भगवद गीता - एक Motivational Toolkit ? - माझे मनोगत !

Submitted by jpradnya on 4 April, 2020 - 07:57

मी गीता वाचली आहे असं खरंतर म्हणण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. परंतु माझ्या आई आणि आजी च्या अथक प्रयत्नांमुळे माझ्या सारख्या वांड कार्टीला “हू इज धिस गीता” असं प्रश्न पडत नाही. भागवद गीतेचं छोटसं पुस्तक कायम बरोबर राहू दे ही त्यांची शिकवण.. नव्हे अट्टहास होता. ही पुस्तक माझी काय आणि कशी मदत करणार आहेही मात्र गावी नव्हतं
नंतर एक वर्षी spirituality चं किडा चावला तेव्हा थोड्याश्या संशयानेच अर्थासकट गीता “वाचली”.
पूर्ण tangent ! किंबहुना चिडचिड झालेली स्पष्ट आठवते.
फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहा? व्हॉट द हेल !श्वासा श्वासाला रिटर्न ऑन इनवेसटमेन्ट चं हिशोब करणारी पिढी माझी .. झेपलंच नाही.
“मीच सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा मी सांगतो ते आणि तेच ऐक”..वगरे डायलॉग श्री कृष्णा च्या तोंडी वाचले आणि वाटलं ह्याला काय अर्थ आहे? असं थोडीच असतं? हाऊ egoistic !
“जिथे मी आहे तिथेच विजय आहे” म्हणे ...दिसत तरी नाही तसं आस पास
“यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत .. अभयउत्थानम अधर्मस्य तदायात्मानं सृजयमयहम ?”
मग अजून हा कसली वाट बघतो आहे अवतार घ्यायला? अजून किती ग्लानि यायला हवी आहे धर्माला ?
अश्या आणि अशा सारख्या असंख्य विचारांनी मन भेंडाळून गेलं. नकोच ती भानगड म्हणून ते पुस्तक ही मिटून बुकशेल्फ मध्ये मागे गेलं.
तरुण रक्त होतं. अशांत मन होतं. अंगात रग होती आणि डोक्यात राग होता. आपण स्वतःचं आयुष्य आणि जग घडवू शकतो असा विश्वास होता. बुद्धी आणि शक्ति वर गुर्मी होती. प्रश्न स्वतःचे होते आणि उत्तरेही स्वतःचीच होती ! स्वतःच्या ह्या ताकदीपुढे गीता कामाची वाटली नाही.

मग हळूहळू वर्ष उलटत गेली. आयुष्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. बरे वाईट अनुभव गाठीशी जमात गेले. नीती-अनीति, मूल्य, संस्कृति आणि संस्कार, हक्क-कर्तव्य , चूक-बरोबर , फायदे-तोटे असे अनेक क्लिष्ट पेच समोर उभे ठाकत होते. उत्तरे मिळेनाशी झाली पण प्रश्न मात्र संपत नव्हते. हतबुद्धता जाणावली तेव्हा पुन्हा ह्या छोट्याश्या पुस्तकाची आठवण झाली. ह्या वेळी मात्र संशया ऐवजी अपेक्षा मिश्रित कुतुहलाने गीता वाचण्याचा प्रयत्न केला आणि मधूनच एखादा “फंडा “ पटकन सापडायला लागला. पुन:शच मान्य करते की गीता वाचते आणि टी समजली असं म्हणायला सुद्धा जीभ वळत नाही. पण काही गोष्टी आत कुठेतरी उमजायला लागल्या ही निश्चित!

मानवी मनाचे संपूर्ण कंगोरे अभ्यासून गीतांकरांनी गीता रचलेली आहे असं दिसलं. माणसाचा जेव्हा अर्जुन होतो, म्हणजेच आयुष्यात त्याच्या परिस्थिति वशात त्याचे सामर्थ्यच गळून जाते.. काय करायचे ही त्याला जेव्हा समजेनासे होते तेव्हाच्या ह्या नाजूक मानसिक स्थितीत त्याला लागणारी सगळी टॉनिक्स गीता पुरवते. अतिशय घाबरलेल्या मुलांचा चेहरा घट्ट धरून आई जस त्याच्या नजरेत नजर रोखून त्याला कणखरपणे जसे सांगते की “ लुक अॅट मी ! तुला काही झालेलं नाहीये. जस्ट breath ! मी आहे ना ?! “ तसंच गीता करते. कर्माच्या परिणामांची आणि त्याच्या यश-अपयशाची धास्ती असली की कर्मा च्या क्वालिटी वर परिणाम होतोच. म्हणून गीताकार कर्मफळांची जबाबदारिच माणसाच्या डोक्यावरून काढून घेतात. ही प्रचंड मोठा अॅंटी depressant आहे. म्हणून तर रॉबर्ट ओपेनहायमर सारख्या अणुबॉम्ब च्या जनकाला गीतेनेच दिलासा दिला. नाहीतर हिरोशिमा नागासाकी नंतर त्यांनी आत्महत्या न केली असती तर नवल.
[टीप: इथे मी कोणत्याही स्वरूपात अणुस्फोट justify करण्याचा प्रयत्न करत नाहीये. ही एक माहीत असलेलं उदाहरण होतं ते उद्धृत केलं एवढंच!]

