मला एक खोड आहे. म्हणजे तशा बऱ्याच खोड्या आहेत, पण हि एक वेगळी. मला कुठलंही गाणं ऐकलं कि त्याची मोडतोड करायची ईच्छा होते. चांगल गाणं घ्यायचं आणि त्याची पार वाट लावायची किंवा हिंदीतलं गाणं मराठीत बसवायचं. आत्तापर्यंत एका गाण्याने मात्र माझा नक्षा पार उतरवलाय, ते कोणतं ते पुढं सांगतो. आधी मी गाण्याची मोडतोड कशी करतो ते सांगतो.
आता हे सुंदर गाणं घ्या "सखी मंद झाल्या तारका , आता तरी येशील का ?" बाबूजींनी मस्त गायलंय. पण त्याच सुरात ( बाबूजींच्या नाही हो, ते कसं जमेल ? आपण बाबूजींच्या सुरात गातोय असं समजून गायचं ) मी काय म्हणतो, "सखी खुप खाल्ल्यास खारका, आता तरी थांबशील का ?"
दुसरं सुंदर गाणं "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते ". सुमनताईंचे सुंदर गाणे आहे. मी काय म्हणतो "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट लावते , वाट लावते ", कळलं नाही तर परत वाचा.
"राजा ललकारी अशी दे" या गाण्यातच इतक्या जागा आहेत ना , फक्त त्याच सुरात गा आणि पुढच्या ओळी म्हणा :
"कुंकवाचा माझा धनी, त्यानं केली वेणी फणी "
"माझ्या सजनाला मिशी दे ", वगैरे वगैरे
आणखी काही उदाहरणे (अट म्हणजे त्याच सुरात गायचं)
"सागर किनारे, बैठे है सारे.
टमरेल नही है तो कोई गम नही है" (कारण समुद्र आहे जवळ ),
"आप जैसा कोई मेरे जिंदगी मी आये तो बाप बन जाये "
"टिक टिक वाजते डोक्यात , गडबड होते पोटात "
आणि सगळ्यात शेवटी म्हणजे "मेरे रंग मे रंगने वाली " च मराठी version
माझ्या रंगात रंगणारी,
परी आहेस का पऱ्यांची राणी
का तु माझी प्रेम कहाणी
माझ्या प्रश्नाचे उत्तर दे , दे ना !!
अशी मी अनेक गाण्यांची मोडतोड करतो. घरातली माणसे वैतागलीत कारण माझे शब्द एवढे प्रभावी असतात ना कि त्यांच्या तेच लक्षात राहतात. "कुंकुवाचा माझा धनी" म्हणल्यावर पुढे "त्याने केली वेणी फणी" हेच म्हणावे वाटते.
माझ्या बायकोला गाणे गुणगुणायची हौस आहे. एकदा माझ्या बायकोचे वडील घरी आले होते आणि जेवत होते, आणि माझी बायको गाणे गात होती, अर्थात माझे version
हि गुलाबी हवा !
पाहिजे तेवढं खावा !!
नशीब, माझे नातेवाईत खात नव्हते.
पण मी सुरुवातीला जसं म्हणलं तस एका गाण्यानं माझी मस्ती पार उतरवलीय , त्याची मला काहीच मोडतोड करता येत नाही, हिंदीतून मराठी पण करता येत नाही, शब्द फिरवता येत नाहीत. मी किती महिने प्रयत्न करतोय. ते गाणं म्हणजे
जिहाल -ए-मस्किन मकून बारंजीश !
बहाल-ए-हिज्र बेचारा दिल है !!
गुलामी मधलं गाणं आहे हे. त्याची मनासारखी काहीच मोडतोड होत नाहीये. "जिला आहे मिशी" इथपर्यंतच जमतंय, पुढं नाही.
तुम्ही प्रयत्न करणार का या गाण्याची वाट लावायची ?