सुंदर अक्षर

Submitted by Athavanitle kahi on 23 January, 2020 - 23:03

आज अक्षर दिनाच्या, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. एक शब्द दहा वेळा लिहून गिरवून घेऊन चांगलं वळण देणाऱ्या शिक्षकांना तसेच सुलेखा पाटी ज्यांनी वापरली आहे, त्यांना त्याचं महत्त्व आहेच त्याच्या निर्मात्याला, आणि मैत्रिणीच अक्षर सुंदर आहे म्हणून जीव लावून मेहनत घेणाऱ्या त्या निरागस बालमनाला, आणि थोडेसे प्रयत्न करूनही अक्षर चांगलं होत नाही म्हणून नाद सोडून देणाऱ्या मित्र-मैत्रिणींनाही अक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अगदी तसच सांगायचं म्हणजे ऑफिसमध्ये एन्ट्री करताना खूप कंटाळा यायचा दुसऱ्याच अक्षर सहज वाचताच येत नाही. आणि म्हणून छापील बिल असलेले एन्ट्री पटापट व्हायच्या. शाळा-कॉलेजमध्ये असतानाही आपण गैरहजर असल्यानंतर कोणाची वही घरी आणून ते पूर्ण करताना खूप त्रास व्हायचा. अर्थ समजून घेत, शब्दांचा अंदाज घेत ती वही पूर्ण केली जायची. का कोणास ठाऊक पण दुसऱ्याच अक्षर जर ते खराब असेल तर नाही वाचता येत मला आणि पहिल्या दोन चार ओळी वाचल्या की कंटाळा पण येतो. पहिल्यापासूनच माझ्या वह्या कधीही कोणी हातात घ्याव्यात अशा स्वच्छ टापटीप असायच्या. खोडलेल्या शब्दावर अगदी भरपूर जोर देऊन पान काळ केलेलं मला अजिबात रुसायचं नाही. दुसऱ्याच पेन मागतानाही जीवावर येई. पाठीमागून चावलेलं पेन किंवा डुग डु गणार वेगळीच रिफील घालून ऍडजेस्ट केलेलं पेन माझ्याकडे कधीच नसायचं. माझ्या पेनांच कधी टोपणही हरवत नसे. पण असो ही सर्व गम्मत केलेल्या, विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणी लक्षात राहिल्या असतील. या अक्षर दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवी नववी दहावी च्या वह्या डोळ्यासमोरून गेल्या. प्रयोग वही, आलेख वही निबंधाची वही याची विशेष घेतलेली काळजी आठवली. सुंदर वळणदार अक्षर ही खरोखरच देणगी आहे मला तरी अक्षर चांगले होण्यासाठी फार काही करावे लागले नव्हते. परंतु अक्षर वाचण्यासारखे तरी असावे.
सुंदर वळणदार अक्षर ही आजीकडून मिळालेली देणगी लेकीला पण मिळाली याचा जास्त आनंद होत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन वर्षांपूर्वी मी मटात लिहिलेला लेख…

हस्ताक्षराचे भविष्य
कॉम्प्युटर, मोबाइल यांनी माणसाची अनेक कामे सोपी केली, पण कित्येक पारंपरिक, जुन्या गोष्टींना मूठमाती द्यावी लागली. ‘शिकलेल्या’ माणसासाठी आवश्यक असलेली हस्तलेखन कलाही कॉम्प्युटर, मोबाइलमुळे अस्तंगत होण्याचा धोका वाढला असून, पुन्हा त्याची वाटचाल शब्दशः निरक्षरतेकडे सुरू असल्याचे चित्र आहे.
--
आपण आज दिवसभरात आपल्या हस्ताक्षरात किती लिहिले, असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला तर, बहुतांश जणांचे उत्तर नकारात्मक येईल. शैक्षणिक क्षेत्र आणि काही सरकारी कार्यालये सोडली तर इतर सर्व क्षेत्राचे संगणकीकरण झाल्यामुळे सही आणि शेरे मारणे याशिवाय लिहिण्याच्या कलेचा वापर केला जात नाही. आता तर डिजिटल सिग्नेचर आल्यामुळे सह्यांचीही आवश्यकता पडत नाही. शाळांमध्ये पानेच्या पाने ‌लिहिणाऱ्यांना आज चार ओळी लिहायच्या म्हटल्या तरी हात थरथरतो. सवय राहिली नाही. बहुतांश जणांची हीच गत आहे. पेनचा वापर फक्त सहीसाठी केला जातोय. आता तर डिजिटली व्यवहारांसाठी पासवर्ड, ओटीपी आणि अंगठ्यांचे ठसे असे पर्याय आल्यामुळे तेथेही लिहिण्याची गरज सरत चालली आहे. शाळांमधले दप्तर कमी होत जाऊन मुलांच्या हाती टॅब येताहेत. शिक्षक खडू-फळ्याऐवजी स्क्रिनवर मुलांना धडे देताहेत. त्यामुळे हजारो वर्षांपासून मानवाने विकसित केलेली ही हस्तलेखन कला येत्या काही वर्षांत लयास जाते की काय, अशी शंका भेडसावू लागली आहे.
