पूर्ण झालेला अपूर्णांक

Submitted by Theurbannomad on 20 April, 2020 - 05:56

एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये चहा घेत असताना अचानक समोर एक मिठाईचा भला मोठा डबा घेऊन आमचा 'ऑफिस बॉय' आला. इतका मोठा डबा, त्यात तऱ्हेतऱ्हेची वर्ख लावलेली मिठाई आणि वर अजून एका छोट्या डब्यात प्रत्येकाला वेगळी चॉकलेट्स हे सगळं नक्की कशासाठी चाललंय याचा मला उलगडा होईना. शेवटी त्याने " वो हाला है ना, उसको बेटा हुआ...उसकी मिठाई है..." अशी माहिती पुरवली.

मिठाई हातात घेऊन मी काहीश्या गोंधळलेल्या अवस्थेत आजूबाजूच्यांकडे बघायला लागलो. त्यांची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. आम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी 'आपल्याच डिपार्टमेंटमधली हाला' की अजून कोणती, असा आमच्या त्या 'ऑफिस बॉय' ला विचारलं. अक्ख्या ऑफिसच्या खबरबाता बहिर्जी नाईकचा केरळी वंशज असल्याच्या बेमालूमपणे काढून आणण्यात हा मनुष्य पटाईत होता. त्याच्या तोंडून ' तीच हाला' अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावर आमच्यात कुजबूज सुरु झाली.

" अरे ती प्रेग्नन्ट होती असा कधी वाटलंच नाही...नवव्या महिन्यापर्यंत इतकी कशी बारीक राहू शकेल कोणी?"

" दत्तक नाही ना घेतलं मूल ? विचारलं पाहिजे लिजोला..." लिजो म्हणजे अर्थात आमचा ऑफिस बॉय.

" नाही रे...कसं शक्य आहे? इथे दुबईला इतकं सोपं आहे का ते? त्यात ती लॅबनॉनची आहे...म्हणजे मूल लेबनीज नसेल तर ती दत्तक घेणार नाही इतकं नक्की...आणि ते करायला तिला स्वतःच्या देशात नाही का जावं लागणार? मागच्या दोन वर्षात आजारी पडल्यावर फक्त तिने सुटी घेतलीय..." आमच्यातल्या एकाने आपल्या सुपीक डोक्यातून निघालेला शंकांचा पाढाच वाचून दाखवला.

शेवटी हि नक्की काय भानगड आहे, याची चौकशी करायला आम्ही आमच्या बहिर्जीला पुन्हा एकदा पाचारण केलं. मला इतरांच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायला जराही आवडत नाही, पण हे प्रकरण नक्की काय आहे, याची मला जबरदस्त उत्सुकता असल्यामुळे मी त्या ' भोचक ' कळपाचा एक भाग झालो. हाला माझी चांगली मैत्रीण असली, तरी अशा गोष्टींबद्दल तिला थेट प्रश्न करणं मात्र मला पटत नव्हतं. जेवणाच्या सुट्टीपर्यंत आमच्या बहिर्जीने आपल्या क्लुप्त्या वापरून माहिती काढली आणि आम्हाला येऊन सांगितली.

हालाने 'सरोगसी' द्वारे मूल जन्माला घातलेलं होतं. गर्भारपणाच्या त्रासातून स्वतःची सुटका व्हावी, म्हणून कोणा स्त्रीच्या भाड्याच्या गर्भाशयात आपलं मूल वाढवून घेऊन तिने आपलं आई होण्याचं स्वप्नं पूर्ण केलं होतं. काही वेळाने तिचं अभिनंदन करण्यासाठी मी तिच्या टेबलापाशी गेलो तेव्हा तिच्या आजूबाजूला फुलांचे गुच्छ,अभिनंदनाची पत्रं आणि कोणी कोणी दिलेल्या भेटवस्तू रचून ठेवलेल्या मला दिसल्या. त्या सगळ्याच्या मध्ये हाला बसलेली आहे हे आंधळ्या व्यक्तीने देखील सहज ओळखलं असतं, कारण तिच्या त्या सुप्रसिद्ध अरबी अत्तराचा घमघमाट लांबूनदेखील नाकाला जाणवायचा. अक्ख्या ऑफिससाठी हालाच्या असण्याची ती परिचयाची खूण होती.

