ठाणे पाठपुरावा वर्धापनदिन म्हणजे एक मेजवानी असते. माधव कोल्हटकरांच्या कल्पक आयोजनामुळे यादिवशी तासदीड तासाच्या कर्यक्रमात अतिशय मौलिक माहिती हा कार्यक्रमाला येणार्यांच्या पदरी पडते. स्वतः माधवसरांचे खुसखुशीत निवेदन, विनोदाची पखरण असतेच. त्यातून डॉ. शैलेश उमाटेंसारखे विनोदाचे वावडे नसलेले, आपले व्याख्यान अतिशय सहज, सोप्या भाषेत, घरगुती उदाहरणाने समजावून देणारे आणि त्याजोडीला अभिनयाचे अंग असलेले, तरुण व्यक्तीमत्व जर कार्यक्रमाला लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढतच जाणार यात नवल नाही. कालचा कार्यक्रमही तसाच रंगला. आणि तो डॉक्टरसाहेबांचे व्याख्यान संपल्यावरदेखील प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने आणखी बहरत गेला. गंभीर विषय आपल्या विशिष्ट शैलीने सोपा करुन सांगण्याची आणि त्यात खट्याळ चिमटे काढत हशा, पिकवत आपले भाषण परिणामकारक करण्याची कला डॉक्टरांना साधाली आहे. कालचा विषय होता केयर गिव्हर म्हणजेच मुक्तांगणच्या भाषेत सहचरी.
सरांनी सुरुवातीपासूनच नवरा किंवा मुलगा व्यसनी असल्यास सहचरींवर जे प्रसंग येतात त्याचे सोदाहरण विवेचन बारीकसारीक बारकाव्यांसहित केले. त्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरांच्या पद्धातीने आपल्या व्याख्यानाची मांडणी केली होती. एका सहचरीलाच त्यांनी प्रेक्षकांमधून आपल्या व्याख्यानात सहभागी होण्याची विनंती केली. तिला समोर बोलावून तिलाच निरनिराळ्या प्रसंगी तुमची भावना काय होती हे विचारत तिच्याकडून उत्तरे घेत त्यावर स्वतः टिप्पणी करीत सर बोलत असल्याने सर्व भगिनींना जणु काही हे आपल्या घरातील घडलेल्या गोष्टींबद्दलच बोलत आहेत असेच वाटले असणार. त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादावरुन जे जाणत होतेच. पहिल्याप्रथम आपला नवरा व्यसनी आहे किंवा मुलगा व्यसनी आहे हे कळल्यावर सहचरींचा विश्वासच बसत नाही. व्यसन काय आहे याची कल्पना असते. मात्र ते इतर कुणी करतील आपला नवरा, मुलगा "त्यातला" नाही असेच सहचरींना वाटते. त्यांना ते स्विकारताना अतिशय अवघड जाते. सुरुवातीला त्या स्वतःच "डिनायल" मध्ये जातात.
त्यानंतर व्यसनाबद्दल शास्त्रीय अशी काहीही माहिती नसल्याने त्या स्वतःच, कुणाचीही मदत न घेता आपल्या माणसाला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी धडपडू लागतात. काही सहचरी तर नवर्याची घरातच पिण्याची सोय करुन देतात. त्यांची अशी समजूत असते की जे काही करतील घरात करतील. बाहेर शोभा होणार नाही. शिवाय घरात पिणे होईल तर ते मर्यादेत होईल. व्यसनाच्या भीषणतेची कल्पना नसलेल्या या भगिनी नवर्याचे व्यसन कमी होईल या समजुतीने व्यसनाला घरातच आमंत्रण देतात. आणि मग नवरा घरात राजरोस बाटली घेऊन बसतो. आणि व्यसन कमी होण्याची आशा असलेल्या भगिनी त्याला दारुबरोबर काहीतरी खायला करुन देतात. मात्र आपली चूक झाली आहे हे त्यांना लवकरच कळून चुकते. व्यसन कमी होतच नाही. काही महिने, वर्षांत व्यसनाच्या परिणामांची भयनकता अनुभवाला येऊ लागते. भांडणे, मारहाण, शरीर मनावर वाईट परिणाम, गृहकलह सुरु होतात. सहचरींसाठी हा फार मोठा धक्का असतो.
