आनंदछंद ऐसा - पशुपत

Submitted by पशुपत on 28 February, 2020 - 01:56

महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी पुरुषोत्तम स्पर्धेसाठीच्या एकांकिकेत संगीतिकेचे संगीत करण्याची संधी मिळाली. त्यातल्या एका गझलच्या चालीचे विशेष कौतूक झाले.
आणि हेच आमचे बलस्थान असल्याचे लेखक दिग्दर्शकाना समजून आले .. आणि पुढील तीन वर्षे एकापेक्षा एक सुंदर एकांकिका करण्याचा उपक्रम केला आम्ही.
आणि इथेच कवीताना चाली लावण्याचा छंद , अंगात भिनला तो आजवर पंचवीस तीस वर्षे टिकून आहे.
त्या वेळेला समोर येणार्या ओळी जास्त करून कथानक पुढे घेउन जाणार्या असत. त्यामुळे वाचिक गुणवत्ता चालीत आणि गायनात लक्षपूर्वक आणण्याचे आवर्जून प्रयत्न केले ज्यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली.. त्याही पेक्षा भावना व्यक्त करणारी चाल आणि आवाज + शब्द्फेक हे सारे आपोआप जोपासले गेले.
पुढे या मुळे उत्तमोत्तम कवींच्या कविता वाचण्याचा एक आणखीन नवा छंद जडला.
महानोर , सुरेश भट , आरतीप्रभू ही त्यावेळी भावलेली व्यक्तीमत्वे.
दिवे लागणीची वेळ
विस्तीर्ण नदीचा काठ
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
सजण दारी उभा
अशा कित्येक कवीताना चाली लावल्या आणि गाइल्या.
आता विचार करताना एक महत्वाची गोष्ट जाणवली कि , मनाला आवडेल अशी चाल होइपर्यंत एक हुरहुर , निराशा , चिडचिड , अशांतता , तगमग या सगळ्या भावनातून गेल्यावर मग कुठे छानशी चाल सापडते.
मग वाटतं , अरे ही इतकी चपखल चाल आहे कि दुसरं काही सुचलंच कसं !!
काताळात दडलेले शिल्प शोधून काढणे हे जसे शिल्पकाराचे हात घडवून आणतात तसेच अर्थाने भरलेले शब्द आणि तशा भावना उमटवणारे स्वर यांचे एकमेकांशी जुळून - मिसळून जाणे , त्याना सुयोग्य लयीत - स्वरात गुंतवणे , त्यांची गळाभेट घडवणे हे संगीतकाराचे काम. त्यासाठी त्याची शब्दांशी आणि स्वर-तालाशी जुनी दोस्ती असावी लागते. त्यांच्यात सतत मिळून - मिसळून रमता रमता गप्पा गोष्टी करता आल्या पहिजेत. त्यांच्या अंतरंगात शिरून दडलेले गुपीत हळूवारपणे जाणून घेणे व्हायला हवे... शब्दांचा आणि संगीताचा संवाद आपल्या मार्फत होउ लागला पाहिजे.. मग हा त्रिवेणी संगम जुळून येतो..
शब्द-स्वरांचे तादात्म्य असे साधले पाहिजे कि ऐकताना आपल्याला मनात भिडतोय तो स्वर आहे का शब्द का भावना हा संभ्रम व्हावा !!!
त्यानंतर त्या गाण्याचे सावट दिवसेंदिवस टिकले पाहिजे. त्यातून बाहेर पडूच नये असे वाटत रहावे.
ही जादू संगीतकाराना साधते ... त्याना माझा सलाम .
आणि आपण कायमचे त्यांच्या रुणात रहावे हाच आनंद .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! सुंदर!
शब्द-स्वरांचे तादात्म्य असे साधले पाहिजे कि ऐकताना आपल्याला मनात भिडतोय तो स्वर आहे का शब्द का भावना हा संभ्रम व्हावा !!!>≥>>>>
खासच!

