स्वयंघरबंदी

Submitted by Asu on 25 March, 2020 - 00:59

सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नियम पाळा, काळजी घ्या.

स्वयंघरबंदी

हात जोडुनी विनंती मानवा
दृढनिश्चयाचे दर्शन घडवा
करोनासूर करण्यास आडवा
साजरा करू घरीच पाडवा

नववर्षाचे स्वागत करूया
संकल्प करू स्वयंघरबन्दी
जगणेमरणे आपल्या हाती
उपाय केवळ संचारबंदी

गुढी उभारून वंदन करता
जीवनरक्षकां मनात स्मरू
तळहाती शिर घेऊन लढती
या शूरांना निज हृदयी धरू

करोनासूर किती भयंकर!
अंदाज नाही कुणा खरोखर
उंबरठ्याची ही लक्ष्मणरेषा
नका ओलांडू एक क्षणभर

मायावी करी क्षणात हरण
अदृश्य राहून करी संक्रमण
घरात बसणे असे शहाणपण
समोर दिसता करी आक्रमण

जगण्याची शेवटची संधी!
शिस्त नियमांची रे पाळा
किती सांगावे मूढ मानवा
रस्त्यावरती गर्दी टाळा!

तुम्हा सांगतो गर्दी टाळा
पुन्हा सांगतो गर्दी टाळा
गर्दी टाळा, गर्दी टाळा!
आरोग्याचे नियम पाळा

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.25.03.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults