वाल्मिकी

Submitted by Theurbannomad on 12 March, 2020 - 09:46

आफ्रिकेच्या देशांमधला त्यातल्या त्यात प्रबळ, लोकसंख्येने समृद्ध आणि अर्थकारणाच्या बाबतीत आजूबाजूच्या भावंडांपेक्षा उजवा असेलला देश म्हणजे नायजेरिया. या देशाच्या जमेच्या बाजूमध्ये अनेक गोष्टी लिहिता येऊ शकतात हे खरं असलं, तरी त्यापेक्षा कैक पटीने अधिक गोष्टी विरुद्धच्या रकान्यात भरता येऊ शकतात. या देशाच्या तरुणांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून जास्त असल्यामुळे रूढार्थाने हा देश प्रगतीच्या शिखरावर असणं जरी अपेक्षित असलं, तरी भ्रष्टाचार, देशांतर्गत हिंसाचार, संघटित गुन्हेगारी यामुळे या तरुणांचा ओढा नको त्या दिशेला जास्त आहे. जगभरात अनेक देशांमध्ये नायजेरिअन तरुण-तरुणींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा होणं हि रोजची बातमी झालेली आहे.

'अलाके ' असं साधारण भारतीय माणसाला उमजायला कठीण पद्धतीचं नाव असलेला, सव्वासहा फूट उंच, अंगापिंडाने मजबूत, पिवळसर पांढऱ्या बटबटीत डोळ्यांचा आणि घोगऱ्या आवाजात आफ्रिकन शैलीत इंग्रजी बोलणारा हा माणूस मला माझ्या एका प्रोजेक्टचं काम करत असताना भेटला. अबू धाबी इथल्या कोर्टाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा काम आमच्या ऑफिसला मिळालेलं होतं. त्या कामात एका खास इमारतीची संरचना आम्हाला करायची होती, ज्यात कंसाच्या कैद्यांना काही काळापुरतं ठेवण्यासाठी एक छोटेखानी तुरुंग आम्हाला तयार करायचा होता. त्या संदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायला आम्ही गेलो असताना आम्हाला तिथे हा एका पोलिसांबरोबर आणि वकिलाबरोबर संभाषण करताना दिसला.

त्याच्या कोणत्यातरी मित्रावर चोरीचा आरोप असल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. ज्याने आरोप केले, तो मालक आपल्या वकिलाबरोबर तिथे आलेला होता. बोलणं कानावर पडलं तेव्हा कळलं की अलाके आपल्या बोबड्या इंग्रजीत त्या सगळ्यांबरोबर आणि मुख्यत्वे त्या वकिलाबरोबर कसाबसा आपल्या मित्राच्या सुटकेसाठी वाटाघाटी करत होता. त्याला आपल्या मित्राने केलेली चूक माहित असावी, कारण त्याने चोरलेले पैसे आणि वर अजून थोडे पैसे देऊन त्याला मित्राची तुरुंगवारीपासून सुटका करायची होती. शेवटी त्या मित्राला कायमचा देशाबाहेर घालवायची आणि चोरलेली रक्कम त्या मालकाला परत करायची हमी देऊन त्याने कसाबसा तो समझोता घडवून आणला. सगळ्यांना त्यांचे पैसे देऊन त्याने तिथेच बाजूला ओशाळवाण्या चेहेऱ्याने उभ्या असलेल्या त्याच्या त्या मित्राला नायजेरिअन मातृभाषेत शिव्यांची लाखोली वाहिली आणि तिथून ताबडतोब राहत्या घरात जाऊन सामान आवरायला सांगितलं. मला त्याच्याकडे बघून सारखं त्याच्याबरोबर बोलावसं वाटत होतं, पण कामाच्या गडबडीमुळे आणि मुळातच आफ्रिकेच्या लोकांबद्दल वाटत असलेल्या चमत्कारिक भीतीमुळे मी त्याच्याशी बोलायला धजावत नव्हतो.

जेवणाची वेळ झाल्यावर मी कोर्टाच्या आवारात असलेल्या 'फूड कोर्ट' मध्ये गेलो. हातात जेवणाचं ताट घेऊन एका कोपऱ्यात बसलो, तोच मला हा अलाके बाहेर उभा राहून हातातल्या बाटलीतून घोट घोट पेप्सी पिताना दिसला. शेवटी धीर करून मी त्याला आत बोलावलं आणि थोडा वेळ बोलू शकतो का म्हणून विचारणा केली.

