’दुर्दम्य’ - गंगाधर गाडगीळ. राजकारणाच्या विद्यापीठाबद्दल!

Submitted by मुग्धमानसी on 23 March, 2020 - 03:15

'राजकारण' या एकूणच विषयाबद्दल काहीशी नकारात्मक आणि परकेपणाची भावना घेऊन जन्माला आलेल्या आणि बहुतांश आयुष्य़ जगलेल्या एका पिढीत आणि वर्गात आपल्यातील बर्‍याच जणांचा समावेश होतो. आपण ज्यांना खरोखर आदर्श ’नेता’ किंवा ’पुढारी’ म्हणून ओळखत होतो आणि अजूनही ओळखतो ते सारे आपल्या जन्माच्या कैक वर्षे आधीच निवर्तलेले होते किंवा त्यातले थोडके आपल्या बालपणीच संपून गेले. आपल्या पुढे ’राजकारण’ या क्षेत्रातला आदर्श म्हणावे असे खरे पाहता कुणीच हयात स्थितीत नव्हते. आणि एकूणच राजकारण म्हणजे त्यातले डावपेच, चिखलफेक, कुरघोड्या, भ्रष्टाचार, सत्ताकारण, खोटी आश्वासने आणि येन तेन प्रकारेण खुर्चीसाठी चाललेली नीच धडपड आणि या सार्‍यात जनतेची होणारी अपरिहार्य होरपळ.... असेच सारे समीकरण कालांतराने बनून गेले जे दुर्दैवाने आजही अबाधित आहे!

परंतू असे असले तरी राजकारण या विषया बद्दल मनातून अनाहूत ओढ ही असतेच. त्यात प्रत्यक्ष सहभागाऐवजी चार हात लांब राहूनच राजकारणावर टिकटिप्पण्णी, मिमांसा, चर्चा यात हिरीरीने संधी मिळेल तेंव्हा भाग घ्यायचाच असतो असे जणू ठरलेलेच असते. प्रत्येकजण हे करत असतो. त्यातही अहंअहमिका असते. पक्ष घेणे, पक्षपातीपणा करणे, शब्द फिरवणे, स्वार्थ साधणे, निंदा नालस्ती करणे हे सारे त्यात असते. या चर्चांमध्येही एक छुपे राजकारण असतेच. ते त्या चर्चांच्या गाभ्या इतकेच षंढ आणि निद्रीतावस्थेत असते इतकेच. पण तरिही... राजकारण म्हणजे काय हे नक्के कुणालाही समजलेले नसते. चार हात अंतरावर राहून केलेल्या असल्या पोकळ चर्चांतून ते कुणाला कधी उलगडणारही नसते. कुठल्याही संस्थेचे, राष्ट्राचे, देशाचे वा विश्वाचे एकूण कारभार ज्या विषयाच्या सखोल अभ्यासाशिवाय चालणे दुरापास्त आहे असा विषय म्हणजे ’राजकारण’. आणि त्याच्या सर्वांग गूढ अभ्यासाविषयी बरीचशी अनास्थाच असते. किंबहूना आपल्या ’सोवळ्या’ मध्यमवर्गी जगण्याला या विषयाचे काहीसे मलिन जहालपण मानवणारेच नसते.

या विषयाशी माझा इतका गाढ संबंध येणं आणि या विषयाच्या एका निराळ्याच सांगोपांग अर्थाविषयी माझ्या मनात कुतुहल चाळवणे या सार्‍याला निमित्त्य ठरले ते एक पुस्तक - ’दुर्दम्य’!

_________________

लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावर आधारीत ’गंगाधर गाडगीळ’ यांनी लिहीलेल्या या कादंबरीचा नायक जरी ’लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ नामक एक भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासातील अजरामर नेता असला तरी कादंबरीचा मुख्य विषय (आणि नायक) हा ’राजकारण’ हाच आहे! खरंतर टिळक आणि राजकारण हे समानार्थी शब्द म्हणूनही वापरायला हरकत नाही असा माझा ग्रह या पुस्तकाच्या वाचनानंतर झालेला आहे.

राजकारणाचा सखोल अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी तर हे पुस्तक वाचावेच; पण ज्यांना किमान पातळीवर राजकारणात सहभाग घ्यायचा आहे, ज्यांना राजकारणाचा निषेधही समजून उमजून नोंदवायचा आहे; किंवा ज्यांना समोर घडण्यार्‍या राजकारणी खेळाचे नुस्ते एक जाणते उमगते साक्षीदार व्हायचे आहे त्या सर्वांनी... थोडक्यात सगळ्यांनीच आवर्जून वाचले पाहीजे असे हे पुस्तक आहे. जे प्रत्यक्ष सक्रीय राजकारणात सहभागी आहेत आणि जे स्वत:ला जनतेचे पुढारी वा सेवक म्हणून मिरवतात त्यांनी तर हे पुस्तक सक्तीने वाचले पाहिजे शिवाय टिळकांच्या जीवनाचा, त्यांच्या राजकारण विषयक तत्वज्ञानाचा सखोल अभ्यासही केला पाहीजे! अर्थात तेवढेही पुरेसे नाहीच. त्यांची तत्त्वे कालातीत होती हे जाणून घेताना त्यातली मेखही ध्यानात पक्की ठेवणे आवश्यक आहे जी गाडगीळांनी बळवंतराव टिळकांच्याच तोंडी या कादंबरीत लिहीली आहे - "राजकारणात कुठलेच त्रिकालाबाधित नियम नसतात. जे आज केलं त्याच्याविरुद्ध उद्या करावं लागतं. थोडक्यात म्हणजे परिस्थितीनुरूप राजकारणातले पवित्रे बदलावे लागतात." राजकारणात हे असे लवचिकतेचे नियम लावून पाहिले तर टिळकांच्याच अनेक राजनैतिक भूमिकांतील परस्पर विरोधाभास सहज कळून जातात आणि मान्यही होतात. आणि टिळकांनी सांगितलेले राजकारणाचे असे अनेक नियम मग अक्षरश: पटून जातात.

एकेकाळचे टिळकांचे जीवश्च- कंठश्च मित्र असलेल्या गोपाळराव आगरकरांशी त्यांचे कालापरत्वे उद्भवलेले इतिहासप्रसिद्ध तात्त्विक भांडण हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. वरवर पाहता ’आधी सामाजिक सुधारणा आणि मग स्वराज्य’ की ’आधी स्वराज्य आणि मग सामाजिक सुधारणा’ इतका हा वाद सोपा वाटतो. मलाही तो आजवर इतकाच माहीत होता आणि टिळकांसारख्या विद्द्वान आणि धुरंधर असामीने सामाजिक सुधारणांना त्याकाळी विरोध केला हे काहीसे विक्षिप्त आणि खटकण्याजोगेही वाटत होते. मात्र एका जागी टिळक म्हणतात - "माझा विरोध सुधारणेला नाही. ती लोकांवर लादण्याला आहे. जे लोकाग्रणी स्वत:ची मतं लोकांना पटवून देऊ शकत नाहीत ते अग्रणी व्हायला नालायक आहेत असं माझं मत आहे आणि ते जर परकीय सरकारचं सहाय्य घेऊन आपली मतं समाजावर जबरदस्तीनं लादू पहात असतील तर ते अग्रणी नसून या देशाचे शत्रू आहेत असंच मी मानतो. कारण त्यांचा हेतू काहीही असो, प्रत्यक्षात ते परक्या सरकारचे हस्तक म्हणून अश्या प्रसंगी काम करतात." नीट विचार केला तर या भुमिकेमागची वैचारीक बैठक नीटच लक्षात येते. आपल्या कुटुंबांतर्गत असलेले दोष, हेवेदावे आणि कलह कुटुंबांतर्गत आणि तेही समजूतीने सोडवायचे असतात. कुटुंबप्रमुखाचे ते कौशल्य असते. त्यासाठी बाहेरच्यांची मदत घेणे सोडाच... पण आपण आतले कलह चार भिंतींच्या पलिकडेही जाणार नाहीत याची दक्षता जास्तीत जास्त घेत असतो. मग देशाच्या बाबतीत हा विचार किती उदात्त पातळीवर आणि निक्षून व्हायला हवा?
शिवाय टिळक असेही म्हणतात - "मलाही सुधारणा हवी आहे. परंतू तुमचा धर्म वाईट, तुमची संस्कृती संकुचित असं म्हणून लोकांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान नष्ट करायचा आणि मग सुधारणा त्यांच्या गळ्यात बांधायची हे मला नको आहे." यावर "मग समाजसुधारणा व्हायची तरी कशी?" या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते असेही म्हणतात - "आतापर्यंत आपल्या समाजात ज्याप्रकारे सुधारणा झाली त्याचप्रकारे यापुढेही होईल. आपला समाज शेकडो वर्षं तसाच आहे, त्यात काहीही फरक झालेला नाही ही कल्पनाच चुकीची आहे. परिस्थितीनुरूप या समाजात वेळोवेळी अनेक बदल झालेले आहेत. आजही लोकांत राष्ट्रीय भावना निर्माण झाली, राष्ट्रकार्यासाठी ते एकोप्यानं झटू लागले की आपोआपच आपसांतील भेद कमी होतील आणि राष्ट्राच्या उत्कर्षाच्या आड येणार्‍या चालीरिती लोक बदलतील." - हेही किती पटण्याजोगे आहे! आपल्या कितीतरी आधीच्या पिढीने पाळलेल्या चालीरिती आजच आपल्याला किती अनोळखी आणि आश्चर्यकारक वाटतात हे हे पुस्तक वाचतानाच अनुभवास येते! अर्थात त्यामागे सामाजिक सुधारणेसाठी धडपडलेल्या अनेक नेत्या पुढार्यांचे श्रेय आहेच... पण समाजाचा स्वत:चा असा एक परिवर्तनाचा पिंड असतोच. त्यानुसार संस्कृतीत आणि धर्माचरणातही काही सुक्ष्म बदल सतत आपसूक घडतच असतात. बदलांची आणि सुधारणांची ही गाळणी प्रत्येक पिढीला पार करावीच लागते आणि रुचो न रुचो, पटो न पटो... ते बदल आत्मसात करून जुळवून घेणार्‍यालाच नव्या काळात तगून राहता येतं हे तर सत्यच आहे! टिळक - आगरकर वादातली टिळकांची भुमिका अशी या पुस्तकातून उलगडत आणि पटतही जाते आणि नकळतपणे धर्म, धर्मनिष्ठा, संस्कृती, जात, वर्ण आणि देव यासंबंधीच्या आपल्या संकल्पनांना आव्हान देत राहते.

राजकारणात लोकसंग्रह आणि लोकानुनय हा किती महत्त्वाचा हेही या पुस्तकातून लक्षात येतं. "लोकांचं पाठबळ ही एकमेव शक्ती आज देशकार्‍यासाठी माझ्यासारख्याला उपलब्ध आहे आणि आजतरी सगळे लोक या मंडळींच्याच मताचे आहेत. लोकांना मान्य असलेले हे अग्रणी आहेत. ह्यांना दूर लोटलं म्हणजे लोकांच्या पाठबळाची आशाच बाळगायला नको. लोकांचा अनुनय केल्याशिवाय त्यांना मार्गदर्शन करणं अशक्य आहे." असं टिळक म्हणतात. पुढार्‍यानं सामान्य जनतेची अनुकुलता आणि पाठींबा मिळवण्यासाठी वेळप्रसंगी स्वत:ची वैयक्तिक मतेही बाजूला कशी ठेवायची असतात हे समजून घेताना तर कधीकधी नैतिक धक्केही बसतात. पण त्याबरोबरच त्यांची भुमिका पटल्याशिवाय रहात नाही. खरे राजकारण करायचे तर माणसाचे दोष न पाहता, त्याने निवडलेल्या मार्गाची योग्यायोग्यता आपल्या नजरेने न जोखता केवळ त्यांचे आणि आपले अंतिम ध्येय एकच आहे, आणि ते गाठण्यामागची त्यांची तळमळ, कष्टांची तयारी हे सारे सामाईक आहे हे जाणून घेऊन त्यांना आपल्यासोबत घ्यायचे असते. किमान राजकारणात अश्या माणसांना कधीही तोडायचे नसते. खरा राजकारणी माणूस हाती अदृष्य सुईदोरा घेऊन दिसणार्‍या प्रत्येक निष्ठावान व्यक्तीला अंतीम ध्येयप्राप्तीच्या धाग्यात ओवून घेत असतो हा धडा प्रत्येक राजकारण्यानी शेकडो वेळा गिरवावा असा आहे!

________________________

लोकमान्यांची संपूर्ण राजकीय वाटचाल अशी पानापानांतून उलगडताना आपल्यासा सखोल, संपूर्ण आणि उदात्त राजनीतीचे असे असंख्य धडे देत जाते. कधी चुचकारत, तर कधी फटकावत टिळक आपल्याला राजकारण, समाजकारण, धर्मकारण या सार्यांतले भेद स्पष्ट करतात. एके ठिकाणी टिळक अगदी स्पष्ट म्हणतात - "धार्मिक जागृतीचा उपयोग राजकारणात अवश्य होतो. परंतू धर्मात राजकारण अडकलं की धर्मभोळे लोक भवती जमा होतात आणि राजकारण बाजूला राहून धार्मिक भानगडींनाच महत्त्व चढतं. म्हणून राजकारण हे धर्मापासून वेगळंच ठेवलं पाहीजे." आत्ताच्या राजकारणाचा विचार केला तर हे तत्त्व किती लक्षात घेण्याजोगे आहे?

पण मग तरिही काही अस्वस्थ करणारे प्रश्नही पडतातच. टिळकांनी सांगितलेले राजकारणाचे सारे निकष जेंव्हा आपण सद्द्यस्थितीतल्या आपल्या भोवतालच्या राजकिय घडामोडींना लावतो तेंव्हा आपल्याला चीड का येते? आजच्या पुढार्‍यांची परिस्थितीनुरूप सतत बदलणारी भुमिका आपल्याला त्यांच्याविषयी अविश्वास का निर्माण करते? स्वार्थपरायण का वाटते? त्यांची लोकानुनय मिळवण्यासाठीची सततची धडपड आपल्याला लाळघोटेपणाची आणि अप्रामाणिक का वाटते? त्यांचे धर्माचे, जातीचे राजकारण आपल्याला उबग का आणते? स्वातंत्र्योत्तर काळात बदलत गेलेली या देशाची राजनीती हळूहळू जनतेच्या प्रगाढ विश्वासाला पारखी का होत गेली?

या सर्वांचे उत्तर आज टिळक हयात असते तर नकीच बिनतोड देऊ शकले असते. (आज टिळक हयात असते तर कदाचित ही परिस्थितीच उद्भवली नसती.) पण मला या सार्‍या प्रश्नांचे माझ्या बुद्धिनुरूप सुचलेले उत्तर एवढेच की त्याकाळचा त्या नेत्यांचा लढा हा एका परकीय शक्तीविरुद्धचा होता. ’सत्ता’ हे त्यांचे ध्येय नसून ’देशाचे स्वातंत्र्य’ हे त्यांचे अत्यंत स्पष्ट ध्येय होते. सत्ता हे केवळ एक माध्यम होते. आवश्यक असले तरी ते निव्वळ एक साधन आहे याची त्यावेळच्या राज्यकर्त्यांन्ना संपूर्ण जाणीव होती. शिवाय ’सत्ता’ ही फारच तुलनात्मक संज्ञा झाली. कुणावर सत्ता? कशासाठी? कुठल्या बाबतीत? कुठवर? हे सारे प्रश्न स्वत:ला विचारणारा आणि त्याची स्पष्ट उत्तरे स्वत:पाशी बाळगणारा असा कुठला नेता आज आपल्या राजनीतीत सांगता येईल? इतका राजनीतीचा प्रगाढ विचार करणारा एकतरी प्रगल्भ नेता आज आपल्यासमोर आहे काय? आणि जर ध्येयच स्पष्ट नसेल तर मार्ग स्पष्ट असणार तरी कसे? आजचे राजकारण त्यामुळेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण या सगळ्याला बगल देत केवळ ’सत्ताकारण’ म्हणून उरलेले आहे. आणि टिळकांसारख्या प्रगल्भ धुरंधर पुढार्‍याने केलेले राजकारण आता निव्वळ सत्ताप्राप्तीच्या लालसेतले एक सहाय्यमात्र प्यादे म्हणून वापरले जात आहे. समाज, त्यातील जातीव्यवस्था, धर्म या सार्‍या गोष्टींचा वापर आजचे पुढारी ज्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी करतात ते ध्येयच मुळात स्पष्ट नाही. त्या ध्येयाच्या प्रामाणिकतेबद्दल कुणाच्याच मनात विश्वास नाही आणि ते ध्येय अंतिमत: संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि भल्यासाठी असेल याची तर जनतेला मुळीच खात्री नाही कारण असे काही असते याची या अल्पकालीन सत्ताकारणात गुंतलेल्या नेत्यांना कल्पनाही असेल असे वाटत नाही.

या पुस्तकात दिसत असलेला त्याकाळच्या तत्कालिन राजकारणाचा सभ्य, सुसंस्कृत आणि उदात्त चेहरा आपल्याला भारावून टाकतो. अस्वस्थ करतो. टिळकांच्या आयुष्यातले अनेक मह्त्त्वाचे प्रसंग गंगाधर गाडगीळ नेमकेपणानं आपल्यासमोर मांडतात. त्यांची जिद्द, त्यांची निष्ठा, त्यांचा कणखर स्वभाव, त्यांचे हट्टीपण, त्यांचा पराकोटीचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर त्यांचे काही दोष, त्यांचे अगदी हळवे कोपरे या सार्‍यावर गाडगीळ सावधपणे पण अभ्यासपूर्ण भाष्य करतात. सर्वात मह्त्त्वाचं म्हणजे १९७१ साली, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्या काळचा आपला देश, भाषा, संस्कृती, विचार याचे अगदी तंतोतंत चित्रण करण्यात गाडगीळ कमालीचे यशस्वी झालेले आहेत. या पुस्तकावर लिहिता येण्याजोगे अजूनही खूप काही आहे. टिळकांच्या बरोबरीने या पुस्तकात उल्लेख झालेल्या कित्येक तत्त्कालिन नेत्यांचा, पुढार्‍यांचा, विद्वानांचा, विचारवंतांचा संदर्भ वाचताना तत्कालिन पुण्याचा, महाराष्ट्राचा, आणि संपूर्ण देशाचा हेवा वाटत राहतो! टिळकांच्या कौटुंबिक जीवनाचे उल्लेख त्यामानाने कमीच असले तरी तेही मनात हुरहुर निर्माण करून जातात. ’शेवटी राजकारणात कुणीच चूक किंवा बरोबर नसतं.’ हेच पुन्हा पुन्हा प्रत्ययास येत राहते.
____________________

कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत गाडगीळ म्हणतात - ’ही कदंबरी लिहिताना मीच नव्हे तर आमचे घरही टिळकमय झाले होते.’ या तब्बल ७६७ पानांच्या दिर्घ कादंबरीने मलाही गेले महिनाभर संपूर्ण टिळकमय केलेले होते हे खरं! आणि अजूनही मी जितकी टिळकमय आहे तेवढीच यापुढेही राहो अशी माझी ईच्छा आहे. आयुष्यात जेंव्हा जेंव्हा संघर्षाचे, संकटाचे, नैराश्याचे प्रसंग येतील तेंव्हा टि़ळकांची स्मृती मला यापुढे कायम सहाय्यभूत ठरेल!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या ’लोकमान्य टिळक’ नामक एका अविश्रांत झटणार्‍या; आयुष्याचा क्षणन् क्षण ध्येयाप्रती झिजवणार्‍या एका दुर्लभ महत्त्वाकांक्षी वादळी पर्वावर आधारीत या कादंबरीला ’दुर्दम्य’ हे नाव अगदीच समर्पक आहे.

_____________________________________

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आयुष्यात जेंव्हा जेंव्हा संघर्षाचे, संकटाचे, नैराश्याचे प्रसंग येतील तेंव्हा टि़ळकांची स्मृती मला यापुढे कायम सहाय्यभूत ठरेल!>> अगदी खरंय. ते तसं सहाय्यक होतं.
चांगले लिहिले आहे तुम्ही, "मुग्धमानसी.

मुग्धमानसी, सर्वप्रथम अतिशय सुरेख लेखाबद्दल आपले खुप खुप आभार Happy
दुर्दम्य फार वर्षांपूर्वी वाचली होती. पण खुप आवडल्याचे आठवते आहे. तुम्हाला अस्वस्थ करणारे प्रश्न योग्यच आहेत. मात्र मला त्याचं मिळालेलं उत्तर हे चारित्र्यातील तफावतीमध्ये आहे. आजचे नेते आणि टिळकांसारखे नेते यांत महत्वाचा मला वाटणारा फरक म्हणजे आजच्या नेत्यांच्या आचार आणि विचारांमध्ये प्रचंड तफावत असते. ती जनतेच्या लक्षात येते मग नेत्यांना जनता कितीही भोळी वाटू देत. टिळकांसारखे नेते हे खर्‍या अर्थाने लोकनेते असतात. त्यांच्या आणि आम जनतेच्या राहणीमानात फारसा फरक नसतो. आणि हे सर्व बाबतीतच असतं अशी माझी समजूत आहे. मला ही सुरुवात खुप महत्वाची वाटते. टिळकांसारखी माणसे म्हणेल ते करण्यास जनता तयार होती कारण त्याकाळात टिळकांना जनता देवच मानत होती. मी टिळकांवर इतरही काही पुस्तके वाचली. त्यात हा भाग सगळ्या ठिकाणी होता. टिळक म्हणजे देवच.
त्यांच्या घरी सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळत असे. गांधीमुळे ब्रह्मचर्य वगैरे शब्द राजकिय पटलावर आले. टिळकांनी असे प्रयोग कधीही केले नसले तरी त्यांचे चारित्र्य अग्निसारखे तेजस्वी होते. "ताईमहाराज" प्रकरणात हा त्यांचा गुण अगदी ठळकपणे दिसून येतो. त्यानंतर त्यांच्यातील इतर विलोभनीय गुण किती सांगावे? राजकारणाच्या धकाधकीत त्यांनी आपली ज्ञानतृष्णा सतत जागृत ठेवून ओरायन, आर्टिक होम इन वेदाज सारखे ग्रंथ लिहिले. गीतारहस्यात तर त्यांच्या वागण्याचे अगदी मूळ दिसून येते. सतत कर्म करीत राहणे. आणी कुठल्याही परिस्थीतीला समर्थपणे तोंड देणे. त्यांच्या समकालिन काही नेत्यांना अत्यंत गरीबीत दिवस काढावे लागले. पण अडचणीच्या काळात टिळकांनी लॉ क्लास काढला होता आणि त्याला गर्दी असे.
मंडालेत थोडक्या काळात गीता रहस्य लिहिल्यावर ब्रिटीशांनी ते गायब केलं असं म्हणतात. पण टिळकांनी निव्वळ स्मृतीच्या आधारावर तो पुन्हा लिहून काढला. केतकरांसारख्यांबद्दल टिळकांना आस्था वाटत असे. ज्ञानकोशाच्या कामाला त्यांचा होकार होता. ग्रंथ, संशोधन, ज्ञानोपासना, ज्ञानोपासक यांच्यात ते रमून जात. एकदा एखाद्याला मित्र मानलं की शेवटपर्यंत टिळक त्या माणसाचा हात सोडीत नसत. आज यातील एखाद टक्काही गुण असलेला असा एकतरी नेता असेल असे वाटत नाही.
माझ्या अनेक दैवतांपैकी टिळक हे एक अतिशय आदरणीय दैवत. त्यांच्याबाबत किती बोलु आणि किती नको असं होऊन जातं. माझा प्रतिसाद लांबला त्याबद्दल क्षमस्व.

