दुबईमध्ये येऊन २-३ वर्ष झाल्यावर आणि बऱ्यापैकी मित्रमंडळी जोडल्यावर जवळ जवळ प्रत्येक सुटीच्या दिवशी काही ना काही बेत आखायची आणि त्यानुसार कुठेतरी जाऊन गप्पांचा अड्डा जमवायची मला सवय लागली होती. कधी कधी अबू धाबी, शारजा अश्या इतर अमिरातींमधून सुद्धा काही मित्रमंडळी येत आणि गप्पांचा फड आणखी रंगात येई.अशाच एके दिवशी गप्प्पा मारायला जमलेल्या आमच्या टोळक्यात माझ्या एका अबू धाबीच्या मित्राबरोबर गोरापान, निळे डोळे असलेला आणि पाहताक्षणी ब्रिटिश वाटेल असा कोणीतरी आलेला दिसला आणि मी त्याची इंग्रजीत विचारपूस करायला लागल्यावर ' अरे काय हे....मी ना, मी मराठी आहे' असं लडिवाळपणे तो बोलला. हे प्रकरण नक्की काय आहे, याचा मला उलगडा होण्यासाठी थोडा वेळ जावा लागला.मग माझ्या त्या मित्रानेच या महाभागाची माझ्याशी ओळख करून दिली.
हे महाशय दस्तुरखुद्द पुण्यातल्या सारसबागेजवळ राहतात आणि त्यांचं आडनाव टिळक आहे हे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. बाळ गंगाधर टिळकांनी इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी जंग जंग पछाडलं, पण एक चुकून राहून गेला कि काय, असं मला वाटून गेलं. त्याचं बोलणं जरा जास्तच 'लाघवी' होतं . डोक्यावरचे सगळे केस कधीच उडालेले होते. गप्पा मारताना हा आमच्याबरोबर पुष्कळ वर्षांपासून असल्यासारखा मस्त बोलत होता, त्यामुळे माझ्यासारख्या बोलक्या स्वभावाच्या माणसाला तो एका भेटीतच आवडला. नंतर त्याने स्वतःबद्दल माहिती पुरवल्यावर कळलं, कि तो व्यवसायाने 'शेफ' होता. दुबईमधल्या अशा भोसलेंच्या रेस्टॉरंटमध्ये तो काम करत होता. आशाताईंकडे याचं चांगलंच जाणंयेणं होतं अशी माहिती त्याने पुरवल्यावर मी गुळाला मुंगळा चिकटावा तसा त्याला चिकटलो. आधीच त्याचा बोलका स्वभाव, त्यात माझ्या अतिशय आवडत्या गायिकेकडची त्याची ये-जा आणि त्यामुळे त्याच्याकडे असू शकलेला किस्श्यांचा खजिना अशा सगळ्या गोष्टी जुळून येत होत्याच, त्यामुळे पहिल्या भेटीतच आमची मस्त मैत्री जमली.
मग कधी संध्याकाळी एकत्र जेवायला भेट, कधी नुसताच भटकंती करायला भेट किंवा कधी चहाच्या एका कपाचे पाच होईपर्यंत नुसतं बसून गप्पांची मैफिल जमव अहा अनेक गोष्टी होताच राहिल्या. माझ्या राहत्या जागेपासून हा अगदी दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर राहात होता.त्यामुळे कधीही त्याला भेटणं शक्य होतंच. आशाताईंबद्दल जाणून घायची इच्छा हा माझा त्याच्याशी मैत्री करण्यामागचा मूळ हेतू कधीच नाहीसा झाला. उलट या महाभागाने आपल्या गमतीशीर वागण्याने मला काही दिवसातच खिशात टाकलं.
' अरे ए किंग जॉर्ज......चल फिरायला जाऊया....बीचवर येशील का?' एका शुक्रवारी मी त्याला सकाळी ८ वाजताच जाग केलं. ' कोंबड्या.....इतक्या पहाटे तुझा बाप उठून कॉल लावतो का रे?' पलीकडून आवाज आला. समीर टिळक नावाचा प्राणी सुट्टीच्या दिवशी ११ वाजायच्या आधी उठत नसतो, हे मला माहित असूनही मी त्याला हक्काने त्रास देत होतो.
' तुझा पण बाप लवकरच उठत असेल....आणि तू पण आज ऊठ. मी १०-१५ मिनिटात येणार आहे, तयार नसलास तर घरात येऊन पाणी टाकेन अंगावर' माझ्या धमकीचा काडीमात्र परिणाम झाला नाही. ' मी येणार नाही...डायरेक्ट दुपारी जेवायला भेट....' ' अहो पेशवे, उठा आज.....विनंती समजा' शेवटी साम-दाम-दंड-भेद यातल्या सगळ्याचा वापर करून मी श्रीमंतांना एकदाचं तयार केलं. ' समुद्रात बुडवतो तुला आज....' अशी शेवटची धमकी देऊन एकदाची स्वारी उठली.
आम्ही भेटल्यावर काही गोष्टी अगदी नेमाने व्हायच्या. आधी एक कडक चहा, त्याबरोबर खायला ग्लुकोज बिस्कीट ( इतर बिस्कीटं म्हणजे मातीत साखर आणि लोणी मिसळून कुंभाराने तयार केलेली मडक्यांची झाकणं, असं त्याचं ठाम मत होतं ), मग चालायला सुरुवात करून गोल गोल हिंडत तास दोन तास नुसती भटकंती आणि शेवटी घसा कोरडला, कि एखादी पाण्याची बाटली रिचवून कुठेतरी बसून पुन्हा गप्पा. भूक लागली की त्या दिवशी पेशव्यांचा काय 'मूड' आहे त्यावर कुठे जायचं हे ठरायचं. खास दक्षिण भारतीय पद्धतीच्या ' कडक फिल्टर कॉफी' ची त्याला जेवल्यावर तलफ यायची आणि ती पोटात ढकलून आमची पुढची मैफल रंगायची.
मला त्याच्या कृपेने जेवण कसं करायचं, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सगळ्या गोष्टींचं प्रमाण किती असावं, चुकून पदार्थ बिघडला तर काय युक्त्या कराव्या हे सगळं अगदी मुद्देसूद समजायला मदत झाली. जेवण कसं करायचं, हे सांगायची पद्धतसुद्धा त्याची अफलातून होती.
' अरे काय माहित्ये, एक माध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा. तो छान धुवायचा......गोड दिसला पाहिजे अगदी....मग त्याला सोलायचा. ' गोड दिसला पाहिजेच्या पुढे लगेच हिंस्रपणा आलेला बघून मला मजा वाटायची. ' मग ना, त्याच्या सुंदर फोडी करायच्या.....गोऱ्या गोऱ्या दिसल्या पाहिजेत हां.....मग पाण्यात त्यांना बुडवून ठेवायचं.....मग ती सुंदर हिरवी कोथिंबीर काढायची.....त्याच्या दांड्या ना, टाकायच्या नाहीत.....कसं वाटेल त्या कोथिंबिरीला तिच्या दांड्या टाकल्यावर......' कोथिंबीर पेशव्यांशी बोलत असावी बहुधा! ' थोडंसंच तेल घ्यायचं बरं का, आपल्याला काय भाज्यांना अंघोळ नसते घालायची.....' त्याच्याकडून अश्या पद्धतीने नुसती बटाट्याची सुकी भाजी कशी करायची याची कृती ऐकायला सुद्धा खूप मजा यायची. दुकानात एखादी भाजी छान दिसली कि तो त्या भाज्यांना चक्क अभिनेत्रींची उपमा द्यायचा. ' कसली जुही चावला भेंडी आहे बघ.....मस्त टवटवीत' ' अरे तो दुधी बघ....नुकताच वयात आलाय त्या प्रीती झिंटासारखा' असल्या दिव्य पद्धतीने भाज्यांची ओळख झाल्यावर त्या भाजीला हात लावायलासुद्धा कसंतरी वाटायचं.
त्याला माझ्या बरोबरीचे ' अगंबाई ' समजायचे। त्याचे ते हावभाव, त्याचं थोड्याश्या बाइलपणाने हसणं, ' चल चोरा !' असं लडिवाळपणे पाठीत थाप मारून बोलणं हे सगळं मला कधीच विचित्र वाटलं नाही. मनुष्यस्वभावाची उकल करण्यापेक्षा त्यातून येणाऱ्या गमतीशीर अनुभवांची मजा घेणं मला आवडतं, आणि तेही समोरच्याला मुद्दाम खिजवून किंवा दुखवून त्याची टिंगल न करतां. कदाचित त्यामुळेच असेल, पण आमचं खूप छान जमायचं. त्याचं बोलणं मला अतिशय मजेशीर वाटायचं. त्याने लोकांना दिलेल्या उपमा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल अशा असायच्या.
