परतीचा.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 February, 2020 - 22:07

परतीचा पाऊस..

अरे पावसा, आलास पुन्हा? ये.. पण परतीचा असशील तरच हां..
काय घालायचाय तो धिंगाणा घाल, माझं छप्पर उडव, भिंती पाड, पार माझ्या आठवणींचं अस्तित्व सुद्धा गाडून टाक चिखलात.. पण परतीचा असशील तरच हां..

आधी आला होतास ना, तेव्हा माझ्या दारातुन वाहताना तुझ्या पाण्यात मी देखील माझी नाव सोडली होती, तुझ्या भरवश्यावर, मग तू थांबलास, डबकं झालं पाण्याचं अन नाव बुडाली.. आता पुन्हा नाव बनवणार नाही मी, प्रॉमिस.. पण परतीचा असशील तरच हां..

आणि हो, ते आधी म्हटलो ना तसा खरंच मला जमीनदोस्त कर, आठवणींना कायमचा गाडून मी एकटा उरेन, त्याच आठवणींच्या छाताडावर पाय रोवून पुन्हा भिंती बांधेन.. छप्परही चढवेन वर, यावेळी कौलारू.. पुढल्या वेळी तू कोसळलास तरी पागोळ्यातून निघून जाशील.. घाबरू नकोस, मी भिजेन नेहमीसारखा.. फक्त पुढल्यावेळी घर सांभाळेन माझं..
आजही तुझं स्वागत आहे, पण परतीचा असशील तरच हां..

- राव पाटील!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults