शब्दविभ्रम, नक्कल, मिमिक्री, डबिंग अशा अनेक गोष्टींमध्ये कमीजास्त प्रमाणात निपुण असणारी अनेक कलाकार मंडळी आपल्याला दृश्य आणि अदृश्य माध्यमांतून अगदी दररोज भेटत असतात.जाहिरातींच्या क्षेत्रात काम करत असणारी चेतन सशीतल, सुदेश भोसले, मेघना एरंडे अशी मंडळी शेकडो कलाकारांचे आवाज जेव्हा लीलया काढून दाखवतात, तेव्हा काही क्षण आपले डोळे, कान आणि मेंदू एकत्र काम करत आहेत की नाही अशी शंका सतत येत रहाते. संवाद, आवाज आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना याचं काही क्षणात आपल्या मनावर खोल ठसा उमटत असतो आणि म्हणून कदाचित दृक्श्राव्य माध्यम हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्त परिणामकारक आहे, असं जगातल्या अनेक तज्ज्ञांचं ठाम मत आहे.
म्हणूनच असेल कदाचित, पण चार्ली चॅप्लिन अथवा लॉरेल-हार्डी ची जाड्या-रड्याची दुक्कल जेव्हा जेव्हा मी जुन्या कृष्णधवल मूकपटांमध्ये बघतो, तेव्हा त्यांच्या त्या काळात त्यांनी करून ठेवलेल्या अफाट कामाची महती कळते. आवाजाचं आणि रंगांचं माध्यम नसूनही त्यांनी केवळ दमदार कथानक, विलक्षण बोलका चेहरा आणि अतिशय विचारपूर्वक लावलेले कॅमेरा-अँगल या त्रिसूत्रीचा जोरावर आजच्या काळातही कालबाह्य न वाटणाऱ्या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. चार्ली चॅप्लिन तर समस्त चित्रपटसृष्टीचा भीष्म पितामह ठरू शकेल, इतकं त्याचं काम जबरदस्त आहे. या आणि अशा अनेकांची 'मूकाभिनयाची' कला आज ज्या ज्या लोकांनी पुढे चालवलेली आहे, त्यातलाच मला भेटलेला एक 'अतरंगी' विदूषक म्हणजे लेऊंग चेन.
सिंगापूरच्या 'मरिना प्रोमेनाड' वर मनसोक्त भटकंती करणं, शुद्ध ताजी हवा छातीत साठवत आजूबाजूच्या गजबजाटाचा एक भाग होत 'विंडो शॉपिंग' करणं आणि ठिकठिकाणी सुरु असलेल्या 'स्ट्रीट आर्ट' चा आस्वाद घेणं हे माझं तिथल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्याचं दररोजच काम. ऑफिसच्या कामानिमित्ताने गेलेलो असल्यामुळे ' कुटुंबवत्सल ' साच्यात न राहता ' वसुधैव कुटुंबकम ' च्या भूमिकेत जाणं सहज शक्य होतंच, त्यात सिंगापूरमध्ये 'रात्रीचे दिवस' आणि 'दिवसाच्या रात्री' सहज अनुभवायला मिळत असल्यामुळे माझ्यासारख्या भटक्यांसाठी हे दोन आठवडे म्हणजे एक पर्वणी होती. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान ऑफिसचा काम इमाने इतबारे करून बाकीचे ११ तास शक्य तितके भटकंतीत घालवायचे असं मनाशी पक्कं करूनच मी विमानात चढलो होतो.