स्वतःच्या रेस्टॉरंटमधल्या एका धष्टपुष्ट शेफला हा ' उकडून फुगलेला मोमो' म्हणायचा. त्याच्या बरोबर काम करत असलेल्या एका नवरा-बायकोच्या जोडीला त्यांच्या शरीरयष्टीमुळे ' धूप - उदबत्ती' ची जोडी म्हणायचा. त्याच्या एका मदतनीसाने एकदा चुकून मीठ जास्त घातल्यामुळे वरण खारट झालं, याचं वर्णन त्याने ' ते घामटलेलं अस्वल त्या वरणात उडी मारून डुंबल असेल बहुतेक....इतकी लाज आणली त्याने....' असं केलं तेव्हा मी पाच मिनिट गडाबडा लोळून हसलो होतो. त्याच्या एका शेफ मित्राने छातीपर्यंत दाढी वाढवली, त्यावर ' हा बोकड जेवण करताना मधून मधून हात पुसायला वापरत असणार ती दाढी.....' असं त्याने मला त्या शेफच्या समोर सांगितलं आणि वर ' त्याला मराठी नाही येत रे....' हेही ठेवून दिलं. पुढ्यातली खीर खाताना ' अरे नीट बघ, शेवया आणि त्याच्या दाढीचे केस एकसारखेच दिसतात म्हणून म्हंटल ' असं बोलून त्याने २-३ आठवडे माझा खीर खाणं बंद केलं . एकदा जेवताना अंमळ थंड आणि पातळ झालेलं सांबार खाताना ' या फोडणीच्या पाण्याने ताटातल्या इडलीला अंघोळ घालायचे इतके पैसे घेतात का रे दुबईला' असं त्याने अक्ख्या खानावळीत आवाज घुमेल इथल्या मंजुळ आवाजात विचारलं आणि वर ' नशीब चटणी नाही मागितली.....इडलीला सर्दी झाली असती मग एवढ्या सगळ्या पाण्याने' अशी शालजोडीतली देऊन त्या खाणावळीतला आमचा तो शेवटचा दिवस ठरेल याची आयुष्यभराची तजवीज केली.
' जेवण कसं हवं....लतादीदी, आशाताई, बाळासाहेब यांच्या गाण्यासारखं.....त्यात काही जास्त नको, कमी नको.....सगळं कसं जितक्यास तितकं हवं.....' हे त्याचं तत्वज्ञान मला मनापासून आवडून गेलं. आशाताईंना तो आईच्या जागी मानायचा. लतादीदी, उषाताई, मीनाताई अशा सगळ्यांचे पाय चेपण्यापासून ते त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारायचं भाग्य त्याला नशिबानं भरभरून दिलं होतं. आशाताई तर त्याच्यावर निरतिशय प्रेम करायच्या. आम्ही भेटलो कि बरेचदा ' मंगेशकर घराण्याच्या' गाण्यांवर आमचं बोलणं व्हायचं. आश्चर्य म्हणजे इतका असूनही त्याला काही संगीताचा कान नव्हता, गळा तर नव्हताच नव्हता. चुकून एखादं गाणं गायला लागला की सरस्वती देवी शंकराकडून त्रिशूळ उसना घेऊन याचं डोकं उडवेल अशी सतत भीती वाटायची. धांगड धिंगा असलेली गाणी ऐकताना ' हे मेले कुत्रा चावून पिसाळलेत वाटत....लतादीदींचा एक गाणं म्हणायला सांग, जुलाब करतील बघ....' असं चिडून बोलायचा आणि मी हसायला लागल्यावर ' हसतोस काय.....मी काय जोक मारतोय काय.....' म्हणून मला प्रेमळपणे दटावायचा.
मुळात या प्राण्याला मोकळ्या ढाकळ्या वातावरणाची आणि अनिर्बंध जगण्याची आवड. त्यात घरातून लांब राहत असल्यामुळे कोणी थांबवणारं नाही, या सगळ्यामुळे 'लग्न' या विषयाचा त्याला राग यायचा. ' कशाला लग्न करायचं असतं रे....मला तर बायकोला खायला प्यायला पण घालावं लागेल.....त्यापेक्षा नकोच ते....' अशी त्याची लग्नाबद्दलची मतं बदलणं मला शक्य नव्हतं। ' माझे घरचे इडली म्हंटलं कि सांबर आणि चटणी मागणारच.....मी मॉडर्न आहे, मी इडलीच्या मस्त तळून सॉस बरोबर खातो....' अशा शब्दात घरच्यांचे विचार कसे कर्मठ आणि आपले कसे आधुनिक आहेत हे त्याने मला सांगितलं होतं. ' माझ्या एका मित्राने लग्न केलं......मुलगी आधी छान वाटली.....मग अशा मिऱ्या वाटल्या ना सासू-सासऱ्यांच्या डोक्यावर, कि दोघे शनिवारवाड्यावर काका मला वाचवा ओरडत पळताना बघितलेत लोकांनी' असे असंख्य किस्से मग लग्न का वाईट हे पटवून द्यायला एक एक करत बाहेर यायचे.
