सुलभाताईंनी सर्वप्रथम कंटाळ्याचे कारण सांगितले. आपल्याला कंटाळा हा प्रामुख्याने कामातील तोच तोच पणा असल्याने येतो. हा एरवीसुद्धा येतो. अनेकदा आपल्याला कंटाळा दूर करण्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहण्याची सवय असते. आता लॉकडाऊनमध्ये बाहेर जाण्याची सोय नाही त्यामुळे याची तीव्रता वाढु शकते. हा कंटाळा जास्त वाढला की पुन्हा चीडचीड आणि नैराश्य वाढू शकतं. याचे उपाय सांगताना सुलभाताईंनी सर्वप्रथम आपल्या हातात यावेळी काय पर्याय आहेत ते पाहण्यास सांगितले. बाहेर तर जाता येणार नाही. मग घरातल्या घरात काय करता येईल याचा विचार करावा लागेल. आपल्या रोजच्या कामात थोडं वैविध्य आणावं लागेल.
त्यांनी या काळात निवृत्त झालेल्या एका माणसाने स्केचिंग करायला सुरुवात केली हे उदाहरण दिले. आता त्या माणसाला काही मोठा चित्रकार व्हायचं नाहीये. पण त्याला स्केचिंग करण्यात आनंद मिळत आहे. एका तरूण मुलाने सोसायटीत एकट्या राहणार्या आजीबाईंना काय हवे नको ते विचारण्यास सुरुवात केली. एकट्या आजीबाईंना तर याचा उदंड आनंद आहे. पण हे उपाय करताना आपण हे सारे आपल्यावर लादले गेल्यामुळे करत आहोत ही भावना मनात ठेवली तर पुन्हा आपल्याला ओझे होईल हे सुलभाताईंनी आवर्जून नमुद केले. त्यापेक्षा आपण आपल्या प्रकृतीसाठी, शरीर, मन स्वास्थ्यासाठी हे करत आहोत. त्यामुळे आपल्याला कंटाळा येत नाही. आपण बाहेर जात नाही. त्याद्वारे आपण या काळात एका आदर्श नाकरिकाचे कर्तव्य पार पाडत आहोत अशी भावना ठेवली तर हे करणे आनंददायक होऊ शकेल.
हे करताना आपल्या कामात लय शोधणे महत्त्वाचे आहे असेही सुलभाताईंनी सांगितले. त्यासाठी त्यांनी रस्त्यावर काम करणार्या साध्यासुध्या माणसांची उदाहरणे दिली. काही माणसे रस्त्यावर झाडू मारतानादेखील एका लयीत त्यांचे काम चाललेले असते. ते पाहताना, त्यांची देहबोली निरखताना हे जाणवते की ही माणसे पाट्या टाकल्यासारखी कामे करीत नाहीत तर त्यांना काम करताना आपली स्वतःची एक लय सापडलेली आहे. असे झाले की कामाचा कंटाळा येत नाही.मन ताजेतवाने राहते. सध्या अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत त्यातून काही आवडीचं शिकता येईल. नाटके चित्रपट पाहता येतील. काही कलाकार सध्या ऑनलाईन कार्यक्रम करीत आहेत ते पाहता येतील. शेवटी सुलभाताई म्हणाल्या करण्यासारखं खुप काही आहे. जागेच्या मर्यादा असल्या तरी मनाच्या मर्यादा मोकळ्या करुया आणि कंटाळ्याला दूर ठेवूया.
सुलभाताई स्वतः मैत्र हेल्पलाईनच्या फेसबुकपेजवर लिहित असतात. त्याची लिंक देत आहे.
https://www.facebook.com/Maitra-Emotional-Distress-Helpline-229722830395368
(क्रमशः)
अतुल ठाकुर
लेख आवडला. खरच काल मलाही
लेख आवडला. खरच काल मलाही भयंकर कंटाळा आला होता, खरं तर डिप्रेस्डच वाटत होते. पण मग कॉफी घेतली, गाणी लावुन, व्यायाम केला (जेमतेम १५ मिनिटे) पण तरी न केल्यापेक्षा बरे. आंघोळ केली. थोड्या वेळात बरं वाटू लागले.
छान लेखमाला
छान लेखमाला
तो फोटो किती भयानक आहे?!
तो फोटो किती भयानक आहे?!