येत्या शुक्रवारच्या संध्याकाळी 'मरिना प्रोमेनाड' वर कसले कसले कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती माझ्या ऑफिसच्या सिंगापुरी खबऱ्यांनी माझ्यापर्यंत पोचवली आणि शुक्रवारी ऑफिसच्याच प्रसाधनगृहात कपडे बदलून तिथून थेट मरिना गाठायचं मी ठरवलं. खरोखर त्या दिवशी इंद्राचा दरबार स्वर्गातून सुट्टी घेऊन ( अर्थात अप्सरांसकट ) त्या ठिकाणी अवतरला होता. बरोबरीला खाद्यपदार्थ, खेळणी, भेटवस्तू वगैरे विकणारे आणि ओठांचे चंबू करून 'सेल्फी' काढणारे जागोजागी होतेच. त्या सगळ्या गर्दीच्या केंद्रबिंदूपाशी एक मोठा घोळका काहीतरी बघत उभा होता. अधून मधून हास्याचे चित्कार कानावर पडत होते, टाळ्यांचा गजर होता होता आणि मोबाइलच्या कॅमेऱ्यात काही क्षण बंदिस्त होता असल्याचे ' खिच...खिच' चे आवाज येत होते. उत्सुकता चाळवली गेली म्हणून मी त्या गर्दीतून वाट काढून त्या केंद्रबिंदूपाशी गेलो आणि समोर दिसणारं दृश्य बघून अक्षरशः अवाक झालो.
एक साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची असलेला मनुष्य एकही अक्षर नं उच्चारता केवळ आंगिक अभिनयाने एका प्रहसनाचं प्रात्यक्षिक दाखवत होता. मधूनच बघायला सुरु केल्यामुळे मला विषय काही कळत नव्हता, म्हणून थांबून त्याच्या पुढच्या प्रात्यक्षिकाची वाट बघत मी तिथेच घुटमळलो. तो माणूस पुढच्या १५ मिनिटात वेष बदलून आला. आत्तापर्यंत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत रंगीबेरंगी कपडे घातलेला आणि चेहऱ्यावर कसलीतरी रंगीत नक्षी काढलेला हा महाभाग आता चार्ली चॅप्लिनचा 'ट्रम्प' होऊन आला होता. त्याने अक्षरशः काही सेकंदात 'ट्रम्प'चं बेअरिंग पकडून चार्ली चॅप्लिनच्या जुन्या मूकपटांमधले प्रसंग सादर करायला सुरुवात केली. सर्वात आधी ' द इमिग्रंट ' मधला बोटीवरच्या हेलकाव्यांमध्ये तोल सांभाळत सांभाळत लपतानाचा प्रसंग त्याने सादर केला. त्यानंतर ' द किड ' मधला पोलिसाला चुकवून पळतानाचा प्रसंग, ' द सर्कस' मधला सिंहाच्या पिंजऱ्यातून पळून जाऊन खांबावर चढण्याचा प्रसंग आणि शेवटी ' द डिक्टेटर ' मधला डोक्यावर कढई लागल्यावर हेलकावे घेत इथून तिथून चालत खांबाशी थांबण्याचा प्रसंग असे सगळे त्याने एकापाठोपाठ एक सादर केले. प्रेक्षक त्याच्या हालचालींवरून स्वतःच त्या चित्रपटाचं आणि त्या प्रसंगाचं नाव घेत होते आणि तो त्यातल्या काही जणांना खिशातून चॉकलेट काढून बक्षीस म्हणून देत होता. सरतेशेवटी त्याने " आता मी माझ्या मते चार्ली चॅप्लिनच्या सर्वोत्कृष्ट तीन परफॉर्मन्सपैकी एक तुमच्यासमोर सादर करतो आहे, कृपा करून शांतपणे बघा आणि मला आपली प्रतिक्रिया द्या..."