एके दिवशी यूएई चा मुक्काम आटोपून पेशवे कतारच्या आशाताईंच्याच रेस्टॉरंटच्या नव्या कामासाठी रुजू होणार आहेत असं कळलं. त्याचे दुबईत उरलेले दिवस मनसोक्त मजा करून घालवायचे, असं दोघांनी ठरवलं आणि रोज आम्ही भेटायला लागलो. वेगवेगळ्या जागी खायचं प्यायचं, रात्री उशिरापर्यंत गप्पा झोडायच्या आणि केवळ शरीर दमल्यामुळे शेवटी झोपायचं असे २ महिने आम्ही अक्षरशः धुमाकूळ घातला. आशाताईंच्या असंख्य आठवणी त्याने मला सांगितल्या आणि एका क्षणी त्यांच्या आठवणीने तो चक्क रडला सुद्धा.
जायच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही एका सध्या खानावळीत जेवायला बसलो. त्याला तिथेच जायचं होतं, कारण कितीही तास बसलो तरी ते उठायला सांगत नाहीत अशी मौलिक माहिती त्याने मला दिली.आम्ही जे जेवण मागवला ते यथातथाच होतं. ते बघून पेशवे एकदम चवताळले....
' अरे के कबाब आहेत की ऍसिड मध्ये तळलेले कोळसे'
' हि रोटी तू तिथून कापायला सुरु कर, मी इथून कापतो.... मध्ये भेटू कुठेतरी'
' पनीर मसाल्यात पनीर शोधा अशी स्पर्धा लावूया का रे'
' यांच्याकडचा पालक खत घालून पिकवलाय कि डांबर घालून.....काय भयंकर लागतेय भाजी.....'
' डाळीत लसणाची फोडणी दिलीय की लसणात डाळीची....केवढीशी डाळ ती त्या पाण्यात'
याचं सगळ्या जेवणावर सतत टीकाटिप्पणी कारण अखंड सुरु होतं. आज आम्ही बहुतेक घराच्या ऐवजी हॉस्पिटल मध्येच पोचतोय कि काय अशी मला भीती वाटायला लागली. मी सतत त्याला जेवणावरून वेगळ्या दिशेला भरकटवायचा प्रयत्न कार्य होतो आणि हा घासाघासाला त्या खानावळीचा उद्धार करत त्या खानसाम्याच्या वर गेलेल्या पिढ्या खाली आणत होता. एकदाचा जेवण झाल्यावर मी त्याला दुसरीकडे जाऊन बोलूया अशी जवळ जवळ दटावणीच केली आणि आम्ही निघालो. त्यात सुद्धा बिल भरताना ' जेवण काय विमानाच्या पेट्रोलमध्ये बनवता काय....इतकं बिल आणि अशा जेवणाचं ?' असा शेरा मारून त्याने माझ्यासाठी त्या जागेचीही दारं कायमची बंद केली.
निरोप देताना त्याला गहिवरून आलं. भेटत राहू वगैरे सोपस्कार झाले. ' अरे social media वर राहा ना जरा ' अशी मी त्याला विनंती केली आणि तोंडदेखलं 'ठीक आहे' म्हणून तो निघाला. त्याची आणि social media ची गट्टी कधी जमलीच नाही, कारण social media म्हणजे इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला निर्माण झालेली एक ब्याद असं त्याचं ठाम मत होतं.
बरेच वर्षांनी पुण्याला जायचं योग्य आला आणि हा महाभाग आहे का हे शोधायला मी आमच्या काही मित्रांकडून त्याचा ठावठिकाणा काढायचा प्रयत्न केला.पेशवे आपल्या पुण्याच्या राजमहालात सध्या मुक्कामाला असतात हे समजल्यावर मी अतिशय खूष झालो. ४-५ वर्षांनी भेट घडणार होती, तेही माझ्या बायकोबरोबर असताना याचं मला आनंद होता. एके जागी भेटायचं ठरलं आणि आम्ही तिथे जाऊन ५ मिनिटं झाल्यावर पेशवे आले. पण खाऊन लाल झालेलं तोंड आणि अंगावर जिथे तिथे वाढलेला मांस अशा विचित्र प्रकारामुळे मी पटकन त्याला ओळखलंच नाही. ' काय रे कुत्र्या.......विसरलास का मी कसं दिसतो ते......' असं बोलून समोर बायको आहे हे लक्षात आल्यावर त्याने चटकन जीभ चावली आणि ' तुझी बायको म्हणेल कसलं मवाली कार्ट आहे.....' असं बोलून तो खुर्चीवर बसला.