स्वर-तालाशी जुनी दोस्ती असावी लागते. त्यांच्यात सतत मिळून - मिसळून रमता रमता गप्पा गोष्टी करता आल्या पहिजेत. त्यांच्या अंतरंगात शिरून दडलेले गुपीत हळूवारपणे जाणून घेणे व्हायला हवे>> खूप छान मस्तच लिहिलेय !!

छान लिहिलेय

गझल , कविता लिहिण्याऱ्या , त्यांना चाली लावण्याऱ्या लोकांबद्दल आदरयुक्त उत्सुकता असते नेहमीच .
कस काय सुचत असेल परफेक्ट चाल !!!

स्वर-तालाशी जुनी दोस्ती असावी लागते. त्यांच्यात सतत मिळून - मिसळून रमता रमता गप्पा गोष्टी करता आल्या पहिजेत. त्यांच्या अंतरंगात शिरून दडलेले गुपीत हळूवारपणे जाणून घेणे व्हायला हवे>>अहाहा ! किती मस्त लिहीलय

वा! सुरेख आहे हा छंद आणि यासाठी प्रतिभा हवी. येर्‍यागबाळ्याचं काम नोहे हे. चाली लावणे, म्युझिक देणे वगैरे ज्यांना जमतं अशा व्यक्तींबाबत प्रचंड आदर आणि कुतुहल वाटतं.

सगळ्यांना अभिप्रयाशाठी धन्य्वाद.

मामी , मीही लेखाच्या शेवटी या मंडळींना सलाम ठोकला आहेच.
फक्त त्यांची नावं घेण्याचा मोह टाळला..

>>ही जादू संगीतकाराना साधते<<
१००% सहमत. तुम्हि केलेली जादू ऐकायला आवडेल...

आजच्या ह्या रीमिक्सच्या जमान्यात कर्णमधुर चालींचा खुप तूटवडा आहे. गाण्यांचा आशय आणि बाज न मोडणार्‍या चाली/संगीताचं सदैव स्वागतच नव्हे तर आंतरीक आस आहे. उदा: माडगुळकरांची "एका तळ्यात होती..." हि कविता आधी वसंत पवारांनी स्वरबद्ध केली होती, सुखाचे सोबती या चित्रपटाकरता. पण खळेकाकांनी (आकाशवाणीवर) नविन चालीतुन ओतलेली जादू, आणि आशाताईंच्या सप्तकाच्या गारुडामुळे ते गीत पुढे अजरामर झालं. तुमच्या चालींना ती उंची प्राप्त होवो अशी इच्छा बाळगतो...

खूप छान गायिलंय.
अश्याच छान छान चाली लावत रहा, गात रहा!

<<<<मनाला आवडेल अशी चाल होइपर्यंत एक हुरहुर , निराशा , चिडचिड , अशांतता , तगमग या सगळ्या भावनातून गेल्यावर मग कुठे छानशी चाल सापडते.>>>
राम जन्मला गं सखे... या ओळी सुचण्या आधी ग. दि. मा. मध्यरात्री पर्यंत अंगणात अस्वस्थपणे येरझारा मारत होते. मला वाटतं एखादी उत्तम कलाकृती जन्म घेते तेव्हा प्रत्येक कलाकाराचे असेच होते. ( प्रसववेदनाच त्या)
सुंदर छंद...मला वाटतं यासाठी तपश्र्चर्या जेवढी महत्वाची तेवढीच ईश्र्वर कृपा...
सुंदर लेख

मभा दिन संयोजक, प्रशस्तिपत्रा बद्दल आभार !
खरं तर असं काही लिहायला , मायबोलीशी निगडीत असलेल्या बहुत जनांना प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद !

वा! फारच छान चाल आणि मस्त म्हंटलं आहेस ते गाणं... गुन्तलेला जीव मायेच्या! फक्त रेकॉर्डिंग आणखी चांगलं असतं तर जास्त आवडलं असतं, इतकंच!
छंद फारच उत्तम आहे. मला संगितात रमलेल्या लोकांचं फार कौतुक वाटतं!