शाप आणि वरदान यातली सीमारेखा काही वेळा खूप धूसर असते. जे अमरत्व हनुमानाचं तेच अश्वत्थाम्याचं, पण दोघांच्या नशिबात आलेले भोग त्या अमरत्वाला वेगवेगळा अर्थ देत असतात. रेखीव चेहेरा, बांधेसूद शरीर आणि शुभ्र गोरा वर्ण समाजाच्या प्रचलित व्याख्येनुसार कोणत्याही स्त्रीला सौंदर्याची अनेक विशेषणं देण्यायोग्य जरी करत असला, तरी त्या स्त्रीचा जन्म अश्वत्थाम्याच्या कुळातला असेल, तर त्या नशिबाचे विश्लेषण करायला कोणतीही पत्रिका कमी पडते.
दुबई हे शहर जगातल्या अनेक देश-प्रदेशातून आलेल्या लोकांमुळे खऱ्या अर्थाने विश्वव्यापी आहे. पावलो पावली नवे नवे लोक इथे भेटतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब असल्यामुळे का होईना, पटकन संवाद सुरु करतात. एकटा जीव सदाशिव असल्यामुळे सवयीप्रमाणे एका सुटी च्या दिवशी दिवसभर दुबई ची भ्रमंती करायच्या उद्देशाने बाहेर पडलो होतो आणि स्वतःची गाडी नसल्यामुळे बसमध्ये बसून थोड्या लांबच्या अंतरावर असणाऱ्या एका मॉल मध्ये निघालो होतो. बस मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती आणि सुट्टी असल्यामुळे अनेक पठाण लोक जीवाची दुबई करायला बस मध्ये चढले होते. सहा-सव्वा सहा फूट उंच आणि जवळ जवळ तितकेच रुंद असलेले ते अजस्त्र पठाण आजूबाजूला असल्यामुळे थोडा अंग चोरून मिळालेल्या सीट वर मी सावरून बसलो, तोच एक नाजूक आवाज कानावर पडला....
" CAN I REQUEST YOU FOR YOUR SEAT? "
अजस्त्र पठाणांच्या मधून एक नाजूक आणि साधारण सत्तावीस-अठ्ठावीस वर्षाची मुलगी केविलवाणी होऊन विनंती करत होती. मुंबई मध्ये कधी कधी टोलेजंग इमारतींमध्ये अचानक एखादं सुंदर बैठं घर दिसलं की जसं वाटतं, तसं काहीसं दृश्य समोर होतं. स्त्रीदाक्षिण्य हा घरातून मिळालेला संस्कार अचानक अदृश्य रूपात समोर उभा राहिला आणि पुढचा अर्धा तास आजूबाजूच्या त्या महाकाय देहांमध्ये आपला चरख्यातला ऊस होणार आहे हे माहित असूनही मी जागा रिकामी केली. त्या मुलीला बसल्यावर झालेला आनंद तिने एक चॉकलेट काढून हातावर ठेवून व्यक्त केला. तिच्याकडे बघून ती चीन किंवा चीन च्या आजूबाजूच्या देशांपैकी एका देशातून आलेली असावी हे समजत होतं, त्यामुळे भाषेची अडचण तिने त्या चॉकलेटच्या माध्यमातून दूर केली असावी असा मला वाटून गेलं.
थोड्या वेळाने पठाणांची गर्दी ओसरायला लागली आणि एक एक सीट रिकामी व्हायला लागली. मला समोरची सीट मिळाल्यावर मी बूड टेकवणार, तोच मागून पुन्हा तोच आवाज ऐकू आला -
" CAN I SIT NEXT TO YOU ? "
आता पुढच्या अर्ध्या तासासाठी ही मुलगी आपल्या बाजूला बसणार, या कल्पनेने मी थोडा सुखावलो. नाही म्हणायला बस मध्ये बाकीच्या वाळवंटात हि एकमेव हिरवळ असल्यामुळे आणि आपल्या बाजूच्या रिकाम्या जागेवर एखादा अजस्त्र पठाण बसू शकेल हि भीती असल्यामुळे मी तिची विनंती मान्य केली.