चांगली पावणेसहा फूट उंच, बारीक शिडशिडीत, नखशिखांत नटलेली, तासभर स्वतःच्या 'मेक-अप' वर काम केल्याशिवाय घराबाहेर पाऊल ना ठेवणारी, अगदी ऑफिसमध्येही तासातासाला वॉश रूममध्ये जाऊन ' टच-अप' करणारी पण स्वभावाने अतिशय मनमिळावू असलेली हाला ऑफिसमधल्या सगळ्यांची चांगली मैत्रीण होती. स्वतःच्या सौंदर्याची इतकी काटेकोर काळजी घेणारी दुसरी कोणतीही व्यक्ती मी आजवर बघितली नव्हती. आमच्याच ऑफिसच्या हालाच्या घरी जाणं-येणं असलेल्या एकीने हालाच्या ' वॉर्डरोब' च्या सुरस कथा आम्हाला ऐकवल्या होत्या. चाळीस-पन्नास पादत्राणांचे जोड, दोन खण भरतील इतकी घड्याळं, दोन-तीन कपात भरून कपडे, वीस-पंचवीस अत्तरांच्या बाटल्या, कुठून कुठून आणलेली सौंदर्यप्रसाधनं आणि डोळ्यात लावायच्या दहा-बारा रंगांच्या लेन्सेस असा हालाचा जामानिमा ऐकून मला कपाटाच्या एका छोट्याशा खणात अर्ध्या जागेत मावणाऱ्या माझ्या अक्ख्या कुटुंबाच्या सौंदर्यप्रसाधनांची कीव आली. अर्थात दर आठवड्याच्या गुरुवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्या सुटल्या माझी घाई घरच्या दत्ताच्या सांज -आरतीसाठी होत असे आणि हालाची तशीच घाई ' फुल बॉडी केअर स्पा' साठी होत असे, या साध्या गोष्टीतूनच आमच्या आवडीनिवडी किती विसंवादी आहेत हे मला समजत असल्यामुळे त्या सुरस कथांचा माझ्यावर विशेष परिणाम झाला नाही.

ऑफिसला , अगदी आमच्या बहिर्जी नाईकासकट कोणालाही माहित नसलेली एकमेव गोष्ट म्हणजे हालाचं कुटुंब. तिच्या घरीसुद्धा तिच्या आई-वडिलांखेरीज इतर कोणाचे फोटो कधी कोणाला दिसले नाहीत. एकदा ऑफिसमध्येच तिला भेटायला आलेला तिचा सक्खा भाऊ बघून तिला सक्खी भावंडं असावीत, इतकं आम्हाला कळलं होतं. हाला कॉप्टिक ख्रिस्ती असल्यामुळे ईस्टर, ख्रिसमस अशा सणांच्या वेळी कधी कधी लेबॅनॉनहून तिच्या घरचे तिला मिठाई वगैरे पाठवायचे, त्यामुळे तिच्या घरच्यांशी तिचे संबंध चांगले असावेत असा आमचा समज होता. पण एकूणच काय, तर तिचं कुटुंब हे तिच्या ' नैसर्गिक ' चेहेऱ्याप्रमाणेच बाहेरच्या जगासाठी एक ' गुलदस्त्यातलं रहस्य ' होतं.

एके दिवशी संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमाराला तिला घरून एक फोन आला. तिच्या बाळाची काळजी घेणाऱ्या 'दाई' ने बाळाला अचानक ताप भरल्याचा निरोप दिला आणि हाला घाईघाईत उठली. मी तिच्याशी एका प्रोजेक्टसंदर्भात संभाषण करत असल्यामुळे डोळ्यासमोर तिची चाललेली तगमग बघून मी तिची विचारपूस केली आणि परिस्थितीचं गांभीर्य कळल्यावर गाडीने तिला घरी सोडायला गेलो. रस्त्यात सतत पाच-दहा मिनिटांनी फोनवर फोन सुरु होते. आपल्या बाळाची तब्येत ठीक नाही, हे कळल्यापासून हाला प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिच्या इमारतीखाली गाडी उभी करून मी तिला बाळाला खाली आणायची विनंती केली आणि जवळच्या हॉस्पिटलला कॉल करून लहान बाळाला घेऊन येत असल्याची माहिती दिली. पुढच्या पंधरा मिनिटात बाळाला उपचार मिळायला सुरुवात झाली आणि तिथल्या डॉक्टरांनी प्रथमदर्शनी साधा हिवताप वाटत असल्याचं सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

इतका वेळ अस्वस्थ असणारी हाला शेवटी शांत झाली. घरी जाऊन बाळाचे कपडे वगैरे आणूया, म्हणून मी तिला सुचवलं आणि आम्ही पुन्हा तिच्या घरी गेलो. तिच्या त्या महालवजा घरात मी आयुष्यात पहिल्यांदा प्रवेश केला.हालाच्या आवडीनिवडी भडक असल्याची खात्री पटावी, असं त्या घराचं स्वरूप होतं. सोनेरी रंगाची झुंबरं, सोनेरी वेलबुट्टीचं काम असलेले भले मोठे सोफे, भिंतींवरच्या मोठमोठाल्या चौकटींमध्ये बंदिस्त केलेली चित्रं, दिव्यांच्या पिवळसर प्रकाशात अजूनच भपकेदार वाटणारे गालिचे असं सगळं बघून मला एकदम शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या राजवाड्यांची आठवण आली. घरात सगळीकडे अरबी 'उद'चा काहीसा उग्र सुवास दरवळत होता. मेजावर बदाम, पिस्ते, काजू आणि खजूर भरलेली खणाची थाळी होती. हालाच्या घराबद्दल मी जे ऐकलं होतं, ते अतिशयोक्तीपूर्ण नव्हतं, याची मला खात्री पटली.

पाच-दहा मिनिटानंतर हाला आतून आली, तेव्हा तिच्याकडे बघून मी काही सेकंद स्तब्ध झालो. साध्या कपड्यांमध्ये तोंडावर मेक-अपचा एकही ठिपका न लावता हाला समोर उभी होती आणि क्षणभर मी इतक्या दिवसांपासूनची तिची ओळख विसरल्यासारखी माझी अवस्था झाली. एखादी व्यक्ती मेक-अपशिवाय इतकी वेगळी दिसू शकते हे मला आजवर माहीतच नव्हतं. डोळ्यांखालची पुसत काळी वर्तुळं, चेहेऱ्यावर पुसटश्या दिसणाऱ्या सुरकुत्या, काजळ न लावल्यामुळे एकदम लहान वाटणारे आणि पहिल्यांदाच नैसर्गिक रंगात दिसणारे तपकिरी डोळे आणि केस बांधल्यामुळे पहिल्यांदाच दिसलेले 'चट्टेदार' कान अशा पद्धतीचं तिचं दर्शन माझ्यासाठी धक्कादायक होतं. आत गेलेली हाला आणि बाहेर आलेली हाला यात खजूर आणि खारकेइतका फरक होता.

" कॉफी घेऊन निघूया?" हालाने विचारलं.

" चालेल, कॉफी उत्तम. आणि काळजी नको करू, साधा हिवताप आहे म्हणून डॉक्टर म्हणालेयत ना...टेस्ट करतीलच ते, पण ते सगळं त्यांना करावंच लागतं...माझी मुलगी सहा वर्षाची आहे. हे सगळं तिच्याबरोबर होऊन गेलाय अनेक वेळा...त्यामुळे मी सांगतोय, निर्धास्त राहा. "

" आभारी आहे...माझी ही पहिली वेळ आहे ना...."

" नवऱ्याला कळवलं नाहीस? " माझ्या तोंडून प्रश्न निसटून गेल्यावर मी चटकन जीभ चावली. बोलायच्या नादात मी भलताच काहीतरी बोलून गेलोय की काय अशी मला भीती वाटायला लागली.

" कुठे कळवणार? बैरूतला? तो काय करणार तिथून?" अचानक हालाच्या आवाजात एक प्रकारचा तुसडेपणा डोकावायला लागला.

" असाच, तो तिथे गेलाय का..."

" तो तिथेच असतो. गेलाय कसला...आणि तिथेच बरा आहे."

पुढे काय बोलावं ते मला सुचेना. हे नक्की काय प्रकरण आहे, याचा उलगडा होत नसला तरी शेवटी त्या दोघांची ती खाजगी बाब होती. पण हालाकडूनच मला त्या सगळ्याचा उलगडा झाला.

" तुला सांगतेय, इतर कोणाला कळू देऊ नकोस. हा माझा नवरा बैरूतला इंजिनिअर आहे. चार वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. त्याआधी तीन वर्ष आम्ही ' डेट ' केलं. त्याला मी आधीपासून सांगायचे, की मी प्रचंड महत्वाकांक्षी आहे. मला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय. अशक्य असं काही असतं यावरच माझा विश्वास नाही. त्याला हवं होत की आम्ही लग्नानंतर मुलाचा विचार करावा. दोन वर्ष झाल्यावर त्याने खूपच आग्रह करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं, माझ्या महत्त्वाकांक्षेच्या आड नको येऊस. मूल म्हणजे दीड-दोन वर्ष गेली ना उमेदीची. आधी नऊ महिने पोटात आणि नंतर वर्षभर तरी बाहेर ते मूल वाढवा आणि त्यात सगळ्या करिअरची राखरांगोळी..."