' घरी बाबांनी मुलगी आणलेली.....' मी हे ऐकून तीनताड उडालो.
' अरे मेल्या.....माझ्या लग्नासाठी बोलणी करायला.....ठेवायला नाही.....' त्याची ती तिरकस विनोदबुद्धी तशीच होती.
'मग काय? दोनाचे चार?'
' कसलं काय.....अरे इतकी भयानक होती ती.....नाही म्हंटलं. आता खेळ झालाय घरी.....आई बाबा मुलींची स्थळं आणतात आणि मी नाही म्हणतो. मी तर बाबांना बोललोही, कि अहो त्यापेक्षा माझं होर्डिंग लावा पुण्याच्या चौकाचौकात, कि आमच्या येथे लग्नाचा मुलगा रिकामटेकडा पडलेला आहे......'
' अरे मग कर ना लग्न......तुला काय ब्रह्मचारी राहायचं का?'
तो माझ्याकडे बघून हसला। ' अरे, जबरदस्ती आहे का.....नाही म्हणून कोणी ऐकताच नाही.....'
मी विषय बदलला. बाकीच्या गप्पाटप्पा झाल्यावर आणि माझ्या बायकोला माझ्याबद्दल खवचटपणे पुष्कळशी नको ती माहिती पुरवल्यावर साहेबांची निघायची वेळ झाली. त्यात सुद्धा चहाच्या चवीवर ' हे गढूळ पाणी साखर टाकून गोड करून चहा म्हणून विकणाऱ्या या बेअक्कल लोकांना उलट टांगून त्याचं चहामध्ये बुचकळून मारला पाहिजे' अशी खास ' टिळक' शैलीतला खोचक शेरा त्याने मारलाच.बिलाबरोबर आलेल्या शिळ्या बडीशेपेला ' पालीच्या लेंड्या' म्हणून त्याने माझी आणि माझ्या बायकोची आयुष्यभराची बडीशेप बंद केली.
निघताना पुन्हा एकदा त्याने पाठीत धपाटा मारला, ' चोर.....भेटत जा रे' म्हणून मिठी मारली आणि बायकोला ' हा काही बोलला तर सांग मला..... तसा चांगला आहे, पण अडकतो कधी कधी दातात दालचिनीसारखा' अशी शेफला साजेशी टिप्पणी करत तो वळला.पाठमोरा असला तरी त्याचा हात डोळ्यापर्यंत जाऊन खिशात परतलेला मी बघितला आणि ' पेशवे आज रडले' असं बायकोला सांगत मी निघालो.
हा माणूस कसाही असला, तरी माझ्यासाठी तो पंचपक्वांन्नाने भरलेल्या ताटातला मोदक होता. बाहेरून निर्मळ, आतून गोड आणि एका घासात बाकीच्या पदार्थांची चव विसरायला लावणारा. मैत्रिच्या रूपाने त्या मोदकावर आपल्या हातून तुपाची धार सोडली गेली, याचा मला अतिशय आनंद होता. सात सुरांच्या पलीकडचं आशाताईंनी शोधून काढलेला हे रत्न माझ्या आयुष्यात असंख्य आनंदाचे क्षण देऊन गेले , हेच खरं.
छान लिहिलयं... आवडले पेशवे. .
छान लिहिलयं... आवडले पेशवे. ...!
अवर्णनिय व्यक्तीचित्र.
अवर्णनिय व्यक्तीचित्र.
खूप छान लिहिलयं!
खूप छान लिहिलयं!
छान व्यक्ती आणि व्यक्तीचित्र!
छान व्यक्ती आणि व्यक्तीचित्र!!!
व्यक्ती आणि व्यक्तीचित्र
व्यक्ती आणि व्यक्तीचित्र दोन्ही छान
धमाल ... तुमच्या या
धमाल ... तुमच्या या श्रीमंतांचे वंशज अंतू बर्वा च्या आळीतले असतील
धन्यवाद !
धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.
https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/
व्यक्तीचित्र आवडलं.
व्यक्तीचित्र आवडलं.