वेस्टर्नपट हा आमचा वीकपॉईंट. वेळ मिळाला की मिळतील ते वेस्टर्नपट पाहाणे हा उद्योग. सर्वच चित्रपट दर्जेदार असतात असे नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रेमात असता तेव्हा वाईटातही काहीतरी चांगले शोधण्याची तुमची प्रवृत्ती होऊन जाते. त्यामुळे मी कुठलाही वेस्टर्नपट पाहिला तरी मला मजाच येते. काहीन काहीतरी चांगलं सापडतं. मूळातच त्या डोंगरदर्या, ते धूळीने भरलेले रस्ते, त्यावर दौड करणारे ते खास रापलेल्या चेहर्याचे घोडेस्वार, त्यांच्या बंदुका, गन फाईटसमध्ये झटक्यात बाहेर येणारी पिस्तुलं, ते टिपिकल सलून्स, त्यातल्या त्या नाचणार्या मदनिका, बारटेंडर्स, तेथे चालणारा जुगार, त्यावर होणार्या मारामार्या, दिली जाणारी आव्हाने, त्यात पडणारे मुडदे, त्यानंतर येणारा टाऊन शेरीफ, छोटी छोटी टाऊन्स हे सारं अगदी वेगळं आणि आकर्षक जग आहे. हे जितकं बारकाईने दाखवलं जाईल तितका चित्रपट अधिक परिणामकारक होतो असा माझा अनुभव आहे. आणि वेस्टर्नपटातील बारकावा म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सर्जिओ लियॉनी.
काही माणसे अगदी मोजके चित्रपट करून अजरामर होऊन जातात. सर्जियो लियॉनी हे त्यातलेच एक नाव. (चार पूर्ण चित्रपट आणि पाचव्या चित्रपटाची वीस मिनिटाची फाईट चित्रित करून अमर झालेला ब्रूस ली हे चटकन आठवणारे आणखी एक नाव ) सर्जियो लियॉनीच्या नावावर फार तर सहा सात चित्रपट असतील. पण नुसत्या वेस्टर्नच नाही तर जागतिक सिनेमाचा आढावा घेण्यास कुणी बसले तर पहिल्या चार दोन पानात सर्जियो लियॉनी हे नाव घ्यावं लागेल अशी माझी नम्र समजूत आहे. लिऑनीच्या चार चित्रपटांवर लिहिण्याचा विचार आहे.पहिला "फिस्टफूल ऑफ डॉलर्स", दुसरा "फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर", तिसरा "द गुड, द बॅड, अँड द अग्ली" आणि चौथा अर्थात "वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट". क्रमाने खरं तर "फिस्टफूल ऑफ डॉलर्स" घ्यायला हवा. सुरुवातीलाच "द गुड, द बॅड, अँड द अग्ली" घेण्याला काही तर्कशुद्ध कारण नाही. मनाचा कल आणि आवड हेच एकमेव कारण आहे. या चित्रपटाची लोकप्रियता अफाट आहे. जी मंडळी हॉलिवूड चित्रपट पाहतात त्या बहुतेकांना या चित्रपटाचे नाव माहित असते. वेस्टर्नपट म्हटला की अनेकांना तर पहिला हाच चित्रपट आठवतो. आजही या चित्रपटाची लोकप्रियता ओसरलेली नाही. किंबहूना हा चित्रपट एक दंतकथा बनला आहे.
अशा चित्रपटावर लिहायचं तर एका लेखात लिहिणे माझ्यासारख्या सविस्तर लिहायची सवय असणार्याला शक्यच होणार नाही. दुसरे म्हणजे या चित्रपटाचा आवाका फार मोठा आहे. मुख्य कथेत अनेक छोटी उपकथानके आहेत. या सार्याचा धांडोळा घ्यायचा आहे. लियॉनीच्या चित्रपटात एकही फ्रेम वाया गेलेली नसते. त्याचा विचार लिहिताना करावा लागेल. या दिग्दर्शकाला टाईट क्लोजप्स वापरण्याची सवय आहे. त्यासाठी त्याने निवडलेले चेहरेही खास असतात. या क्लोजअप्सबद्दल आणि त्यासाठी निवडलेल्या माणसांबद्दलही लिहावे लागेल. लियॉनीच्या चित्रपटांमध्ये लोकेशन्स ही त्या चित्रपटातील जणू पात्रंच असतात. या लोकेशन्समुळे कथेला कसे परिमाण लाभले ते पाहणे आवश्यक ठरेल. त्यानंतर प्रमुख पात्रांबद्दल लिहिणे आलेच. त्याबरोबरच इतर पात्रांच्याबाबतही विचार करावाच लागेल. कारण ही काही क्षणांसाठी आलेली माणसेही सर्जियोच्या चित्रपटात दृश्याचा परिणाम गडद करून जातात असे दिसते. लियॉनिच्या चित्रपटातील पार्श्वसंगीत हा तर संशोधनाचाच विषय आहे.
