मी अभिजित. आमच्या कंपनीचा न्यूयॉर्कमधील प्रोग्राम डायरेक्टर! आमची मल्टीनॅशनल कंपनी ट्रीरुट्स सर्व्हीसेस ही बँकिंग सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी!
न्यूयॉर्कमधील एका उंच व्यापारी इमारतीतल्या छत्तीसाव्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर मी बसलो होतो आणि समोर लॅपटॉपवर एक ईमेल आलेला होता. त्याकडे बघत विचारांत गढलो होतो.
त्यातील सत्तावीस नावे मी पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि त्यातील नऊ नंबरचे नाव बघून अस्वस्थ होत होतो. खुर्चीवरून उठून मी उभा राहिलो आणि काचेच्या खिडक्यांतून बाहेर पाहू लागलो.
आज मला कसलीच कमतरता नव्हती. माझी एक मुलगी विशाखा अमेरिकेतच प्रोफेसर आणि दुसरी अजून शिकत होती! माझी पत्नी अनिता एका ऑडीट कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर!
मॅनहॅटनमध्ये पार्क अव्हेन्यू सारख्या भागात आमचे तीन बेडरूमचे घर! आणि त्यात भर म्हणून सध्याच्या जॉबमध्ये आणखी पदोन्नतीची शक्यता होती! ती पदोन्नती या आलेल्या ईमेलवर अवलंबून होती.
पण पदोन्नती मिळायची असेल तर या ईमेलमुळे आता मला एक निर्णय घ्यावा लागणार होता आणि आलेल्या ईमेलला कंपनीला अपेक्षित असा एक रिप्लाय देणे आवश्यक होते...
पण ...
पण त्याऐवजी मी खिडकीतून न्यूयॉर्कमधील उत्तुंग इमारतींकडे बघत उभ्या उभ्या मनाशी अतिशय वेगळाच निर्णय घेऊन टाकला.
त्या निर्णयाची अंमलबजावणी आताच करायची असा निश्चय करून वेगाने मी पुन्हा माझ्या खुर्चीवर येऊन बसलो, झपाटल्यासारखा लॅपटॉप पुढे ओढला आणि एक नवीन ईमेल लिहिण्यासाठी विंडो ओपन केली आणि टाईप करू लागलो.
कशाबद्दल होता तो नवा ईमेल? मी असा कोणता वेगळा निर्णय घेतला? ते सांगण्याआधी अनेक वर्षांपूर्वी काय घडले ते मला सांगावे लागेल!
* * *
अभियांत्रिकीला मी चारही वर्षे हॉस्टेलमध्ये राहिलो. हॉस्टेलवर आमचा सहा जणांचा एक असा ग्रुप होता जो पुस्तकातला कोणताही मुद्दा संपूर्णपणे समजून घेण्यावर विश्वास ठेवत असे. त्यामागचे लॉजिक समजून घेण्यात आमचा विश्वास असायचा. आमच्यापैकी कुणीही कधीही पाठांतर केले नाही.
आमचा एक विषय असा होता की ते शिकवायला कॉलेजमध्ये चांगले प्राध्यापक नव्हते. एक आले पण ते एकच महिना टिकले. काही काळ कुणीही प्राध्यापक नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आम्हाला तो विषय नीट समजलाच नाही. त्यावेळेस ऑनलाईन शिकायला गुगल, इंटरनेट, युट्यूब हे सगळं नव्हतं. पण आमच्या ग्रुपमधला किशोर हा लायब्ररीमध्ये जाऊन वेगवेगळ्या लेखकांची अनेक पुस्तकं दिवस-रात्र वाचून ते मुद्दे स्वतः समजून घ्यायचा, त्याच्या नोट्स काढायचा आणि मग नंतर सोपे करून सगळ्यांना सांगायचा. काही जण तर किशोरने काढलेल्या नोट्सच्या झेरॉक्स करून फक्त त्यातूनच पास व्यायचे, इतर कोणतीही पुस्तके न वाचता! किशोरलाही सगळ्यांना मदत करायला आवडत असे.
तर त्या "धड शिक्षक न लाभलेल्या आणि बरेचसे कन्सेप्ट नीट क्लियर न झालेल्या" विषयाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री मला प्रचंड टेन्शन आले होते. मला पेपर द्यायची इच्छाच होत नव्हती. मी आणि किशोर मिळून त्या विषयाची भरपूर संदर्भ पुस्तके वाचून संशोधन केलेले होते, आम्हाला जेही समजले ते अनेकांनाही आम्ही समजावून सांगितलेले होते.