" मला भूक लागलीय, पण जेवायला पैसे नाहीयेत. आज संध्याकाळी टॅक्सी परत दिली की माझ्या खोलीवर जाऊन जेवण करेन...रिकाम्या पोटी तुला काय सांगू मी?"

" मी घेतो तुझ्यासाठी जेवण...चालेल?"

" तू कोण आहेस? वकील कि NGO वाला?"

" यातला कोणीही नाही." मग मी माझी थोडक्यात माहिती त्याला दिली.

शेवटी पोटाची भूक त्रास देत असल्यामुळे अनिच्छेने का होईना, पण माझ्याशी बोलायला तो तयार झाला. हातात भला थोरला बर्गर, बाजूला मोठ्या ग्लासमध्ये कॉफी, एक केकचा तुकडा आणि एक केळ असं सगळं घेऊन तो माझ्यासमोर खुर्चीवर स्थानापन्न झाला.

" मला तूच स्वतःबद्दल सांग. मी काही तुला फारसं विचारणार नाही..." मी मुद्दाम त्याला खुली सूट दिली. हा मनुष्य किती बोलू शकतो, याला नक्की बोलण्यात किती रस आहे हे मला समजून घ्यायचं होतं.

त्याने बर्गर संपवल्यावर एक समाधानाची ढेकर दिली आणि त्याच्या तोंडून धबधब्यासारखे शब्द वाहायला लागले. आफ्रिकी वळणाचं बोबडं इंग्रजी आणि भरभर बोलायची शैली मला सुरुवातीला त्रास देत होती, कारण शब्द नीट समजून घेणं अवघड होत होतं. दहा-पंधरा मिनिटात मला त्याच बोलणं व्यवस्थित कळायला लागलं आणि मी त्या संभाषणाचा मूक श्रोता झालो.

हा माणूस नायजेरियाच्या 'ईग्बो' वंशाच्या लोकांपैकी होता. धर्माने ख्रिस्ती असूनही त्याच्या गळ्यात मला 'क्रॉस' दिसला नाही, त्यामुळे तो कदाचित फारसा धार्मिक नसावा असं मला वाटलं. ' कानो ' नावाच्या नायजेरियाच्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या शहराच्या एका झोपडपट्टीत - ' घेट्टो' वस्तीत तो जन्मला आणि वाढला. जन्मदाता सतत दारू, जुगार आणि नशेबाज लोकांच्या संगतीत असल्यामुळे आणि आई त्याच्यासकट अजून आठ-दहा मुलांचा कबिला वाढवण्यासाठी दिवसभर 'अंगमेहेनत ' करत असल्यामुळे 'बालपण' त्याच्या नशिबात आलंच नाही. तो कळत्या वयाचा झाल्यावर आपोआप 'कमावता' झाला. गल्लीबोळातल्या पोरांबरोबर पोटाची खळगी भरायला तो नको ते सगळे धंदे करायला शिकला. भुकेची जाणीव व्हायला नको म्हणून एकदा नशा केल्यावर त्याला अर्थात त्या नशेची सवय लागली. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत आठ-दहा वेळा तुरुंगवारी, एक वर्ष सुधारगृह, एका प्रेयसीपासून झालेलं एक मूल आणि सततच्या धूम्रपानामुळे कि नशेमुळे झालेला फुफ्फुसाचा संसर्ग इतकी या मनुष्याची 'अधोगतीची प्रगती' झालेली होती.

" तुझ्या लहानपणीच्या आठवणी अर्थात खूप त्रासदायक असतील ना? पण एक सांग, हे सगळं करताना कधीही यामुळे आपलंच आयुष्य कमी होतंय असं कधी वाटलं नाही?"

" आयुष्य वगैरे शब्द त्यांना शोभून दिसतात, ज्यांच्याकडे मुळात अन्न-वस्त्र-निवारा आहे. आमच्या वस्तीत रोज कोणीतरी रस्त्यात पडलेला दिसेल...कधी गेला, कशामुळे गेला कोणालाही पत्ता नसतो." त्याने बहुमोल माहिती पुरवली आणि मला माझ्या प्रश्नाची लाज वाटायला लागली.

" माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे मी बदललो. सत्तावीस वर्षाचा होतो तेव्हा...म्हणजे चार वर्ष झाली साधारण त्या घटनेला..." अलाके सांगत होता. " नायजेरियामध्ये मी एकवीस वर्षाचा होऊन तुरुंगातून सुटलो. तुरुंगात कोवळ्या कैद्यांशी जबरदस्तीने समलिंगी संबंध ठेवणाऱ्या एका जुन्या कैद्याची मी हाडं मोडली, म्हणून चक्क पोलिसांनी मला तीन महिने आधी सोडलं. कदाचित पोलिसांनाही तो आवरला जात नसावा..." अलाके आपले पिवळे दात दाखवत खदाखदा हसला. त्या हसण्यात मला आनंदापेक्षा भेसूरपणा जास्त जाणवला. " त्या तुरुंगाच्याच एका अधिकाऱ्याने मला त्याच्या घरी नोकर म्हणून रुजू केलं. मला गाडी चालवायला शिकवली. वेळप्रसंगी पैशांची मदत केली. तीन वर्ष मी काम केल तिथे. तिथेच मी कम्प्युटर आणि मोबाईल वापरायला शिकलो. तीन वर्षांनी अचानक त्या अधिकाऱ्याची दुसऱ्या जागी बदली झाली आणि त्याने मला रामराम ठोकला."

अलाके आपल्या आयुष्याची कहाणी सांगत असताना माझ्या डोळ्यासमोर ती सगळी दृश्यं झपझप एखाद्या चित्रफितीसारखी पुढेपुढे सरकत होती. ज्या विश्वामध्ये राहणं तर सोडा, पण पाऊल ठेवायलाही मी धजावणार नाही, तिथलं 'आयुष्य' फक्त जगण्याच्या संघर्षापुरतं मर्यादित होतं हे मला पदोनपदी जाणवत होतं आणि आपण तशा जागी जन्म नं घेतल्याबद्दल मला विधात्याचे आभार मानावेसे वाटत होते.

बेकार झाल्यावर हा मनुष्य पुन्हा एकदा नागमोडी वाटेवर गेला. आता त्याच्याकडे तंत्रज्ञानाची विशेष माहिती असल्यामुळे त्याने नायजेरियाच्या संघटीत गुन्हेगारीच्या विश्वात आपलं पाऊल ठेवलं. " मी कॉम्पुटर शिकलो त्याचा फायदा झाला. आमच्या देशात अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि 'इंटरनेट फ्रॉड' करणाऱ्या असंख्य टोळ्या आहेत. समांतर अर्थव्यवस्थाच आहे तिथे त्यांची. मी माझ्या संभाषण कौशल्याने आणि तंत्रज्ञानाच्या माहितीने तिथल्या एका 'बॉस' ला मस्त 'इंप्रेस' केलं. वर्षभरात त्याला मी पाच लाख डॉलर कमवून दिले...माहित्ये?"

" कसे?"

" अमली पदार्थाची तस्करी करायची आमची एक पद्धत आहे. आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये आमच्या माणसांना पर्यटक म्हणून पाठवतो...आमच्या खर्चाने. तुमच्या गोव्यामध्ये बरेच जण पाठवले मी...ते लोक अमली पदार्थ भरलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या पुड्या गिळतात. बायका आपल्या मेक-अपच्या साहित्यात, अंतर्वस्त्रांमध्ये, पर्सच्या हॅण्डलमध्ये आणि कुठे कुठे छोट्या छोट्या पुड्या दडवतात. साधारण बायकांशी वागताना विमानतळावर जास्त खोलात जात नाहीत पोलीस..." गुन्हेगारी विश्वाच्या अंतरंगाची ती सफर माझ्या अंगावर मिनिटामिनिटाला काटा आणत होती.

" पण माझी खरी कामगिरी होती ' हनी ट्रॅप' च्या व्यवसायात. मी प्रशिक्षित केलेली पोरं सोशल मीडियावर - फेसबुक, इंस्टाग्राम...तुला माहित असेलच... - सुंदर मुलींची प्रोफाईल बनवायची. मग आम्ही लोकांना मैत्रीची भुरळ घालायचो, त्यांच्याशी गुलुगुलु बोलायचो आणि मग त्यांचे खिसे रिकामे करायचो. " माझ्यासाठी हे सगळं ऐकायला नवीन नसलं, तरी प्रत्यक्षात या सगळ्यात सामील असणारा एक मनुष्य समोर बसून इतक्या विस्तृतपणे मला या सगळ्या गोष्टी सांगतोय, हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच मंत्रमुग्ध करणारा होता.