आज कित्येक वर्षे या चित्रपटातील ट्युन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लियॉनीच्या चित्रपटांमध्ये पात्राच्या स्वभावागणिक काही ठिकाणी वेगळे संगीत वापरले जाते. याही चित्रपटात काही दृश्यांमध्ये ही किमया केली आहे. सर्जियोच्या चित्रपटांमध्ये अतिशय संथ असे सीन्स असतात. काहीवेळा संवादाशिवायच अनेक मिनिटे जातात. अशावेळी त्या दृश्यांमध्ये नैसर्गिक आवाज वापरले जातात. या संथपणे चालणार्या घटना पुढे येणार्या वादळांची चाहुलच असते. अशावेळी वातावरणातला ताण वाढवत नेत चरम सीमा गाठत एकदम स्फोट करण्याची लियॉनीची पद्धत आहे. या सार्यात त्याविशिष्ट पार्श्वसंगीताचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. तेव्हा या दृश्यांसोबतच संगीतावर लिहावे लागेल. अशा अनेक बारकाव्यांबद्दल लिहिण्याचा मानस आहे. सर्जियोचे चित्रपट म्हणजे मेजवानी.पण मनोरंजनाबरोबरच एक प्रकारचे तत्वज्ञानही हा दिग्दर्शक आपल्या चित्रपटांत मांडतो. ते टाळून पुढे जाता येणार नाही.थोडक्यात या चित्रपटांचा आढावा घेताना आपण या चित्रपटांमधील कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा मागोवा घेत प्रवास करणार आहोत.
(क्रमशः)
अतुल ठाकुर
प्रतीक्षेत!
प्रतीक्षेत!
सध्यातरी एवढंच लिहितो!
ही ट्यून माझी रिंगटोन आहे.
ही ट्यून माझी रिंगटोन आहे. चित्रपट 4,6 महिन्यात एकदातरी पाहून होतोच. The बेस्ट!
Btw इथं एक वेस्टर्नपटांवर मालिका लिहिणार होतं कोणीतरी..
मीच. आता लिहेन.
मीच. आता लिहेन.
अच्छा, तुम्हीच का.. नक्की
अच्छा, तुम्हीच का.. नक्की लिहा, वाट बघतोय. त्या मालिकेचा पहिला (आणि एकमेव
) भाग खूप छान लिहिला होता तुम्ही.
दरवेळी पाहताना या चित्रपटाचे
दरवेळी पाहताना या चित्रपटाचे नवनवीन पैलू समोर येत असतात..
माझा आवडता सीन एक नाव शोधण्यासाठी कब्रस्तानात धावण्याचा आहे. काय cinematography, camera work आणि संगीत....!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
मी वेस्टर्न चित्रपटांच्या
मी वेस्टर्न चित्रपटांच्या गाजलेल्या संगीतकाराबद्दल, एनिओ मॉरिकॉनेबद्दल, इथे लिहीलं होतं पूर्वी: https://www.maayboli.com/node/32057
वेस्टर्नस'चं असं एक खास आगळं
वेस्टर्नस'चं असं एक खास आगळं जग आहे. एकदां का त्याची ओळख झाली कीं पुन्हा पुन्हा त्या जगात फेरी मारावीशी वाटतेच ! अगदीं परवांच ' द गुड द बॅड..' अचानक ' वेस्टर्न क्लासिकस' चॅनेलवर पुन्हा ( कित्व्यांदा कल्पना नाही ) पाहिला. आतां परत तपशीलवार पुन: प्रत्यय व रसग्रहण !! छान !!!
धन्यवाद
धन्यवाद
या चित्रपटातलं ब्लाँडि आणि
या चित्रपटातलं ब्लाँडि आणि टुकोचं नातं विलक्षण आहे. टुको एक नंबरचा "कमिना" तर ब्लाँडि शब्दाला जागणारा (एक-दोन प्रसंगी नरो वा कुंजरोवा
), पण दगेबाज नाहि. मला तर वाटायचं कि सलिम-जावेद यांनी वीरु-जय हे दोन नमुने टुको-ब्लाँडि यांच्यावर आधारले (६०%) असावेत. टुको वाचाळ, उच्छृंखल तर जय मीतभाषी आणि मैत्री जपणारा...
सर्जियो लियोनी या इटालियन डायरेक्टरने एकाहुन एक सरस असे वेस्टर्न क्लासिक्स दिले हि अद्भुत बाब आहे. त्याला इंग्रजी अजिबात येत न्हवतं हे वाचुन तर आदर दुणावला. त्याची गादि आता एक दुसरा इटालियन, क्वेंटिन टेरंटिनो चालवतो आहे हे एक समाधान...
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. तुम्ही जसं म्हणाला तस , Sergio Leoni ची प्रत्येक फ्रेम बोलते. काही वेळेला फक्त ती फ्रेमच काही seconds असते, actors नसतातच. त्यावर वाचायला आवडेल. आणि ह्या सगळ्या pictures मधला एक एक scene खुप लांब लचक आहे, तसेच क्वेंटिन टेरंटिनो च्या pictures मध्ये असते
Chan lihilay...pudhcha bhag
Chan lihilay...pudhcha bhag yeu dya..