भाषा ते लिपी प्रवास
मनुष्याच्या सामाजिक विकासाबरोबर त्याने विविध भाषा विकसित केल्या. या भाषा बोलणे सोपे होते, पण झालेले बोलणे दीर्घकाळासाठी साठवून ठेवणे अशक्य होते. यासाठी मनुष्याने अक्षराचा शोध लावला. अ-क्षर म्हणजे जे कधीच नष्ट होत नाही. अक्षरांचे शब्द बनले आणि शब्दांची वाक्ये. ही भाषा प्रत्यक्ष जतन करून ठेवण्यासाठी लिपीचा शोध लागला. जगभरात आज सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. त्यापैकी बहुतांश भाषांना लिहिण्यासाठी ठराविक लिपी आहे.
भारतात मराठी, हिंदी, गुजराती यासह काही प्रादेशिक भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरली जाते. हजारो वर्षांपासून ही लिखाणाची कला मनुष्याने अवगत केली आहे. गुहा, ताम्रपत्रे, भुर्जपत्रे, झाडांची पाने अशा विविध माध्यमांचा मुक्त वापर करीत त्या-त्या युगात मनुष्याने आपल्या अस्तित्वाच्या खुणा हस्तलेखनाच्या माध्यमातून ज‌िवंत ठेवल्या आहेत. संतांनीही आपल्या अभंगांतून लेखनाचे महत्त्व वर्णन केले आहे. संत तुकाराम महाराजांनीही संत प्रत्यक्ष कृती करूनच दाखवतात, हे सांगण्यासाठी आजोबा नातवासाठी कशी हातात पाटी घेऊन प्रत्यक्ष लिहून दाखवतात, असा दाखला देताना ते म्हणतात- अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी || तैसे संत जगी | क्रिया करुनी दाविती अंगी || प्रत्येकाची शिक्षणाची सुरुवात लिखाणानेच होते. मग भिंतीवर रेघोट्या मारणे असो, पाटीवरचं गमभन असो की, त्यानंतर शालेय जीवनभर वह्या खरडणे असो… यात हस्ताक्षराचा सर्वात मोठा वाटा होता, आहे. ‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’ हा सुविचार तर प्रत्येक शाळेत लिहिलेला असतोच असतो. एखाद्या मुलाचं सुंदर अक्षर असेल तर त्याला ‘मोत्यां’ची उपमा दिली जायची. असे हे हस्तलेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
प्रत्येक माणसाला सारखे अवयव असले आणि साधारणपणे तो एकसारखाच असला तरी तो निसर्गतः एकमेकांपासून पूर्णतः भिन्न आहे. जशा व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षरही वेगळे. अगदीच अपवाद सोडला तर प्रत्येकाने आपल्या हस्ताक्षराची एक शैली विकसित केलेली असते. या शैलीमुळेच जगभर ‘हस्ताक्षरावरुन भविष्य’ सांगणारे अनेकजण उदयाला आले आणि त्यावर शेकडो पुस्तकेही लिहिली गेली. पण, गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञानात ज्या झपाट्याने बदल झालेत, त्यामुळे हजारो वर्षांपासून आपले अस्तित्व टिकून असलेल्या ‘हस्त’लेखन कलेचे भविष्य अधांतरी वाटू लागले आहे.