मग सेल्फ ब्लेमिंग सुरु होतं. आपणच कुठे कमी पडलो असे त्यांना वाटू लागते. आपल्यातच काहीतरी दोष आहे असे वाटू लागते. एरवी चांगला वागणारा हा माणूस दारु प्यायल्यावर इतका वेगळा कसा वागतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे स्वतःतच दोष शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होते. घरातल्या या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम सहचरींच्या शरीर मनावर होतो आणि त्यांना चिंता, नैराश्य यासारख्या समस्या भेडसावू लागतात. सरांनी साध्यासुध्या चिंतेपासून ते अगदी नैराश्याच्या आजारापर्यंत जाणार्या सहचरींचे प्रमाण फार मोठे आहे हे वारंवार आवर्जून सांगीतले. नवरा व्यसनाने आजारी असतो तर बायको चिंतारोग किंवा डिप्रेशन सारख्या आजाराचा बळी पडते. ही चिंता नवर्याची असते, स्वतःची असते आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाबाळांचीदेखील असते. आता कसे होणार हा प्रश्न समोर असतो. यानंतर मग डॉक्टर आणि मुक्तांगणसारख्या रिहॅबिलीटेशनचा पर्याय समोर येतो.
अर्थात हे सर्व सुखासुखी होत नाही. अनेक अडचणी, मनस्ताप आणि दु:खामधून गेल्यावर सहचरींना हे लक्षात येतं की यावर उपचार आहेत. सहचरींच्या आयुष्यात आशेचा प्रवेश या क्षणापासून होतो. मुळात व्यसन हा एक इतर आजारांसारखाच आजार आहे हे कळल्यावरच ताण नाहीसा होतो. कारण इतर अनेक आजारांना माणुस तोंड देतो परंतु व्यसनाला मात्र आजही आजार म्हणून सामाजिक मान्यता नाही. त्यामुळे लाज, शरम, अपमान, तिरस्कार, थट्टा, कुत्सित बोलणी, टोमणे यांना तोंड द्यावे लागत असते. याचा परिणाम सततच्या नैराश्यात होतो. हे सारं नैराश्य जेव्हा व्यसन हा एक आजार आहे, त्यावर उपचार करावे लागतात, हा कधीही बरा होणारा जरी नसला तरी या उपचारांनी माणुस व्यसनमुक्त होऊन सर्वमामान्य आयुष्य घालवु शकतो ही बाबच मुळात फार दिलासा देणारी असते. त्यमुळे सेल्फ ब्लेमिंगची सवय सुटते आणि आपल्या माणसाला दोष देणे थांबते. व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. आता व्यसन हे अनाकलनिय कोडे राहिलेले नसते. तो एक मात करण्याजोगा आजार आहे अशी त्याची नवीन ओळख झालेली असते. आणि हे चित्र अर्थातच आशादायक असते.
आपल्यामाणसावर उपचार सुरु झाल्यावर स्वतःवरदेखील उपचार करणे आवश्यक आहे हे उमाटेसरांनी मुद्दाम नमुद केले. बायका स्वत:कडे दुर्लक्ष करतात. खरं तर व्यसनात बुडालेल्या माणसाची व्यसनातून सुटका करुन घ्यायची असेल तर आधी स्वतः फिट असणे महत्त्वाचे आहे. हे सहचरीने नीट लक्षात घेतले पाहिजे. एकदा स्वतःचे शरीर मन सुधारु लागले म्हणजे त्याचा इतरांशी असलेल्या संबंधांवरसुद्धा सकारत्मक परिणाम होतो असे चर्चेत सहभागी झालेल्या सहचरीनेसुद्धा मान्य केले. एकदा मुक्तांगणमधून उपचार घेऊन माणुस बाहेर पडला की पुढचा प्रवास सुरु होतो. या नाजुक काळात स्लिप, रिलॅप्स असे वेदनादायक टप्पे येऊ शकतात. त्यवेळी सहचरींनी कशी काळजी घ्यावी यावद्दल सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरांचा एकुण रोख हा संतुलित वागण्यावर दिसला. कुठलिही टोकाची भूमिका अशावेळी घेऊ नये हे त्यांनी कळकळीने सांगितले. व्यसन सुटल्यानंतर कितीही वर्षे झाली तरी स्लिप होण्याची शक्यता या आजारात असते हे सत्य मान्य करुनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
