बृहन्नडा

Submitted by Theurbannomad on 12 March, 2020 - 01:18

वेश्याव्यवसाय हा जगातला कदाचित सगळ्यात जुना व्यवसाय असावा. लाखो वर्षांपूर्वी मनुष्य अस्तित्वात आला तेव्हापासून त्याची उत्क्रान्ती टप्प्याटप्प्याने होते आहे, असं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक आणि लैंगिक - अश्या तिन्ही पातळ्यांवर झाली आणि होत राहील, असंही विज्ञान सांगतं. मनुष्य हा ' समाजात ' राहणार प्राणी आहे, त्याच्या सामाजिक उत्क्रांतीत त्याने 'नाती' निर्माण केलेली आहेत आणि त्या नात्यांशी निगडीत चौकटीसुद्धा त्याने आखून घेतलेल्या आहेत, असा समाजशास्त्रीय सिद्धान्त त्या उत्क्रांतीवादाबरोबर सांगितला जातो. सर्वसामान्य पातळीवर हे सगळं जरी सोपं वाटत असला, तरी काही वेळा असे काही अनुभव आयुष्यात येतात, ज्यामुळे काही मनुष्यांची ' मानसिक' आणि 'लैंगिक' उत्क्रांती शारीरिक उत्क्रांतीच्या अनेक वर्ष मागे राहिल्याची प्रचिती येते आणि समाजशास्त्रीय चौकटीचा पोकळपणा ठळकपणे अधोरेखित होतो.

मुळात भपकेबाज, सुंदर, नीटनेटकं बघून त्याचा आनंद लुटण्यापेक्षा एखाद्या गोष्टीची न दाखवली जाणारी किंवा न दिसणारी बाजू शोधण्यात जास्त रस असल्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माझी पावलं तिथल्या रस्त्यांपेक्षा गल्ल्यांकडे जास्त आकर्षित होतात. चकचकीत इमारतींपेक्षा मोडक्या जुनाट भग्नावशेषांत मला त्या शहराची प्रतिमा बघायला जास्त आवडते. जर इमारत बांधताना विटांचे थर सुबकपणे मांडले गेले तर त्या भिंतींवर रंगांचा मुलामा देण्याची गरजच नाहीशी होते, त्याचप्रमाणे कोणत्याही जागेचा, समाजाचा, संस्कृतीचा गाभा सुंदर असला की वेगळ्याने चेहरा तयार करायची खटपट करावी लागत नाही. पहिल्यांदा सिंगापूरला जायचा योग्य जेव्हा आला, तेव्हा त्या एखाद्या छोट्याशा शहराइतक्या आकाराच्या देशाबद्दल लोकांनी मला अतिशय चांगल्या आठवणी सांगितल्या आणि या देशाच्या 'गाभ्याला' हात घालायचा विचार मी विमानात पाऊल ठेवायच्या आधीच मनात पक्का केला.

साधारणतः कोणताही देश स्वच्छतेबद्दल जागरूक असतोच, पण हा देश मात्र त्या बाबतीत खूपच काटेकोर होता. नियम मोडल्याची शिक्षा केवळ आर्थिक नाही, तर शारीरिक सुद्धा होती आणि अट्टहासाने तिथल्या शासनकर्त्यांनी ती तशीच ठेवून लोकांना कायद्याची योग्य भीती वाटेल अशी तजवीज करून ठेवली होती. जिथे तिथे सुशोभीकरण, हिरवळ, झाडी, रस्त्यांवरून अथवा खालून जाणारे सायकलस्वारांसाठीचे खास मार्ग, अतिशय शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतूक अश्या अनेक गोष्टी पहिल्या दोन दिवसात अनुभवायला मिळाल्या आणि या देशाचा ' चेहरा ' दृष्ट लागावा इतका सुंदर आहे हे मला पुरेपूर समजलं.

नवखा असल्यामुळे या देशामध्ये कोणाबरोबर दोस्ती करावी, आपल्याला हवी असलेली माहिती कशी काढावी याचाच मी विचार करत असताना अचानक मला वर्तमानपत्रात तिथल्या एका ठिकाणी ' फक्त प्रौढांसाठी ' आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाची जाहिरात दिसली आणि उत्सुकता चाळवल्यामुळे आपोआप संध्याकाळनंतर पावलं त्या दिशेने वळली. सिंगापूरच्या ' बुगीस स्ट्रीट ' नावाच्या रस्त्यावर हे प्रकार आयोजित होतात, तिथेच आजचा हा ' शो' होता.

अशा शो मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी - मद्य, मदनिका आणि मधुलिका - तिथे मुबलक प्रमाणात होत्या. हे सगळं बघत असताना अचानक बाजूला एक तरुणी आली आणि तिने मला कानात माझं नाव विचारलं. आजूबाजूच्या गोंगाटात मला नीटस ऐकू गेलं नाही, म्हणून मी तिला तिचा प्रश्न पुन्हा विचारण्याची विनंती केली. तिने मला जवळ जवळ ओढून थोड बाजूला नेलं आणि पुन्हा विचारलं,

" your name my friend?"

" Ashish ...how about you?"