" वात इस यूर नेम माय फ्रेंड?'
तिने तिच्या चिनी वळणाच्या इंग्रजीत पहिला प्रश्नाचा खडा टाकला. मराठी माध्यमात शिक्षण झालेलं असलं तरी मेहेनतीने इंग्रजीवर मिळवलेल्या प्रभुत्वाचा फायदा उत्तर देताना झाला. मग मी सुद्धा काहीशा अवघडलेल्या आवाजात तिला तिचं नाव विचारलं.
" ROSE "
मी थोडासा गोंधळलेला दिसल्यामुळे पुढे तिनेच खुलासा केला -
" माय जुंग इस माय व्हिएतनाम नेम... ROSE इस माय बीसीनेस नेम "
" BUSINESS ? "
" i work here as escort lady "
मी दोन मिनिटं स्तब्ध झालो. हि मुलगी नक्की आपल्या बाजूला का येऊन बसलीय, असा विचार मनाला शिवून गेलं आणि त्या थंडीत कपाळावर घामाचे थेंब जमा झाले.
मी अवघडलोय हे तिला कळलं असावं, कारण तिने स्वतःच पुढे बोलायला सुरु केलं..
" I AM NOT ASKING YOU TO COME TO MY ROOM .... DON'T WORRY . IF YOU DON'T WANT TO TALK I AM SORRY DEAR .... I WILL CHANGE SEAT ...."
मला थोडंसं ओशाळल्यासारखं झालं. एका प्रोजेक्ट साठी ARCHITECTURE COURSE च्या ३ऱ्या वर्षात मुंबईच्या वेश्यावस्तीत फेरफटका मारलेला आठवला आणि वेश्यांकडे माणूस म्हणून बघावं, भोगवस्तू म्हणून नाही वगैरे उपदेश केलेले आठवले आणि पटकन स्वतःची लाज वाटून गेली. इतरांना उपदेश देणं सोपं असतं पण स्वतः वर वेळ आली की आपणही तीच चूक कशी करतो याची जाणीव झाली आणि मी तिच्याशी संभाषण सुरु करायचं ठरवलं.
ती मुलगी व्हिएतनाम सारख्या एका शापित देशाची नागरिक होती. हा देश तसा इतिहास समृद्ध, अगदी ५००,००० बी.सी. च्या काळातले मानवी वस्तीचे पुरावे असलेला. नंतरच्या काळात हुंग राजांनी या देशावर राज्य केलं, मग चिनी सम्राटांनी हा देश आपल्या अखत्यारीत आणला. सोळाव्या शतकात पोर्तुगीज या देशात आले आणि त्यानंतर फ्रेंच, जपानी, इंडोनेशियन अशा वेगवेगळ्या साम्राज्यांनी या देशावर आपापली सत्ता गाजवली. शेवटी शीतयुद्धाच्या वेळी साम्यवादी गटात सामील झाल्यावर अमेरिकेने येथे प्रदीर्घ युद्ध करूनही या चिमुकल्या देशाने त्यांच्या अत्याचारांचा जबरदस्त प्रतिकार करून आपला अस्तित्व कायम ठेवलं. या सगळ्यात भरडली गेलेली अर्थव्यवस्था आणि त्यामागून आलेली गरीबी या देशाला आत्ता आत्तापर्यंत त्रास देत होती.
व्हिएतनाम ने मागच्या १५-२० वर्षात चीन च्या पावलावर पाऊल ठेवून समाजवादी आणि भांडवलशाही या दोहोंमधील मध्यम मार्ग शोधून काढला आणि स्वतःचा विकास साध्य करायला सुरुवात केली. मुळात समाजवादी विचारसरणीचा इतका खोल प्रभाव या देशावर आहे, की आज सुद्धा हा देश त्या विचारसरणी पासून पूर्णपणे विलग झालेला नाहीये, परंतु तरीही समृद्धी प्रत्येकाला समसमान मिळालेली नसल्यामुळे तिथे आज सुद्धा आर्थिक विषमता आहे.