त्याच्याकडच्या पिशवीतून त्याने दोन बटाटे काढले, दोन काटे काढले, तिथल्या एका टेबलखुर्चीवर त्याने बूड टेकवलं, दीर्घ श्वास घेतला आणि चार्ली चॅप्लिनच्या 'गोल्ड रष' मधल्या सुप्रसिद्ध 'बटाटा नृत्याचं' प्रात्यक्षिक झालं. प्रेक्षकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. त्यातल्या काहींनी कदाचित त्याचे हे अभिनयाचे अविष्कार आधी बघितले असावे, कारण त्यांनी लगेच ' द डिक्टेटर ' मधल्या पृथ्वीच्या गोलाबरोबरचं चार्ली चॅप्लिनने साकारलेलं हिटलरचं जगज्जेता व्हायचं स्वप्नरंजन सादर करायची फर्माईश केली. तीही पूर्ण झाली. शेवटी वीस-पंचवीस मिनिटांनी धाप लागल्यामुळे लोकांनी मना करूनही लेऊंगने आपलं सादरीकरण आटोपतं घेतलं.
अर्थात या वल्ली माणसाचे पुढचे सगळे 'परफॉर्मन्स' बघायची माझी तीव्र इच्छा मला तिथून निघायची परवानगी देत नव्हती. चार्लीच्या चित्रपटांची पारायणं केलेला मी याची देही याची डोळा चार्लीच्या या एकविसाव्या शतकातल्या प्रतिबिंबाकडे आपसूक आकर्षित झालेलो होतो. डोळ्यामोरून ते कृष्णधवल चित्रपट झरझर सरकत होते. तितक्यात साध्या कपड्यांमध्ये खांद्यावर मोठी बॅग आणि हातात पाण्याची बाटली घेऊन हा लेऊंग मला मॉलच्या दरवाज्यातून बाहेर येताना दिसला. आजच्या दिवशीचा याचा 'कोटा' पूर्ण झालेला असावा, याची खात्री पटली. माझ्या सुदैवाने तो तिथल्याच कॉफी शॉपमध्ये बाहेरच्या एका खुर्चीवर बसला आणि त्याने शीण घालवायचा रामबाण उपाय असलेली कॉफी मागवली. त्या शॉपचा मालक याचा चाहता तरी असावा किंवा याच्यामुळे जमलेल्या गर्दीत त्याचा धंदा वाढत असावा, कारण त्याने कॉफीचे पैसे घेतले नाहीतच, पण बरोबर एक छानसं 'हॅम सॅंडविच' सुद्धा आपल्यातर्फे त्याला दिलं. मी अर्थात त्याच्या समोरच्या रिकाम्या खुर्चीत पटकन बूड टेकवलं आणि कॉफी मागवली. संभाषणाची सुरुवात कशी करायची, याची जुळवाजुळव मनात करत असताना त्यानेच मला पहिला प्रश्न केला, " माझ्याशी बोलायचं का? मी बघतोय तुम्हाला तासभरापासून...बाकीचे गेले पण तुम्ही इथेच थांबलात..."
" होय...तुमच्या सादरीकरणानंतर मी तुमचा 'फॅन' झालेलो आहेच, पण माझ्या मते पृथ्वीवरच्या असामान्य अभिनेत्यांमध्ये ज्याचं स्थान अग्रगण्य असेल, असा माझा अतिशय आवडता 'चार्ली' तुम्ही सादर केलात म्हणून मला तुमचे आभार सुद्धा मानायचे आहेत."
" धन्यवाद. तुम्ही इंडियन आहात?"
" होय. तुम्ही चेहेऱ्यावरून चिनी वाटताय..."