" आता काय करतोस? आणि इथे हे सगळं चालणार नाही तुला माहित्ये..."

इतका वेळ ओसंडून वाहणारा त्याचा शब्दांचा प्रवाह अचानक थिजला. त्याने अजून एका कॉफीची विनंती केली. अर्थात मी त्याला एक काय दहा कॉफी घेऊन द्यायला तयार होतो...त्याच्याकडून या सुरस गोष्टी ऐकण्याची संधी मला परत मिळणं शक्य नव्हतं. कॉफीचे दोन-तीन घोट घेऊन त्याने घसा खाकरला आणि बोलायला सुरुवात केली. आधीच जड असलेला त्याचा आवाज आणखी दसपटीने जड झाल्याचं मला लक्षात आलं.

" माझ्या दोन बहिणींना अमली पदार्थांची सवय लागली. एकीने त्या सवयीपायी आमच्या शहरातल्या श्रीमंत लोकांना 'हॉटेलमध्ये' भेटायला सुरुवात केली. दिवसभर स्वतःच्या सोयीची नशा करायची, रात्री इतरांच्या नशेची सोय व्हायचं. दुसरी बहीण तर पुड्या बनवायच्या कारखान्यातच काम करायची. एके दिवशी माझ्या 'बॉस' बरोबर तिथे गेलो तेव्हा अंगावर एकही कपडा नसलेली माझी स्वतःची बहीण मला तिथे दिसली. तिच्यासारख्या अनेक मुली आणि बायका तिथे होत्या. आपल्या कपड्यांमधून चोरी करून पुड्या परस्पर बाहेर नेऊ नये म्हणून कारखान्यात अंगावर एकही कपडा घालायची परवानगी नव्हती. माझ्या बहिणीच्या नजरेला नजर मिळवू नाही शकलो मी.... या सगळ्यात आपण सुद्धा सामील आहोत याची लाज वाटली मला. माझ्या डोळ्यासमोर माझा सगळा भूतकाळ उभा राहिला. एका मुलीला 'वापरून सोडून दिलेलं' , बॉसने दिलेल्या पैशांनी स्वतःच्या रात्री जागवलेल्या...माझ्या बहिणींच्या जागी कोणी दुसऱ्या मुली असल्या तरी त्या कोणाच्या ना कोणाच्या कोणीतरी होत्याच ना?" त्याचे डोळे मी बघितले आणि त्या काळ्या कातळाच्या आतून एक छोटासा पाण्याचा झरा फुटलेला मला दिसला.

दुसऱ्याच दिवशी अलाके आपल्या या गुन्हेगारीच्या विश्वातून बाहेर पडला. जीवावर बेतलं, मार खावा लागला आणि एकदा तर राहत्या घराला कोणीतरी आग लावून त्याला बेघर सुद्धा केलं. पण एकदा माणसाच्या मनाला मृत्यूची भीती वाटेनाशी झाली की त्याला कोणत्याही संकटांनी डगमगायला होतं नाही.

अलाके आता पुन्हा आपल्या जुन्या विश्वात कधीही जाणार नव्हता. मेहेनत करून आपल्या पोटापाण्याची सोय करायच्या जिद्दीने त्याने शहर सोडलं. आधी नायजेरियाच्या राजधानीत - लागोसला येऊन त्याने एका हॉटेलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू आपल्या स्वभावाने त्याने तिथे अनेक लोकांशी मैत्री जुळवली आणि ड्रायव्हरच्या हुद्द्यावरून एक एक पायरी चढत हॉटेलच्या ड्राइवर लोकांचा तो प्रमुख झाला.

