मुलीसाठी पाळणे किंवा तत्सम लोकगीते?

Submitted by रॉय on 25 February, 2020 - 23:24

नमस्कार,
घरी नवी पाहुणी आली आहे. तिच्या बारश्याची तयारी चालली आहे. माझं जसं सेल्फीविहीन, नॉनप्लास्टिक, घरातल्या एका ऊबदार खोलीत बारसं झालं तसंच माझ्या लेकीचं व्हावं ही इच्छा आहे. माझ्या बारशाला राम कृष्णांचे, विठ्ठलाचे, आणि एका लिंगायत आज्जीकडून बसवेश्वरांचेसुद्धा पारंपारिक पाळणे गायले गेले.

लेकीसाठी मात्र मला स्त्रियांवरचे पाळणे हवे आहेत. इतरत्र तसा शोध घेतला तर काहीच हाती लागले नाही. मुळात कोणत्या स्त्रियांचे पाळणे अस्तित्त्वात आहेत तेच कळत नाही. पंचकन्यांचे पाळणे आहेत का? नेटवर जिजाऊंचा पाळणा मिळाला. तोही मालिकेतला असल्याने त्याला तसलीच (झी-मराठीछाप) सुमार कळा आहे.
१. कोणत्या भारतीय स्त्रियांवर पाळणे रचायला हवेत/ रचले गेले आहेत? ( मला सीता, द्रौपदी या भारतीय कथांच्या नायिका, मुक्ताई, राणी लक्ष्मीबाई(?), जिजाऊ, सावित्रीबाई इतक्या स्त्रिया पटकन आठवतात)
२. यांच्यावर कुणी पारंपारिक पाळणे लिहिले आहेत काय?
३. मायबोलीवरच्या कवी/कवयित्री मला नवीन पाळणे लिहून देतील का? ( पाळणे पारंपारिक मीटर्समध्ये गाता यावेत. उदाहरणार्थ हा रामाचा पारंपारिक पाळणा पाहा -

पहिल्या दिवसी बोलली गंगा,
राखा(?) बायांनो ....... दंगा,
दसरथ राजाला जाऊनी सांगा,
गुढ्या उभारा पाचिया रंगा,
जो बाळा जो जो रे जो...

दुसऱ्या दिवसी बोलली भागा,
निरंकाराचे ....................झगा/जागा(?)
उठा बायांनो चरणासि लागा,
दान चुड्याचे रामाला मागा,
जो बाळा जो जो रे जो...

याव्यतिरिक्त राम कृष्णांचे रामदासांनी लिहलेले पाळणे आहेत. मात्र ते मात्रांत/वृत्तात इतके ठासून भरलेले आहेत की त्यातली सगळी गेयता अतिशय कृत्रिम आणि नीरस होऊन जाते. म्हणून मला ते अजिबात आवडले नाहीत. त्यापेक्षा वरील पारंपारिक पाळणा खूप साधा सरळ आणि सुंदर आहे.

तर अशाच पद्धतीचे वरील स्त्रियांचे पाळणे कुणी रचतील का?)

[ संपादन १]
माझी भूमिका मी परत स्पष्ट करतो -

मला पाळणे का आवडतात‌ ?
पाळणा म्हणजे भारतीय मिथकांच्या, त्यांतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांच्या आयुष्याचा एक छोटासा ट्रेलर असतो. त्यांची स्मृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मी मौखिक पद्धत मला आवडते. आरती पेक्षा पाळणे हे जास्त मानवी असतात.
बाराव्या दिवशी नाव ठेवण्यापूर्वी बारा दिवसांची डायरी अशा प्रकारचे पाळण्यांची रचना असते. तीही मला आवडते. पाळण्यांच्या चाली गोड असतात. त्यांच्यात अंगाईचं माधुर्यही असतं आणि सामूहिक गाण्याच्या जागाही असतात. आरतीचा कंठाळीपणा नसतो.

स्त्रियाच का?
माझा समजानुसार पाळण्यामागची भावना "बाळाचा आदर्श प्रोटोटाईप" ठरविणे असतो. मोठं होऊन बाळ असंच युगप्रवर्तक इत्यादी व्हावं अशी मनीषा असते. मुलीसाठी असे प्रोटोटाईप भारतीय समाजात असताना त्यांचे पाळणे पूर्वी रचले गेले आहेत का हे विचारण्यामागे हाच समज आहे.
सीता असो की दुर्गा, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी या देवतांचे पाळणे आहेत का ते विचारायचं होतं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रोचक धागा.

राम कृष्णांचे रामदासांनी लिहलेले पाळणे इथे लिहाल का? तुम्हाला आवडले नाहीत तरी इतरांना आवडू शकतात.

अरे वा छानच की. मी प्रयत्न करेन. माझ्या डोहाळजेवणाला सासु बाईंनी संगीत डोजे केले होते. अनेक गायिकांनी पाळणे पारंपारिक रचना म्हटल्या होतया त्या रेकॉर्ड करायला हव्या होत्या तेव्हा पण ते जमले नाही. आय लव्ह गर्ल बेबीज. सध्या पिंटरेस्ट वर छोटे छोटे फ्रॉक्स चे डिझाइन बघून मन रमवते.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. वरती सुचवलेले पाळणे मी वाचले होते. इथल्या कवींकडून अजून काही मिळतंय का ते पाहायचं होतं. धन्यवाद.

१) मराठी विश्वकोश ओनलाइन लिंक यामध्ये शोधावे लागेल.
२) माझ्याकडे लोककला साहित्य प्रकाशनचे एक होता राजा हे सरोजिनी बाबर संपादित पाचशे पानी पुस्तक(१९६४) आहे त्यात पुरुषांची लोकगिते आहेत.
[ यात राम,कृष्ण,,आणि शिवाजी यांचे पाळणे सापडले ]

प्रस्तावनेत म्हटले आहे की अगोदरचे मागच्या वर्षीचे प्रकाशन जा माझ्या माहेरा स्त्रियांसाठी होते ते हातोहात खपले. त्यामध्ये असतील कदाचित हवे असलेले पाळणे.