काही सेकंदांच्या अंतराने एकाच आईच्या पोटी एकाच प्रसूतिगृहात एकाच दिवशी जन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांची कुंडली अगदी तंतोतंत एकसारखीच असायला हवी , अशी शंका मला कुंडलीशास्त्राबद्दल वाचत असताना नेहेमी येत असे. अधून मधून त्या विषयातल्या काही तज्ज्ञ मंडळींना मी त्यासंबंधी प्रश्न सुद्धा करत असे आणि माझ्या मनाचं त्यांच्यापैकी कोणाच्याही उत्तराने समाधान होतं नसे. पूर्वजन्मीच्या संचिताचे परिणाम प्रत्येक आत्म्यावर वेगवेगळे होतं असतात, असं साधारण उत्तर प्रत्येकाकडून मला मिळत असे. मुळात विज्ञान, गणित, शास्त्र याच्या कसोट्यांवर प्रत्येक गोष्ट पारखून घ्यायची आणि तर्कशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधणाऱ्या माझ्या पिढीला " आमच्या वडिलांनी सांगितलेला म्हणून आम्ही मान्य केलं " च्या धर्तीवर उत्तरं देणाऱ्या महाभागांचं वावडं, आणि त्यात ज्योतिषासारख्या आणि पुनर्जन्मासारख्या अंधश्रद्धा आणि विज्ञानाच्या पुसटश्या सीमारेषेवरच्या विषयातून त्या जुळ्यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न सापडल्यामुळे इतर अनेकांप्रमाणे ज्योतिष म्हणजे काहीतरी खुळचटपणा आहे, असं माझं मत तयार होऊ लागलं होतं. माझे 'बाप दाखव किंवा श्राद्ध कर' छापाचे वाद अनेक ज्योतिषांबरोबर झाले, पण एके दिवशी माझ्या डोळ्यांसमोर एक अशी काही घटना घडून गेली की माझ्या मनातल्या सगळ्या शंका-कुशंकांचं अगदी कायमचं निरसन झालं.
वास्तुविशारद विषयाची पदवी मी ज्या महाविद्यालयातून घेतली, ते माझ्या घरापासून बरंच लांब होतं. दररोज पहाटे लोकल ट्रेन पकडून मुंबईच्या त्या जीवघेण्या गर्दीतून लांबच लांब t-sqare , ड्रॉईंगच्या शीट्सची भेंडोळी ठेवायची प्लॅस्टिकची केस, मोठाले set squares अशा काय काय गोष्टी अंगावर वागवत मध्य रेल्वे ते पश्चिम रेल्वे अशी कसरत करत दीड तासांच्या प्रवासानंतर कॉलेजचं दर्शन होई. अनेक वेळा या सगळ्यांबरोबर 'मॉडेल' सुद्धा असे. अर्थात त्या प्रवासात या सगळ्या वस्तू आजूबाजूच्यांच्या अंगाला 'नको तिथे' लागून अनेक वेळा शिव्या खायचे प्रसंग उद्भवत असत आणि आजूबाजूच्या गर्दीतल्या त्या लोकांना बाबापुता करत समजावावं लागे.
" अरे भाईसाब, आपका वो मिसाईल काहीं उपर रख दो ना...मुझे पेट में चुभ रहा है...मेरा ऑपरेशन हुआ है, लगा जोर से तो बुरा हाल होगा..." माझ्या कानात मागून सुपरिचित 'मुंबईया हिंदीत' हे शब्द पडले. आजूबाजूला हलायला जागा नव्हती, त्यामुळे शब्दांचं उगमस्थान नक्की कुठे आहे, हे कळायला मार्ग नव्हता. गर्दी इतकी होती, की उभ्या असलेल्या सगळ्यांची ' मेथीची जुडी' झालेली होती." थोडा जगा होने दो ना..." मी आर्जवी सुरात उत्तर दिलं. " तब तक जिंदा नही बचा तो?" आता त्या आवाजातली विनंती धमकीच्या वळणाने यायला लागली होती. शेवटी आजूबाजूच्या दोघांना विनंती करून कशीबशी मी खांद्यावरचा 'शीट रोल' काढला आणि पुढे धरला. तितक्यात धूर झाल्यावर पोळ्यातून मधमाशा जश्या बाहेर पडतात, तसे घाटकोपर स्टेशनवर लोक उतरायला लागले आणि स्टेशनवरचे लोक त्यांना ढकलत ट्रेनमध्ये घुसायचा आटापिटा करायला लागले. एका काटकुळ्या माणसाचं कोपर त्या झटापटीत माझ्या मागच्या बाजूच्या कोणालातरी जोरात लागलं आणि त्या माणसाने जोरदार किंकाळी ठोकली. मी कसाबसा वळलो, तेव्हा समोर मला एक मध्यम चणीचा तिशीतला वाटणारा एक मनुष्य कळवळून स्वतःचा जीव वाचवायचे प्रयत्न करताना दिसला. पुढच्या विद्याविहार स्टेशनपर्यंत कसाबसा तग धरून त्याने खुणेनेच 'मला स्टेशनवर उतरायला मदत करा' अशी माझ्याकडे विनंती केली आणि माणुसकीला जागून मी त्याला कसाबसा त्या गराड्यातून बाहेर काढला. स्टेशनवरच्या बाकड्यावर त्याला बसवून पाणी दिलं, घाम पुसायला रुमाल दिला आणि समोरच्या स्टॉलवरून एक लिंबू सरबताची बाटली आणून दिली.