काही वेळापूर्वी बाळाच्या काळजीने गलबललेली हाला आणि समोर हे सगळं बोलत असणारी हाला या दोन अतिशय विसंवादी स्वभावछटा माझ्यासमोर उभ्या होत्या. यातली नक्की कोण खरी हा माझ्यासाठी एक यक्षप्रश्नच होता.

" वर्षांपूर्वी आमच्यात वाद झाला. मी त्याला सांगितलं, मूल हवाय ना? सरळ 'surrogacy' च्या मार्गाने जाऊ. घरात सगळ्यांना अर्थात नाही आवडलं. मी ठाम राहिले. माझ्या खर्चाने माझ्याच पुढाकाराने मी शोधली एक जण...बैरूतला. तिने नऊ महिने वाढवलं माझं बाळ. शेवटच्या ४ महिन्यात तर ती इथेच होती, माझ्याच घरात. बाळ झाल्यावर पैसे दिले आणि पाठवलं परत. घरच्यांना दाखवून दिलं, आई व्हायला कामधंदे सोडावे नाही लागत. नवऱ्याला नाही पटत सगळं...ती हॉस्पिटल मध्ये थांबलीय ना, ती माझी 'मेड' आहे. घेते की काळजी बाळाची दिवसभर...नवऱ्याला वाटतं मी 'ब्रेक' घ्यावा, दोन वर्ष मुलाकडे लक्ष द्यावं...अरे दोन वर्षात जग इथून तिथे जाईल. मी आपल्या ऑफिसमध्ये चार वर्षात साध्या ' सिनियर आर्किटेक्त्त' ची ' सिनियर प्रोजेक्ट लीड' झालेय. पुढे पाच वर्षात बघ...कमीत कमी सिनिअर मॅनेजर असेन मी."

'देदीप्यमान कारकीर्द' घडवायच्या जीवघेण्या स्पर्धेत सतत पुढे राहायच्या अट्टाहासाने आयुष्यातल्या बाकीच्या कोणत्याही गोष्टींना महत्व नं द्यायची ही राक्षसी महत्वाकांक्षी वृत्ती माणसाला यंत्रवत करून टाकते, हे मला समोर दिसत होतं. 'surrogacy' हा खरं तर आई होण्यामध्ये नैसर्गिक अडथळे येत असलेल्या स्त्रियांसाठी वरदान ठरलेला मार्ग आहे, पण 'पैशांच्या जोरावर' या वरदानाचा गैरफायदा घेणाऱ्या अशा स्त्रिया बघून वैद्यकशास्त्राबरोबरच कायदेसुद्धा तितकेच पुढे गेले पाहिजेत, याची जाणीव मला होत होती. पैसा, मानमरातब, हुद्दा, सत्ता आणि महत्वाकांक्षा या 'पंचरिपूंमध्ये' अडकलेल्या हालासारख्या व्यक्तींची मला मनापासून कीव करावीशी वाटत होती.

कॉफी घेऊन झाल्यावर आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो. सगळं ठीकठाक असल्याचं कळल्यावर हालाने संध्याकाळची अपूर्ण राहिलेली ती मीटिंग दुसऱ्या दिवशी सकाळी 're-schedule' केली. " म्हणजे उद्या सकाळी तू ऑफिसला येणार आहेस?" या माझ्या प्रश्नावर " अर्थात...मी इथे थांबायची गरज असेल हॉस्पिटलची बिलं मी का देऊ? कसले पैसे घेणार ते?" हे तिचं उत्तर ऐकून मी हादरलो. तिच्या त्या 'मेड' कडे तिने एक कार्ड दिलं आणि लागेल तास ते वापरायची सूचना करून ती डॉक्टरांना भेटायला गेली. त्या दहा मिनिटात एकही शब्द नं बोलता ती मेड माझ्या बाजूला नुसती बसून होती. डॉक्टरला भेटून आल्यावर तिने हालाला " आपलं बाळ ठीक आहे नं?" इतकाच प्रश्न विचारला. तिच्या आवाजात हालापेक्षा जास्त काळजी मला जाणवत होती. " सगळं ठीक, उद्या सोडतील घरी..." असं कोरडं उत्तर देऊन हालाने बरोबरची बॅग तिच्या हातावर टेकवली.

