मागच्या पंचवीस वर्षांपासून जगाची एकमेव महासत्ता हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या अमेरिकेत जाऊन अनेक जाती-धर्म-पंथ-देशाच्या लोकांनी आपली भरभराट करून घेतलेली आहे। संधींची उपलब्धता, गुणग्राहकता, विचारस्वातंत्र्य आणि मेहेनतीचा हमखास मिळणार परतावा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेला जाऊन तिथलं नागरिकत्व मिळवणं आणि त्यानंतर सुखसमृध्दीचं जीवन जगणं ही स्वप्न बाळगणारे हजारो तरुण जगाच्या कानाकोपऱ्यातून अमेरिकेत वास्तव्याला गेले। मागील काही वर्षांपासून मात्र अनेक राजकीय कारणांनी या 'अमेरिकन ड्रीम' ला अमेरिकेच्याच राजकारण्यांनी वेसण घालायचं काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित झालेला एक ' पॅटर्न' कुठेतरी खंडित झाला।
आजसुद्धा अनेक लोक या ना त्या पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करून तिथल्या 'ग्रीन कार्ड' च्या मागे लागलेले दिसतात। अरब जगतात काही ना काही करून अमेरिका किंवा अगदीच नाही जमलं तर कॅनडाच्या नागरिकत्वाचे तरी सोपस्कार पूर्ण करून आपल्या देशाच्या नागरिकत्वातून स्वतःची आणि कुटुंबीयांची 'सुटका' करण्याची चढाओढ चाललेली दिसते। सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टिन,जॉर्डन, इजिप्त, ट्युनिसिया, लिबिया अशा मागच्या दोन-तीन दशकांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या देशाचं नागरिकत्व तिथल्या लोकांना इतकं नकोसं झालेलं आहे, की चांगली पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली मंडळी केवळ नागरिकत्वासाठी पाश्चात्य देशांमध्ये हलक्या दर्जाची काम करायला तयार होतात।
अबू धाबीमध्ये ' कसर अल होसन ' नावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक दशांमधून अनेक लोक येतात, त्यातला एक झाकी। सीरिया देशाचा नागरिक, पण आपल्या देशातून परागंदा होऊन आजूबाजूच्या अरब देशांमध्ये भटकत आयुष्य जगणारा। त्याची ओळख म्हणजे त्याच्या बोटांमद्ये आणि शरीरामध्ये असणारी कला। पियानो आणि बासरी या दोन वाद्यांवर त्याचं प्रचंड प्रभुत्व आणि शरीर इतकं लयबद्ध आणि लवचिक की बघणाऱ्याने क्षणार्धात ओळखावं की एखाद्या नृत्यप्रकारात हा नक्कीच पारंगत असला पाहिजे। जोडीला गळासुद्धा सुरेल होता। हातात थोडीफार चित्रकला होती आणि घरचा परंपरागत चालत आलेला कॉफी विकण्याच्या व्यवसाय त्याला 'कॉफी' या विषयाची भरपूर माहिती देऊन गेला होता। इतक्या विविध कला अंगात असूनही फक्त नशीब वाईट असल्यामुळे सिरियासारख्या देशात त्याचा जन्म झाला असावा, जर युरोपात जन्माला आला असता तर हा नक्कीच कुठल्या कुठे गेला असता।
त्या कार्यक्रमांमध्ये त्याचं १५ मिनिटांचा छोटंसं सादरीकरण होतं। त्याने बासरीतून असे काही सूर त्या पंधरा मिनिटात छेडले की श्रोत्यांनी अजून १०-१५ मिनिटं त्याला सादरीकरण लांबवायला लावलं। शेवटी आयोजकांनी विनंती करून पुढचं सादरीकरण सुरु केलं। हा स्टेजवरून उतरला आणि आजूबाजूच्यांशी हस्तांदोलन करत बाजूच्याच कॉफीच्या दुकानाकडे निघाला। तो त्या गर्दीतून बाजूला गेल्याचं हेरून मी चटकन मोका साधत त्याच्याकडे गेलो आणि " आपण थोडा वेळ बोलू शकतो का?" म्हणून त्याला विचारलं। तो अगदी अनपेक्षितपणे आमची अनेक वर्षांची मैत्री असल्यासारखा तयार झाला आणि त्याने मला अट घातली, " मी आता दोन कॉफी घेणार, एक तुला आणि एक मला। आपलं संभाषण जसं जसं पुढे जाईल तसं आपल्याला अजून कॉफी, पाणी, खाणं पिणं लागत जाईल.....पहिली कॉफी मी घेतली, आता आलटून पालटून दोघांनी एकमेकांची खातिरदारी करायची " मी मनापासून आनंदलो। " दुपारचा जेवण आणि कदाचित रात्रिचंही एकत्र घ्यावा लागेल......चालेल का?" झाकी हसला आणि त्याने मला सांगितलं, " उद्याचा नाश्ता सुद्धा आणि दुपारचं जेवण सुद्धा.....काय बोलतोस?"
