मल्याळी बहिर्जी

Submitted by Theurbannomad on 22 April, 2020 - 05:25

मल्याळी माणसांशी माझं विशेष संबंध आखाती देशांमध्ये काम करतानाच आला. मुंबईला मुळात मल्याळी लोक तसे कमीच, त्यात मुंबईला एकदा राहायला सुरुवात झाली, की मल्याळीच काय पण अगदी परग्रहवासी सुद्धा सहज मुंबईकर होत असल्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये भेटलेले मल्याळी महाभाग मला फारसे वेगळे कधीच वाटले नाहीत. एक-दोन मित्रांच्या घरी गेल्यावर तितक्यापुरते कानावर पडलेले जड मल्याळी उच्चार आणि एका मैत्रिणीच्या मुंबईतच पार पडलेल्या लग्नसमारंभात केरळहून अगदी पारंपारिक वेशात आलेले शंभर-एक वऱ्हाडी यापलीकडे विशुद्ध मल्याळी अनुभव माझ्यापाशी नसल्यातच जमा होते. या सगळ्यामुळे असेल, पण देशाबाहेर पडून दुबईला आल्यावर जिथे तिथे भेटणारे मल्याळी लोक आणि अगदी समुद्रापार वेगळ्या देशात येऊनही त्यांनी नेटाने जपलेली त्यांची संस्कृती हा माझ्यासाठी नवा अनुभव होता.

राहायची सोय करायच्या दृष्टीने दुबई मध्ये शोधाशोध सुरु केली आणि मला आश्चर्याचा धक्का बसायला सुरुवात झाली. जिथे तिथे " तू मल्याळी आहेस का?" अशी विचारपूस आणि " नाही" हे माझं उत्तर ऐकल्यावर " सॉरी बॉस..." असं नकारार्थी उत्तर हा अनुभव येत होता. सुरुवातीलाच अक्ख घर भाड्यावर घेणं शक्य नव्हतं आणि " मल्याळी नसशील तर आम्ही आमची रूम शेअर करणार नाही" हे उत्तर हमखास मिळत होतं. दोन-तीन दिवस हा प्रकार चालला आणि शेवटी या सगळ्यांपुढे हात टेकून मी ऑफिसच्या लोकांना मदतीसाठी विनंती केली. अर्थात ते सुद्धा कधीतरी जात्यातून गेलेलेच होते! त्यांनी मला ऑफिसच्या एका विवक्षित 'केबिन' मध्ये जायला सांगितलं.

' शैजू कुन्ही , P .R .O .' अशी दारावर ऐटीत डकवलेली पाटी आणि काचेच्या दारातून दिसत असलेली मध्यम उंचीची पाठमोरी आकृती हे बघून मला हा मनुष्य ऑफिसचा कोणीतरी मोठा माणूस असावा असं वाटून गेलं. दारावर टकटक केल्यावर ती आकृती वळली.त्याने हातानेच आत यायची खूण केली. आत गेल्यावर त्याच्या आजूबाजूचा तो कागदपत्रांचा ढीग बघून मी भांबावलो. कामात असेलल्या माणसाला कसा त्रास द्यायचा, या विचारांनी मी काहीही नं बोलता उभा राहिलो. शेवटी त्या शैजूने मला थेट प्रश्न केला..

" रूम प्रॉब्लेम ?"

" येस..."

" आय हव वन रूम. यु शार विथ टू पीपल...टेंन मिंट वाक...स्टार्ट नौ, सेट्टल, थेन सरछ रूम दॅट यू लाईक ..." अतिशय जड मल्याळी हेल असलेलं त्याचं इंग्रजी समजायला जड गेलं असलं तरी मला राहायची सोय झाली, इतकं कळलेलं होतं.

" थँक यू..."

" फर्स्ट गिव्ह रेंट...टू मन्थस...वन्न मंथ ऍडव्हान्स वन्न मंथ डेपोसीट.." त्याने मूळ मुद्दा जराही सोडला नाही.