समजा आपला नवरा उपचारानंतरदेखील पिऊन आला हे पत्नीच्या लक्षात आले तर त्यावेळी दातओठ खाऊन, अकांडतांडव करुन भांडण्यात अर्थ नसतो. आधी तर प्यायलेल्या माणसाला काय चालले आहे हे समजण्याची शुद्ध नसण्याचीच शक्यता जास्त असते. आणि मागचे पुढचे संदर्भ देत जर भांडण वाढवले तर माणुस आणखि व्यसनात बुडण्याचा धोका असतो. त्यामुळे "जेवुन घ्या, झोपा, उद्या बोलू" इतकेच बोलावे असे सर म्हणाले. यापुढे जास्त संभाषण वाढवु नये. दुसर्या दिवशी तुमचं कालचं वर्तन मला आवडलं नाही असं सांगुन आपली नापसंती व्यक्त करावी. माणुस वाईट नाहीच आहे. जर माणुस वाईट असता तर आपली त्याच्याशी पंधरावीस वर्ष सोबत टिकलीच नसती. माणुस चांगला आहे. व्यसन वाईट आहे. त्यामुळे जसं व्यसनमुक्ती टिकवल्यावर आपण त्याचं वर्तन आपल्याला आवडलं असं सांगुन त्याला अॅप्रिशिएट करतो. त्याचप्रमाणे स्लिप झाल्यावर आपली नापसंती कळवावी. मात्र हे करताना आपला व्यवहार संतुलित असावा. नापसंती व्यक्त करताना आदळाअपट करु नये आणि पसंती व्यक्त करताना गरजेपेक्षा जास्त स्तूतीदेखील करु नये हा कानमंत्र उमाटे सरांनी दिला.
हे रंगतदार झालेले व्याखान संपू नये असेच वाटत होते. मात्र समारोपाची वेळ येणारच होती. शेवटी सरांनी व्यसनमुक्तीच्या प्रवासावर राहण्यासाठी पाठपुराव्याला येणे किती महत्त्वाचे आहे आहे त्याबद्दल सांगितले. एकमेकांच्या भेटीगाठी, समान दु:ख असलेली माणसे भेटणे, स्लिप आणि रिलॅप्स फक्त आपल्याकडेच होतात असे नसून इतरांकडेदेखील या घटना घडत असतात. लोकं यातून मार्ग काढत असतात. त्यामुळे आपण एकटे नाही. हे दु:ख फक्त आपल्याच वाट्याला आलेले नाही. यातून यशस्वीपणे बाहेर पडलेली माणसे आहेत अशी भावना पाठपुराव्याला आल्यावर वाढीस लागते. पाठपुराव्याचं महत्त्व अशा तर्हेने विशद करीत सरांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. त्यानंतर प्रश्नोत्तरांमध्येही अनेक गोष्टींची सरांनी सविस्तर चर्चा केली. माधवसरांनी तर सरांची त्यांची मुलाखतच घेतली. प्रेक्षकांकडूनदेखील अनेक प्रश्न आले आणि सरांनी सर्वांचेच समाधान केले. माझ्यासारख्याला तर असे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असते कारण आम्हा तथाकथित निर्व्यसनी लोकांमध्ये इतर सर्व दुर्गुण पुरेशा प्रमाणात असतात असे मला वाटते. आणि अशी व्याख्याने हे त्यावर चांगले औषध असते. सरांनी सांगितलेला संतुलित वागण्याचा कानमंत्र मी लक्षात ठेवला. आणि असे व्याख्यान ठेवल्याबद्दल मनोमन माधवसरांचे आभार मानले.
अतुल ठाकुर
स्वाती२ , अँमी पोस्ट्स पटल्या
स्वाती२ , अँमी पोस्ट्स पटल्या.
नात्यात अॅब्युझ असला तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे आणि ऐनवेळी माघार घेणे असे बराच काळ चालते >>> अगदी खरं आहे,. कुबड्यांची इतकी सवय होऊन जाते की कुबड्यांशिवाय आपण जगू शकतो हेच वळत नाही. आपल्या निर्णयाने आपली अवस्था आगीतून फुफाट्यात तर होणार नाही ना याची अनामिक भीती वाटत रहाते.