दोघेही प्रचंड बोलके, दोघांनाही भटकंतीची आवड आणि दोघांनाही अनेक विषयांवर बोलायची हौस, त्यामुळे आम्हा दोघांची गट्टी अगदी पाच मिनिटात जमून गेली। आधी १-२ तास त्याने मला माझ्याबद्दल भरभरून माहिती घेतली। मी 'इंडिया' चा आहे, हे ऐकल्यावर तो जबरदस्त खुश झाला। त्याने भारताची माहिती इंटरनेट आणि पुस्तकांमधून वाचलेली होती.......भारत देशाचा आकार, वैविध्य, संस्कृती आणि भाषा अशा अनेक गोष्टींवर तो माहिती घेत होता। भारतीय पद्धतीचं जेवण तो आवडीने जेवायचा। त्याच्या मते इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण एकाच देशात जगाच्या पाठीवर कुठेही मिळणं अशक्य, हे ऐकून मी मनोमन सुखावलो। त्याला ताज महाल, लाल किल्ला, कुटूंब मिनार याबद्दल माहिती होतीच, पण त्याच कुतूहलाने तो महाराष्ट्रातल्या गडकिल्लांबद्दलसुद्धा मला विचारत होता। त्याला भारतीय डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर ओटा, कारण त्याच्या कुटुंबातल्या अनेकांच्या शस्त्रक्रिया भारतात झालेल्या होत्या। त्याच्या मते भारताचे डॉक्टर खुद्द देवाचे शागीर्द असतात आणि म्हणूनच त्यांच्या हातात रुग्णाला धडधाकट करायची कला असते.......दुपारच्या जेवणापर्यंत त्याने माझ्याकडून त्याचा समाधान होईस्तोवर अनेक विषयांची माहिती घेतली आणि शेवटी उदरभरण झाल्यावर बाजूच्याच एका बागेत हिरवळीवर छानपैकी बैठक मारून मला फर्मान सोडला, " आता तुझी वेळ। काय विचारायचं विचार...."
" आधी तू मला तुझ्याबद्दल सांग..... तू कुठला, काय करतोस, इथे कशासाठी आलायस.......आणि जे जे म्हणून मला तू सांगू शकशील ते सगळं सांग"
" मी सिरियाचा। दमास्कसला माझं घर होतं। मी दहा वर्षाचा होतो तेव्हा घरच्यांनी खटपट करून सिरियाबाहेर जायचा प्रयत्न सुरु केला। करणार काय, देशात सतत दंगली, मारामाऱ्या, युद्ध, यादवी.....दोन-तीन पिढ्या या सगळ्यात नासल्या आमच्या देशाच्या......अनेक लोक देश सोडून गेले, माझे घरचे सुद्धा.......मी मात्र माझा देश, माझ्या देशाचं नागरिकत्व आणि माझं घर.......काहीही सोडलं नाही। आणि मी का जाऊ इतर देशांकडे भिका मागायला? आधी ते मला नाही म्हणणार, मग मी त्यांच्या मागे लागणार, मग ते मला त्यांच्या देशात यायला तेव्हढी परवानगी देणार, मग मी तिथे हलक्या दर्जाची कामं करायची, चार-पाच वर्ष काढायची, पुन्हा त्यांच्याकडे भीक मागायची, मग मनात आलं तर ते मला संधी देणार अन्यथा पुढची संधी मिळेपर्यंत पुन्हा तेच सगळं.........माझं देश आहे ना? का हे सगळं करू मी?"
मला हे सगळं ऐकून नक्की काय बोलावं तेच कळेनासं झालं। आपल्या क्षूद्र राजकारणापायी सिरीयाच नव्हे, तर इतर अनेक देशांचा बळी घेऊन अमेरिका, रशिया किंवा युरोपातल्या प्रबळ महासत्ता स्वतःचा स्वार्थ जरी साधत असल्या, तरी त्या देशांच्या सामान्य नागरिकांना भोगायला लागणाऱ्या यातनांशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं। इतर देशात घुसखोरी करण्यात काहीही वावगं न वाटणाऱ्या या महासत्तांनी स्वतःच्या घरात शिरायचे नियम मात्र अतिशय कडक करून ठेवले होते। हा माणूस या सगळ्यात भरडला जाऊनही स्वतःच्या देशावर प्रचंड प्रेम करत होता आणि सगळं ठीक झाल्यावर आपल्या देशात आपण मानाने आणि ताठ मानेने जगू या आशेवर दिवस काढत होता।
" माझ्या देशाचे लोक आणि सत्ताधीश - दोघेही लघुदृष्टीचे। त्यात आमची प्रतिमा भांडखोर अशी। खरंही आहे म्हणा ते, कारण आम्ही स्वतःला कधीही सुधारला नाही, शक्तिशाली केला नाही पण तरीही आमचं म्हणणं सगळ्यांनी ऐकावं, आम्हाला सगळ्यांनी महत्व द्यावं, आम्हाला साधं खरचटलं तर इतरांनी लगेच शस्त्र उगारवी असाच आमचा इतिहास आहे। घरातलं लाडावलेलं पण वाया गेलेलं कार्ट असतं ना तसंच ! "
स्वतःच्या देशाबद्दल तो अभिमानी असला तरी दुराभिमान नव्हता। त्याला कुठे काय चुकतंय आणि काय बरोबर व्हायला पाहिजे हे स्वच्छ माहित होतं। त्याने शिष्यवृत्तीवर संगीताचं शिक्षण पूर्ण केलं होतं, तेही मिलान मधून। तिथेच त्याच्या फावल्या वेळात शिकवण्या करून त्याने पैसा कमावला होता आणि त्यातून आपलं 'बॅले' नृत्याचं शिक्षण घेतलं होतं। मुळात मिलान शहराची हवाच अशी, की कलाकाराने हवं ते आणि हवं तितकं शिकावं , त्यामुळे चित्रकला, शिल्पकला आणि काय काय तो शिकला होता।
त्याने बोलण्याच्या ओघात पुढे जे सांगितलं, ते ऐकून मला अतिशय नवल वाटलं। त्याचं आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं दमास्कस येथे जगातली सगळ्यात मोठी, सुसज्ज आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक असलेली कला-अकादमी सुरु करायचं। " का आपण सगळे सतत पाश्चात्त्यांकडे हात पसरायचे? कलेसाठी युरोप, शिक्षणासाठी इंग्लंड, तंत्रज्ञानासाठी अमेरिका.....कशासाठी? अरे हो, तुमच्याकडेसुद्धा आहे ना ते IIT, IIM ..... आम्ही अरब लोक भांडताच राहिलो। म्हणायला आम्ही कैरो विद्यापीठाचं नाव घेतो, पण काय उपयोग? कधी कळणार आमच्या लोकांना, की खरी संपत्ती पेट्रोल किंवा सोनं नाही, तर शिक्षण आहे। " कुठेतरी मला हे सगळं परिचयाचं वाटत होतं, कारण काही प्रमाणात भारताच्या बाबतीतही हे लागू होत होतं।
दिवसभर अशा अनेक विषयांवर आमचा दिलखुलास संवाद झाला। त्याने मला तो वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवत असलेल्या १००-१५० विद्यार्थ्यांचा परिचय त्याच्या लॅपटॉपवर करून दिला। ते सगळे त्यांच्या या अनोख्या गुरुजींकडून वेगवेगळ्या विषयांचे धडे घेत होते। जे विद्यार्थी त्याच्यासारख्याच उध्वस्त देशातले होते, निर्वासितांच्या छावणीत राहात होते त्यांना ते शिक्षण विनामूल्य होतं। " फुकट आणि विनामूल्य या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फार आहे अर्थाचा....फुकट काहीच नसावं.....म्हणूनच मी त्यांना तेव्हाच शिकवतो, जेव्हा ते मला त्यांच्यासारखे कमीत कमी दोन विद्यार्थी जोडून देतात....निर्वासितांच्या छावण्यात काय असत? तिथे कट्टरतावादी लोकांची पैदास व्हायला पोषक वातावरण असतंच , मग त्याचे परिणाम जग भोगत । मी त्यांना कलेच्या माध्यमातून स्वतःच्या आतल्या भावनांना वाट मोकळी करायची प्रेरणा देतो। " त्याचे हे शब्द प्रेरणादायी होतेच, पण जगण्याकडे विजिगीषू वृत्तीने बघण्याचा संदेश सुद्धा देत होते।
त्याच्या त्या अस्तित्वात नसलेल्या विद्यापीठाचं नाव मी त्याला विचारलं। पुढे जाऊन ते विद्यापीठ खरोखर अस्तित्वात यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे हेही मी त्याला सांगितलं। तो हसला आणि म्हणाला, " असं असेल तर तूच विचार का ना.....काय नाव असेल?"