त्या संध्याकाळी एकदाची माझी राहायची सोय ऑफिसपासून जवळच झाली.रूममधले इतर दोघे जण भारतीयच होते. तेही माझ्यासारखे या शैजूचे भाडेकरू. त्यांच्याकडून मग मला या शैजू नावाच्या अतरंगी प्राण्यांची ओळख समजली.

हा माणूस साधा दहावी शिकलेला. मध्यम उंची, अक्कडबाज मिश्या, तेल लावून चप्प बसवलेले कुरळे काळेभोर केस, कुठल्याशा पावडरचा सतत शरीरातून येणार दरवळ, खिशातून डोकावणारी ' विल्स' ची पाकिटं, नेहेमी पांढरा शर्ट,काळी पॅण्ट, काळे चकचकीत बूट, मनगटावर 'राडो' असाच पेहेराव आणि या सगळ्यांवर कडी करणारे सोनेरी काड्यांच्या चष्म्यांमागून समोरच्याचं 'स्कॅनिंग' करणारे टपोरे काळेभोर डोळे अशी ती मूर्ती बघून त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज कोणालाही येणं तसं कठीणच होतं. तो केरळच्या पलक्कड नावाच्या छोट्याशा गावातून पंधरा वर्षांपूर्वी दुबईला आला होता. पंजाब-हरयाणामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक घरातला एक तरी सदस्य सैन्यात जातो, त्याप्रमाणे केरळमध्ये प्रत्येक घरातला एक तरी सदस्य 'गल्फ' मध्ये जातो. एक सूटकेस, खिशात पाच-सहाशे दिरहम आणि दुबईला येण्यासाठी एजंटकडे भरलेल्या पैशांचं कर्ज असा ' सी.वी.' घेऊन हा दुबईला नोकरी करायला आला होता. गडी हरहुन्नरी होता. पाच वर्षात छोट्याशा ऑफिसच्या सफाई कामगारापासून थेट दुबईच्या मुन्सिपाल्टीत शिपायाच्या नोकरीपर्यंत याची मजल गेली. तितक्या वेळात अस्खलित अरबी आणि तोडकं मोडकं का होईना, पण इंग्रजीही त्याने शिकून घेतलं. नव्वदीच्या दशकात दुबई कम्प्युटरवर काम करायला लागली होती, त्यामुळे तेही त्याने शिकून घेतलं. म्युनिसिपालिटीच्या अनुभवातून सरकारी कामाची इत्‍थंभूत माहिती मिळवून आणि खालच्या चपराश्यापासून अगदी म्युनिसिपालिटीच्या महाव्यवस्थापकांपर्यंत सगळ्यांशी सलगी वाढवून त्याने स्वतःला एक सुयोग्य ' P .R .O .' मध्ये रूपांतरित केलं होतं.

काहीशे दिरहमच्या सफाई कामगाराच्या नोकरीपासून थेट आकाराने आणि विस्ताराने मोठया अश्या आमच्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या 'प्रमुख P .R .O ' च्या केबिनपर्यंत त्याने उण्यापुऱ्या आठदहा वर्षात झेप घेतली होती. या त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याने जिथे काम करतो, तिथल्या एकेका मनुष्यप्राण्याची नस अन नस जाणून घ्यायचा अजून एक गुण शिकून घेतला होता. हा गुण शिकलेला माणूस अश्वत्थ्याम्याप्रमाणे अजरामर असतो. अशा माणसाला बाजारात कधीही कामाचा तुटवडा जाणवत नाही. त्याची ही माहिती मिळताच त्याच्याशी एका अंतरापर्यंतच सलगी वाढवायची खूणगाठ मी मनात बांधून घेतली.

" घर आवडलं का?" दुसऱ्या दिवशी सगळ्या ऑफिससमोर त्याने मला प्रश्न केला.

" हो...छान आहे. शिवाय ऑफिसजवळ पण आहे.." मी उत्तर दिलं.