आरामखुर्चीतील विचारवंत>>> अगदी पटले .हे अगदी नात्यातही असतात.
अॅमी,
अॅमी,
मी जेव्हा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसणे असे म्हणते तेव्हा त्याचा अर्थ या स्त्रीया जोडीदारावर काही प्रमाणात आर्थिक दृष्या अवलंबून असतात. काही वेळा स्त्रीच्या नोकरीच्या ठिकाणी हेल्थ इंशुरन्स नसतो पण नवर्याच्या नोकरीमुळे ते कव्हरेज मिळते. दोघे दोन वेगवेगळ्या शिफ्टमधे काम करुन चाईल्ड केअरची कॉस्ट कमी केलेली असते. इथले राहाणीमान, नियम, कायदेकानू बघता निभावून नेणे भारतापेक्षा अजिबातच सोपे नाही, उलट कठीणच आहे असे मी म्हणेन, पदरात मुलं असतील तर फारच कठीण. अमेरीका वरवर जरी श्रीमंत देश वाटत असला तरी बरेच जण वर्किंग पुअर या वर्गात आहेत. अशावेळी होमलेसनेसच्या काठावर जगणे हे खूप सामान्य बाब असते. बहूतेक नातेवाईकही तशाच परीस्थितीत असल्याने तिकडूनही फारशी मदत मिळणे शक्य नसते. सेफ पब्लिक हाउसिंग मिळवायला मोठी प्रतिक्षायादी असते. बहूतेक होमलेस शेल्टर्स ही सेवाभावी संस्थांनी चालवलेली असतात. ती देखील बरेचदा सध्या सहा महिने निभतील , होपफुली मदत मिळेल आणि पुढेही काम चालू ठेवता येइल' अशा परीस्थितीत असतात. आमच्या काउंटीतले शेल्टर पैशाअभावी दोन वर्षांपूर्वी बंद झाले.
ॲमी, ननि, स्वाती२, तुमच्या
ॲमी, ननि, स्वाती२, तुमच्या पोस्ट्स मुळे या साऱ्या गोष्टींकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन लक्षात आला. अतुल ठाकूर यांची या विषयावरची मते (एका अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून) वाचायला उत्सुक आहे.
सर्व व्यसनी व्यक्ती या एकाच कॅटेगरी मध्ये मोडत नाहीत. व्यसनाधीनता आणि कौटुंबिक हिंसाचार (शारीरिक व मानसिक) ही एक कॅटेगरी आहे. त्यांच्या सहचरींना केवळ सबुरीचा सल्ला देऊन भागणार नाही. नवरा दारू पिऊन मारझोड करतो आणि सहचरी केवळ आर्थिक अडचणींमुळे मजबूरीने रहात आहे. अशा सहचरींचे समुपदेशन कसे केले जाते? त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगतात का? असे अनेक प्रश्न मनात आले.
गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय आहे तेव्हा सहज सोपे असे काही नसणार हे मान्यच आहे.
एखाद्या स्त्रीचा पती तिला
एखाद्या स्त्रीचा पती तिला बेदम मारहाण करत असेल तर शेजार पाजारचे लोक त्याला फटकावून समज देऊ शकतात, पण त्यानं पोलिस कंप्लेंट केली तर पोलिस कायदा हातात घेतला म्हणून केस वगैरे करतील या भितीने कोणी मध्ये पडत नाही.
एकट्या स्त्रीला कोणी गुंड मवाली त्रास देत असेल तर त्याला पोलिसांनी शिक्षा करावी अशी इतर लोकांची अपेक्षा असते. कारण संरक्षण पुरवण्याची जबाबदारी पोलिसांवर समाजानं टाकली आहे, त्यातून लोकांनी अंग काढून घेतले आहे.
पंचायती, जात पंचायती बेकायदेशीर ठरवल्या आहेत. कोणी स्वत:हून मध्ये पडत असेल तर त्याला संस्कृती रक्षक म्हणून हिणवलं जाते.
अवांतर : जालना येथील प्रेमी
अवांतर : जालना येथील प्रेमी युगुल मारहाण प्रकरण का घडलं असेल?
आजकाल काही प्रेमी युगुलं कोवळे तरुण तरुणी शाळेत जाण्याच्या नावाखाली बाहेर भटकणं, उघड्यावर मिठ्या मारणं, फोटो शुटिंग, टिकटॉक व्हिडिओ बनवणं या गोष्टी करण्याचं प्रमाण वाढले आहे.
शहरात कोण हटकत नाही. पण ग्रामीण भागात लोकांना वाटते हे प्रकार पाहून आमची मुलं मुली बिघडतील.
स्वाती२,
स्वाती२,
> काही वेळा स्त्रीच्या नोकरीच्या ठिकाणी हेल्थ इंशुरन्स नसतो पण नवर्याच्या नोकरीमुळे ते कव्हरेज मिळते. >
हम्म तिकडे आरोग्यसेवा पूर्ण खाजगी असल्याने हा इश्यू असावा. ओबामा केअरमुळे काही फरक पडला नाही का?
> दोघे दोन वेगवेगळ्या शिफ्टमधे काम करुन चाईल्ड केअरची कॉस्ट कमी केलेली असते. > भारतात काय करतात निम्नवर्गातल्या स्त्रिया काय माहीत. घरात कोणी वृद्ध नातेवाईक असेल तर त्याच्या भरवशावर सोडत असतील, किंवा मोठ्या मुलांनी लहानांना सांभाळायचं.
बाकी तिकडेही एकंदर अवघडच आहे म्हणायचं
खरेंच्या प्रतिसादातील १ आणि ६ बद्दल कशी परिस्थिती आहे?
===
जिज्ञासा,
> त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगतात का? > पोलिसांकडून काही मदत होत नाही. त्या पोस्टमधेपण मुलीने लिहलंय We tried to get help from the police, our neighbors and relatives -- but it was of no use.
फरक पडण्याची एकच शक्यता/संधी असते मुलगा/गी मोठे झाले आणि त्यानी वय वाढलेल्या, दारूमुळे खंगलेल्या बापाला कानफटात देऊन विरोध करायला चालू केलं तरच! तोपर्यंत सगळं रामभरोसे
लेख आणि प्रतिसाद वाचले.खूप
लेख आणि प्रतिसाद वाचले.खूप कठीण परिस्थिती आहे.या सर्वांना या परिस्थितीतून लवकर बाहेर पडता येवो.
जिथे स्त्रीबालकांना शारिरीक
जिथे स्त्रीबालकांना शारिरीक धोका आहे ती केस कशी हँडल करता तुम्ही?
बऱ्याच वेळेस नवरा जेंव्हा जीवाला धोका निर्माण करतो त्यावेळेस पोलीस त्या दारुड्याला दोन तीन दिवस कोठडीत बंद करून ठेवतात.
अशा वेळेस त्याची दारू उतरली आणि परत तल्लफ आली कि त्याला काहीही करता येत नाही. शिवाय पोलीस बऱ्यापैकी त्याला फटकावतात.
दारू हि बंद आणि मारही खावा लागतो त्यामुळे बरेचसे दारुडे पुढचे काही महिने तरी बायकोला/ मुलांना हात लावण्याचा धीर करत नाहीत.
दुर्दैवाने दारूच्या व्यसनामध्ये बायकोच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रमाण वाढते हा मानसिक आजाराचा परिणाम असतो त्यात त्याची स्वतःची लैंगिक इच्छा आणि कार्यक्षमता रसातळाला गेलेली असते यामुळे काही दिवसात / महिन्यात काही तरी कारणाने परत मारहाणीचे प्रकार चालू होतात. शिवाय काही निम्न वर्गात बायकोला मारहाण करत नाही तर तो पुरुष नाही अशी विचित्र विचारसरणी पण असते.(दुर्दवाने कित्येक बायका सुद्धा नवऱ्याने बायकोला मारणे यात काही गैर नाही असेच समजतात.)
समजा सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष केस केली तर बऱ्याच वेळेस बायका माघार घेतात आणि साक्ष हि देत नाहीत.त्यामुळे केस कोर्टात कोसळते.