" होय, पण पक्का चिनी नाही. मी हॉंगकाँगचा आहे. दिसायला चिनी, बाकी पक्का ब्रिटिश..." अर्थात खायला सुरुवात करण्याआधी पूर्ण बाह्यांच्या शर्टाच्या ' कफलिंक्स' काढून बाह्या नीट दुमडून मांडीवर कपडा ठेवणारा, सँडविच काट्या-चमच्याने खाणारा आणि ' gonna ' , ' wanna ' सारख्या अमेरिकन 'slangs' ना स्पर्शही नं करता व्याकरणशुद्ध इंग्रजी बोलणारा मनुष्य अजून कोणी असूच शकत नाही, हे मला पुरेपूर माहित होतं. इंग्रजांचा शिष्टपणा आणि आत्मप्रौढी मात्र त्याच्यात नावालाही नव्हती. मिचमिचे चिनी थाटाचे डोळे, गवताचे तुरे वाटावे असे तपकिरी रंगात रंगवलेले केस, दाढी-मिशीच्या जागी ' केवळ पुरुष म्हणून जन्माला घातल्याची खूण' म्हणून देवाने चिकटवलेले आठ-दहा केस, पीत-गोरा वर्ण, साडेपाच फुटाच्या किंचित वरची उंची आणि या सगळ्यावर उठून दिसणारा काळ्या फ्रेमचा 'गांधी' चष्मा असं चित्रपटांमध्ये शोभून दिसेलशा थाटाचं त्यांचं दिसणं आकर्षक नक्कीच होतं. बांधा चिनी माणसांसारखा शेलटा असला तरी पिळदार होता. एकूणच हा माणूस बऱ्यापैकी श्रीमंत असावा अशी माझी खात्री पटायला लागली होती.
" तुम्ही हे परफॉर्मन्स इथेच सादर करता कि अजून कुठे सुद्धा जात असता?" मी त्याला बोलता करायचा प्रयत्न सुरु केला. सॅन्डविचमधून हॅमचा एक तुकडा काट्याने बाजूला करीत त्याने माझ्याकडे न बघताच स्मितहास्य केलं, तो तुकडा खाऊन एक कॉफीचा घोट घेतला आणि काटा-चमचा प्लेटमध्ये ठेवून माझ्याकडे बघितलं. मिचमिच्या डोळ्यांमध्ये चमक तरळून गेली आणि त्याच्या त्या फर्ड्या साहेबी इंग्रजीत संथपणे आणि हळू आवाजात त्याने स्वतःच्या आयुष्याची पानं चाळायला सुरुवात केली.
" हॉंगकॉंगमध्ये जुन्या आणि सुप्रसिद्ध असलेल्या 'रेमंड चौ' या चित्रपट कंपनीत माझे आई आणि वडील कामाला होते. वडील निर्मितीच्या बाजू सांभाळायचे, आई वितरण व्यवस्था बघायची. पडद्यामागच्या अदृश्य हातांमधले होते माझ्या आई-वडिलांचे हात. तुला माहित आहे का कुणास ठाऊक, ब्रूस ली, जॅकी चॅन या आणि अशा अनेक 'स्टार्स' ना 'रेमंड चौ' ने जगासमोर आणलं.....हॉलीवूडमध्ये त्यांनी नंतर नाव कमावलं."
" भारतात ९०च्या दशकात कुंग-फू चित्रपटांची लाट आली होती. हे दोघेच नाही, तर मला बोलो येऊंग, सामो हुंग, चौ युन फॅट, लेस्ली चौंग असे अनेक जण आठवतायत. त्यांचे चित्रपट मारामारीसाठी बघायला मजा यायची..." अचानक लेऊंगची कळी खुलली. " अजून आवडतात का तुला हाँग काँगचे चित्रपट?" " हो.. ' इप मॅन ' चा पहिला आणि दुसरा भाग मला प्रचंड आवडलाय..." " अरे तुझ्याशी बोलायला मजा येईल नं मग...चालत चालत बोलायचं का? " नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं.
स्वतःची सायकल त्याने हातात धरली आणि संथ पावलं टाकत आम्ही त्या विस्तीर्ण प्रोमेनाडच्या दुसऱ्या टोकाच्या दिशेने निघालो. लेऊंगने त्याच्या बालपणाची माहिती सांगायला सुरुवात केली. पाच अपत्यांपैकी हा तिसरा. आई-वडील तसे बऱ्यापैकी कमावते असल्यामुळे मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली. इंग्रजांनी हॉंगकॉंग अजून चीनच्या ताब्यात द्यायला वेळ होता, त्यामुळे मोकळ्या लोकशाहीवादी वातावरणात मुलांचा ' यंत्रमानव' झाला नाही. दोघांनी बँकिंगच्या क्षेत्रात पाय ठेवला. लहान बहीण पत्रकारितेत गेली आणि सर्वात लहान बहीण शिक्षकी पेशात गेली. लेऊंग एकटा मात्र तीर्थरुपांचा वारसा पुढे नेत कलाक्षेत्रात आला.