पण...
पण आयत्या वेळी हॉस्टेलवरील काही जणांनी मागच्या दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका माझ्यासमोर अचानकपणे ठेवल्या!
अत्यंत कठीण होत्या त्या! ते बघून आम्ही पास होणे तर सोडाच पण वीस ते पंचवीस मार्कसुद्धा मिळवू शकू की नाही अशी मला शंका यायला लागली.
ते जुने पेपर घेऊन मी तडक किशोरच्या रूमकडे निघालो आणि त्याचा टेबलवर सगळे पेपर आदळले. त्याने चमकून वर पहिले.
मी म्हणालो, "यार, मला नाही वाटत मी उद्या पेपर देऊ शकेल. हे बघ मागच्या वर्षीचे काही पेपर!"
किशोरने पेपर वरवर बघितले. चाळले!!
मग चेहऱ्यावरची शांती ढळू न देता तो म्हणाला, "हा यार! पेपर खूप कठीण आहेत खरे! पण या वर्षीसुद्धा असाच कठीण पेपर येईल असेही नाही!"
मी त्यातील दोन पेपर डोळ्यासमोर नाचवून पुन्हा आदळले आणि म्हणालो, "अरे बघ, या दहा पेपर पैकी फक्त हे दोनच पेपर सोपे आहेत! सोपे म्हणजे फक्त पास होण्यापुरते!"
"अरे टेन्शन नको घेऊस! यावेळेस शंभर टक्के सोपा पेपर येणार बघ!"
"नाही रे! मला तर वाटतंय हा विषय सोडून द्यावा! पुढच्या वर्षी आणखी नीट अभ्यास करून मग पेपर द्यावा आणि चांगला स्कोअर मिळवावा! तेव्हा कदाचित एखादा चांगला शिक्षक शिकवायला आलाच तर त्या बॅचकडून आपल्याला न समजलेला भाग समजून घेता येईल!!"
"अरे मित्रा, परीक्षा टाळण्याचा विचारही करू नकोस! एकदा का अशी सवय लागली ना की तीच कायम राहते. आता जेवढा वेळ हातात आहे तेवढा वेळ आपण अभ्यास करूया. आपल्याला जेवढे येते, जेवढे समजले आहे त्याचीच नीट तयारी करून जाऊया! पण पेपर सोडून देण्याचा विचारही मनात आणू नकोस! पहिल्या वर्षाचे विषय शक्यतो पहिल्या वर्षीच निघाले तर चांगले. पहिल्या वर्षाला जर एखादा विषय राहिलाच तर तो पुढे आपला पाठपुरावा करत राहतो अगदी शेवटपर्यंत! भित्यापाठी ब्रह्मराक्षस लागतो ना तसेच! आणखी नवीन विषय जोडीला त्यात येत राहतात! परत करून टाक ते सगळे मागचे पेपर त्यांना! त्या पेपरकडे पाहूही नकोस!"
त्याचे म्हणजे मला सकारात्मक वाटले आणि खूप पटले. मग आम्ही दोघांनी रात्रभर त्याच्या रूमवर दोन वाजेपर्यंत अभ्यास केला. आम्हाला जेवढेही समजले होते ते सर्व आम्ही नीट अभ्यासले! मग हळूहळू डोळ्यांवर झापड यायला लागली आणि झोप लागली!
दुसऱ्या दिवशी प्रचंड दडपणाखाली परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला! आम्ही सर्वजण प्रश्नपत्रिका हातात पडण्याची वाट बघत होतो! ती अखेर मिळाली!!
आणि...
आणि बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले! पेपर प्रचंड सोपा होता! आणि गंमत म्हणजे त्या विषयात मला त्यावर्षी सगळ्यात जास्त मार्क मिळाले, किशोरपेक्षाही जास्त!
इतकेच नाही तर कॉलेजमध्येही मी पहिला आलो. अर्थात किशोरला त्याचे वाईट वाटले नाही, तो मत्सरी नव्हता!