आम्ही हालाची गाडी घेऊन आलो असल्यामुळे तिने मला ऑफिसच्या खाली माझ्या गाडीकडे आणून सोडलं. रस्त्यात मी मुद्दाम तिला माझ्या मनातली शंका विचारली.

" काही तासांपूर्वी मुलाच्या तापाची माहिती मिळाल्यावर तू इतकी अस्वस्थ होतीस...समाज असं कळलं असतं की त्याचा त्रास साधा नाहीये, तर काय केलं असतंस? सुट्टी घेतलीच असतीस ना ? मग तसाच समज आणि राहा ना घरी त्याच्या बरोबर काही वेळ...तू कधीही सुट्टी घेत नाहीस, कधी कधी तर सुट्टी असेल तरी ऑफिसमध्ये येऊन काम करतेस...स्वतःसाठी जग ना काही काळ....नवऱ्याला भेट, त्याला इथे बोलाव, फिरायला जा...उद्या तुला गरज पडलीच कधी, तर ऑफिसपेक्षा घरचे लोकच कामी येतात...'

" माझी पोसिशनच अशी करायचीय मला, की मला काहीही झाला ना तरी आता आपलं कसं होणार या विचारांनी घाम फुटला पाहिजे सगळ्यांना....झक मारून येतील मला मदत करायला...मी नसेन तर इतकं सगळं अडला पाहिजे की मी ना विचारता सुद्धा शंभर लोक आले पाहिजेत मदतीला...काय? आणि बाळाचं बोलशील तर त्याला जास्त त्रास झाला असतं तरी मी जास्तीत जास्त घरून काम करायची सवलत मागून घेतली असती...माझ्या प्रोजेक्टवर कोणी दुसरा काम करेल हे मी सहनच नाही करू शकत... " तिने माझं बोलणं तोडत माझ्या प्रश्नच उत्तर दिलं. केस हाताबाहेर गेलेली आहे आणि या महामायेला काही समजावणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे हे समजून मी विषय संपवला.

पुढच्या काही महिन्यात बाळ, ऑफिसचं काम, वरून जास्तीचं मागून घेतलेलं काम आणि त्यासाठी दिवस रात्र जागून केलेली जीवापलीकडची मेहेनत याचा व्हायचा तो परिणाम झालाच! एके दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्या हालाला आदल्या रात्री हॉस्पिटल मध्ये न्यावं लागल्याची माहिती कळली आणि संध्याकाळी तिला भेटायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिच्या खोलीबाहेर एक म्हातारी स्त्री, एक तरुण पुरुष, तिचं एव्हाना सात महिन्याचं झालेलं ते बाळ आणि त्या बाळाबरोबर त्याची ती मेड असे सगळे जण मला बसलेले दिसले. त्या मेडने माझी त्या सगळ्यांशी ओळख करून दिली. हालाची आई आणि नवरा सकाळीच मिळेल त्या विमानाने बैरूतहून आलेले होते.

मागच्या वेळेस हालाला मी केलेली मदत त्या मेडमुळे कदाचित त्यांना समजली असावी, कारण माझं नाव ऐकून ते एकदम उठले. माझ्या आईच्या वयाच्या असलेल्या एका बाईने पुन्हा पुन्हा आभार मानल्यामुळे मला थोडं संकोचल्यासारखा झालं.ती अरबी भाषेत मला नक्की काय बोलत होती ते मला काही कळत नव्हतं, पण मुलीची काळजी मात्र त्या बोलण्यातून मला जाणवत होती. शेवटी हालाच्या नवऱ्याने मला बाजूला नेलं. दोघांनी खालच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन बोलायचं ठरवलं आणि आम्ही बोलत बोलत जिना उतरायला लागलो.

" हाला अशी नव्हती...आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती जरी महत्वाकांक्षी असली तरी इतकी टोकाला गेलेली नव्हती. कदाचित ती अशी झालीही नसती...जर..." आणि अचानक नजीबने आपला वाक्य अर्धवट तोडलं.

" म्हणजे? काय झालेला असं? "

कॉफी घेऊन खुर्चीत बसल्यावर नजीबने घोटभर कॉफी घेऊन घसा साफ केला. त्याने मनातल्या एका हळव्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा जाग्या होत होत्या.