मन ही नेहमी शंका-कुशंकांवर हिंदोळत असते. नेहमीच सतत साशंक असलेल्या मनाकडून फार काही विधायक होऊ शकत नाही. म्हणून “ मीच तुझा एकमेव मार्ग आहे” असं ठणकावून संगत गीताकार माणसांतल्या एनर्जि ला channelize करतात. मनाचा वाभरेपणा आटोक्यात आणतात.

सत्त्व रज् तम गुणांच्या वर्णनातून माणसाला स्वतःला ओळखायला मदत करतात. माझी वृत्ती आणि सवयी तामसी अर्थात घातकी आहेत ही जर माणसाला अात कुठेतरी जाणवलं तर तो कधी ना कधी सात्विकते कडे प्रवास करण्याचा प्रयत्न करेल आणि ही उत्थान नैसर्गिक असेल.

तसंच ज्ञान -कर्म-भक्ति योग ही विभागणी करून गीताकार प्रकांड बुद्धिवादी, कर्तव्य पारायण लोक आणि भाबडे भाविक ज्यांच्या बुद्धी ची झेप कदाचित थोडी कमी असेल – अशा सर्वांना आपलसं करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एकाच पातळीवर आणून बसवतात. ही विविधतेत एकात्मतेचीच क्रिया आहे.

पुनर्जन्म, मोक्ष, अवतार अश्या संकल्पनांची बीजे लोकांच्या मनात रुजवून गीताकार माणसांना सत्कार्य प्रवण बनवतात.सध्या काही बरं चाललं नाहीये पण माझं पुण्य कुठे तरी जमतंय, आज नाही तर उद्या ते कामी येईलच हा विश्वास माणसाला आजचा खडतर निराश दिवस जगण्याची उमीद देतो. परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही सगळ्यात मोठं पॉजिटिव affirmation हताश झालेल्या माणसाला नव्याने उठण्याची शक्ति देऊ शकतं. नेमकं हेच गीताकार प्रभावीपणे करतात.
शांत स्थिर आणि प्रगल्भ मन ही केव्हाही जास्त दक्ष, कुशल, कार्यक्षम आणि कर्तुत्त्ववान ठरतं हा मानस शास्त्रीय सिद्धांत आहे. तेव्हा उद्द्विग्न मनाला शांत आणि स्थिर करण्याची थेरपी भगवद गीतेत मांडली असावी.

मानवी बुद्धी ला अनाकलनीय अश्या कित्येक गोष्टी ह्या विश्वात आहेत त्या बद्दलही गीता भाष्य करते. परंतु त्याची शहानिशा खात्रीलायक आणि तर्कसंगत होऊ शकत नाही. तेव्हा त्या फंदात न पडता एक अतिशय उपयुक्त असे Motivational Toolkit म्हणून सध्या तरी गीता खुणावते आहे. पुढे ती स्वतःची आणखी काय काय ओळख करून देईल ते भगवान श्री कृष्ण च जाणोत!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ता. क . हे पूर्णतः माझे वैयक्तिक विचार आहेत. इथे मतभेद ही असणारच. मानस शास्त्र अथवा धार्मिकते चे माझे कोणतेही claims नाहीयेत. मला बापडीला वाटलेलं मनातलं notepad मध्ये उतरवलं इतकंच. चूक भूल माफ करावी !

खूप सुंदर लिहिलं आहे ... गीता अजून वाचली नाही , नंतर नंतर म्हणत राहून गेली आहे .. रामानंद सागरच्या श्रीकृष्ण मालिकेतली आणि नितीश भारद्वाजच्या कृष्णाने सांगितलेली बऱ्याचदा पाहिली आहे ... पण वाचन ते वाचन .. त्यातून नक्कीच खूप जास्त काहीतरी मिळेल .. वाचणार आहे .