त्यानंतर मी पुढे कधीही कोणता पेपर सोडून देण्याचा विचार केला नाही. समजा या वेळेस हा पेपर मी सोडून दिला असता तर किती पश्चातापाची पाळी आली असती, याचा विचारही करवत नाही! आता सोपा आल्याने कदाचित पुढच्या वेळेस कठीण पेपर आला असता तर? पण मी खूप मोठ्या संकटातून वाचलो. माझ्या "पेपर ने देण्याच्या" निर्णयापासून मला किशोरने परावृत्त केले होते!
* * *
अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला असताना किशोरच्या खासगी आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली! अशा घटना त्याच्या आयुष्यात घडल्या की त्या मी इथे सांगूही शकत नाही! असे कुणाहीसोबत न घडो! ती उलथापालथ इतकी प्रचंड होती की त्याला तीन पेपरच देता आले नाहीत. मला प्रचंड वाईट वाटले, परंतु माझा नाईलाज होता! कारण तो परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी घरी गेला होता आणि तीन-चार पेपर होऊन गेल्यानंतरच होस्टेलवर परतला. ते राहिलेले पेपर त्याने शेवटच्या वर्षी दिले. अर्थात तोही माझ्यासारखा इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासने सुटला, परंतु शेवटच्या वर्षी पुन्हा एक विषय राहून गेल्याने तो त्याने नंतर दिला. याच एका कारणामुळे म्हणजे सलग इंजिनियरिंग न सुटल्यामुळे त्याची कुवत असतांनाही त्याला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी नाकारले. मग तो छोट्या मोठ्या कंपनीत अनुभव घेत राहिला. मध्येच त्याने घरच्या समस्यांमुळे नोकरी सोडली आणि कालांतराने पुन्हा नोकरीच्या शोधार्थ भटकत राहिला.
* * *
दरम्यान अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी इन्फोसॉफ्टमध्ये माझी निवड झाली. माझे संभाषणकौशल्य, आत्मविश्वास आणि ज्ञान हे कारण तर त्यामागे होतेच पण अजून एक कारण होते की मी एकाही वर्षी एकाही विषयात नापास झालेलो नव्हतो. काही मोठ्या कंपन्या फक्त अशाच उमेदवारांना प्राधान्य देतात. नंतर मी किशोरशी संपर्कात होतो पण माझे लग्न, कुटुंब आणि काम यात मी गुंतत गेलो. मग मी अधिक चांगल्या प्रोफाईलसाठी कंपनी बदलली आणि ट्रीरुट्स सर्व्हीसेसला जॉईन झालो. मग कालांतराने माझे तिथे चांगले बस्तान बसले. स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
* * *
काही दिवसांनी मला कळले की एका किचकट स्वरूपाच्या प्रोजेक्टसाठी एनालिस्ट (विश्लेषक) हवा होता जे काम फक्त किशोर करू शकेल हे मला माहित होते. मी किशोरला त्याचा बायोडाटा पाठवायला सांगितले. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. इंटरव्ह्यू घेणारा माझ्या परिचयाचा होता. त्याने आधी त्याच्या शैक्षणिक रेकॉर्डबद्दल थोडी नापसंती दाखवली पण मी हमी घेतली आणि किशोरचे इतर विशेष कौशल्य चांगले असल्याचे सांगितले. किशोर सिलेक्ट झाला. त्याला चांगला पगार आमच्या कंपनीने देऊ केला. त्याने माझे खूप आभार मानले. किशोरसाठी काहीतरी करायला मिळाले याचे मनाला समाधान लाभले. कंपनीलाही किशोरमुळे खूप फायदा झाला कारण त्याने संधीचे सोने केले. नंतर मला कळले की त्याच्या घरच्या समस्या आता बऱ्यापैकी मिटल्या आहेत. नंतर त्याचे लग्न झाले आणि मुले होऊन सुखी संसार सुरु झाला. एकदा कुटुंबासह तो घरीसुद्धा येऊन गेला. कालांतराने मी न्यूयॉर्कमध्ये सेटल झालो.
* * *
बरीच वर्षे निघून गेली. एके दिवशी अचानक ती बातमी आली...