" भाडं वेळेवर दे...बाकी तुला हवं ते कर.." त्याने उत्तर दिलं आणि तो तिथून आपल्या गुहेकडे निघाला. ' हा माणूस माझं भाडेकरू आहे..समजलं का?' हे त्याला ऑफिसला दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून वाट वाकडी करून तो माझ्या कामाच्या जागेपर्यंत आला हे मला आजूबाजूच्यांकडून समजलं. " केरळला हत्ती असतात ना...त्यातला हा एक आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे...काय समजलास?" समोरच्याने मला मौलिक माहिती पुरवली. शिवाय ' सांभाळ, तुझं माप घेईल दोन-तीन आठवडे आणि मग तुझ्या कुंडलीतले वाईट योग सुरु होतील अचानक...' असं स्वानुभवावरून आलेलं शहाणपण सुद्धा एकाने मला नं विचारता सांगून टाकलं.

खरोखर हा माणूस जसजसा कळायला लागला, तसतसा दातात वेलची अडकावी तसा अडकायला लागला. दोन-तीन दिवसांनी एकदा संध्याकाळी तो गप्पांचे फड जमवायला आमच्या रूमवर यायचा. बाल्कनीपाशी ठेवलेली आरामखुर्ची हे त्याचं सिंहासन होतं. एका हातात 'विल्स' घेऊन आणि दुसऱ्या हातात स्वतःच बरोबर आणलेली ताकाची बाटली घेऊन तो सुरु व्हायचा. सिगारेट आणि ताक एकत्र पिणारा मनुष्य मी पहिल्यांदाच बघितला होता. कालांतराने ताकात वोडका घालून प्यायची त्याला सवय होती हे कळल्यावर मी थक्क झालो. हे अचाट 'मिक्स' कुठून शोधून काढलं असं विचारल्यावर " दारूमुळे पोटात उष्णता होते...पण ताकामुळे थंडावा राहतो...त्यामुळे दोन्ही मिक्स केल्यावर बॅलन्स राहतो" असं विचित्र उत्तर मला मिळालं आणि मी गार पडलो. ताकाच्या दोन घोटांनंतर अर्थातच गप्पांना रंग चढायचा. गप्पांचा विषय अर्थातच ' ऑफिसवाल्यांची लफडी - कुलंगडी' हाच असायचा.

" अरे तो MEP डिपार्टमेंटचा खान आहे ना, तो चाललाय पुढच्या महिन्यात घरी. मागच्या वेळी गेला तेव्हा पोराचं बारसं करून आला...आता पुढचा पोरगा येतोय तीन महिन्यात...सहा झाले आता सातवा येतोय...इलेक्शनला उभा राहिला तर घरातूनच निवडून येईल...ख्या ख्या ख्या..."

" ती नवी रिसेप्शनिस्ट त्या मुरलीच्या ओळखीने आलीय ना...त्याच्या जुन्या ऑफिसमधली आहे. बाजूबाजूला उभे केले तर पाणघोड्याच्या बाजूला बगळा उभा राहिल्यासारखा वाटतो....ती शिंक आली तरी टिशू काढून हळूच शिंकते आणि सॉरी म्हणते...हा फासकन आवाज काढून शिंकतो आणि रुमाल नाकात घुसवून नाक साफ करतो...काय जोडी आहे.." हा विक्राळ मुरली आणि त्याची ती नाजुकशी मैत्रीण हे कसे शिंकतात यात शैजूला रस घ्यायचं खरं तर काहीच कारण नव्हतं. पण आपल्या 'जन्मजात भोचकपणाला' स्मरून तो ऑफिसमधल्या कोणाकोणाबद्दल असाच बोलत राहायचा.

