" हॅलो, आशिष का? अरे एक वाईट खबर द्यायचीय...आपला सूरज गेला...."
रात्री दहा वाजता झोपायच्या तयारीत असताना मला माझ्या मित्राचा फॉरेन आला आणि मी अंतर्बाहय हादरलो. सूरज आपल्यात नाही हे सत्य पचवणं जड होतंच...अगदी मागच्या काही वर्षांपासून असं काहीतरी होणार आहे हे माहित असून सुद्धा. सूरज हा माझा जीवश्च कंठश्च नसला, तरी जवळचा मित्र नक्कीच होता. किंबहुना तो जगमित्र होता...मीच काय, जगातल्या कोणाशीही तो इतकी सहज मैत्री करू शकायचा, की त्याच्यात एक अदृश्य चुंबकीय शक्ती असून ती मनुष्यांना आपल्याकडे आकर्षित करते अशी सतत शंका यायची. अगदी माणूसघाण्या आणि खडूस लोकांनाही सूरज सहज आपलासा करून घ्यायचा.
त्याची आणि माझी ओळख झाली एका विमानप्रवासात. मुंबई ते दुबई प्रवासात फक्त तीन तासात माझ्या बाजूला बसलेल्या या माणसाने अनोळखी ते ओळखीचा ते मित्र अशा शिड्या भरभर चढून मला खिशात टाकलं होतं. त्याची मैत्री करायची एक खास पद्धत होती. आधी तो स्वतःची जुजबी ओळख करून द्यायचा. त्यानंतर समोरच्याला नाव-गाव वगैरे परवलीचे प्रश्न विचारल्यावर थेट त्याच्या आवडी-निवडींवर यायचा. स्वतःकडे अनुभवांची आणि किश्श्यांची भली मोठी शिदोरी असल्यामुळे त्याला कोणाशीही कोणत्याही विषयावर चटकन बोलता यायचं. सहसा व्यवसाय, चित्रपट, गाणी अशा प्रत्येकाच्या खास राखीव कुरणांचा तो शोध घ्यायचा आणि मग गप्पांचा ओघ असं काही सुरु व्हायचा, की कोणालाही त्याच्याबरोबर भरपूर बोलावसं वाटावं.
अर्थात त्या प्रवासानंतर दोघेही दुबईला राहात असल्यामुळे आणि दोघांनाही माणसंच व्यसन असल्यामुळे आमच्या अनेक भेटीगाठी झाल्या. मी आर्किटेक्ट आणि तो इंजिनिअर. अर्थात आमच्या कामाच्या स्वरूपात सुद्धा बरंच साम्य होतं. त्यात आम्ही दोघे भटके आणि गप्पिष्ट.एरव्हीही अनोळखी माणसांशी सूर जुळायला मला जास्त वेळ लागत नाही...आणि इथे तर मैफिलीचा बादशाह स्वतःहून समोरून माझ्याशी दोस्ती करत होता. आमच्यात एक-दोन भेटीतच भरभरून संभाषण झालं आणि आम्ही बराच वेळ एकत्र घालवायला लागलो.
सूरज मूळचा कलकत्त्याच्या असला तरी तामिळ होता. त्याच्या वडिलांनी कलकत्त्याच्या कुठल्याशा कंपनीत बस्तान बसवलं आणि सूरज काही दिवसांचा असल्यापासून ते सगळं कुटुंब कलकत्त्याला कायमचं राहायला गेलं. अर्थात वर्ण आणि वंश सोडला, तर तो औषधालाही तामिळ उरला नव्हता. भाताबरोबर सांबारऐवजी हिल्सा माशांची आमटी जास्त चवीने खाणारा हा ' अण्णा ' बंगाली कायस्थांना लाजवेल इतक्या सुंदर पद्धतीचं बंगाली बोलायचा. कर्नाटकी शास्त्रीय संगीतापेक्षा ' रॉबिनद्रो शोंगीत ' जास्त तल्लीन होऊन ऐकायचा आणि पानात कितीही पायसम असलं तरी रोषोगुल्ला आणि मिष्टी दोहीची आठवण काढून हळहळायचा. एकूणच काय, तर सूरज सुब्रमण्यम नाव धारण केलेला हा तामिळ ब्राह्मण पूर्णपणे कलकत्त्याचा बंगाली कायस्थ झालेला होता.
लाघवी असला, तरी हा माणूस अतिशय खोड्याळ होता. आमच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये एकदा फोन करून आपण त्याच्या प्रेयसीचा भाऊ असल्याची बतावणी करून त्याने भूकंप घडवून आणला. हा आमचा मित्र ऑफिसमध्ये भर थंडीत घामाने डबडबला. ही कोण माझी प्रेयसी आणि हा कोण तिचा भाऊ जो संध्याकाळी बहिणीबरोबर आपण न केलेल्या प्रणयाराधनासाठी आपल्याला मारायला येणार आहे, हे कोडं आमच्या या मित्राला दिवसभर सोडवता आलं नाही. शेवटी संध्याकाळी सूरजने आमच्या त्या मित्राला त्याच्याच अक्ख्या ऑफिससमोर त्याला 'एप्रिल फूल' केल्याचं सांगितल्यावर त्या दोघांमध्ये समझोता घडवता घडवता माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले होते.
एके दिवशी सकाळी सकाळी सूरजला फोन आला. त्याने दुबईच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या इब्न बतूता मॉलमध्ये जाण्याचा घाट घातला होता. त्याच्याकडे गाडी होती, माझ्याकडे आणि माझ्या इतर दोन मित्रांकडे नव्हती.अर्थात आम्ही सगळे त्याच्या गाडीच्या भरवशावर निघालो. रस्ता चाळीस-पंचेचाळीस मिनिटांचा होता. आमच्या टीव्हीला बावल्या सुरु होत्याच...पण सूरज आमच्या एक पाऊल पुढे होता. त्याने रस्त्यात 'लिफ्ट' मागण्यासाठी उभ्या असलेल्या एका पठाणाला मुद्दाम गाडीत बसवलं. रस्त्यात या पठाणाची भरपूर मस्करी करायची असा त्याचा 'प्लॅन' होता.
" तुम्ही कुठले?"
" आम्ही अफगाणिस्तानचे. हेरात नावाच्या गावात राहतो आम्ही.."
" दुबईला काय करता?"
" कामासाठी आलोय. इथल्या एका सुपरमार्केट मध्ये कामाला आहे."
" तुमची अफूची आणि कॉलीफ्लॉवरची शेती कशी चाललीय? " मागे बसलेल्या आम्हा तिन्ही पामरांच्या पोटात गोळा आला. मनातल्या मनात आम्ही रामरक्षा, हनुमान चालीसा आणि संकटातून सुटका व्हावी म्हणून जे जे काही शक्य होतं ते ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.
" डोकं फिरलोय का? मी अफू नाही पिकवत...हे हराम काम मी नाही करत." पठाण तडकला.
" अहो, चिडू नका. मी खूप ऐकून आहे या शेतीबद्दल म्हणून विचारलं.." सूरज निर्विकार.
" काय ऐकलंय?" पठणाचा आवाज आता रागाची शिव ओलांडून संतापाच्या दिशेला निघाला होता.
" मी ऐकलंय, की तिथे कॉलीफ्लॉवरचे मळे अफूच्या शेतीशेजारी पिकवतात, ते कॉलीफ्लॉवर लहान असताना त्यात अफूच्या पुड्या खोचतात. तो कॉलीफ्लॉवर वाढला कि पुडीच्या आजूबाजूने वाढतो आणि आत ती पुडी लपते. मग ते कॉलीफ्लॉवर एक्स्पोर्ट करतात तिथून..."
" हरामखोर, गाडी थांबव. तुझ्या गाडीसकट तू जहन्नुममध्ये जाशील...थांबव गाडी..." पठणाचा संयम सुटला. रागारागाने तो उतरला आणि गाडीचा दरवाजा दाणकन आपटून त्याने आमच्याकडे ढुंकूनही न बघता चालायला सुरुवात केली. " अरे यहां तक छोडने का शुक्रिया तो काहो" सूरजने अजून आगीत तेल ओतलं. किलोमीटरभर तरी आम्हाला त्या पठाणाच्या शिव्या आणि शाप ऐकू येत होते.
" एखाद दिवस आम्ही पण मरू तुझ्यामुळे...सूरज, मस्करीची एक सीमा असते...काय हे.." आमच्या एका मित्राने त्रागा सुरु केला. दुसऱ्याने सूरजला दुबईमध्ये अमली पदार्थांचे नियम किती कडक आहेत यावर प्रवचन देऊन पुन्हा अशी आगळीक न करण्याची तंबी दिली. सूरजवर काही परिणाम झाला असेल असं वाटलं नाही, कारण त्याने त्यापुढेही मस्करीच्या नावाखाली असले जीवघेणे प्रकार करणं थांबवलं नाही.