दहा मिनिटानंतर थोडी हुशारी आल्यावर त्याने मला नमस्कार केला.मी सुद्धा आता थोडासा अवघडल्यासारखा झालो होतो. त्याची अवस्था आता ठीक आहे, हे बघून मी त्याला त्याचा ठावठिकाणा विचारला.
" मी कल्याणला राहातो. झवेरी बाजारात एका दागिन्यांच्या दुकानात मी काउंटर सेल्समन आहे. तुम्हाला हे तुमचं काय आहे ना खांद्याला..."
" प्लास्टिक केस...आमच्या ड्रॉईंगची..."
" हां, तीच ती...ती बाजूला करायला मीच सांगत होतो..."
" ते तुम्ही होता का...माफ करा पण करणार काय, गर्दी किती होती आत ..."
" ठीक आहे हो...मुळात माझाच थोडा प्रॉब्लेम आहे...आठ महिन्यांपूर्वी किडनी काढलीय ना...त्या टाक्यांवर काहीही लागलं की असं होतं...आणि ट्रेनशिवाय पर्याय नाहीये दुसरा...कल्याण ते मुंबई जाणार कसं?"
थोड्या वेळाने पुढच्या ट्रेनमध्ये त्याला पुढे चढवून मागाहून मी कसाबसा त्या गर्दीत घुसलो आणि दादरला उतरायची कसरत सरावाने आलेल्या चपळाईने मी पूर्ण केली. दिवसभर त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता.
आता त्याच्याशी माझी वरचेवर भेट व्हायला लागली. सकाळी बरेच वेळा आमची त्याच ' विडिओ कोच' फर्स्ट क्लास डब्यात गाठ पडायची. माझ्या अंदाजाप्रमाणे खरोखर त्याचं वय सदतीस-अडतीसच्या जवळपासचं होतं. आळंदीच्या वारकरी संप्रदायातल्या एका अतिशय देवभक्त घरात त्याचा जन्म झालेला होता. गळ्यातली तुळशीची माळ, कानाच्या पाळ्यांवर लावलेला शेंदूर, कपाळावर आणि गळ्यावर घरातून निघताना लावलेलं अंगाऱ्याचं बोट, मनगटावर बांधलेले चार-पाच गंडे आणि शर्टाच्या आतल्या बाजूच्या चोरखिशात प्लॅस्टिकच्या वेष्टनात ठेवलेली कसल्यातरी स्तोत्राची पुस्तिका असा त्याचा दररोजचा जामानिमा असायचा. या सगळ्या प्रकाराला साजेशी ' फिकट रंगाच्या शर्टावर गडद रंगाची विजार ' च्या थाटातली त्याची वेशभूषा चुकूनही कधी वेगळ्या वाटेवर गेली नाही. अशा या देवभोळ्या सज्जन माणसाचं नाव त्याच्या आजोबांनी 'धर्मज' असं भारदस्त ठेवलं होतं. अर्थातच ते नाव पाळण्यातून शाळेच्या दाखल्यावर आणि सरकारी कागदपत्रांवर जरी संपूर्ण पोचलं, तरी दररोजच्या बोलण्यात ते 'धर्मा' इतकंच राहिलं होतं. मुंबईच्या जनतेने अंगभूत तुच्छपणाला जागून त्याचा 'धर्म्या' सुद्धा केला होता. पण या माणसाच्या चेहेऱ्यावर इतकी विरक्ती असायची की ट्रेनमधल्या गर्दीतल्या धक्काबुक्कीत कोणी याला 'भ'कारान्त शिवी जरी हासडली तरी तो त्याच्या ज्ञानेश्वर माउलींसारखा स्थितप्रज्ञ दिसायचा.