" एकदा गाडीत शारजाचा एक शेख होता. घाईघाईत विमानतळावर निघालेला होता, फोनवर सतत कोणाशीतरी बोलत होता, म्हणून कि काय, पण गडबडीत तो त्याची बॅग मागच्या सीटवर विसरला. मला समजल्यावर मी गाडी वळवली. पुन्हा एकदा विमानतळावर नेली आणि तिथल्या ओळखीच्या एकाकडून तो विमानात बसला कि नाही याची विचारपूस केली. कशीबशी त्याच्यापर्यंत ती बॅग पोचती केली. एका आठवड्याने तो पुन्हा आमच्या हॉटेलमध्ये आला. मला शोधात शोधात ड्राइवर रूम पर्यंत आला. माझा त्याने भरभरून कौतुक केलं. मला माहित नव्हतं, पण त्याच्या त्या बॅग मध्ये त्याचं सोन्याचं घड्याळ, दहा हजार डॉलर, सोन्याचं पेन, दुसरा एक फोन असं काय काय होतं. त्याने मग मला इथल्या लोकांचा नंबर दिला, इथे ओळखीवर एका हॉटेलमध्ये कामाला लावलं आणि राहायची सोय केली. "

गेली दीड वर्षं अलाके शारजाला काम करत होता. आपल्या देशाच्या आणि वेळप्रसंगी आफ्रिकेच्या कोणत्याही देशाच्या लोकांना तो आपल्या परीने मदत करायचा. आपल्या ओळखीचा उपयोग करून एखाद्या नाजूक क्षणी वाकडं पाऊल पडलेल्या गरीब कामगारांना, टॅक्सीचालकांना, कुठे कुठे काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या लोकांना तो तुरुंगवारीपासून सोडवायचा प्रयत्न करायचा. आपल्या गावात तो दर महिन्याला तिथल्या एकुलत्या एका शाळेसाठी जमेल तितकी मदत पाठवायचा. ' AMNESTY ' योजनेमध्ये तुरुंगातल्या साध्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना यूएई सरकार अधून मधून मुक्त करत असते. हा त्या लोकांना आपल्या ओळखीचा उपयोग करून देऊन आपापल्या देशात पाठवायची सोय करून द्यायचा.

शेवटी दीड तास झाल्यावर कामाची आठवण होऊन मी उठलो. त्यानेसुद्धा हातातली थंड झालेली कॉफी रिचवली आणि तो माझ्याबरोबर बाहेर पडला. एका पांढऱ्या शुभ्र आलिशान गाडीकडे गेला. त्याच्या हॉटेलची ती गाडी तीन-चार तास उन्हात उभी होती. " तुला कुठे सोडू का?" त्याने आपणहून विचारलं.

" माझं इथल काम अजून थोडा वेळ आहे, धन्यवाद. "

" तुझा नंबर दे...तुझे जेवणाचे पैसे द्यायला येईन उद्या..."

" अरे नको...मी इतका वाईट नाहीये..."

" मी गरीब आहे, दरिद्री नाही. मगाशी माझ्या खिशात आणि बँकेत होते ते सगळे पैसे मी दिले माझ्या त्या मित्राला सोडवायला...म्हणून तुला तसदी दिली. फुकट जेवायची सवय सोडली मी केव्हाच..." तो पुन्हा एकदा भेसूर हसला.

" मित्रा, माझ्याकडून विनंती समज. पुढच्या वेळी भेटू तेव्हा तू मला कॉफी घेऊन दे...ठीक आहे?"

हसून त्याने गाडीचा दरवाजा उघडला. गाडी चालू करून पुन्हा एकदा तो बाजूला आला आणि काच खाली करून त्याने माझ्याशी हस्तांदोलन केलं. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सुचले नसावे. शेवटी नुसतंच हसून त्याने गाडी पुढे दामटवली.

रामायणात वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकली होती....पण आज ती मला खऱ्या अर्थाने ' समजली'.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या कथा वाचतेय..व्यक्तिवर्णन खूप छान करता तुम्ही..अगदी डोळ्यासमोर चित्र ऊभे राहते..

माणसं भेटतच असतात प्रत्येकाला...पण मुळात त्यांच्याशी संवाद साधता येणं महत्वाचं असतं. कोण काय बोलेल , कसा प्रतिसाद देईल किंवा आजूबाजूचे काय बोलतील याची पर्वा न करता आपण समोरच्याला बोलतं करून श्रोत्याची भूमिका स्वीकारली की आपोआप व्यक्ती उलगडत जातात. मॉल मध्ये वेळ घालवण्यापेक्षा रस्त्यावर, बागेत किंवा सार्वजनिक जागी वेळ घालवला की भेटतात असे अनेक वल्ली हा माझा तरी अनुभव आहे.