अर्थात ते नाव "दमास्कस कला विद्यापीठ " शिवाय दुसरं काय असू शकणार होतं!
अहो काय होतं य की तुम्ही
अहो काय होतं य की तुम्ही सारखे नवे नवे लेख टाकल्याने आधीचे लेख पान दोन पान तीन वर जाउन लोकांना वाचायला मिळत नाहीयेत सर्च केल्या शिवाय. एक दो लेख आठवड्यात असे केले तर सर्व वाचून होतील. बघा बुवा पटतंय का.
माझ्या profile वर जाऊन लेख
माझ्या profile वर जाऊन लेख टॅब वर क्लिक केलं, तर सगळे लेख एकत्र मिळतील...
सुरेख लेख आणी अनूभव. ब्लॉग
सुरेख लेख आणी अनूभव. ब्लॉग वाचला तुमचा .
माझ्या profile वर जाऊन लेख
माझ्या profile वर जाऊन लेख टॅब वर क्लिक केलं, तर सगळे लेख एकत्र मिळतील...>> अॅडमिन ला सांगून लेख मालिका करता येइल. अॅव्हरेज माबोकर माझ्यासारखे पहिल्या पानावर काय दिसते आहे ते बघून सोडून देतात.
मी request केलेली मागच्याच
मी request केलेली मागच्याच आठवड्यात..अजून काही उत्तर नाही आलंय.
तुमचं सगळंच लिखाण आवडत आहे.
तुमचं सगळंच लिखाण आवडत आहे. सर्व लेख एकाच वेळी पोस्ट केले तर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद दिला जात नाही. मग दिवसभरात काही लेख मागे पडत जातात. वाचायचे राहून जातात.
तुमचे चाहते होण्याचा पर्याय
तुमचे चाहते होण्याचा पर्याय इथे का दिसत नाहीये मला ?
मला खरंच कल्पना नाही...चाहते
मला खरंच कल्पना नाही...चाहते होण्याचा पर्याय असायलाच हवा....माझ्या profile वर जाऊन शक्य होतंय का ते बघू शकता...मी या ब्लॉगवर स्वतः नवा आहे, त्यामुळे मलाच अनेक गोष्टी स्वतःला समजून घ्यायच्यायत...
माझ्या profile वर जाऊन लेख टॅब वर क्लिक केलं, तर सगळे लेख एकत्र मिळतील....सध्या इतकंच सुचवू शकेन..
https://humansinthecrowd
https://humansinthecrowd.blogspot.com तसच https://demonsinthecrowd.blogspot.com हा माझा वैयक्तिक ब्लॉग आहे. कृपया ब्लॉग वर लेख वाचून प्रतिक्रिया नोंदवावी, हि विनंती.
तुमचे सर्व लेख खूप छान आहेत..
तुमचे सर्व लेख खूप छान आहेत.. ब्लॉगवरचे सुद्धा.
राजकारण जगात सर्वत्र आहे
राजकारण जगात सर्वत्र आहे
भरडला फक्त सामान्य माणूस जातो