पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने पुरुषार्थातल्या 'पुरुष' हा लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात। जातपात, लिंग, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून फक्त स्वतःच्या कर्तृत्वाला सलाम करायला लावतात आणि आणि मग पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट एका अश्या ' दाम्पत्याशी ' घडली की आयुष्याकडे आणि आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला.
एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती। या देशात विधात्याने मुक्त हस्ताने सौंदर्य आणि लावण्य वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे। फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे। कामसू आणि मेहेनती म्हणून ओळखले जाणारे हे लोक स्वभावाने सुद्धा अतिशय मृदू आणि मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही। लिन्टा सुद्धा अशीच परिचयाची झाली आणि मीटिंगसाठी थांबायची वेळ आली तर मजा मस्करी करण्याइतपत मोकळी आमची मैत्री झाली।
स्वतःला अट्टाहासाने अतिशय टापटीप आणि अदबशीर ठेवणारी ही मुलगी माझ्याहून फक्त तीन वर्षांनी लहान आहे हे कळल्यावर मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही। फिलीपिन्स आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमधले लोक चिरतारुण्याचं वरदान घेऊन जन्माला आलेले आहेत। वयाचा अंदाज हमखास चुकेल अशी शरीरयष्टी आणि एकही सुरकुती नसलेले त्यांचे चेहरे माझ्यासारख्यांना न्यूनगंड वाटायला लावायचे आणि मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाचं ' विधात्या, तूही आमच्यावर रुसलास ' च स्वगत थोड्या वेगळ्या कारणासाठी आठवून जायचं। सतत हसरा चेहरा दिसत आल्यामुळे ही किती आनंदात आहे असा मी तिच्याबद्दल समज करून घेतला होता आणि तिच्या तश्या आयुष्याचा हेवा सुद्धा वाटून घेतला होता। पण ज्याप्रमाणे पावसात उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे वरकरणी हसऱ्या दिसणाऱ्या चेहेऱ्यावरचे अश्रू केवळ वरून धो धो कोसळणाऱ्या पाण्यामुळे लपले जातात तसाच तिचं होत होतं आणि हे कळायला मला बराच वेळ लागला।
क्लायंटच्या काही महत्वाच्या गोष्टी मला माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये देत असताना चुकून एकसारखे दिसणारे पेन ड्राइव्हस बदलले गेले आणि माझ्याकडे तिच्या खाजगी वापरातला तिचा पेन ड्राईव्ह आला। ऑफिस मध्ये आल्यावर मला चूक कळली आणि मी तिला त्याबद्दल सांगितलं। ' आत्ताच्या आत्ता मला तो परत आणून दे , अगदी काहीही झालं तरी ' अशा शब्दात तिने मला जवळ जवळ अदृश्य हातांनी मानगूट पकडूनच सांगितलं आणि मी थोडासा चिडलो। संध्याकाळपर्यंत थांबायची विनंती वारंवार करूनही तिने खूप ताणून धरल्यामुळे माझा नाईलाज झालं आणि मी पुन्हा तिच्या ऑफिसच्या दिशेने निघालो। चिडलो असल्यामुळे असेल, पण पुन्हा एकदा फोन आल्यावर तिला दोन शब्द सुनावले आणि शेवटी तिच्या ऑफिसच्या खाली तिला भेटल्यावर तिच्या हातावर तो पेन ड्राईव्ह मी जवळ जवळ आपटला।
' यातल्ये कोणतेही फोल्डर्स ओपन केले नाही ना?' तिने विचारलं। मुद्दाम तिरसट उत्तर द्यायचं म्हणून ' हो, सगळे बघितले आणि ऑफिस मध्ये माझ्या कॉम्पुटर मध्ये कॉपी पण केले।।।।। आता जा ' असा सगळा राग एकदाचा तिच्यावर काढून मी गाडीकडे वळलो। मागून काहीच आवाज ना आल्यामुळे पुन्हा वळून बघितलं , तर ती डोकं धरून मटकन खाली बसली होती आणि घळाघळा रडायला लागली होती। हे सगळं मला अनपेक्षित होतं, पण ते दृश्य बघून मी थोडासा हबकलो। तिला शांत व्हायला सांगितलं आणि समोरच्या कॉफी शॉप मध्ये तिला घेऊन गेलो। हातात कॉफी अली तरी तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि कॉफी प्यायला काही ती तयार होत नव्हती। शेवटी ना राहावून मीच प्रश्न केला ' अगं इतकं काय झाला रडायला? कधी कोणी चिडला नाही का तुझावर आजपर्यंत? आणि माफ कर, पण असा काय झाला होतं कि संध्याकाळपर्यंत सवड नव्हती काढता येत तुला?'
