"वायसी" व्हायरसची माहिती आणि लक्षणे

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2020 - 00:26

सर्वात जास्त संसर्गजन्य, अत्यंत वेगाने पसरणारा आणि सर्वाधिक लागण होणारा व्हायरस म्हणजे वायसी व्हायरस होय.

(वायसी ही अद्याक्षरे नक्की काय दर्शवितात याची आम्हास माहिती नाही, तरी ती येडछाप शब्दावरून घेतली आहेत असे ऐकण्यात आले आहे, खखोदेजा.)

स्वाइन फ्लू असो की इबोला असो की करोना, त्यासोबतच हा वायसी व्हायरस त्याच्या लक्षपटीने पसरून लागण करतो.
या व्हायरसचा मृत्युदर नगण्य असला तरी उपद्रवमूल्य दखल घेण्याइतपत गंभीर आहे. या व्हायरसवर अद्याप कुठला इलाज नाही. याची तीव्रता येत्या दशकात वाढत जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडुन समजते.

याची लक्षणे:

१. मास्कची खरंच गरज आहे का, नक्की कुठला मास्क घ्यावा, तो कसा वापरावा याची शून्य माहिती असतानाही फार्मसीत धाव घेऊन मास्क खरेदी करून त्याचा तुटवडा निर्माण करणे, फेसबुकवर मास्क घातलेला फोटो अपलोड करणे.
२. अशा फोटोंना लाईक करणे.
३. नवीन पसरणाऱ्या व्हायरस बद्दल वाट्टेल ती अफवा शहनिशा न करता, तसेच वाट्टेल तसे विनोद भक्तिभावाने पुढे ढकलणे.
४. आपली वैद्यकीय पात्रता, अनुभव नसताना मित्र नातेवाईकांत त्या नव्या व्हायरसचा तज्ञ असल्याचा आव आणणे.
५. आपल्या चुकीच्या जीवनशैलीचे कौतुक करत तीच आपल्याला या व्हायरस पासून वाचवणार असल्याचा जगाला साक्षात्कार घडवणे.
६. आपले पूर्वज किती महान होते, असे व्हायरस पसरू नये म्हणुन त्यांनी काय काय पद्धती अवलंबल्या होत्या, त्याचा आपल्याला आता कसा फायदा होणार आहे, याचा जगाला साक्षात्कार घडवणे.
७. अजून हा व्हायरस नक्की काय आहे याची त्यावर अहोरात्र संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना पूर्ण माहिती मिळुन त्यांनी त्यावर समाधानकारक उपचाराचा विचार करण्यापूर्वीच त्यावरील होमिओपथी आणि आयुर्वेदिक रामबाण उपायांच्या पोस्ट्स जास्तीत जास्त लोकांना पाठवून त्यांना पुढे जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याचे आव्हान करणे.

आणखी लक्षणे आपल्या पाहण्यात / ऐकण्यात आली असतील तर कृपया भर घालावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या गावाकडे एका डॉक्टरला कोरोना व्हायरस झाल्याची अफवा पसरले, बिचाऱ्याचा दवाखाना ओस पडलाय. अभिमानाची बाब म्हणजे माझापण ती अफवा पसरवण्यात थोडा हातभार होता.

मानव, Lol

काल माझी नियमित औषधे घेण्यासाठी एका औषधालयात गेलो होतो त्याला ह्या नाकाच्छदानाविषयी विचारले सहज...
तो म्हणे इथली बातमी आल्या पासून २ दिवसांत सगळा साठा संपला आमच्याकडचा!
इथल्या हैद्राबादच्या चिकटून चालणार्‍या गर्दीत मात्र हवे काहीतरी अच्छादन म्हणून आपले रुमाल बांधावेत!

कृष्णा, नॉवेल करोनाची डोळ्यातूनही लागण होते असे वाचले. मास्क घातला आणि समोरच्या व्यक्तीचे शिंकल्याचे कण डोळ्यात गेले तर? तेव्हा सेफ्टी गॉगलही हवा.

या पेक्षा हेल्मेट घालणे उत्तम.

मी ऑनलाईन स्पेस सूट शोधणारच होतो, पण मग लक्षात आले की स्पेस सूट घालून फिरू लागलो तर आपल्या भोवती लोक गर्दी करतील उगाच, शिवाय आमच्या कॉलनीत सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, जरा कुठे वेगळा पेहराव दिसला की तुटून पडतात म्हणुन विचार सोडून दिला.

परवापर्यंत भारताची घसरणारी आर्थिक व्यवस्था यात व्हॉट्स ऍप विद्यापीठात पी एच डी केलेल्या असंख्य लोकांनी विषाणूजन्य रोग covid १९ आणि त्यापासून मुक्तता यात यशस्वीपणे पी एच डी पूर्ण केलेली आहे.

त्यांचा पदवीदान समारंभ व्हॉट्स ऍप विद्यापीठात त्यांना आलं, लसूण, गोमूत्र, दालचिनी आणि मिरी यांनी संतृप्त केलेले सेंद्रिय (ORGANIC) ताग आणि कापसापासून बनवलेले मुखवटे देऊन उद्या सकाळी १० वाजता होणार आहे.

८. ऐन जनता संचारबंदीत, तिचा मूळ उद्देश पूर्णतः फाट्यावर मारून, जणु काहीतरी साजरे करण्याची वेळ असल्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन टाळ्या, घंट्या, ढोल वाजवत मिरवणूक काढणे.