हि मुलगी अशाच एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली होती. तिने आपल्या जन्मदात्याचं नाव आणि घरी असलेल्या एका फोटो मधला चेहेरा इतकाच ' बाप ' पहिला होता. तो तिच्या आई च्या पदरात चार अपत्य 'टाकून' पुढची मौज मजा करायला कुठेतरी कायमचा निघून गेला होता. आई गरिबी, चार मुलांची जबाबदारी आणि शिक्षण नसल्यामुळे न मिळणारं काम या दुष्टचक्रातून बाहेर पाडण्यासाठी शेवटी 'घराबाहेर' पडली. मध्यम वय आणि परिस्थितीच्या 'खुणा' अंगावर असल्यामुळे बाई बाहेरच्या देशात जाण्यायोग्य नाही, सबब शहरातल्या वेश्यावस्तीत देशी गिर्हाईकांना तिने आपली 'सर्विस' द्यावी असा सल्ला एकाने दिला आणि तिने स्वतःकडे असलेली एकमेव संपत्ती - आपला देह - समाजाला अर्पण केला.
हे सगळं ऐकत असताना पांढरपेशा मनाला सतत जाणवत असलेलं अवघडलेपण मला हळू हळू टोचायला लागलं. साजूक तुपातले सुशिक्षित घरातले मध्यमवर्गीय संस्कार हळू हळू पोकळ वाटायला लागले आणि वर्तुळाबाहेरच्या जगातलं हे उघडं नागडं सत्य मला माझ्यामध्ये असलेल्या पुस्तकी विचारांमधला फोलपणा अधिकाधिक गडद करून दाखवायला लागले.
' why did you choose the same life ? you could have studied well and done something better? "
माझ्या तोंडून हा प्रश्न बाहेर पडत असताना मला आपण काहीतरी चुकीचा विचारतोय का असं क्षणभर वाटून गेलं...पण शब्द निसटून गेले होते. माझ्या नकळत मी तिच्या भूतकाळाच्या एका हळव्या कोपऱ्यात तिने जपून ठेवलेल्या काही स्मृतींना हात घातला होता.
' I AM POST GRADUATE IN CONTEMPORARY MUSIC ..' माझ्या पायाखालची जमीन हादरली.
ही मुलगी संगीत शिकलीय आणि हिने स्वतःच्या देशातल्या अव्वल संगीतकारांबरोबर काम केलंय हे ऐकून मी सर्द झालो. तिने मला तिचे VIOLIN वाजवतानाचे आणि स्टेज वर गाण्याचं सादरीकरण करतानाचे फोटो दाखवले आणि तिचं ८ वर्ष जुन पण तिने जपून ठेवलेलं तिचं VISITING CARD सुद्धा दाखवलं. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता आणि हे तिला बहुधा कळलं होतं, कारण तिनेच तिची कहाणी सांगायला सुरु केली.
ही शापीत अप्सरा लहान असल्यापासून संगीत शिकायला जात होती. आपल्या कलेच्या हिमतीवर तिने शिष्यवृत्ती मिळवून degree आणि post graduation पूर्ण केलं होतं. देशातल्या उत्तमोत्तम संगीतकारांकडे काम करायच्या जिद्दीने तिने खूप मेहेनत केली होती आणि शेवटी HOANG CUONG या व्हिएतनाम च्या अव्वल संगीतकाराकडे तिने व्यावसायिक काम करायला सुरु केलं. स्वतःच्या दोन लहान भावंडांची तसंच शरीराची आणि त्याहूनही जास्त मनाची पार चाळण झालेल्या आपल्या आईची तिने काळजी घेऊन त्यांना सैगोन शहराच्या एका चांगल्या वस्तीत आणलं होतं. म्हाताऱ्या आईला शेवटचे दिवस समाधानाचे मिळावे म्हणून तिने तिच्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचे प्रयत्न मनापासून केले होते. मनुष्याच्या वेशातल्या अनेक लांडग्यांनी यथेच्छ ओरबाडलेल्या त्या क्षीण शरीरात पुन्हा एकदा भावना जागवायचा प्रयत्न ती मनापासून करत होती.
