अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
18th फेब्रुवारी 2019
ए झिम्मा,
आता तुला पत्र लिहायचं तेवढंच बाकी राहिलं होतं. मांजरीला पत्र लिहायचं म्हणजे फारच झालं हे खरय पण ज्याला पत्र लिहित्ये त्याच्याशिवाय इतरही वाचतातच की. म्हणून तुझ्यासारख्या अडाणी मांजरीला पत्र लिहिले तरी चालेल अस वाटल. शिवाय काल रात्री बॉन फायर भोवती गप्पा चालू होत्या, तेव्हा सारेच ट्रॅव्हलर्स सांगत होते की फॅमिली मेम्बर्स पेक्षा त्यांना आपापल्या घरच्या पेट्स ची जास्त आठवण येते. खरंच आहे ते. मला पण तुझी खूप आठवण येतेय.
आज सकाळी उठले तेव्हाही पाऊस पडतच होता. त्या थंडीतही मी अंघोळ आटपली. आदल्या पत्रात माझ्या अंग पुसायच्या हातरुमालाबद्दल लिहिले आहे. जीव केवढा त्यापेक्षा जास्त काम केल्यामुळे तो पांढरा शुभ्र रुमाल मळकट राखाडी झाला होता आणि त्याला दमट कुबट वासही येत होता. मला भीती वाटली मयूर च्या पॉश Audi मध्ये माझ्या रुमलाचा वास भरून राहील. मग तो हातरुमाल (माझा so called टोवेल) मी तिथेच पाठी सोडला.
फेरी निघायला थोडा वेळ होता, म्हणून मी तिथल्या जाडजूड गब्रू डुकरांच्या पाठी पाठी त्यांचा फोटो काढायला गेले. एकतर एवढ्या घाणीत हे लोळतात ह्यांचा फोटो काढायला कोणीतरी मागेल काय? मी ही दुरूनच सेल्फी काढला असता पण ह्यांना सेल्फिचा अनुभवच नाही तर काय करायचे. डोकं फिरल्यासारखी तीन तीन डुकरं माझ्याकडे बघत माझ्या जवळ जवळ जशी येऊ लागली तशी माझी घाबरगुंडी उडाली. मी पळत पळत मी एका टपरीच्या आत येउन लपले.
त्याच टपरीवर ब्रेकफास्ट करताना सब्यसाचीशी ओळख झाली. तो त्याच्या बहिणीला घेऊन माजुली फिरायला आला होता. अलीकडच्या किनाऱ्यावर झालेली ओळख पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत मैत्रीसारखी झाली. पुन्हा एकदा सारे एकत्र चहा ब्रेकफास्ट ला बसलो या पलीकडच्या किनाऱ्यावरच्या टपरीत बसलो. या टपरीत कोण सापडली तर एक मांजर! ती माझ्याकडे अंग घासायला आली तेव्हा तर तुझी खूप खूप आठवण आली. तुझ्या कलर ची गॅरेंटी नसती आणि तुला पाण्यात बुचकळून धुऊन काढले असते तर तू वाळल्यावर कशी दिसली असतीस? अगदी तस्साच तिचा रंग होता. तुझ्यापेक्षा खूप स्मार्ट होती. रागावू नकोस ग, तू जशी आहेस तशीच मला आवडतेस.
सब्यसाची बरोबरच्या गप्पात सुख दुःख नातीगोती आयुष्य हे विषय निघाले होते. अशा विषयांच्या गप्पा एका भेटीत पुऱ्या होतील का? सर्वांनी लवकरच पुन्हा भेटायचे असे ठरवून, नवीन मित्रमंडळींना आपापल्या घरी यायचे आग्रहाचे निमंत्रण देऊन नंतर आम्ही आपापल्या वाटेने निघालो.
आज आम्ही काझीरंगा ला जायचे ठरवले.
आपण फॅमिली हॉलिडे ला जातो तशा ट्रिप पेक्षा बॅकपॅकिंग टाईपचा प्रवास अनेक पातळींवर वेगळा आहे. ज्यांना लोकांशी बोलायला जमत नाही , आवडत नाही, ही वाट त्यांच्यासाठी नाही. कारण गुगलबाबा त्या त्या जागेची फक्त जुजबी माहिती देतो, अस्सल लोकल माहिती सहसा लोकल लोकांकडूनच मिळते. आज कुठे जायचे ते ठरवले की एकदाचे तिथे जाऊन पोहोचायचे, अशा प्रवासाचा हा एवढाच हेतू नसतो. बरेचदा तिथे तिथे पोहोचल्या वर रहायची सोय शोधण्यापासून सुरुवात असते. फारशा अपेक्षा नसतात, घाई नसते. रात्रीपूरती रहायची सोय झाली की आजची गरज भागली. उद्याचे काय ते आज माहीत नसते. उद्याची चिंताही नसते. बहुतेक निव्वळ अनुभव हाच अशा प्रवासाचा ध्यास असावा. त्यानुसार बरेवाईट अनुभव स्वागतार्हच असतात. निवडक अनुभव वेचण्यासाठीच्या Itinerary नुसार जी वाट आखली असते, ती अनेक अनुभवांना बायपास करून पुढे जाते. ते सारे अनुभव हा अशा प्रवासाचा अनिवार्य भाग आहे. पण ते गाठोडे प्रवास संपल्यावरही स्वेच्छेने आयुष्यभर बरोबर घेऊन चालावे, मला ती कमाई एवढी मोलाची वाटते. बॅग पॅकिंग आणि रोडट्रीप करणाऱ्या प्रवाशांची मानसिकता एकच असली तरी दोघातला मुख्य फरक म्हणजे रॉड ट्रिप मध्ये वहान हाताशी असल्याने त्यानुसार इतर फायदे मिळतात, वेळही वाचतो. खर तर, कमी वेळ आणि भरपूर वेळ गुंतवावा लागतो, बॅग पॅकिंग ची हीच नेमकी खासियत आहे.
दुपारचे जेवण आम्ही कालच्याच आसामी स्पेशल थाळीचे केले. रिटर्न कस्टमर हीच तिथच्या रुचकर जेवणाची सर्वात मोठी पावती नाही का? म्हणून आम्हाला पहाताच क्षणी त्या आसामी ओनर च्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
काझीरंगाचे अभयारण्य ... भूगोलाच्या अभ्यासासाठी जी माहिती वाचायला जीवावर यायचे तीच माहिती आता किती interesting वाटते.
ब्राम्हपुत्रे च्या काठचा हा गवताळ प्रदेश जवळजवळ अडीज हजार एकशिंगी गेंड्यांचे घर आहे. गेंड्याचे जेवणच मुळात गवत हेच आहे. आणि एव्हढ्याल्या अंगाला पोसायला त्याला दिवसाला म्हणे 40 किलो अन्न खावे लागते. दिवसभर हा प्राणी चरतच रहातो. याशिवाय अभयारण्यात हत्ती, हरणे, रानरेडे हे शाकाहारी प्राणी सुद्धा मुबलक आहेत. मांसाहारी जनावर एकच ... वाघ! हरण किंवा अवजड प्राण्यांची पिल्ले खात त्यांचा खुशाल गुजारा होतो. सध्या इथे 200 पेक्षा जास्त वाघांचा रहिवास आहे.
दुपार टळत असताना काझीरंगा च्या वेस्टर्न गेट जवळ पोहोचलो. सफारी आटपून कोणी बाहेर येत होते त्यांचे चेहेरे हर्षोल्हासित वगैरे असे दिसतच नव्हते. आज म्हणे पावसामुळे दिवसभर सफारीत जनावरं दिसलीच नाहीत. अशा दिवशी नकोच ती सफारी! मग आम्ही उलट वळलो. काझीरंगा अरण्याच्या समोरच्याच टेकडीवर 'ला व्ह्यू' हे सुंदर हॉटेल आहे, मयूर चा डोळयांत ते हॉटेल भरले होते, पण माझे डोळे मात्र जवळपास बजेट गेस्ट हाउस शोधायला भिरभिरत होते.
मयूर ने माझा तो प्रश्न झटक्यात सोडवून मला दुसराच प्रश्न घातला. ट्विंन बेड च्या रूम मध्ये gender मध्ये येणार नसेल तर झोपायला माझी हरकत आहे का? माझ्या बायनरी विश्वासाची व्हॅल्यू '1' धरून जरी पुढचे गणित मांडते तरी प्रत्येक पाऊल उचलताना समाज माझ्यावर किती विश्वास ठेवेल ह्या मांडणीने वेगळे उत्तर मिळते. पण तरीही माझे गणित माझ्याच रीतीने सोडवून पहायचे मी असे ठरवले. जरी माझे मला उत्तर मिळाले होते तरी त्याची पडताळणीच फक्त उत्तराची अचूकता सिद्ध करू शकत होती आणि त्यासाठी आजचा दिवस सारून उद्याचा दिवस उजाडणार होता.
झिम्मे तुला यातल काय कळलं? काही सुद्धा नाही. दगड आहेस. आता मी घरी परतल्यावर मात्र माझ्याकडे क्षणभर करवंदासारखे दिसणारे डोळे रोखून बघशील आणि बराच वेळ अनवाणीच वाटा तुडवलेल्या त्या माझ्या तळपायांचा वास घेत राहशील. .माझ्या प्रवासाच्या एकेका पायवाटेचा थांगपत्ता शोधत! Miss u. Love u.
तुझीच
मम्मा
हा ही भाग आवडला.
हा ही भाग आवडला.
मांजरीला पत्र लिहायचं म्हणजे
मांजरीला पत्र लिहायचं म्हणजे फारच झालं >>>
गेंड्याच्या अंगाला 'पोसायला' हवंय बहुतेक. पुसायला लिहिलंय आणि मी विचार करत होतो गेंडा अंग पुसतो?
मस्त चालू आहे हा प्रवास
मस्त चालू आहे हा प्रवास
हर्पेन अगदी बरोबर
हर्पेन अगदी बरोबर
आता त्याला पोसला.
कदाचित ते ' पुरायला' असू शकेल
कदाचित ते ' पुरायला' असू शकेल.
लेखमाला उत्तमच आहे. सगळे लेख आवडले.