एके दिवशी त्याच्याबरोबर आमचा जेवणावरून वाद झाला. बंगाली जेवणापेक्षा महाराष्ट्रीयन आणि गुजराथी जेवणात जास्त वैविध्य आहे आणि चव आहे, या वाक्याला त्याने जवळ जवळ सत्याग्रहच सुरु केला. आम्ही त्या दिवशी दुपारचं जेवण बंगाली आणि संध्याकाळचं जेवण गुजराथी - महाराष्ट्रीयन रेस्टोरंटमध्ये करून आम्ही त्या वादाचा निष्कर्ष काढायचं ठरवलं. बंगाली जेवण जेवताना आम्ही मनापासून जे जे आवडलं त्याला दाद दिली आणि जे नाही आवडलं ते नक्की कशामुळे नाही आवडलं हेही सांगितलं. संध्याकाळी जेवताना संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायची वेळ सूरजची होती.
" असाच, याला भाकरी म्हणतात का...मला शेणाची गोवरी वाटली. तेच म्हंटलं, ही कशी खाणार...आणि लोक म्हणतील सूरजने शेण खाल्लं...."
" डाळीत साखर घालतात का तुमच्यात? मग त्यात गुलाबजाम पण घाला ना..."
" अरे, उंधियु म्हणजे काय आहे माहित्ये, स्वयंपाकघरात उरलेलं सगळं घ्यायचं आणि त्याला फोडणी द्यायची...३०-४० व्यंजनं एका भाजीला कशी लागतील?"
शेवटी आम्ही त्याला चिडून " तुला नावं ठेवायची असतील तर आपण शांत राहूया....." असं सुनावल्यावर स्वारी जराशी वरामली. पण तरीही जेवणानंतर " बंगाली जेवणापुढे हे काहीच नाही..." म्हणून आपलं म्हणणं त्याने पुढे रेटलंच.
एकूणच काय, या माणसाला कसलीही भीती न बाळगता वाट्टेल ते करण्याचं वरदान त्याच्या कालीमातेने दिलेलं होतं आणि त्यामुळेच आम्ही त्याच्याशी 'बंगाल'शी संदर्भ असलेल्या विषयावर वाद घालणं सोडून दिलं. हा खुशालचेंडू आपल्या मस्तीत बेफिकिरीने जगत होता आणि तरीही त्याच्याकडे आपल्या जवळच्या लोकांबद्दल अतीव प्रेम होते. रात्री दोन वाजताही त्याने एका क्षणाचा विचार न करता आमच्यातल्या एकाला अडचणीत असताना मदत केली होती आणि तेही स्वतःच्या खिशातून खर्च होत असल्याची पर्वा नं करता.
या माणसाला मुळातच अनिर्बंध जगायची सवय असल्यामुळे आणि कदाचित घरातून त्याला विरोध होत असल्यामुळे त्याने घरच्यांशी जेमतेम संबंध ठेवले होते. त्याचं घरच्यांवर प्रेम नव्हतं असं नाही, पण त्याला त्यांच्या सूचना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातली ढवळाढवळ वाटत असल्यामुळे त्याने घरच्यांना एका अंतरावर ठेवलं होतं. अशा या मनस्वी आणि बिनधास्त माणसाच्या आयुष्यात पुढे एक असं वादळ आलं, ज्यात त्याच्याबरोबर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक काळाकुट्ट अध्याय लिहिला गेला.
साध्या खोकल्याचं निमित्त होतं. महिनाभर खोकला जायचं नाव घेत नाही म्हणून त्याने दुबईलाच एका मोठ्या नाक-कान-घसा तज्ज्ञाला भेटायचं ठरवलं. त्याने शंका अली म्हणून काही टेस्ट केल्या आणि आमच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ते रिपोर्ट्स आले. सूरजला शेवटच्या टप्प्यात पोचलेला श्वासनलिकेच्या कॅन्सर झाल्याचं निदान झालं. अर्थात त्याचे घरचे सुद्धा हादरले. एकुलता एक मुलगा ऐन विशीमध्ये असल्या दुर्धर आजाराला सामोरा जाताना बघून घरच्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली. त्यानंतर सूरज कलकत्त्याला परत गेला. तिथल्या कॅन्सरतज्ञाकडे त्याचे उपचार सुरु झाले.