आणखी लिहा तुम्ही , वाचायला आवडेल .. __/\__

धन्यवाद राधानिशा .
पहिल्यांदाच वाचणार असाल तर जरा नीट पारख करून तुमचं व्हर्जन निवडा म्हणजे इंट्रेस्ट कायम टिकेल अशी छोटीशी गोष्ट सांगविशी वाटली. मला स्वतःला पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांची गीतेवर ची प्रवचने खूप आवडतात. आणि इंग्रजी मध्ये वाचणार असाल मला परमहंस योगानंद (autobiography ऑफ अ योगी फेम ) ह्यांचे भाषांतर खूप आवडले होते.

गीता वाचणारच असाल तर श्लोक, त्याचा अर्थ इतपतच वाचून स्वतः त्याचा अन्वयार्थ, स्वतःच्या अनुभवातून लावायचा प्रयत्न करावा. बाकी कुणाचीही कॉमेंट्री (भाष्य) हा त्या त्या व्यक्तीच्या अनुभवविश्र्वाशी निगडीत अन्वयार्थ असतो, जो आपल्याला लागू पडेलच असं नाही. बाकी गीतेवरची एक-दोन श्लोक घेऊन त्यावर तास तास चालणारी लेक्चर्स ही बहुदा दुकानं असतात. उगाच ‘इथे कृष्णानं अर्जुनाला अर्जुन न म्हणता पार्थ का म्हटलं असेल? कारण पार्थ मधला प म्हणजे...’ छापाच्या व्याख्यानांपासून शक्यतो दूर रहावं. एखादा भाग पटला नाही तर प्रामाणिकपणे तसं स्वतःशी कबूल करावं. गीतेत सांगितलय म्हणून ते वाट्टेल त्या लॉजिक ने स्वतःला पटवून घ्यायचा प्रयत्न करू नये. त्यातून कन्फ्युजन वाढतं आणी एक तर तुम्ही ब्लाईंड फॉलोअर बनता किंवा त्यापासून दूर जाता. गुड लक!!

फे फ , अगदी अगदी . गीता हा एक अनुभवांचा आणि उपदेशाचा अवाढव्य ( श्लोकसंख्या कमी असली तरी अर्थ ठासून भरला आहे म्हणून ) ल सा वि आहे. प्रत्येकाला लागू पडणारा उपदेश आणि अनुभव त्यात आहेच शिवाय बरेच काही स्वत: ला गैरलागू आहे असे वाटू शकेल. ह्याचे कारण तो एक महासमन्वय आहे. ज्याला जे पटते, भावते, ते त्याने घ्यावे.

फेरफटका +१
माझ्या अनुभवात काश्मीरची त्रिक-शैव परंपरा ज्यांनी सर्वार्थाने फुलवली त्या अभिनवगुप्ताचे गीतार्थ संग्रह हे गीतेवरील भाष्य सर्वोत्तम आहे.
ज्यांना अभिनवगुप्त कोण हे माहित नसेल तर - https://en.wikipedia.org/wiki/Abhinavagupta

ह्यांच्या ग्रंथसंपदेचा पुर्ण अभ्यास करायला एक जन्मसुद्धा कमी आहे. तरी मुळातून ज्यांना तंत्र शास्त्राचा तात्विक आणि प्रायोगिक अभ्यास करायचा असेल तर आधी ह्यांच्या "तंत्रलोक" ह्या खंडात्मक कृतीपासून सुरु करावा. तेवढा वेळ नसेल तर ह्या कृतीचे सार म्हणून "तन्त्रसार" ही कृती उपलब्ध आहे. (इथे तंत्र म्हणजे नेहमी डोळ्यापुढे येणारे तंत्रमन्त्र नाही). चौखंबा कडून ह्यांचे वरील ग्रन्थ प्रकाशित झाले आहेत.

गीता हा असा ग्रंथ आहे की जवळपास सर्वच पंथ आणि संप्रदायाच्या संतांनी आणि महानुभावांनी त्यावर भाष्य केले आहे. माझ्या मते तुम्ही जर एखाद्या गुरु कडून अनुग्रह घेतला असेल तर त्यांनी किंवा त्या संप्रदायात बाकी गुरूंनी लिहिलेली गीता वाचणे सर्वात उत्तम. नसल्यास ज्ञानेश्वरी पासून सुरुवात करावी. ब्रह्मसूत्राप्रमाणे गीता देखील अनेक अंगानी उलगडून दाखवता येते त्यामुळे साधनामार्गात तुम्हाला जो मार्ग सर्वात जवळचा वाटतो किंवा ज्या मार्गावरून तुम्ही चालत आहात त्या अनुषंगाने लिहिलेली टीका वाचणे जास्त श्रेयस्कर.

