तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 January, 2020 - 05:35

नव्वदीच्या दशकातील घटना आहे. तेव्हा शैक्षणिक कारकिर्दीत चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांना फार महत्व दिले जायचे. हल्ली त्या असतात की नाही याचीही कल्पना नाही. माझ्या वर्तनावरून मी वाटत नसलो तरी गणित आणि बुद्धीमत्ता चाचणी या विषयातील हुशार प्राणी होतो. स्कॉलरशिप परीक्षातील भाषा हा तिसरा विषयही कसाबसा जमवून न्यायचो. त्यामुळे चौथीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत मी मेरीटमध्ये आलो होतो. ते देखील काठावर नाही तर मुंबईत चक्क चौथा आलो होतो.

निकाल घोषित झाला. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांची माणसे शाळेत आली. आम्हा गुणवान विद्यार्थ्यांचा शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत फोटो काढून गेली. तिसर्‍या दिवशी तो फोटो पेपरात नावासह छापूनही आला. पण माझ्या घरात मात्र आपल्या पोराने असा काही तीर मारला आहे याची साधी कल्पनाही नव्हती. बहुधा तेव्हा आमच्याकडे रोज वर्तमानपत्र यायचे नाही. तर शेजारच्या घरातून कोणीतरी धावत आले. अहो तुमच्या ऋन्मेषचा फोटो आलाय बघा पेपरात, त्याला स्कॉलरशिप मिळालीय. तेव्हा घरच्यांना माझे हे प्रताप समजले. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर त्यांनी मला आनंदाने झोडपलेच.

पुढे सातवीतही स्कॉलरशिप मिळाली. पुन्हा ते फोटो सोपस्कार झाले. विशेष कौतुक वाटले नाही. कारण आधी हे आयुष्यात एकदा घडून झालेले.

पण गेल्या आठवड्यात मात्र ईनकमटॅक्स संदर्भात जुनी कागदपत्रे शोधत असताना बरेच दिवसांनी त्या वर्तमानपत्राच्या कात्रणावर नजर पडली. सोबत पोरगी माझ्या कागदपत्रांच्या पसार्‍याशी खेळत होती. तिलाही मोठ्या हौशेने ते कात्रण दाखवले. तिनेही मोठ्या हौसेने ते बघितले. मात्र पेपरात फोटो येणे हे तेव्हा काय भारी फिल देणारे होते हे तिला शब्दात काय कुठल्याही प्रकारे समजावून सांगता येण्यासारखे नव्हते. किंबहुना आज फेसबूक इन्स्टाच्या जमान्यात जो तो आपली स्वत:ची हवी तशी मार्केटींग करतो तिथे असे पेपरात फोटो येण्याचे कोणाला किती कौतुक असेल हा प्रश्नच आहे. पण आजही आमच्या घरातील नातेवाईकांमधील सारेच आठवण काढतात, की हुशारीसाठी म्हणून पेपरात फोटो येणारा ऋन्मेष आपल्या घरातील पहिलाच पोरगा. आणि आताही आमच्या घरात या पिढीतले कित्येक जण शिक्षणासाठी परदेशी गेलेत, तिथेच स्थायिक झालेत, पण पेपरात फोटो येणारा अजूनही मी एकटाच आहे Happy

माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी पेपरात फोटो येणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या फोटोची आठवण स्पेशल असेल. अनुभव वाचायला आवडतील Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि बायको दोघेही पत्रकार आणि त्यामुळे आम्ही ज्या पेपर मध्ये काम करत होतो त्यांनी आमचा लग्नाचा फोटोच छापलेला
त्याचे कात्रण अजूनही जपून ठेवले आहे

दुसरे म्हणजे वेस्ट इंडिज ला झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लोकसत्तेत होतो,त्यांनी स्पेशल 4 पाने रोजची अशी पुरवणी काढलेली आणि एकत्र काम करायला सोपे होईल म्हणून सगळ्या शहरातल्या आवृत्ती मधल्या क्रीडा पत्रकारांना मुंबईत आणून राहायची व्यवस्था केली आणि एकच ऑफिस मधून काम करायचं सांगितले. तो एक महिना मी लोर परेल ला होतो. आणि गंमत म्हणजे स्पर्धा संपल्यावर संपादक म्हणाले की पुरवणी चे काम करणाऱ्या सगळ्या टीम चा एकत्र फोटो छापू. त्यानुसार लोकसत्ता च्या गच्चीत फोटोसेशन झालं आणि प्रत्यक्ष पेपर मध्ये छापताना आर्टिस्ट ने गंमत केली, त्याने त्या फोटोचा मागे डिझाइन म्हणून वेस्ट इंडिज मधला स्टेडियम चा कट आउट लावला.
त्यामुळे कहर म्हणजे खूप जणांना वाटलं की आम्ही महिनाभर वेस्ट इंडिजला होतो. आणि एकदा तर फोन पण आला की आम्ही कार्यक्रम ठेवतोय, तुमचे वेस्ट इंडिज चे अनुभव यावर बोलाल का
मी म्हणलं अहो आम्ही नव्हतो गेलो
तर म्हणे ह्या आम्ही पाहिलाय की फोटो पेपरला आलेला
माझी अक्षरशः पुरेवाट झाली त्यांना समजवताना Happy

अरे वाह, तुम्ही पत्रकार होता, ते सुद्धा विंडीज वर्ल्डकप म्हणजे २००७ साली .. बाकी लग्नाचा फोटो पेपरात हे भारी, पेज थ्री सेलेब्रेटी Happy

होतो नाही, अजूनही पत्रकार च आहे
फक्त फिल्म आणि राजकारण सोडून अन्य विषय
मुख्यत्वे क्रीडा त्यातही क्रिकेट व्यर्ज Happy

हा अजून एक म्हणजे आम्ही पुणे ते कन्याकुमारी केलं होतं त्यावेळी सायकलिंग ची इतकी क्रेझ नव्हती त्यामुळे मी आल्यावर एक छोटी बातमी केली आणि फोटोसह पाठवून दिली सगळ्या पेपर ला
त्यामुळे जवळपास सात ते आठ वृत्तपत्रात आमच्या मोहिमेची बातमी फोटोसह छापून आलेली

त्यामानाने जम्मू पुणे च्या वेळी इतका उत्साह नाही दाखवला कोणी, का ते कळलं नाही, बहुतेक हे लोकं सारखेच कुठंतरी जातात, किती वेळा यांचा फोटो छापणार असा विचार केला असावा Happy

Pages