विरक्तीची आसक्ती असलेला हा माणूस दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांना आभूषणं कसा विकत असेल, याचं मला सारखं कुतूहल वाटत असे. त्याच्यावर त्याच्या मालकाचा इतका विश्वास होतं, की त्याने दुकानाची एक चावी त्याच्या ताब्यात दिली होती. त्याला मालकाने मोबाइलसुद्धा दिला होता. तो अनेक वेळा खिशातल्या छोट्या चोपडीत वैयक्तिक कारणासाठी केलेल्या कॉल्सची नोंद करून ठेवताना दिसायचा, कारण केवळ मालकाचा विश्वास आहे म्हणून कामाव्यतिरिक्तच्या कॉल्सचं बिल मालकाच्या खिशातून उकळणं त्याच्या तत्वात आणि संस्कारात बसणं शक्य नव्हतं.
एके दिवशी असाच तो मला ट्रेनमध्ये भेटला. शनिवार असल्यामुळे जागा बऱ्यापैकी रिकाम्या होत्या, त्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळालेली होती. मुंबईच्या लोकलमध्ये बसायला आणि तीही खिडकीपाशी असलेली जागा मिळणं म्हणजे थेट मोक्षप्राप्तीचा आनंद असल्यामुळे मी खुशीत होतो, पण आज या माऊलीचा काही चेहरा खुलत नव्हता. जेवढ्यास तेवढं बोलत तो आपला खिडकीबाहेर बघत गप्पपणे कसलातरी विचार करत होता. शेवटी ना राहवून मी त्याला मुद्दाम थेट प्रश्न केला..
" अरे मित्रा, आज काय झालंय? इतका गप्प का रे?"
" अरे...थोडी चिंता आहे रे घरची..."
" काय झालं? सांग ना..."
" तुला सांगून तुझा मूड का घालवू..."
" अरे, सांग ना. हरकत नाही...मी काही मदत करू शकतो का? संकोच नको करू...'
" अरे तसं नाही...आणि तू काय मदत करणार...जाऊदे. भोग असतात ना एकेकाचे..'
" भोग? अरे काय झालाय तरी काय?"
" अरे काय सांगू...काल पुन्हा माझं भाऊ पिऊन आला घरी...खूप तमाशा केला. घरी आरडाओरडा, जेवणाचं ताट फेकून दिलं...आई आणि अप्पा अक्षरशः हात जोडून सांगत होते, नको असं वागूस...पण तो कसला ऐकतोय...असं का झालं तो त्या परमेश्वरालाच माहीत..."
" भाऊ? लहान आहे कि मोठा?"
" मोठा...पण काही सेकंदांनी. जुळा आहे. माझ्या आधी फक्त काही सेकंद तो जन्माला आला. 'वेदज' नाव आहे त्याचा, आम्ही सगळे वेद म्हणतो, आणि आजूबाजूचे वेडा..."
मी अक्षरशः स्तिमित होऊन त्याची ती कर्मकहाणी ऐकत होतो. दोन सक्खे जुळे भाऊ, एकाच आई-बापाच्या पोटी जन्मलेले, एकसारख्याच संस्कारांमध्ये वाढलेले, एकाच घरातलं अन्न खाल्लेले पण त्यांच्यात इतकी जमीन-अस्मानाची तफावत कशी असू शकते, याचं विचार माझ्या मनात सुरु झाला.
" लहानपणापासून का कुणास ठाऊक, पण हा सतत नको तेच करायचा. बालवाडीपासून शाळेत जायला कंटाळा, अगदी त्या वयापासूनच मारामाऱ्या, वर्गातल्या मुलांच्या पेन्सिली चोर, खोडरबर चोर असे प्रकार करायचा. खोड्या काढणारे आणि मस्ती करणारे अनेक असतात, पण हा जे करायचा, ते त्याच्या पलीकडचं होतं. शिक्षकांचा मार खाऊन निगरगट्ट झालेला. घरात वातावरण असं, की साधी मुंगी किंवा माशी आम्ही मारत नाही...पण माझ्या वडिलांनी एकदा असह्य होऊन त्याला एक सणसणीत थोबाडीत मारली होती. पुढे मोठा झालं तसा पेन्सिलींवर समाधान होईना...मग कोणाचे पैसेच चोर, कोणाच्या सायकलचा दिवाच चोर असे प्रकार करायला लागला. एकदा परस्पर शाळेतल्या एका मुलाची चांदीची अंगठी चोरून विकायला गेला आणि सोनाराने अप्पांना बोलावून घेतलं. एक वर्ष सुधारगृहात ठेवलं, तिथे पाकीट कसं मारायचा याचं शिक्षण घेऊन आला. जोडीला नको ती व्यसनं लावून घेतली..." बोलताना धर्मजच्या डोळ्यातून अश्रू निसटला आणि त्याने खांद्याला तो पुसत पाण्याची बाटली उघडून तोंडाला लावली.