नसल्यास ज्ञानेश्वरी पासून सुरुवात करावी.>> छान सल्ला.

मी खूपदा श्रीमद्भगवद्गीता वाचायचा प्रयत्न केलाय पण माहित नाही का जास्त वेळ concentrate करताच येत नव्हतं.

माझा स्वतः चा गीतेबद्दलचा अनुभव असाच काहीसा आहे.सौदी आरामको मध्ये असताना गीतेबद्दल विशेष ज्ञान झाले.प्रत्येक technician ला एक सर्टिफिकेशन घ्यावे लागते.अचानक सूचना देऊन परीक्षेसाठी बोलावले.एक लहान पुस्तिका देऊन ती अर्धा तास वाचायची आणि लगेच परीक्षा,25 प्रश्न आणि प्रत्येकी 4 मार्क आणि 80 ला पास! चडफडत परीक्षा दिली आणि थेट पर्यवेक्षकाला जाऊन भेटलो आणि ही कुठली पद्धत म्हणून विचारले,त्यांनी सांगितले की कुठल्याशा अमेरिकन युनिव्हर्सिटी ने संशोधन करून त्यांच्या असे लक्षात आले की जर तुमचे पूर्ण लक्ष्य अभ्यासात असेल 80 टक्के लक्षात राहून तुम्ही पास व्हाल. खोलीत परत आल्यावर श्रीधर आचार्य म्हणून माझा मित्र होता त्याला गीतेतील एक अर्धवट माहीत असलेला श्लोक सांगितला की त्याचा शेवट दैवम पंचमम असा आहे तर तुला पूर्ण माहीत आहे का? त्याने मराठी गीताच हातात काढून दिली(हे अत्यंत दुर्मिळ आहे,कुठलेही धार्मिक पुस्तक कुराण सोडून, तेथे आणण्यास परवानगी नाही)
अधिष्ठानम तथा कर्ता करणम चा पृथगविधम
विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम
(Project,the person,different resources,different actions{to be taken by that person} comes to 80%and 100%success depends only on 20 %luck)
जे आपल्या पूर्वजांना काही हजार वर्षे पूर्वी माहीत होते ते अमेरिकन युनिव्हर्सिटी ने काही लाख डॉलर्स खर्च करून शोधले आणि मला सौदी अरेबियात शिकवले, आता बोला ☺️☺️

प्रज्ञा, असं म्हणतात की गीतेचं सार हे कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका हे आहे.
तुलाही असंच वाटल का आफ्टर रिडींग गीता?

सुंदर लेख...नंतर वाचू म्हणत म्हणत आत्ता वाचला शेवटी..आवडला. रामायणात सुद्धा हेच सांगितलंय की कर्म करणे फक्त माणसाच्या हाती आहे. त्याची फळे यथावकाश मिळतातच.