यापेक्षा चांगल्या पोलीस अधिकार्यांची मदत घेणे जास्त संयुक्तिक ठरते. ( दारुड्याचे मानवाधिकार वगैरे बाजूला ठेवायचे असतात)
काही वेळेस असा चाकोरीबाहेर जाऊन आपले काम करावे लागते तर कधी ते नियमात बसवावे लागते.
एक माझा अनुभव लिहिला आहे.
http://www.misalpav.com/node/23640
धाग्यावर अतिशय सुरेख चर्चा
धाग्यावर अतिशय सुरेख चर्चा सुरु आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनःपूर्वक आभार. खरं तर सुबोध खरे आणि स्वाती२ यांनी मला वेगळ्याने लिहिण्यासारखे काही ठेवले नाही. त्यांचेही खुप खुप आभार. त्यांच्या मताशी सहमत.
संशोधन करताना मुक्तांगणला मला जो अनुभव आला आणि त्यानंतरही स्वमदत गटात जे पाहिलं त्यावरून एक गोष्ट मात्र अधोरेखित कराविशी वाटते. शक्यतोवर घर मोडू नये, संसार तुटू नये अशी असा समुपदेशकांचा प्रयत्न असतो. याचा अर्थ बायकोला कितीही मारहाण झाली तरी तिने नवर्याबरोवर रहावं असा मुळीच नसतो. अनेक जण पटकन हा प्रश्न विचारतात "मग काय तिने सर्व सहन करत त्या राक्षसाबरोबर राहायचं का?" असं नसतंच. प्रकरण फारच पुढे गेलं असेल तर घटस्फोटासारख्या घडायच्या त्या गोष्टी घडतातच पण तेथेपर्यंत प्रकरण ताणले जाऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात. त्यात व्यसनी मणसाईतकाच स्त्रीचाही विचार केला जातो हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. हा विचार कुठल्या तर्हेने केला जातो हेही येथे सांगावं लागेल.
मुक्तांगणसारख्या केंद्रात सहचरींसाठी वेगळे गट चालवले जातात. व्यसनी माणूस केंद्रात उपचार घेत असेल तर कुंटूंबासाठी वेगळे वर्ग घेतले जातात. त्यात माणुस व्यसनमुक्तीकेंद्रातून बाहेर आल्यावर त्याच्याशी कसे वागावे याबद्दल मार्गदर्श केले जाते. पण हे झाले व्यसनीमाणसासाठी. स्वतःसाठी सहचरींनी काय करावे याचेही धडे येथे मिळतात. सर्वप्रथम म्हणजे नवरा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. नवरा म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य नव्हे हे स्त्रीच्या लक्षात आणून द्यावे लागते. त्यानंतर तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न केले जातात. व्यसनाच्या काळात आणि नंतरही स्त्रीला आपल्या हक्कचं, मन मोकळं करण्याचं एक व्यासपीठ हवं असतं. बोलून मन मोकळं करायचं असतं. अनुभवी सहचरींकडून मार्गदर्शन हवं असतं. अशावेळी त्यांना सहचरी गटात सामावून घेतले जाते. येथे स्त्रीला आपल्यासारख्याच समस्यांशी यशस्वीपणेलढा देणार्या मैत्रिणी मिळतात आणि तिचा एकटेपणा निघून जातो.
घर न मोडण्याचा प्रयत्न याचा अर्थ स्त्रीने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे असे मुळीच नसते. अगदी परवाच माझ्या शेजारी मुक्तांगणमध्ये उपचार घेतलेला एक तरूण बसला होता. याला जूगार आणि दारु दोन्हींचे व्यसन होते. आता साधारण दोन वर्षे तो सोबर होता. सिएसटीवरून घाटकोपरला जाणार्या गाडीत बसलेल्या या तरूणाकडे फक्त वीस रुपये होते. कारण आता बायकोने व्यसनाच्या दरम्यान त्याने केलेले त्याचे सारे कर्ज फेडून व्यवहार आपल्या हाती घेतला आहे. आणि त्याने ते मान्य केले आहे. जास्त पैसे असले की जुगार खेळावासा वाटतो. आता त्यांचा संसार सुखात सुरु आहे. पण व्यसनाच्या दरम्यान साधारणपणे तीनवेळा घटस्फोट घेण्यापर्यंतची वेळ आली होती. व्यसन हा आजार आहे ही गोष्ट तर सार्यांच्याच मनावर बिंबबावी लागते. आणि तरच आजार आहे म्हणून उपचारही आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आहे हे लक्षात येऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.