" Lora ..my name. You want to come with me and enjoy?"

" not interested , but if you are ok , I can pay you to talk to me for a while! "

हा कोण वेडा समोर उभा आहे, असे हावभाव तिच्या चेहेऱ्यावर उमटले. असा महाभाग बहुधा तिला पहिल्यांदा भेटला असावा.

" Are you serious ?"

" Yes ,I am ."

' give me ५० dollars first , let us go to that coffee shop,buy me coffee . but not more than one hour ok ?"

मी पैसे तिच्या हातात ठेवले आणि पुन्हा तिने ' कोण वेडा भेटला आज' असा चेहरा करून ते आपल्या खिशात कोंबले. त्या कॉफी शॉप मध्ये आम्ही गेलो, कॉफी घेतली आणि बाहेर मोकळ्यावर आम्ही बैठक जमवली.

" you are crazy ...what do you want to know from me?"

" Everything.."

तिने एक कॉफीचा घोट घेतला, सिगरेट पेटवून खोल झुरका मारला आणि स्वतःबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली.

" मी थायलंड देशातून इथे ३ वर्षांपूर्वी आले. आमची गोरी नितळ कातडी बाजारात चांगला भाव मिळवून देते. त्यात मी special आहे न..."

" Mhanje ?"

" मी ट्रान्सजेन्डर आहे...माझ्या स्त्रीच्या शरीरावर देवाने पुरुषाचं लिंग चिकटवून मला जन्माला घातलं...त्यामुळे इथल्या मार्केट मध्ये मला खूप भाव आहे. "

स्वतःचा उल्लेख इतक्या कोरडेपणाने एखाद्या किराणासमानाच्या दुकानात विकायला ठेवलेल्या वस्तूसारखा करणारी ती ' लॉरा ' खास नक्कीच होती, पण वेगळ्या अर्थाने.

" घरच्यांनी जन्मल्या जन्मल्या मला कचऱ्यात टाकून दिल, त्यामुळे मला आजही माहित नाही माझे जन्मदाते कोण आहेत. मी गल्लीबोळात धक्के खात, चोऱ्यामाऱ्या करत कशीबशी वाढले. मग एका माणसाने माझ्यातला ' विक्रीयोग्य गुण' हेरला आणि माझी रवानगी पट्टाया शहरातल्या एका वस्तीत केली. ती वस्ती माझ्यासारख्या अनेकांची....जगभरातल्या देशांना माल पुरवणारी."

" किती वर्षाची होतीस तेव्हा?" मी मनावर दगड ठेवून आता प्रश्न विचारायला सुरुवात केली.

" १४ वर्षाची असेन...पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र काढतात जी तारीख घातली, त्याप्रमाणे १४. नाहीतर माहित कोणाला आहे मी कोणत्या दिवशी पैदा झाले..." ती खळखळून हसली आणि मला ते हसणं प्रचंड भेसूर वाटून मी डोळे मिटले.

" २ वर्ष मी तिथे शिकले. आधी आम्हाला तिथे 'sex education ' दिलं गेलं. इंग्लिश शिकवलं गेलं.कशा पद्धतीने आलेल्या पाहुण्यांना खूष करायचं आणि त्यांच्या खिशातून जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा, हे आम्हाला तिथे वर्षभर शिकवलं गेलं. तिथल्या 'कस्टमर्स' बरोबर 'ट्रायल' सुद्धा झाल्या. मग आमचे सुंदर फोटो काढून आमचा अल्बम बनवला गेला आणि अनेक देशांमध्ये पाठवला गेला. तुला बघायचाय?"

तिने आपल्या मोबाईलमध्ये आपला तो 'अल्बम' दाखवला. मादक हावभाव करून वेगवेगळ्या उत्तान पद्धतीने उभ्याने, बसून काढलेले ते फोटो बघताना मला मनुष्य असण्याची लाज वाटली. एका मनुष्याला भोगवस्तू म्हणून किती पद्धतशीर रित्या सजवला जाऊ शकत, याचं ते उघडं नागडं उदाहरण होत. अर्थात हे आगळ कोवळ्या वयात भोगल्यामुळे लॉराचं मन मेलेलं होतं जे तिच्या वागण्या-बोलण्यात स्वच्छ दिसत होतं.

" मी अनेक देशात गेले...ऍमस्टरडॅम, पॅरिस, दुबई, दोहा, दिल्ली, सेऊल....आता ३ वर्ष सिंगापूरला आहे. इथे मला जास्त बरं वाटत, कारण कायदे चांगले आहेत. दर महिन्याला वैद्यकीय चाचण्या बंधनकारक आहेत...आजारी पडले तर काम न करण्याची मुभा आहे, स्वच्छता आहे...कोणी जोरजबरदस्ती केली तर मी पोलिसांना बोलावू शकते कारण माझे पण इथे काही हक्क आहेत...आमच्यासारख्यांना तितकंच खूप आहे. आम्हाला कोणी घरात नक्कीच नेणार नाही...पण घराबाहेर असूनही आम्हाला काहीतरी सन्मान मिळतो इथे..."