तीन मोठ्या जागतिक बँकांनी एकाच वेळेस दिवाळखोरी जाहीर केली. त्यामुळे त्यावर आधारित उद्योग तसेच त्यात गुंतवणूक करणारे रस्त्यांवर आले. बँकिंग सेक्टरमध्ये मंदीची लाट आली. आयटी कंपन्यांना मिळणारे प्रोजेक्ट कमी झाले. कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण होऊ लागले. आमच्या सीईओनी प्रत्येक विभागांतील एचआरना आदेश दिले की विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पगार असलेल्या लोकांची दरवर्षी यादी करा, त्यांची खरंच कंपनीला किती गरज आहे ते ठरवा, नसेल तर त्यांना घरचा रस्ता दाखवा! आणि दरवर्षी किमान पंचवीस ते तीस जणांना कामावरून कमी करा. त्यांच्या वाट्याचे काम कंपनीत जे शिल्लक कर्मचारी आहेत त्यांना द्या. त्यानी जास्त जबाबदारी घ्यायला नाही म्हटले तर त्यांनाही "परफॉरमन्स घसरला" या नावाखाली घरचा रस्ता दाखवा. यादीतील प्रत्येकाचे अनेक डीटेल्स त्यात होते. एच आर म्हणजे मनुष्यबळ विभाग माझ्या कन्फर्मेशन देणाऱ्या परतीच्या ईमेलची वाट बघत होता.
मला आलेल्या त्या ईमेल मधील निवडक सत्तावीस जणांपैकी नऊ नंबरचे नाव किशोरचे होते!!! अजून त्याला हे माहित नव्हते की त्याला कंपनीतून काढण्यात येणार आहे. मी सहज त्याच्याशी फोनवर बोललो होतो तेव्हा मला कळले की त्याने नुकतेच गृह कर्ज घेतले होते आणि हफ्ते सुरु झाले होते. त्याचा सध्याचा भारतातला प्रोजेक्ट आता माझ्या विभागात येत होता!
त्या ईमेलवर माझे पुष्टीकरण गेले की सगळे सत्तावीस जण कंपनीतून कमी होणार होते. हे एक दुष्टचक्र होते. एक सुपात होता तर दुसरा जात्यात भरडत असतांना दिसत होता. जर मी लोकांना कमी करू शकलो नाही तर माझी नोकरी जाण्याची शक्यता होती. कारण कमीत कमी मनुष्यबळ वापरून जास्तीत जास्त काम करवून घेणे हेच आमच्यासारख्या विभाग प्रमुखांचे कौशल्य होते त्यावरच आमच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यमापन होत होते आणि मी तसे करू शकलो तर मला प्रमोशन मिळणार होते!!
काय करावे? फक्त किशोर वगळून इतर जणांना काढून टाकण्याचे पुष्टीकरण द्यायचे का? नाही! पक्षपात केल्यासारखे झाले असते! किशोर माझ्या रेफरन्सने आला आहे याची नोंद एच आर कडे होतीच! किशोर सारखेच इतरजण सुद्धा चांगले काम करणारे होते. कसेही करून दरवर्षी ठराविक कर्मचारी काढायचेच म्हणजे लेऑफ करायचेच असे धोरण कंपनीने अवलंबले होते आणि त्याला काही इलाज नव्हता!!
मला आता हा खेळ नको होता! आता बास!!
मग मी तो एक निर्णय घेतला!
त्या सर्वजणांना काढून टाकण्याच्या ईमेलला पुष्टी देणारे ईमेल न करता मी एक नवीन ईमेल लिहिला. त्यात मी माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरकडे राजीनामा दिला आणि व्यवसाय करण्याचे ठरवले. व्यवसायाचा भागीदार म्हणून मी किशोरला घ्यायचे ठरवले. किशोरच्या तांत्रिक कौशल्याचा मला पुढे खूप उपयोग होणार होता. इतर जणांच्या लेऑफचा निर्णय जो नवीन प्रमुख येईल तो घेईल! मला आता त्याला कारणीभूत ठरायचे नव्हते! राजीनाम्याचा ईमेल दिल्यानंतरच मग मी पत्नी, मुली आणि किशोर यांना माझा निर्णय सांगितला! किशोरलाही राजीनामा द्यायला सांगितला आणि सगळी व्यवस्था झाल्यावर त्याला कालांतराने न्यूयॉर्कला बोलावून घेतले! बिझिनेसच्या प्लानिंग साठी!
होय बरं! काही निर्णय असे काही क्षणांतच घ्यायचे असतात!!
(कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. सत्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा!)
- निमिष सोनार, पुणे
छान!
छान!
खुप छान कथा
खुप छान कथा