संशोधनाच्या दरम्यान एका उच्चशिक्षित गृहस्थांच्या पत्नीने तिचा अनुभव सांगितला होता. व्यसनाच्या पूर्वी नवर्याची भाषा अतिशय सभ्य असायची. पण हाच माणूस व्यसनी झाल्यावर अत्यंत गलिच्छ शिव्या देत असे. आता अनेक वर्षे व्यसनमुक्त आहे. व्यसनातून बाहेर पडल्यावर त्या गृहस्थाची भाषा पुन्हा सभ्य झाली आहे. अशी काही उदाहरणं असली तरी काहींना व्यसन सुटल्यावर स्वभावावर काम करावे लागते. अशावेळी समुपदेशकाशी संपर्क असल्यास पत्नीला स्वमदत गटाचा आणि केंद्राचा आधार असतो. आणि व्यसनीव्यक्तीवर या गोष्टींचा काही प्रमाणात वचकही असतो. अनेक नवरे व्यसनमुक्त होऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांच्या बायका जेव्हा ही मंडळी बाहेरुन रात्री घरी येतात तेव्हा त्यांच्या तोंडाचा वास घेऊन खात्री करून घेतात. हे अनेक नवर्यांना आवडत नाही. पण व्यसनाच्या दरम्यान पराक्रमच इतके केलेले असतात की त्यांना हे सहन करावे लागते आणि त्यांची बाजूही कुणी घेत नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच की योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्त्रीसुद्धा सक्षम आणि कणखर होऊ शकते. तशा त्या झाल्याची उदाहरणे मला माहित आहेत.
त्यामुळे उमाटे सरांनी जे काही सांगितले आहे त्याचा ताबडतोब अर्थ असा कुणीही काढू नये की यात स्त्रीला सारे काही सहन करावे असे सांगण्याची सूचना आहे. स्त्रीच्या इच्छेने, तिचा सन्मान राखून जर संसार टिकत असेल तर तो टिकावा इतकीच ती भूमिका आहे.
सर्वप्रथम म्हणजे नवरा हा
सर्वप्रथम म्हणजे नवरा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. नवरा म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य नव्हे हे स्त्रीच्या लक्षात आणून द्यावे लागते.
ज्जे बात
व्यसन हा आजार आहे, आजार आहे म्हणून उपचारही आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आहे
सौ सुनार कि एक लुहार कि
__/\__
अरे बापरे ती मिसळपावची लिंक!
अरे बापरे ती मिसळपावची लिंक!
तुम्ही लिहलंय पोलीस कोठडीत बंद करून ठेवतात वगैरे पण मी बालपणापासून पाहिलेल्या एकही केसमधे हे झालेलं नाही. पाचही दारू आणि घरगुती हिंसाचारच्या केस होत्या.
एनिवे चांगली चर्चा झाली. सगळ्यांचे आभार _/\_
चांगल्या पोलीस अधिकार्यांची
चांगल्या पोलीस अधिकार्यांची मदत घेणे
हे म्हणूनच तर महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळेस तेथील पोलीस अधिकारी सहकार्य करेलच असे नव्हे.
ती लिंक आणि त्याखालचे
ती लिंक आणि त्याखालचे प्रतिसाद
ती वरची लिंक भयावह परिस्थिती
ती वरची लिंक भयावह परिस्थिती आहे.
अतुल ठाकूर , पोस्टमधून खूप छान माहिती मिळाली.
मुक्तांगण संस्था प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात असते का? मी रहाते त्या शहरातल्या व्यसनमुक्ती केंद्रात मला सहचरी स्वमदत गट आढळला नाही. किंवा असा काही गट असतो हे मला तरी आत्तापर्यंत माहीत नव्हते. कोटुंबिक सल्ला केंद्र , खाजगी समुपदेशक एवढंच माहीत होतं.
माहितीबद्दल धन्यवाद .
Pages