबंधीचे अज्ञान अगाध आहे. काहीतरी गुढ असा चमत्कार होऊन व्यसन आपोआप नाहीसे होईल असे सुशिक्षितांनाही वाटते. लग्न करून देण्यासारखे उपाय तर आजदेखिल लोकप्रिय आहेत. म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्याचा खेळखंडोबा. अजून हा मुलगा सुदैवाने अविवाहित आहे. आपल्याकडे वैज्ञानिक उपायांवर अनेकांचा फारसा विश्वास नसतो. बाई माझ्याशी फोनवर बोलताना काही असे औषध आहे का की जे घेतल्याने दारु प्यायची इच्छाच होणार नाही याबद्दल चौकशी करीत होत्या. दुसरे म्हणजे त्यांना उपचारकेंद्रात दाखल केल्यावर गॅरेंटी हवी होती. अशी गॅरेंटी कुणीही देऊ शकत नाही. व्यसन हे बाय चॉईस असते आणि ते स्वतःच प्रयत्न करून घालवावे लागते. उपचारकेंद्र काय नी सायकियाट्रीस्ट काय तुम्हाला फक्त मार्गदर्शन करु शकतात.
आणि एकदा उपायांवर तुमचा विश्वास नसेल तर उपाय केला तरी त्यावर जास्त पैसे खर्च करायचे नाहीत असा विचार माणसे करु लागतात असे मला अलिकडे वाटू लागले आहे. कुणाला मी अगदी पाषाणहृदयी आहे असे वाटेल पण मला अनुभवही तसेच आलेत. अजून तीन मे ला अवकाश आहे. त्यानंतरही काय निर्णय होईल सांगता येत नाही. उपचारकेंद्रे सुरु होतील की नाही माहित नाही. मुलगा हिंसक झालेला आहे. आणि या बाईंना खर्चाची काळजी आहे. काही कमी करता येईल का असा प्रश्न त्या विचारत होत्या. काही केसेस खरंच अशा असतात की ज्यांची खर्च करण्याची परिस्थिती नसते. व्यसनामुळे सारे काही डबघाईला आलेले असते. पण हातात सोन्याचे ब्रेसलेट, बोटांत सोन्याच्या अंगठ्या, बायकोच्या अंगावर दागिने असा जामानिमा करून आणि स्वतःच्या वाहनातून आलेली माणसेही पैसे कमी करा म्हणून अडून राहिलेली मला माहित आहेत. गंमत म्हणजे यातील अनेकांनी लाखो रुपये व्यसनात उडवलेले असतात. पण पंधरा हजार रुपये पंचवीस दिवसासाठी, (यात राहणे, जेवणखाण, नाश्ता, उपचार सारे आले) खर्च करायचे म्हणजे माणसे एकदम गहन विचारात पडतात.
थोडक्यात काय तर करोनाच्या निमित्ताने व्यसनाची ही काळीकुट्ट बाजुदेखिल उजेडात आली हे एकप्रकारे बरेच झाले. व्यसनाचा पुरवठा होत आहे म्हणून काहीवेळा हिंसा घडत नाही. म्हणजे सर्व आलबेल आहे असे नसतेच. पुरवठा थांबला की ही हिंस्र श्वापदे अंधारातून बाहेर येऊ लागतात. अशावेळी ती कुणाचा घास घेतील त्याचा नेम नसतो.
अतुल ठाकुर
खरं सांगु का, संशोधनाच्या
खरं सांगु का, संशोधनाच्या दरम्यान मुक्तांगणमध्ये जे दाहक वास्तव पाहिलं आहे त्याच्या पाच दहा टक्केही या लेखात आलं नसेल. आता सोळा सतरा वर्षे वयाची मुलं दाखल होऊ लागलीत उपचार घेण्यासाठी. ती ही बरीचशी मल्टीपल अॅडिक्टस म्हणून. म्हणजे वेळेवर जे मिळेल आणि जे उपलब्ध असेल आणि परवडेल ते व्यसन करायचं. या मुलांना पाहिल्यावर दयाच येते. पण ही मंडळी व्यसन करताना आईवडील आणि समाज यांच्यापासून ते चोरून ठेवण्याइतकी बिलंदर असतात. आणि आईवडिलांना अनेकदा हे सारं हाताबाहेर गेल्यावरच कळतं. "आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही त्याला दिलं" हे आईवडिलांचं एक टिपिकल वाक्य असतंच. आपण केलेल्या लाडाचं समर्थन म्हणून.
मी तेथे असताना एक मुलगा दाखल झाला होता. असाच सोळा सतरा वर्षाचा. त्याला जुगाराचे व्यसन होते. घर श्रीमंताचे. अफाट पैसा उडवत असे. मुक्तांगणमध्ये सीसीटीवी कॅमेरे लावले आहेत. आणि मोबाईल बाळगण्याची परवानगी नसते. घरच्यांशी आठवड्यातून एकदोनदाच आणि ते ही आवश्यक असेल तरच आणि ते सुद्धा समुपदेशकाच्या परवानगीनेच बोलता येतं. या मुलाला अत्यंत तातडीने फोन करायचा होता. पण चोरून करायचा होता. कुणाला कशाला ते ठावूक नाही. आणि त्यासाठी माझा मोबाईल हवा होता. मी त्याला टाळण्यासाठी सीसीटीवी कडे बोट दाखवले तर त्यानेच मला उलट उपाय सुचवला की मी टॉयलेट मध्ये तुमचा मोबाईल घेऊन जातो. तिथे कॅमेरे नसतात. अर्थातच मी त्याला उडवून लावले.
बाकी यांना दाखल करताना यातील काही पराक्रमी बाळे जो उच्छाद मांडतात तो पाहण्यासारखा असतो. रडारड काय. विरोध काय..काही विचारु नका. त्यातून कुणाला मानसिक आजार असेल तर परिस्थिती आणखी अवघड असते. मी पाहिलेला आणखी एक तरुण मुलगा कॉलेज सोडून दिवसभर घरात टिवी पाहत विड्या फुंकित असे. त्याने आईवर हात उचलला होता आणि ती बिचारी भेदरून गेली होती. एका वयानंतर आईवडिलांना आपल्या शारिरीक ताकदीमुळे ही मुले ऐकत नाहीत असंही पहिलं आहे. या मुलाला त्याच्या मामांनी जवळपास धरूनच समुपदेशकाकडे आणले होते. यावर त्यामुलाचे म्हणणे असे की उपचारांची गरज मला नाहीच. ती आईलाच आहे. मी तिच्यावर हात उगारला नव्हता. मी अक्षयकुमारसारखा एक व्यायाम प्रकार करत होतो तेव्हा तिला चुकून लागलं.
याला सायकियाट्रीस्टकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला.
बाकी याही पलिकडे जे अत्यंत काळेकुट्ट जग आहे. ते म्हणजे व्यसनामुळे हातून खून आणि तत्सम भयंकर गुन्हे घडलेल्यांचे जग. जी माणसे आता जेलमध्ये शिक्षा भोगत असतील. त्यांचा तर विचारही येथे केलेला नाही.
(No subject)
फार भयानक आहे हे सगळे!
फार भयानक आहे हे सगळे!
(No subject)
Pages