सिंगापूरच्या त्या विरोधाभासी प्रकारांचा एकाच वेळी मला कौतुकही वाटलं आणि त्याचबरोबर या प्रकारांना इथे स्वीकारलं जात हे बघून शिसारीही आली.

" लोकांना कळत नाही आमच्यामुळे काय होतं. विचार कर, घाणेरडे चाळे करायला आणि आपली भूक भागवायला आमच्याकडे येतात न लोक...ते आम्ही नसलो तर कुठे जातील? घरी ना ? तुमची घरं राहतील का सुरक्षित आणि आनंदात, अशी माणसं मोकाट असतील आजूबाजूला तर?" माझ्या अंगावर काटा आला. खरोखर आजच्या समाजात अश्या माथेफिरूंची कमी नक्कीच नाहीये आणि त्यांच्या हिंस्रपणाला आणि गलिच्छ शौकांना पूर्ण करायला जर या वेश्या नसतील, तर समाजात आणखी काय काय बघायला मिळेल याची कल्पना करणं मला अशक्य झालं.

वेश्याव्यवसाय आज एक भलीमोठी ' बाजारपेठ ' आणि ' महाउद्योग' आहे. काही देश पुरवठादार, काही भांडवलदार आणि एकूण सगळेच या उद्योगाचे ग्राहक. सजीव वस्तूंची येथे प्रचंड प्रमाणात उलाढाल होते. या उद्योगाची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे, व्यवहार करण्यासाठीच्या देशोदेशी पसरलेल्या साखळ्या आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदीत हमखास परतावा देणारी ही गुंतवणूक आहे.

" माझ्याकडे एकदा आलेले सगळे ग्राहक पुन्हा माझ्याकडे येतातच. तू त्यातला नाही वाटत...पण चांगलं आहे. सगळेच आमच्याकडे यायला लागले तर तुमच्यासारख्या सभ्य माणसांच्या घरांना अर्थच नाही राहणार, आमच्या खोल्याच घरं होऊन जातील मग...." पुन्हा तिचं ते भेसूर हसणं मला टोचून गेलं.

" तुम्ही लोक राहता ते जग खूप सुंदर आहे...तुम्हाला काय समजणार आमच्या जगातलं.." एक सणसणीत शिवी हासडून तिने जगातल्या समाजसेवी संस्थांचा उद्धार केला. " आम्हाला अनेक लोक भेटतात, सांगतात तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडा आणि मानाने जगा...आम्ही तुम्हाला नोकरी देतो...शिकवतो...अरे पण कोणालाही आम्ही शेजारी राहायला आलो तर चालेल का? आम्ही लांबच राहिलेले आवडणार तुमच्यासारख्यांना...हो कि नाही? खर बोल? " मी उत्तर देऊ शकलो नाही...किंबहुना माझी नजर खालून वर सुद्धा येऊ शकली नाही.
तासाभराने आपलं वाचन पाळत लॉरा उठली. वेळेला ती पक्की होती, कारण तिच्या प्रत्येक तासाला किंमत होती. त्या बाबतीत ती अतिशय व्यावसायिक आणि प्रामाणिक होती. त्या एका तासात मी सुन्न झालो होतं आणि अजून काहीही ऐकायची माझी 'ऐपत' नव्हती. आपोआप खिशाकडे हात गेला, मी तिला अजून पन्नास डॉलर देऊ केले.

" हे ठेव, मी तुला अजून एक तास नाही थांबवत, असेच घे.."

" नको...माझी वेळ झाली, मी जाते. पैसा माझ्याकडे भरपूर आहे, तुझ्या पन्नास डॉलरची गरज नाही मला. सिंगापूरला मी रोज उंची हॉटेल मध्ये राहते माहित्ये ?" आणि पुन्हा ती तसंच खळखळून हसली. खरोखरच ती माझ्याहून कैकपटीने जास्त श्रीमंत होती.

महाभारतात अर्जुनाला अप्सरेच्या शापामुळे एक वर्ष बृहन्नडेच्या रूपात राहून आपलं पौरुषत्व गमवावं लागलं होतं. माझ्या डोळ्यासमोरच्या या अर्जुनाला कोणत्या शापामुळे आजन्म बृहन्नडा होऊन जगायचा शाप मिळाला असेल, हाच विचार तिला जाताना बघून माझ्या मनात घोळत होता!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म! गंभीर आहे सगळं! बाय द वे, काही टायपो झाले आहेत ते कृपया सुधार.. उदा. ' बाहेर पाडा' इथे 'बाहेर पडा' हवं. 'खरा बोल' इथं 'खरं बोल' हवं.

मी ONLINE TYPE करून लिहितो, त्यामुळे खूप TYPO ERRORS होतात. मराठी कीबोर्ड नसल्यामुळे हे सगळं होतं....नवा कीबोर्ड मागावलाय, बघूया.

एका डिस्कशन मधे मी विवेकानंदांचा शिकोगातला रेडलाईट एरियाबद्दलचा किस्सा सांगितला. या आहेत म्हणून आमच्या आयाबहीणी सुरक्षित आहेत असे म्हटल्यावर काही जणांनी असंवेदनशीलतेचा आरोप केला.