धन्यवाद अतुल इतक्या विस्तृत आणि अप्रतिम प्रतिसादाबद्दल! खरोखर टिळक हे आजही आजच्या राजकारण्यांनी गुरुस्थानी मानावेत आणि सामान्यांनी आदर्शस्थानी नित्यस्मरणी ठेवावे असे! पण असे कालात्रयी नेते विस्मरणात जातात. फोटो आणि पुतळ्या तून फक्त उरतात हे या देशाचे दुर्भाग्य.
माझ्याकडे टिळकांच्या केसरी तील लेखांच्या संग्रहांचा तिसरा भागही आहे. तीन खंडांतून हे सारे लेख न. चि. केळकर यांनी 'केसरी-मराठा संस्था, पुणे' यांच्या साहाय्याने 1926 साली म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी प्रकाशित केले होते. माझ्याकडे यातील तिसऱ्या खंडा ची मूळ प्रत आहे. त्यातील लेख वाचल्यावर टिळकांच्या बुद्धीमत्तेने आणि राजकीय कौशल्याने अजूनही अवाक व्हायला होते! अजूनही हे लेख कालबाह्य झालेले नाहीत!! हे अचाटच!!!

धन्यवाद अतुल इतक्या विस्तृत आणि अप्रतिम प्रतिसादाबद्दल! खरोखर टिळक हे आजही आजच्या राजकारण्यांनी गुरुस्थानी मानावेत आणि सामान्यांनी आदर्शस्थानी नित्यस्मरणी ठेवावे असे! पण असे कालात्रयी नेते विस्मरणात जातात. फोटो आणि पुतळ्या तून फक्त उरतात हे या देशाचे दुर्भाग्य.
माझ्याकडे टिळकांच्या केसरी तील लेखांच्या संग्रहांचा तिसरा भागही आहे. तीन खंडांतून हे सारे लेख न. चि. केळकर यांनी 'केसरी-मराठा संस्था, पुणे' यांच्या साहाय्याने 1926 साली म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी प्रकाशित केले होते. माझ्याकडे यातील तिसऱ्या खंडा ची मूळ प्रत आहे. त्यातील लेख वाचल्यावर टिळकांच्या बुद्धीमत्तेने आणि राजकीय कौशल्याने अजूनही अवाक व्हायला होते! अजूनही हे लेख कालबाह्य झालेले नाहीत!! हे अचाटच!!!

दुर्दम्य वाचली नाही पण काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणी वर दर आठवड्याला दुर्दम्य चे कादंबरी वाचन लागायचे.. ते मात्र सगळे भाग ऐकले आहेत... सकाळी एक भाग ऐकल्यावर दिवसभर तोच विषय घोळत राहायचा इतके ते 15 मिनिटे प्रभावी होते. आता मिळवून वाचायलाच हवी.
मानसी, धन्यवाद या लेखन प्रपंचाबद्दल!!!