' पेन ड्राईव्ह मधलं काय काय बघितल्यास?'
' का? असा काय आहे त्यात?'
' त्यात माझे पर्सनल फोटोस आहेत....बघितले असशीलच. आणि कोणाला त्याबद्दल सांगितलंस तर माझी नोकरी जाईलच, पण हा देश सुद्धा सोडावा लागेल'
हे नक्की काय प्रकरण आहे, मला कळेना। हि मुलगी ऑफिस च्या बाहेर काही ' नको ते ' करते कि काय, अशी शंका मनाला चाटून गेली आणि मी हादरलो.
' ऑफिस मधून का काढतील? तू काहीही काय बोलतेस? कळतंय का तुला तरी हे सगळं?'
' या देशात नाही चालत हे......इथेच काय, माझ्या स्वतःच्या देशात सुद्धा हे नाही चालत......त्यात माझी पार्टनर.....' आणि ती एकदम शांत झाली।
थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि मी यातला काहीही कोणालाही सांगणार नाही असा माझ्याबद्दल विश्वास वाटल्यामुळे की याला सगळं नाही सांगितलं तर हा चारचौघात आपलं गुपित उघड पाडेल या भीतीमुळे कुणास ठाऊक , पण तिने मला तिची कर्मकहाणी सांगायला सुरु केली।
खुद्द vatican city फिकी वाटेल अश्या कमालीच्या कर्मठ आणि धर्मभोळ्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती। दोन थोरल्या बहिणी nun होऊन येशूच्या चरणावर सर्वस्व अर्पण करून घरातून चर्च मध्ये कायमच्या मुक्कामाला गेलेल्या आणि पाठचा भाऊ देशाच्या सैन्यदलात। घरात ख्रिस्ती धर्मानुसार प्रत्येक गोष्ट काटेकोर असावी असा आई-वडिलांचा आग्रह किंवा अट्टाहास। गर्भपात, घटस्फोट अश्या गोष्टींना धर्म अनुमती देत नाही म्हणून घरच्यांचा जबरदस्त विरोध। वयात आल्यावर घरच्यांनी एका सैन्यदलातच काम करणाऱ्या परिचयातल्या मुलाशी तिचं लग्नं लावून दिलं। पहिल्या गर्भारपणाच्या वेळी गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाही असं कळल्यावर तिने मुलाला जन्म न द्यायची भूमिका घेतली आणि घरातल्या त्या कर्मठ वातावरणात जबरदस्त भूकंप झाला.
' नवऱ्याने, बापाने आणि कमी पडला म्हणून कि काय पण लहान भावाने सुद्धा शिवीगाळ केली आणि यथेच्च मारहाण केली।अर्धवट, शारीरिक आणि मानसिक व्यंग असलेलं आणि नुसता माणसाचा गोळा होऊन ज्याला आयुष्य काढावं लागलं असत असं मूल मुळात जन्माला का येऊ द्यायचं? पण कोणालाही हे समजत नव्हतं। शेवटी सोडलं घर आणि घटस्फोटाची सोय सुद्धा नसल्यामुळे सरळ एकटा आयुष्य जगायचं ठरवून नोकरी शोधायला सुरुवात केली। आधी कतार मध्ये आणि त्यानंतर दोनच वर्षात दुबई मध्ये नोकरी मिळाली आणि स्वतःच्या हिमतीवर मी जगायला सुरुवात केली'
या सगळ्यात तिने पेन ड्राईव्ह च्या संदर्भातला नोकरी जाणण्याचा संबंध केलेला उल्लेख मला कशाशीही जोडता येत नव्हता। तिचं नवरा सैन्यदलात असला, तरी अचानक जेम्स बॉण्ड सारखा तो कुठून तरीही अवतरेल आणि तिला होत्याचं नव्हतं करून निघून जाईल हे शक्य नव्हतं। शेवटी भरकटत चाललेला संभाषण पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी तिला तोच मुद्द्याचा प्रश्न विचारला।
दोन मिनिटं थांबून, एक दीर्घ श्वास घेऊन आणि आवाजाची पट्टी एकदम चांगले दोन-तीन सूर कमी करून ती म्हणाली, ' मी इथे माझ्या पार्टनर बरोबर रहाते।'
घटस्फोट ना घेता दुसर्या व्यक्तीबरोबर रहाते ही गोष्ट सगळ्यांना कळेल अशी तिला भीती होती, अशी माझी समजूत झाली आणि ' ठीक आहे......आता घटस्फोट तुमच्या देशात मान्यच नाही त्याला काय करणार...... ' सारखी छापील वाक्य माझ्या तोंडून बाहेर आली।
' तुला कळलं नाही.....पार्टनर म्हणजे पुरुष नाही, स्त्री. मी पुरुषांकडून आलेल्या या वाईट अनुभवानंतर परत कोणत्याही पुरुषाबरोबर राहू शकणार नाही हे मला माहित होतं......पण म्हणून मी कधीही हट्टाने समलिंगी संबंध ठेवले नाहीत बरं का. पण Joey बरोबर का कुणास ठाऊक, आपोआप होऊन गेलं...... '