" चूक आहे माझ्या घरच्यांची. लग्नाआधी त्यांनी मला खूप समजावलं, की ही मुलगी तुझ्या लायक नाहीये. हाला साध्या घरातली आहे, माझ्या घरात पैशांना कमी नाही. वडील धनाढ्य. परंपरागत चालत आलेला 'रेस्टॉरंट्स' चा बिझनेस आहे आमचा. अठरा रेस्टॉरंट्स आहेत आमची बैरूतला. वर खाद्यपदार्थांचा आयात-निर्यातीचा व्यापार आहेच. आमच्या लग्नानंतर घरच्यांनी सतत हालाला हिणवलं. एकदा अशाच भांडणात माझ्या वडिलांनी तिला 'काहीतरी होऊन दाखव आधी आणि मग बोल माझ्याशी' असं चारचौघात सुनावलं आणि तिथून हाला जी निघाली ती अजून परतलेली नाहीये. त्या दिवसापासून तिने पैसा, श्रीमंती आणि सत्ता या सगळ्याचा ध्यास घेतला...."

कुठेतरी स्वाभिमान डिवचला गेल्याचा परिणाम हा असा होईल, हे त्या घरातल्या कोणालाच वाटलं नव्हतं. माझ्यासाठी हे सगळं ऐकणं अंगावर काटा आणणारं होत. चूक एका हटवादी आणि गर्विष्ठ माणसाची, पण परिणाम अक्ख्या कुटुंबाला भोगावे लागत होते. नशिबाने नजीब शांत डोक्याने विचार करणारा असल्यामुळे त्याने दोन्ही बाजू हिमकतीने सांभाळल्या होत्या, यावरूनच त्याचं हालावर असलेलं प्रेम दिसत होतं.

जवळ जवळ आठवड्याभरानंतर हाला ऑफिसमध्ये आली. सगळ्यांनी तिला भेटून शुभेच्छा दिल्या. तिने सुद्धा सगळ्यांना चॉकलेट्स वाटली आणि सवयीप्रमाणे तिने आपल्या कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलं. त्या दिवशी चार-पाच तासानंतर सगळ्यांच्या इ-मेल मध्ये हालाचे जे मेसेज आले, ते बघून सगळ्यांचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तिने साथ दिवसांच्या आपल्या तुंबलेल्या रजेच्या दिवसांमधून चाळीस दिवस राजा घेतलेली होती आणि आपली प्रोजेक्ट्स तिने कोणा कोणाच्या हातात स्वखुशीने देऊन टाकली होती. एखाद्या कोट्याधीशाने सर्वस्व त्यागून वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असं ते सगळं वाटत होतं.

संध्याकाळी खाली उतरल्यावर मला गाडीपाशी हाला आणि नजीब दिसले. हाला हसत हसत आली आणि तिने हस्तांदोलन केलं. मी गोंधळल्याचं बघून तिनेच स्पष्टीकरण दिलं...

" तू म्हणालेला होतास ना, गरज पडल्यावर घरचेच येतात...खरं आहे. ऑफिसचे लोक फोनवर विचारपूस करून आपापल्या कामाला लागले. मला वाटत होतं की प्रोजेक्ट्स च्या कामात मी नसेन तर काम पुढे जाणार नाही...पण मला दिसलं, की लोकांनी त्यातून मार्ग काढून काम पुढे नेलं सुद्धा. जग थांबलं नाही...थांबले ते माझे घरचे. नजीब आणि माझी आई होतं नव्हतं ते सगळं काम टाकून इथे आले. खरोखर मागच्या चार-पाच वर्षात मी मला कुटुंब आहे हेच विसरूनच गेले होते...आजाराच्या निमित्ताने का होईना, पण अक्कल आली. आता मी चाललेय बैरूतला उद्या...चाळीस दिवसांची सुट्टी घेतलीय. आल्यावर अर्धा वेळ काम करणार आहे पुढचं एक वर्ष असं सांगितलंय....मुलाची काळजी घेणार आहे मी. "

" ऑफिसवले ऐकतील?"

" नाही ऐकलं तर गेले उडत....हे काय शेवटचं ऑफिस आहे का जगातलं? घेईन वर्षभराचा ब्रेक..." डोळे मिचकावत हालाने उत्तर दिलं आणि मला चटकन एक गोष्ट जाणवली.....

आज हालाच्या चेहऱ्यावर तो गडद आणि भडक मेक-अप नव्हता आणि मला पुन्हा एकदा तिचे तपकिरी डोळे दिसत होते. कदाचित लेन्सच्या रूपातली झापडं तिने काढून टाकली होती म्हणून असेल, पण जगाला ती आणि तिला जग आता स्वच्छ दिसत होतं.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/