" अरे पण कोणाच्या संगतीमुळे हे सगळं झालं? तो मुळात वाईट संगतीत कसं गेला काही तुम्ही शोधला का?"
" अरे तेच तर मोठं कोडं आहे रे...आमचं घर आळंदीला. मी बारावीनंतर मुंबईला आलो. आमच्या घराच्या आजूबाजूला सगळे वारकरी संप्रदायाचे लोकच राहतात. प्रत्येक घरात एक तरी कीर्तनकार मिळेलच तुला... विठूमाऊलीच्या किंवा ज्ञानोबामाऊलीच्या भक्तीत आयुष्य समाधान जगायची आमची शिकवण. पैसा, व्यसनं, शौक, श्रीमंती या सगळ्याची आम्हाला कधीच गरज वाटली नाही. दररोज जेवायच्या आधी देवळात कोणी पांथस्थ आहे का ते बघा आणि असेल तर त्याला घरी जेवायला आणा अशी शिकवण देणारे आमचे आबा आणि आप्पा...आमच्या घरात देवळातल्या दानपेटीतले पैसे पळवणारा हा कोण जन्माला आला हेच मला कळत नाही. अप्पांनी काय काय नाही केलं...नवस केले, अंगारे-धुपारे केले, अनवाणी पायी पंढरपूरला गेले...त्यांच्या पायांना भेगा पडल्या पण माझं भाऊ काही सुधारला नाही..." रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घ्यायचं सामर्थ्य त्या ज्ञानोबा माऊलीत असलं तरी मुळात रेडा एक प्राणी होता, मनुष्य नव्हता हा छोटासा तपशीलसुद्धा विचारात घेण्याजोगा होता. प्राण्यांकडून पुण्याचा काम करून घेणं एक वेळ सोपं असेलही, पण मनुष्याकडून ते करून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील हेच खरं!
सुखाची चटणी-भाकरी खाणाऱ्या साध्या माणसांच्या पानात अचानक गोमांसाचा तुकडा यावा ,असं काहीतरी विचित्र घडलेलं होतं. या सगळ्याचा उलगडा करणं माझ्यासाठी खरोखर अशक्य होतं. आईचा डोळा चुकवून नुकताच काढलेला लोण्याचा गोळा पळवणाऱ्या श्रीकृष्णाच्या चोरीला 'बाललीला' म्हणून त्याचा उत्सव होतो, कारण त्या चोरीत अखंड निरागसता आणि बालसुलभ खोडकरपणा भरलेला असतो. लहान दुर्योधनाने असूयेने भीमाला नदीपात्रात बुडवल्याची लीला त्याच्या लहान वयाचा विचार करूनसुद्धा कधी समर्थनीय होऊ शकत नाही. इथे तर दुर्योधनाने थेट पांडवांच्या घरात जन्म घेतलेला होता, त्यामुळे त्या पापभिरू घराला काय काय भोगाव लागलं असेल, याची मला कल्पनाही करवत नव्हती.
" दारूच्या व्यसनापायी त्याने त्याच्या शरीराची पार वाट लावून घेतली...किडन्या निकामी झालेल्या तीन वर्षांपूर्वी. उपचार केले, पण याची दारू सुटेना...शेवटी आत्ता काही महिन्यांपूर्वी मी माझी एक किडनी त्याला दिली. जुळे आहोत ना...रक्तगट जुळला, बाकी सगळ्या गोष्टी जुळल्या, त्यात मी निर्व्यसनी आणि तरुण. त्याला जीवाची भीती होती, त्यामुळे किडलेय द्यायच्या आधी मी त्याच्याकडून वचन घेतलं की तो पुन्हा कधीही व्यसन करणार नाही आणि वाईट कर्माचा त्याग करून नीट वागेल....माझ्या नशिबाने ऑपरेशननंतर तो नीट वागतही होतं. पण काल काय झालं कुणास ठाऊक...."
धर्मजचं पोट कसल्या ऑपरेशनमुळे नाजूक झालेला आहे आणि तिथे धक्का लागल्यावर त्याला का इतका त्रास होतो, हे मला आता स्पष्ट झालं. कदाचित प्रत्येक वेळी धक्का लागल्यावर शरीराबरोबरच मनातही एक असह्य कळ जात असेल....शरीराचं दुखणं हळूहळू कमी होईलही, पण मनाच्या दुःखावर फुंकर घालू शकणारं सुख या माऊलीच्या नशिबात आहे की नाही, हे त्याच्या त्या विधात्याशिवाय कोणाला माहीत असेल कुणास ठाऊक !