त्याने दिलेल्या उपमा हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. आमच्या एका साईट इंजिनिअरला तो केवळ बुटका आहे म्हणून शैजू ' चार फूट 'नो' इंच' अशी चारचौघात हाक मारायचा. वर ' हा जमिनीवर आहे त्यापेक्षा खाली आहे म्हणून इतकाच राहिलाय' अशी मखलाशी करून त्या बिचाऱ्या इंजिनीरला अजून डिवचायचा. आमच्या डिपार्टमेंटच्या एका 'टी बॉय' च्या चेहेऱ्यावर देवीचे व्रण होते, म्हणून त्याला ' चंदामामा' अशी हाक मारायचा. अकाउंट्स डिपार्टमेंटची एक गोड नाजुकशी फिलिपिनो वास्तविक कोणालाही आवडेल, पण केवळ ती पिठ्ठ गोरी असल्याच्या ईर्ष्येपायी शैजू तिला ' खडूचा तुकडा ' असं संबोधायचा. आमचा एक पोरगेला दिसणारा गोरागोमटा इंजिनिअर गुळगुळीत दाढी करून मिशा कोरून यायचा, तर त्याला याने ' मिशी लावलेली हेमामालिनी' असं नाव ठेवलं होतं. एकूणच काय, तर मार खायची सगळी लक्षणं असलेला आणि केवळ सरकारी कामांसाठी उपयुक्त असल्यामुळे सगळ्यांनी सहन केलेला हा महाभाग माझ्यासाठी सुद्धा डोक्याला ताप झालेला होता.

सक्तीने कधी कधी आम्हाला त्याच्याबरोबर एक अवाक्षरही कळत नसलेले मल्याळी चित्रपट बघावे लागत. मोहनलाल, मामुटी, दिलीप, सुरेश गोपी हे सगळे नट निदान मला तरी एकसारखेच दिसायचे...त्यामुळे " हा हिरो कोण आहे सांग?" असा प्रश्न त्याने केला की माझं उत्तर हमखास चुकायचं. त्या चित्रपटांमधील 'प्रणय' अनेकदा गमतीशीर असे. नटीच्या पोटाशी, बेंबीशी, हाताशी नट मंडळी जे काही खेळ करत, ते बघून मला हसू येई. शैजू मात्र तसं काही दृश्य आलं की लहान मुलासारखा डोळे बंद करून घेत असे. एकदा अशाच एका गाण्यात त्या नटाने नटीच्या पोटावर अखंड नारळ टाकल्यावर तो फुटून त्यातून रंगीबेरंगी पाणी उडतं आणि त्या दोघांवर पिवळ्या पाकळ्यांचा सडा पडायला लागतो असं अचाट दृश्य बघून मी गडाबडा लोळून हसलो, तर शैजूने मला घराबाहेर काढायची धमकी दिली. कदाचित त्याच्या त्या हीरोइनरुपी 'स्वप्नातल्या राजकुमारी' ची मी थट्टा केल्याचा त्याला राग आला असावा.

कधी रंगात आला की तो त्याच्या गावच्या आठवणींमध्ये रमायचा आणि आम्हालाही इच्छा नसूनही त्यात सामील व्हावं लागायचं. त्याने स्वतःच्या मेहेनतीच्या पैशातून एक छोटंसं घर, मागे एक छोटी बाग, दारासमोर विहीर आणि स्वतःच्या मालकीची 'सेकंड हॅन्ड बुलेट' इतकी प्रगती केली होती. कौटुंबिक प्रगतीसुद्धा चांगली होती, कारण सहा वर्षात चांगली चार मुलं जन्माला घालून शेवटी त्याने बायकोला ऑपरेशन करायला परवानगी दिली होती. हे सगळं आम्हाला सांगताना ' डॉक्टर को बोला मै...सिर्फ प्लग निकलना है..सर्किट बोर्ड को हाथ मत लगाव.." असं निर्लज्जपणे बोलत तो फिदीफिदी हसला होता आणि वर " मेरे बाप का आठ औलाद है...और दो बचपण मे गया वर्ना दस होता था.." अशी मौलिक माहितीही देत होता. याला जगातल्या नक्की कोणत्या व्यक्तीबद्दल आदर आहे, असं प्रश्न अशा वेळी मला हमखास पडायचा.