समलिंगी संबंध माझ्यासाठी 'अब्रमण्यम' सदरात मोडणारा विषय नक्कीच नव्हता. प्रत्येक मनुष्याला त्याच्या लैंगिक आयुष्याचे निर्णय घायचं स्वातंत्र्य असावं आणि जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृतींमध्ये स्पष्ट उल्लेख असणाऱ्या समलिंगी संबंधांकडे विकृती या अर्थाने न बघता लैंगिक प्रकृती या अर्थाने बघावं यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तिचं हे गुपित मला स्वीकारणं फारसं अवघड गेलं नाही. मी हे सगळं तिला बोलून दाखवलं आणि त्यावर तिने पुढे मला जे सांगितलं, ते ऐकून माझा मेंदू सुन्न झाला.
Joey हि तिची पार्टनर मुळात स्त्री नव्हती. तिच्यासारखीच फिलिपिन्स मध्ये तशाच घरात जन्माला आलेला तो एक पुरुष होता, पण लहानपणापासून त्याचा स्रीत्वाकडे ओढा होता. स्त्री करेल ते सगळं त्याला करायला आवडत होता आणि कुठेतरी पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री म्हणून आयुष्य रेटत होता. आजूबाजूच्या समाजाने नपुंसक आणि हिजडा म्हणून हिणवलेला हा पुरुष सतत अवहेलना सहन करत वाढला आणि एके दिवशी घरच्यांपासून कायमचा लांब गेला. स्वतःच्या मेहेनतीच्या कमाईवर त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली आणि खर्या अर्थाने त्याची स्त्री झाली.
स्त्री म्हणून जन्माला आलेली पण परिस्थितीशी दोन हात करून स्वकर्तृत्वावर मोठी झालेली Linta आणि पुरुष म्हणून जन्माला येऊनही पुरुषत्वाला शाप समजणारा आणि त्यापासून सुटका करून घेऊन स्त्री म्हणून ताठ मानेने जगणारा Joey हे दोन जगावेगळे मनुष्यप्राणी चक्क आधी परिचित, मग मित्र आणि मग एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती झालेले होते। केवळ fantasy movies मध्ये शोभेल अशी हि विलक्षण प्रेमकहाणी मला अविश्वसनीय आणि तरीही लोभसवाणी वाटत होती। एकीने पुरुषार्थ आणि दुसर्याने स्त्रीत्व मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि शेवटी लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्वीकारलेली एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार व्हायची भूमिका माझ्यासाठी मनुष्याच्या भावभावनांचा लोभसवाणा अविष्कार होता। समाजाचे धुवट विचार कधीही हे स्वीकारू शकले नसते, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या भोवताली एक अदृश्य कुंपण घालून घेतलं होतं आणि बाकीच्या जगाला कटाक्षाने त्या कुंपणाच्या बाहेर ठेवलं होतं।
शेवटी पेन ड्राईव्ह मधलं काहीही मी बघितलेलं नाहीये आणि कॉपी सुद्धा केलं नाहीये अशी तिला मी खात्री दिली। तिच्या खाजगी आयुष्याच्या अनेक 'आठवणी ' त्या पेन ड्राईव्ह मध्ये होत्या। तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि काहीतरी अविस्मरणीय अनुभवल्याची ख़ुशी मनात साठवून ठेवून मी तिथून निघालो।
आधुनिक जगातले हे ऍडम आणि ईव्ह माझ्यासाठी प्रेमाच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकणारे दोन विलक्षण मनुष्यप्राणी होते, ज्यांच्या प्रेमाच्या आड समाज, जात, धर्म, लिंग किंवा तत्सम कोणतीही गोष्ट येऊ शकत नव्हती। जगासाठी अशुद्ध आणि अस्वीकारार्ह असलेलं हे आगळं वेगळं प्रेम माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकं शुद्ध होतं।
सुंदर.
सुंदर.
धन्यवाद !
धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.
https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/
एक कहाणी
एक कहाणी