" लंडनच्या 'राडा' मधून मी अभिनय आणि थिएटरचा कोर्स पूर्ण केला. तिथल्या ब्रॉडवेमध्ये उमेदवारी केली. पथनाट्य, आर्ट फेस्ट मधून एकांकिका, प्रहसन...सगळं ३ वर्ष केलं पण मला माझी ओळख सापडत नव्हती. शेक्सपिअर करूनही मनाला काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळत नव्हतं. एके दिवशी मित्रांबरोबर फिरत फिरत चार्ली चॅप्लिनच्या लंडनमधला केनिन्गटन रोडवरच्या घराला भेट दिली आणि माझं आयुष्य बदललं. तोवर चार्ली मला मोजक्या चित्रपटांमुळे माहित होता. त्याच्या हलाखीच्या बालपणाच्या खाणाखुणा मला दिसल्या आणि एकही शब्द नं उच्चारता त्या सगळ्या जागा माझ्याशी बोलल्याचा भास मला झाला. चार्लीने अशा वातावरणातून येऊन शब्दांचं माध्यम नसतानाही केवळ कायिक अभिनयाच्या आणि भावनाविष्काराच्या जोरावर जे काही केलंय, ते मला कमाल वाटलं. तिथेच ठरवलं, मी मूकाभिनय करणार. कायिक अभिनय. "
स्वित्झरलँडच्या थडग्यात चिरनिद्रा घेणाऱ्या चार्लीच्या आत्म्याला आपल्या या एकलव्याकडे बघून धन्य वाटलं असेल ! लेऊंगने युरोपच्या अनेक देशांमध्ये 'मायमिंग'चे कार्यक्रम केले. चार्लीच्या अनेक मूकपटांना पुन्हा एकदा रंगमंचावर सादर केलं. बरोबरीने स्वतःच्या आतला 'ट्रम्प' शोधायच्या प्रयत्नात त्याने स्वतःचं एक 'कॅरॅक्टर' निर्माण केलं. त्या कॅरॅक्टरचं नाव त्याने ठेवलं ' शुई'. चिनी भाषेत शुईचा अर्थ होतो पाणी. पाण्यासारखं कोणत्याही रंगात, आकारात आणि रूपात स्वतःला सामावून घेणं हे त्यांचं अंतिम ध्येय त्याला मूक अभिनयाच्या माध्यमातून अविष्कारित करायचं होतं.
" चित्रपटांमध्ये का नाही गेलास?" मला राहून राहून वाटत असलेलं कुतूहल अखेर प्रश्नरूपाने बाहेर आलं.
" आजच्या तंत्रज्ञानाने भरलेल्या चित्रपटांमध्ये मला नाही रस वाटत. एकदा प्रयत्न केला, पण हिरव्या पडद्यासमोर डमी अभिनेत्रीशी संवाद साधताना खूप विचित्र वाटायचं. तो 'फील' नाही यायचा. दोन-तीन चित्रपट केले आणि दिलं ते माध्यम सोडून... मी रस्त्यात रमतो. तिथल्या तिथे आपल्या सादरीकरणाचं मूल्यमापन झालेलं बघायची जी मजा आहे नं, ती १०० रिटेक देऊन नाही येत. शिवाय आहे त्या वातावरणात आपण जुळवून घेऊन आपली कला सादर करणं 'स्पेशल इफेक्ट' पेक्षा कितीतरी जास्त आव्हानात्मक आहे. या गोष्टीची वेगळी नशा मिळते. " चित्रपटांमध्ये अभिनय करताना बालगंधर्वांना कदाचित हेच सगळं वाटलं असेल का, असा विचार माझ्या मनात तरळून गेला.
त्यानंतर पाच-सहा दिवस सलग मी संध्याकाळी त्याचे 'परफॉर्मन्स' बघायला गेलो. कधी साधा जोकर, कधी 'ट्रम्प', कधी 'शुई' तर कधी एखाद्या 'सेलिब्रिटी' ची मूक मिमिक्री असे त्याचे ते भावनाविष्कार बघून थक्क व्हायला झालं. मनात आणलं, तर हा मनुष्य जागतिक दर्जाचा कलाकार सहज होईल, हे क्षणाक्षणाला मला जाणवत होतं आणि म्हणूनच त्याच्या पैसे आणि कीर्तीच्या मागे नं जाणाऱ्या मुक्त कलाविष्काराबद्दल मला अधिकाधिक आदर वाटत होता. उत्सफूर्तपणा आणि प्रेक्षकांना थेट भिडणं या दोन गोष्टींमध्ये त्याच्या कलेचा प्राण होता.
तो आठवडा गेल्यानंतर शनिवारच्या संध्याकाळी असेच कॉफी पिताना त्याने सिंगापूरहून प्रयाण करायचा बेत मला सांगितला. रशियाच्या 'पपेट थिएटर' ला भेट द्यायला तो जाणार होता. तिथे असेच ' स्ट्रीट शो ' करून पुढे युरोपला जायचे त्याचे मनसुबे होते. आठवड्याभरात मला अनुभवाने समृद्ध करून हा कलाकार आपल्या मस्तमौला आयुष्याच्या पुढच्या वाटेवर जाणार होता. ब्रिटिश पासपोर्ट असल्यामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये मुक्त संचार करायची मुभा त्याने पुरेपूर वापरून घेतली होती.
शेवटचा 'शेक-हॅन्ड' झाला. त्याच्यातला ब्रिटिश काही सेकंदांपुरता बाजूला झाला आणि निसटतीच का होईना, पण त्याने मला मिठी मारली. त्याचा मुक्काम कधीही एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहत नसल्यामुळे त्याचा मोबाईल नंबर तो कधीच तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ सारखा ठेवू शकत नसे, त्यामुळे त्याचा एक तरी फोटो घ्यावा अशी मला तीव्र इच्छा झाली." माझा खरा चेहरा फोटोमध्ये बंदिस्त नको करूस..." अशी काहीतरी तिरपागडी कारणं देऊन देऊन त्याने फोटो घ्यायला मनाई केली. पाठमोरा होऊन तो त्याच्या वाटेवर चालायला लागला, तेव्हा समोर सूर्य कलतीला आलेला होता.
चार्ली चॅप्लिनचे 'पोटॅटो डान्स' आणि 'हिटलर विथ द ग्लोब' चे दोन बेस्ट परफॉर्मन्सस तो सादर करायचा, पण उल्लेख करून अपूर्ण सोडलेला तो तिसरा परफॉर्मन्स कोणता याच उत्तर कदाचित मला मिळालेलं होतं.' सिटी लाईट्स' च्या शेवटी एकटाच आपल्या वाटेवर चालत जाणारा पाठमोरा 'ट्रम्प' मला समोर दिसत होता!
मस्तं
मस्तं
खुपच सुंदर व्यक्तीचित्रण करता
खुपच सुंदर व्यक्तीचित्रण करता तुम्ही..
खुपच सुंदर व्यक्तीचित्रण करता
खुपच सुंदर व्यक्तीचित्रण करता तुम्ही..+१११११
https://humansinthecrowd
https://humansinthecrowd.blogspot.com तसच https://demonsinthecrowd.blogspot.com हा माझा वैयक्तिक ब्लॉग आहे. कृपया ब्लॉग वर लेख वाचून प्रतिक्रिया नोंदवावी, हि विनंती.
सुंदर
सुंदर