पुढच्या तीन-चार महिन्यात स्थिरस्थावर झाल्यावर मी दुसरी चांगली जागा शोधायचा प्रयत्न सुरु केला. मनासारखी जागा मिळाली तर भाडं जास्त, भाडं आवाक्यात तर जागा यथातथा, दोन्ही ठीक तर ऑफिसपासून लांब अंतर अशा अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतून अखेर एक जागा मला सापडली. प्रशस्त, साफसुथरी आणि ऑफिसपासून चालत दहा मिनिटांवरची ती जागा मी लगेच 'बुक' केली आणि संध्याकाळी शैजूला बातमी दिली. त्याने त्याचं भेदक नजरेने बघून " क्या मेरे साथ बोर हो गया क्या?" असं खवचट प्रश्न केला आणि कोणत्या दिवशी जाणार वगैरे विचारून घेतलं. " नया आदमी देखना पडेगा अब...तू गया तो तेरा भाडा क्या मे अपने जेब से देगा क्या..." वगैरे टकळी सुरु केली पण अनपेक्षितपणे त्याने मला त्रास दिला नाही. त्या शेवटच्या एका महिन्यात जवळ जवळ रोज तो संध्याकाळी अड्डा जमवून माझ्याशी आणि इतर दोघांशी बोलत होता. त्याच्या कृपेने ऑफिसच्या अनेकांबद्दल 'नको ती' माहिती मला नं विचारता मिळत होती. कोणी आपल्या बायको-मुलांना दुबईला नं आणता इथे 'अंगवस्त्र' ठेवलेलं आहे, इथपासून कोण दररोज 'शिलाजीत' च्या गोळ्या खातो अशा सगळ्या गोष्टी त्याने उघड केलेल्या असल्यामुळे मला ऑफिसमध्ये त्या त्या लोकांसमोर वावरताना अवघडल्यासारखं व्हायला लागलं.

" तुला कसं माहित इतकं सगळं?" एकदा मी त्याला मुद्दाम प्रश्न केला.

" अरे बाबा...मालूम करणे के तरीके होते है...वो अजय है ना, उसको एक बार मुनसिपालिटी मे जानेका था...चार बार प्रोजेक्ट अप्रूव्ह करने वास्ते गया नही हुआ. आया मेरे पास...मैने बोला...पेहले माले पे मोहम्मद इस्माईल करके बंदा है...उसे मेरा नाम बोल...वो मदद करेगा. काम हो गया...उके बदले मे अजय मेरेको पार्टी दिया...दो पेग पीते ही मेरेको बोलणे लगा शैजू भाई, मेरेको वो आरती पसंद है लेकिन पूछने की हिम्मत नही है...समझा ?" संदर्भासहित स्पष्टीकरण उदाहरणासकट देऊन त्याने विषय संपवला.

" लेकिन वो मुनिसिपालिटी वाला आपको कैसे जानता है?" माझं कुतूहल आता वाढलं होतं.

" अरे वो सीरिया का है रे...बीवी को यहा लाना था उसको लेकिन पेपर का प्रॉब्लेम था...मैने उसको मदद किया...मुनसिपालिटी का डिरेक्टर नेक आदमी था, उसने मेरेको लेबर मिनिस्ट्री मे उके भाई के पास भेजा...काम हो गया..." हा माणूस नक्की कशाच्या जोरावर इतकं वर आलाय, हे मला आता स्पष्ट होत होतं. कामं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात हातखंडा असलेला आणि कोणत्याही परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी उपयोगी पडतील अशी माणसं हेरून ठेवून आपल्या त्या अफाट जनसंपर्कातून बुडती नाव पैलतीरी नेणारा हा 'स्ट्रीट-स्मार्ट' मनुष्य नक्कीच विलक्षण होता. कुठून कुठून कोणत्या कोणत्या लोकांचे हे असे धागे जुळवत हा माणूस कधी काम तडीस नेईल, हे त्याच्याखेरीज कोणालाही जमणं अवघडच होतं.