मला वाटते गीतेमध्ये अनेक ' योग' सांगितले आहेत. ज्ञानयोग, सांख्ययोग, भक्तियोग, कर्मयोग वगैरे. योग म्हणजे
' युक्त' असण्याची क्रिया. युक्त म्हणजे जुळलेले, जोडलेले असणे. मग हे जुळणे ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे भगवंताशी असो, निर्गुण ब्रह्मतत्त्वाशी असो, प्रकृतीशी असो, आसमंताशी किंवा भवतालाशी असो. एकरूपतेतून येणारी ही स्थिरता अनेक मार्गांनी मिळवता येते. अमुकच मार्ग पाहिजे असे नाही. आपापल्या कुवतीनुसार आपला मार्ग आपण निवडावा. उद्धरेत् आत्मानं आत्मा हे सुप्रसिद्धच आहे. मग षड्रिपूंवर विजय मिळवा, देहबुद्धी सत्कर्मात गुंतवा, ध्यान करा इत्यादि. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास, ( कर्मयोग ही आहेच!)आत्मसंयम असे अनेक उपाय किंवा मार्ग सुचवले आहेत. तेव्हा एका वाक्यात सार सांगता येणार नाही, कारण हा उपदेश अथवा सल्ला भिन्न प्रकृतींच्या, भिन्न स्तरांवरच्या, भिन्न वयोगटातल्या माणसांनी बनलेल्या समाजासाठी आहे. अर्जुन हे निमित्त्य. इथे अनेक विरोधी भासणारे श्लोक आहेत, (खुद्द अर्जुनच तसे म्हणतो!) पुढे वादग्रस्त ठरलेली किंवा यापुढे वादग्रस्त ठरू शकतील अशी उक्ते आहेत. यात काळाचा पटही समाविष्ट केला पाहिजे. जेव्हा समाजव्यवस्था उदयोन्मुख असते, किंवा जेव्हा ती प्रगतीच्या शिखरावर असते अथवा जेव्हा ऱ्हास पावत असते तेव्हा हे मार्ग बदलू शकतात. एकच एक उपाय सर्वकाळी, सर्वस्थळी लागू पडेल असे नाही.
तेव्हा अमुक एक वाक्य खोटे आहे, कालविसंगत आहे म्हणून संपूर्ण गीता चुकीची आहे असे नाही.
एकरूपतेतून स्थिरता येते, चित्तशुद्धी होते, कार्यकारणभाव कळू लागतो, सद् असद् कळते, कर्तव्ये कळतात, योग्य काय ते स्पष्ट दिसू लागते, एकंदर जीवन मार्ग सुरळीत होऊन आयुष्य सार्थकी लागते, नौका पैलतिराला लागते, बेडा पार होतो. प्रत्येकाने यातला हवा तो इत्यर्थ उचलावा.
ह्यावर खूप आणि विस्तृत लिहिता येईल, पण ते पुन्हा केव्हातरी. आता इतकेच.

कर्म करणे फक्त माणसाच्या हाती आहे. त्याची फळे यथावकाश मिळतातच.>>हो अगदीच.. खरंतर माझा आता कर्म सिद्धांतावरच जास्ती विश्वास बसत चाल्लाय.. आयुष्यातले अनेक कडू गोड अनुभव घेतल्यावर मला कर्म सिद्धांतच योग्य आहे असे वाटू लागले आहे...
पण तो आचरणात आणणे तितकेच कठीण..

कर्मसिद्धांत हा शब्द थोड्या वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपण सोप्या भाषेत कर्मविषयक नियम असे म्हणू शकतो. जसे कर्म तसे फळ, पूर्वकर्म हे आपले पूर्व(संचित), प्राप्तकर्म हे भविष्य, ह्या जन्मातल्या कर्मावरून पुढचा जन्म ठरतो, जैसी करनी वैसी भुगतनी ह्या प्रकारची विचारसरणी म्हणजे कर्मसिद्धांत. " मना त्वांचि जे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले " नेमके सांगितलेय समर्थांनी.
गीतेचा रोख किंचित वेगळा आहे. कोणत्या किंवा कशा तऱ्हेच्या कर्माने भगवंताशी युक्त होता येईल, अशी ती चिकित्सा आहे.

खूप खूप धन्यवाद swaapnil , radhanisha, आदिश्री, सूर्यगंगा , वेडोबा , me _rucha _/\_
@ me_rucha_:- आपले सर्वांचे अनुभव तर हेच सांगतील की फक्त कर्म करणे आपल्या हातात आहे. मग frustration टाळायला त्याच्या फळाची अपेक्षा रामभरोसे करून टाकली की आपलं मन शांत होतं असं मला वाटतं.
@हीरा काय सुरेख सार मांडलं आहे तुम्ही .. जियो !

सुंदर लेख. ज्ञान देणारा, मोटीवेशन स्पीच वगैरे स्टाईल मध्ये नसल्याने मनापासून आवडला. जसकाही कुणी आपल्यासमोर बोलतंय आणि गप्पा मारताना सांगतंय असं वाटलं.
माझं एक मत -
आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ असतात, पण त्याचा अवलंब कसा करावा हे आपल्याला कळत नाही. मग अशावेळी आपल्या परंपरांनी लिहून ठेवलेलं साहित्य आपण वाचतो, आणि त्यातील काही दृष्टांतानी आपल्याकडे असलेलं उत्तर कसं वापरावं हे कळत. मग ते भगवद्गीता असो, अथवा दासबोध, अथवा तुकाराम गाथा.
उदा. जर कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक आणीबाणीशी लढायचं असेल, तर
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी!
अर्थात पैसा कमवा, मात्र तो जपून वापरा. उदासीनतेने खर्च करा!
आपल्याला हे माहिती आहे, पण आता गाथेत सांगितले तर नीट implement करता येईल.

हिरा, सखोल विश्लेषण.
तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे संपूर्ण गीतेचं विश्लेषण एका वाक्यात करण चुकीचं ठरेलं.
गीतेमध्ये एवढ्या सगळ्या विषयांवर विविध अंगांनी बरंच काही सांगितलं आहे हे तुमच्यामुळे कळाले.
कदाचित सामान्यातल्या सामान्य माणसाला "गीतेमध्ये सांगितलंय तरी काय "ह्या प्रश्नच उत्तर कळावं म्हणून "कर्मण्ये वाधी कारस्ते मा फलेषु कदाचन "असा एक साधं उत्तर दिलेलं असेल.
पण गीता म्हणजे फक्त तेच असे नाही.
तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

धन्यवाद अज्ञातवासी.
अवांतर :
आपण सर्वच आपापल्या परीने ह्या अगाध आयुष्याचा थांग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाच्या हाती काही लागतं तर कुणाच्या हाती काही.
माझ्या सारख्या अल्पमती आणि दुबळ्या व्यक्तीला नेहमी "कुणीतरी म्हटलंय .." चा आधार लागतो . मग तो "कर्मण्ये वाधिकारस्ते" म्हणणारा भगवान श्री कृष्ण असो, अथवा "स्टे हंगरी स्टे फूलीश " म्हणणारा स्टीव जॉब्स किंवा अगदी "बी स्टुपिड" म्हणणारा वीर दास सुद्धा
आम्ही दुसऱ्यांनी म्हटलेलं ऐकत जगणारे आणि मरणारे बेंबट्या जोशयांचे वंशज आहोत हे खरं ! Happy

Jpradnya, आपला लेख उत्कृष्ट होता. गीता हे खरोखरीचंच एक टूल किट आहे. D I Y प्रकारचं किंवा आज्जीबाईचा बटवा प्रकारचं. कितीतरी नुस्खे, कितीतरी फॉर्म्युले. ज्या सिटुएशनला जे फिट होईल ते वापरायचं. अर्थात हे सुलभीकरण. याहूनही अधिक बरंच काही गीतेत आहे हे तर उघड आहे. मला अठरावा अध्यायही आवडतो. ती एक अवतरणिकाच आहे. कृष्ण म्हणतो, 'इतकं सगळं सांगूनही जर तुला समजलं नसेल किंवा ते आचरणात आणायला जमणार नसेल तर तू माझं स्मरण कर. बाकी सर्व मार्ग, पद्धती (धर्म) सोडून दे, मजजवळ ये, मामेकं शरणं व्रज. मन्मना भव. तुझं मनच माझ्याकडे, माझ्या मनात ठेव. '
अर्थात इथे 'मी' म्हणजे देहधारी श्रीकृष्ण नव्हे. ज्याने आपल्यात विश्वरूप सामावलेलं अर्जुनाला दाखवलं ते परमतत्त्व.
सांख्य, ज्ञान, कर्म, कर्मफल त्याग, संन्यास ह्या सर्व मार्गांचे विवरण करून अखेर कृष्ण सहजसाध्य अशा भक्ती वर येऊन थांबतो. भक्ती म्हणजे अर्थातच टाळकुटेपणा नव्हे. विभक्त नव्हे तो भक्त. ज्याची बुद्धी स्थिर आहे, मोह क्रोधादि विकारांपासून जो मुक्त आहे, तोच त्या परमतत्वाशी एकरूप पावू शकतो. स्मरणध्यान करता करता लिप्त राहूनही अलिप्त अशी ' कमलपत्रं इवांभसि' अवस्था येते आणि प्रपंच परमार्थ दोन्ही साधतात. अशा स्थिर आणि समबुद्धीमुळे कर्माविषयीचे निर्णय घेणे सोपे होते. निर्णयक्षमता वाढते. योग्य आकलनाने परिस्थिती जोखता येते आणि योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढते. द्रष्टेपणा येतो. हे मानवाचे म्हणजे आपले स्वत:चे उद्धरण आहे, उन्नयनीकरण आहे. आणि गीतेला अथवा गीतेतून तेच साधायचे आहे.
असो. आपल्या लेखामुळे हे सर्व मनातले विचार कागदावर आणण्याची संधी मिळाली. ( नाहीतर एव्हढे लांबलचक प्रतिसाद केव्हा आणि कशाला लिहिले असते! Happy )

पुनः शच एकवार अत्यंत अभ्यासपूर्ण अभिप्राय @हीरा
लेखापेक्षा प्रतिक्रिया अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाल्या आहेत

Pages