पुढच्या काही दिवसात धर्मजने त्याचं लग्न जुळल्याची गोड बातमी दिली. त्याच्या आयुष्यात उशिराने का होईना, पण संसाराचं सुख तरी आहे हे बघून मला खूप बरं वाटलं. लग्नाच्या एका आठवड्याआधी त्याचा भाऊ दारूच्या नशेत रस्त्यावरून चालता चालता गाडीखाली आला आणि त्या शापित आत्म्याचा मृत्युलोकातला प्रवास एकदाचा संपला. सुतक असल्यामुळे मुहूर्त पुढे ढकलून शेवटी आळंदीच्या देवळातच साध्या पद्धतीने धर्मजने लग्न केलं. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार लग्नाच्या निमित्ताने त्याने पाच-एकशे गरीब माणसांना जेवू घातलं आणि चार कापडं वाटली. एक काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आणि हातात हिरवा चुडा याशिवाय त्या नववधूच्या अंगावर काहीही अलंकार नव्हते, परंतु वारकऱ्याच्या घरातली असल्यामुळे ती त्या अलंकारांतही लक्ष्मीच्या थाटाने वावरत होती.
काही दिवसांनी धर्मजने आपण कायमचे आळंदीला जाऊन देवळाचा काम करणार असल्याचं सांगितलं. पगार आणि बाकीच्या हिशेबाच्या पैशांच्या व्यतिरिक्त मालकाने स्वखुशीने दिलेले लाखभर रुपये त्याने कशाचंही दुःख न वाटून घेता एका व्यसनमुक्ती केंद्राला दान दिले. त्यात त्याच्याकडे गोड बातमी असल्याची वार्ता त्याने मला कळवली आणि या माऊलीच्या आयुष्यात आता आनंद भरभरून वाहात असल्याचं मला समाधान वाटलं.
" मुलगा झाला रे...माऊलीची कृपा..." हातावर अक्खा पेढ्याचा पुडा ठेवत ट्रेनमधल्या त्याच डब्यात त्याच जागेवर बसून त्याने मला सांगितलं. त्याच्या चेहेऱ्यावर मी इतका आनंद कधीही बघितला नव्हता. त्याने बाकीच्या आजूबाजूच्या लोकांनाही स्वतःच्या हाताने पेढे वाटले. पुढच्या आठवड्यात तो कायमचं आळंदीला जाणार होता. दुकानातल्या आपल्या सहकाऱ्यांना आणि मालकाला मिठाई वाटायला तो निघाला होता.
" अरे क्या बात...काय रे, नाव काय ठेवणार? विचार केलाय का काही?" मी पेढा खात खात विचारलं.
" मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं हे आम्ही कधीच ठरवलं होतं...."
" ज्ञानेश्वर? निवृत्ती? वल्लभ?" मी उत्साहात विचारायला गेलो...
" नाही रे....वेदज..." त्याने शांतपणे सांगितलं.
स्वतःची किडनी देऊन ज्या वाया गेलेल्या भावाचा जीव वाचवायचा प्रयत्न या माउलीने केलेला होता, त्यावरून मला हे कळायला हवं होतं की कसंही झालं तरी त्याचा आपल्या भावावर जीवापाड प्रेम होतं. जुळ्याच दुखणं असंच असतं बहुदा...गर्भातूनच जुळलेलं आणि म्हणूनच विशुद्ध!
खूप छान
खूप छान
Wa sundar lihilay!
Wa sundar lihilay!
निशब्द
निशब्द
फारच सुंदर
फारच सुंदर
सुंदर...
सुंदर...
खुप खुप सुंदर लिखाण.
खुप खुप सुंदर लिखाण.
आतापर्यंत तुम्ही लिहिलेल्या लिखाणातील हे सर्वात जास्त आवडले.
सुंदर... मनाला भिडले.
सुंदर... मनाला भिडले.
सुंदर!
सुंदर!
खूप सुंदर लिखाण..
खूप सुंदर लिखाण..
सुंदर लिहिले आहे
सुंदर लिहिले आहे
खुपच टचींग!
खुपच टचींग!
शेवटचे वाक्य भिडले .
शेवटचे
वाक्य भिडले .
सुंदर!
सुंदर!
फार छान लिहिलं आहे.
फार छान लिहिलं आहे.