वेगळ्या जागी राहायला गेलो आणि याच्याशी संभाषण ऑफिसमध्येच व्हायला लागलं. अधून मधून ' आज बसायचा मूड आहे...तुला हवं तर ज्यूस आणतो...ये ना' अशी विचारणा व्हायची. मी काहीबाही सांगून टाळायचो आणि वेळ मारून न्यायचो. काही महिन्यांनी तेही बंद झालं. नंतर ऑफिसमध्ये नवीन आलेल्या दोन-तीन जणांनाही माझ्यासारख्या अनुभवातून जावं लागलं. तेही काही काळ शैजूचे भाडेकरू होऊन शेवटी त्या घरातून निघाले. त्यांनीही संध्याकाळच्या त्या मैफिली, ते मल्याळी चित्रपट, ऑफिसच्या लोकांच्या टिंगलटवाळक्या, खबरबाता आणि शैजूच्या घरच्यांची माहिती असे सगळे 'टप्पे' त्या काही महिन्यांच्या वास्तव्यात पार केले होते.

एके दिवशी आम्हाला शैजूने आपला भाऊ ऑफिसमध्ये रुजू होत असल्याची बातमी दिली. त्याचा भाऊ असूनही तो चक्क ' 'टी' बॉय' म्हणून ऑफिसमध्ये लागणार होता. मला आश्चर्य वाटल्याचं बघून शैजूने त्याच्या खास शैलीत खुलासा केला. शैजूपेक्षा चांगला बारा वर्षांनी लहान असलेला हा त्यांच्या गोतावळ्यातला सगळ्यात धाकला असल्यामुळे लाडाकोडात वाढला आणि जेमतेम बारावी शिकला. " बोला था, साब बन्ना है तो साब जितना सीखो...नई माना...बोलता है शादी बनाना है...मैने बोला चुपचाप आके काम सीख, काम कर , कमा और जो उखाडना है उखाड...तू और तेरी बीवी मेरे कंधे पे चढ के बैठे तो मै मेरे बीवी- बच्चे का क्या करुंगा..." असं रोखठोक बोलून त्याने सगळ्यांसमोर त्याच्या भावाची कुंडली उलगडली आणि वर सगळ्यांना " मिस्टेक हुआ तो xxx पे लात मारनेका...शैजू कुछ बोलेगा करके डरनेका नही..." अशी सूटसुद्धा सगळ्यांना दिली. त्याचं हे रूप बघून आम्ही सगळे चकित झालो आणि अचानक त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात थोडाफार का होईना, पण आदर निर्माण झाला.

दोन वर्षांनी मी ते ऑफिस सोडून दुसऱ्या एका ऑफिसमध्ये रुजू झालो आणि शैजूशी संपर्क जवळ जवळ तुटला. नव्या ऑफिसमध्ये सारखं मुनिसिपालिटीमधलं काम करावं लागत नसल्यामुळे तिथे जाणंयेणं नसल्यातच जमा होतं. तीन-चार वर्षांनी थेट म्युनिसिपालिटीच्या वरिष्ठ समितीसमोर एक मोठं प्रोजेक्ट सादर करायचं काम आलं आणि म्युनिसिपालिटीच्या पायऱ्या चढायचा योग आला. मीटिंग झाली, चहापान झालं आणि निरोपाची वेळ आल्याबरोबर मागून " आशिष सर" असं आवाज आला. चमकून मागे बघितलं, तेव्हा माझ्या डोळ्यांवर माझं विश्वास बसला नाही...

शैजूचा लहान भाऊ अली हसत हसत समोर उभा होता. तिथल्या अरबी लोकांबरोबर अरबी भाषेत हसत हसत त्याचं संभाषण चाललं होतं. कोणाला चहा दे, कोणाला कॉफी दे असं करता करता तो सगळ्यांशी काय काय बोलत होता. त्या अरबी लोकांपैकी एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अधिकाऱ्याने " This boy is my favorite ...very efficient and hardworking ..." असं मला त्याच्याबद्दल सांगितलं आणि त्याने माझ्याकडे बघून स्मितहास्य करत मला चहा विचारला.

शिवाजी महाराजांच्या काळातल्या बहिर्जी नाईकांचा कोणी वारसदार होता का, याचं उत्तर नकारार्थीच येईल, पण या आधुनिक मल्याळी बहिर्जीने आपला वारसदार आपल्या घरातच तयार केला होता !

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

पण शीर्षकात बहिर्जी खटकलं.