निसर्गाने स्त्री आणि पुरुष अशी दोन लिंगं जरी तयार केलेली असली, तरी त्या लिंगांचा वापर करायची बुद्धी त्याच शरीरात सर्वात उच्च जागी बसवलेल्या मेंदूला बहाल केलेली आहे. या दोहोंच्या मध्ये असलेलं हृदय जेव्हा या दोहोंमधला दुवा होत नाही, तेव्हा मनुष्यातला पशू जागृत होत असतो. असे पशू कोणताही रूपात आजूबाजूला असू शकतात आणि एखाद्या बेसावध क्षणी त्यांच्या हातात सावज अतिशय सहजतेने लागू शकतं. बाहेरच्या देशातून आलेल्या , देखण्या आणि तिच्यासारख्याच कलेच्या प्रांतात असलेल्या तिच्या एका सहकार्याकडे नकळत तिचं मन आकृष्ट झालं आणि पुढच्या सुखी आयुष्याची स्वप्न बघण्याचा काम या शापीत अप्सरेनं केलं, जी तिची आयुष्यातली मोठी चूक ठरली आणि आपणहून सावज होऊन ती एका पशूच्या हाताला लागली.
आईच्या भूतकाळाची माहिती त्याच्यापासून तिने लपवली नाही. त्याने तिला लग्नासाठी एक अट घातली...आई आणि भावंडांपासून लांब त्याच्या देशात राहायचं ,त्यांच्यापासून कायमचे संबंध तोडायचे आणि दर महिन्याला आई आणि भावंडांना त्यांच्या सगळ्या गरजा पुरतील इतके पैसे पाठवून त्यांना चांगला आयुष्य जगू द्यायचं. यात सगळ्यांचा फायदा आहे, हे तिला पटत नसला तरी तिच्या क्षीण झालेल्या आईला मात्र यात सगळ्यांचा फायदा दिसत होता. आपल्या भूतकाळामुळे मुलांच्या भविष्यासाठी आपण एक अडचण ठरणार आहोत हे तिला दिसत होतं आणि त्यामुळे तिने आपल्या मुलीला राजी केलं आणि शेवटी ही मुलगी आपल्या देशातून दूर निघून आली.
' I STILL DON'T UNDERSTAND WHY YOU CHOSE THIS LIFE ....EVERYTHING WAS SO GOOD RIGHT ? ' माझा दबकत आलेला प्रश्न. तिने पुढे जे सांगितलं, ते ऐकून सुन्न होणं म्हणजे काय हे मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा अनुभवलं!
ज्या मुलासाठी तिने आपल्या आईला, भावंडांना, सहकाऱ्यांना आणि देशाला सोडलं, तो मुळात देहविक्री साठी वेगवेगळ्या देशातून 'नवा कोरा आणि कोवळा माल' शोधून आणणारा एक व्यापारी होता. आपल्या मालाची चोख किंमत वसूल करून त्याने तिला AMSTERDAM च्या एका उच्चभ्रू लोकांसाठी खास राखीव असणाऱ्या VIP ESCORT AGENCY मध्ये विकून टाकली. गोरी कांती,कमी वय, ' तुलनेने कुमारिका ' असल्यामुळे असलेलं नितळ शरीर आणि उच्चभ्रू पुरुषांना आवडणाऱ्या 'EXOTIC' वर्गात मोडणारी स्त्री अशी जबरदस्त पात्रता असलेला हा ' माल ' तिथे अल्पावधीत खूप 'लोकप्रिय' झाला. हे आपल्या घरी आपल्या भावंडांना आणि आई ला कळू ना देण्याची जबाबदारी घेऊन तिने त्यांना दर महिन्याला कबूल केलेले पैसे नित्यनेमाने पाठवायला सुरु केलं आणि त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणले. ती आता वेगवेगळ्या देशातल्या उच्चभ्रू लोकांच्या शरीराच्या गरजा भागवणारी एक मोठी असामी झाली होती आणि आपल्या मेलेल्या मनाची पुरेपूर किंमत ती अशा प्रत्येक ' पुरुषाकडून ' चोख वसूल करत होती.
एव्हाना आमची बस इष्टित स्थळी पोचली होती. पुन्हा एकदा पांढरपेशा संस्कारांचा पडदा मध्ये आला आणि मनापासून इचछा असूनही तिला एक घट्ट मिठी मारायचं मला धाडस झाला नाही. खाली उतरल्यावर मी तिला माझा नंबर दिला आणि काही मदत लागली तर.... चं नेहेमीचं वाक्य फेकलं. मला मदत फक्त पोलिसांनी पकडल्यावर लागते आणि ती मी तुझ्याकडून कधीही घेऊ शकत नाही, असं कानात शिशाचा रस ओतल्यासारखा उत्तर मला अजून अस्वस्थ करून गेलं. पुष्कळ दिवसांनी तिने कोणाबरोबर संवाद साधला असावा, कारण किंचित ओल्या झालेल्या डोळ्यांवर तिने GOGGLE चढवला आणि बाहेरच्या जगाला आत चाललेली घालमेल दिसू ना देण्याची खबरदारी घेतली. हातातल्या फ़ोन वर एक नंबर फ्लॅश झाला, तिने फोन कानाला लावला आणि सांगितल्या गेलेल्या दिशेने ती चालायला लागली.
मी तशाच अवस्थेत शून्यात बघत मागे वळून मॉल च्या दिशेने चालायला लागलो. अचानक एक हाक ऐकू आली...ती घाईघाईत चालत येताना दिसली. फ़ोन आल्यामुळे 'थँक्स' म्हणायला विसरली म्हणून पुन्हा आले, असं सांगून तिने GOGGLE काढला. बाहेरच्या जगातला व्यक्तीला तिने कदाचित खूप वर्षांनी आपले अश्रू दिसू दिले असावेत...HANDSHAKE करून ती हसली आणि निरोप घेताना मला तिच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत इतकाच म्हणाली...' NEVER CHEAT WITH ANYONE '
त्या पाठमोऱ्या आकृतीला मी मनातल्या मनात सलाम केला. त्या क्षणी माझ्या लेखी ती व्यक्ती आजूबाजूच्या सभ्यतेचा मुखवटा घालून फिरत असणाऱ्या हजार लोकांपेक्षा जास्त सभ्य आणि सुसंस्कृत होती!
लेख आवडला.सुन्न झालं.
लेख आवडला.सुन्न झालं.
लेख आवडला.
लेख आवडला.
लिंग, बुद्धी आणि हृदय यांत केलेली गुंफण अप्रतिम!
मला पडलेला प्रश्न - तिला फसवून Amsterdam मध्ये विकल्यावर ती प्रतिकार का नाही करू शकली?
असं कोणाही मुलीला कस काय मर्जिविरुद्ध काम करायला लावू शकतात?
त्यांचे कायदे इतके पोकळ आहेत यावर विश्वास नाही बसत...
कारण मुळात तिचा विचार हा
कारण मुळात तिचा विचार हा होता की घरचे अंधारात आहेत पण सुखी आहेत. प्रतिकार आणि घरच्यांचं सुख यात तिने दुसरा पर्याय निवडला. इथे कायदा काय करणार? समाज सुधारला पाहिजे!
आतून हादरवलेय या प्रसंग
आतून हादरवलेय या प्रसंग वर्णनांने
धन्यवाद !
धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.
https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/
माणूसकी हरवत चालली आहे
माणूसकी हरवत चालली आहे
पुर्ण माहिती शिवाय कुणावरही विश्वास ठेवू नये
बाप रे!!! दाहक वास्तव. आपल्या
बाप रे!!! दाहक वास्तव. आपल्या दृष्टीपल्याड, एक असंही जग आहे. दुर्दैवाने ....