सहा महिन्यात त्या पावणेसहा फुटाच्या तगड्या माणसाचं पूर्णपणे चिपाड झालं. केमोथेरपीचे उपचार शरीराची चाळण करून टाकतात, हे माहित असल्यामुळे मी कधीही त्याच्याशी 'विडिओ कॉल' केला नाही. मित्रांकडून कळत होता, की तो यातून सावरायची शक्यता धूसर आहे. त्याच्या बहिणीने सगळं काही सोडून आपल्या भावाच्या सेवेसाठी कलकत्त्याला तळ ठोकला होता. वडिलांनी मदुराईमधलं आपलं वडिलोपार्जित शेत आणि घर विकून पैसा उभा केला होता. एका दुर्धर आजाराने सूरजच्या घराचा पाया खचल्यासारखा झाला होता.
" काय रे, लवकर बरा हो....दुबईला अजून खूप लोकांना छळायचंय अजून..." मी त्याच्याशी एकदा फोनवर बोलत होतो.
" नक्की. पण मान्य कर, बंगाली जेवणासारखं जेवण नाही दुसरं..." त्याचा मूळ स्वभाव तसाच होता. अशा अवस्थेतही त्याला टिवल्याबावल्या सुचत होत्या.
" चल मान्य केलं...तू आला कि तुझ्या आवडीच्या बंगाली रेस्टॉरंट मध्ये मी पार्टी देणार तुला..."
" तुझ्याकडून काय पार्टी घेणार मी...शाकाहारी लोकांकडून पार्टी घेतली तर आयुष्य कमी होईल माझं..." त्याच्या या विनोदावर मला जराही हसू आलं नाही.
" तू ये, मी तुझ्यासाठी हिल्साची आमटी खाईन...वचन आहे माझं..."
" ठीक आहे...पण नाही खाल्लीस तर मी तोंडात जबरदस्तीने टाकेन...खोटं नाही सांगत..."
शेवटी अश्याच गप्पा झाल्यावर मी शब्द फुटायला कठीण व्हायला लागल्यामुळे आवरतं घेतलं. दुबईला अवघ्या सहा महिन्यांची मैत्री असूनही मला माझ्या आयुष्यात काहीतरी हरवल्यासारखं जाणवत होतं. नियतीपुढे हतबल होणं काय असतं याचा माझं हा पहिला अनुभव होता...
आणि तो दिवस उजाडला...खरंतर रात्रच. आमच्या शेवटच्या संभाषणानंतर तीन दिवसांनी मला अपेक्षित पण मनापासून नकोशी असलेली ती खबर मिळाली. रात्रभर मी टक्क जागा होतो. रडू येत नव्हतं कारण त्याच्या सगळ्या आठवणी इतक्या मजेशीर होत्या, की काहीही आठवलं तरी आपोआप हसू फुटत होतं. दुसऱ्या दिवशी फोनवर त्याच्या घरच्यांचं मी माझ्या कुवतीप्रमाणे आणि कुवतीइतकं सांत्वन केलं. घरचे हताश झालेले होते. त्याही अवस्थेत त्याच्या वडिलांनी मला सूरजने शेवटी जे काही आपल्या घरच्यांना सांगितलं, त्याची माहिती दिली. त्याला दर वर्षी त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी घरच्यांनी एकत्र येऊन मनसोक्त धमाल करावी अशी इच्छा होती. " मी गेलो म्हणून रडत नाही बसायचं...उलट मनाला येईल तो वेडेपणा करायचा...मस्त हसायचं आणि माझी आठवण काढताना चेहेऱ्यावर फक्त हसू असेल इतका बघायचं..."
माझ्यासाठी हे सगळं पचवणं जड होतं. काही वेळ मी शून्यात बघत बसलो आणि शेवटी सूरजला स्मरून मी माझ्या मित्रांना फोन केला. संध्याकाळी भेटायला बोलावल्यावर त्यांनी " काय प्लॅन आहे?" हा परवलीचा प्रश्न केला.
" काही नाही...एकत्र बसुया, भंकस करूया, मनसोक्त हसूया आणि मस्त संध्याकाळ एन्जॉय करूया..." मी तरी वेगळं काय सांगू शकणार होतो?
किती हृदय आठवणी
किती हृदय आठवणी
चटका लावून माणसं जातात.
चटका लावून माणसं जातात.चांगले लिहिलंय.