पूर्वी सरकारी, खासगी कोणतेही कार्यालय असो, तेथे हस्तलिखितातच व्यवहार चालायचे. शाळेतील शिक्षणाला तर हस्तलिखितांशिवाय पर्यायच नव्हता. मात्र, प्रिंटिंगचा शोध लागला आणि त्यातून हस्तलेखन कलेला पहिला सुरूंग लागला. हाताने लिहिणे हे वेळखाऊ आणि कष्टाचे काम. त्यातही चुका होण्याच्या शक्यता अधिक. ते जतन करून ठेवणे, त्याच्या प्रती करण्यासाठी पुन्हा ते तसेच लिहून काढावे लागायचे. यातून सुटका केली प्रिंटिंगने. अक्षरांचे साचे करून त्याद्वारे कागदावर अक्षरे उमटविता येतात, हा खरेतर चमत्कारच होता. विशेष म्हणजे एकाचवेळी शेकडो, हजारो प्रती करणे शक्य झाले होते. त्यानंतर ‌प्रिंटिंग क्षेत्रातही मोठे बदल होत गेले. अधिकाधिक उत्तम, सुवाच्च्य, रंगीत प्रिटिंगची सुविधा सुरू झाली. टायपिंग मशीनने कार्यालयीन कामकाज सोपे केले. त्यानंतर ‘जादूचा दिवा’ हाती लागावा, तसा कॉम्प्युटर आला आणि लेखनाच्या सर्व परिभाषाच बदलून टाकल्या. कॉम्प्युटरमुळे प्रिंटिंगसाठी अक्षरांचे खिळे जुळविणे हे किचकट काम कमी झाले. कॉम्प्युटरवर असंख्य भाषांचे प्रोग्रामिंग केले गेले आणि कोणतीही भाषा कमी कष्टात लिहिणे, तिचे जतन करणे, असंख्य प्रती काढणे, एकदुसऱ्याला कागदाचा वापर न करता पाठविणे शक्य झाले. पत्रव्यवहार सगळा ई-मेलवर झाला. त्यामुळे हाताने पत्र लिहिणे हेही कमी झाले. स्मार्टफोन आल्यानंतर तर जगच बदलून गेले. मनुष्याने कधी कल्पनाही न केलेल्या गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातून शक्य होऊ लागल्या. कॉम्प्युटरवर पाच बोटांनी करता येणारी टायपिंग फोनवर केवळ एक, दोन बोटांच्या माध्यमातून करता येतेय.
फिनलंडसारख्या देशांत शाळांमधून लिहिण्याचे धडे देणे पूर्णतः बंद करण्यात आले आहे. शाळांमधून हाताने लिहिण्याऐवजी टायपिंग शिकविली जात आहे. असे अनेक देश आहेत, जे लेखनकला पूर्णपणे बंद करण्याच्या मार्गावर आहेत. झपाट्याने बदलते तंत्रज्ञान, त्याच्या वेगाने धावणाऱ्या जगाशी स्पर्धा करायची असेल, तर हे गरजेचे आहेच. पण, त्यासाठी आपण एका अमूल्य कलेवर संक्रांत आणतोय, हे अनेकांच्या गावीही नाही. हस्ताक्षराच्या नष्ट होत चाललेल्या कलेवर देशभर चिंता व्यक्त केली जातेय. पण त्यासाठी ठोस काही होताना दिसत नाही. अमेरिकन लेखिका अॅन ट्रुबेक यांनी हस्ताक्षराच्या भवितव्याबाबत ‘द हिस्टरी अँड अनसर्टेन फ्युचर ऑफ हँडरायटिंग’ नावाचे पुस्तक लिहिले आहे; ज्यात हस्ताक्षर कला वेगाने अस्तंगत होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ट्रुबेक यांनी हस्ताक्षरावर अनेक शोधनिबंध आणि पुस्तके लिहिली आहेत. महाराष्ट्रातही काही शिक्षक, साहित्यिक हस्ताक्षर कला टिकावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, तंत्रज्ञानाच्या आवाक्यापुढे ते फारच तोकडे आहेत. हस्ताक्षर सुधार कार्यशाळांची आवश्यकता आहे. सरकारी पातळीवर हस्ताक्षर सुधार प्रकल्पाला बळ देणे गरजेचे आहे. जे लोक, संस्था असे प्रयत्न करताहेत, त्यांनाही सर्व प्रकारचे सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. शाळांमधून कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. पूर्वीसारख्या सुलेखनवह्यांची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. जर याबाबत आतापासूनच जागृती झाली नाही, तर ही अमूल्य कला नष्ट होण्यास पुढचे शतक उजाडण्याचीही गरज उरणार नाही. हस्ताक्षराचे भविष्य टिकवायचे असेल तर प्रत्येकाने रामदास स्वामींनी दिलेला ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।’ हा सल्ला पाळणे अनिवार्य आहे.
--
अंगठेबहाद्दर ते अंगठेबहाद्दर
पूर्वी ज्याला लिहिता वाचता येत नव्हते, त्याला अंगठेबहाद्दर म्हणायचे. पण, आता जो सर्वाधिक हायटेक आहे, तोही अंगठेबहाद्दरच आहे. सोशल साइटसमुळे एकमेकांना प्रत्यक्ष पत्रे लिहिण्याऐवजी स्मार्टफोनवर टायपिंग करणे सोपे झाले. एकच मेसेज असंख्य लोकांना एकाच वेळी पाठविता येतोय. मेसेज पाठवायचा तर टा‌यपिंगसाठी अंगठ्याचा वापर आणि सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांसाठीही आता ‘आधार’च्या माध्यमातून केवळ अंगठ्यांच्या ठशांवर सर्व कामे होऊ लागली आहेत. त्यामुळे आपला प्रवास अंगठेबहाद्दर ते अंगठेबहाद्दर असा झाला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

अरे वाह बोकलत, सस्मित दोघांची अक्षरं सुंदर आहेत.
टोच्या, हरिहर दोघांची कॅलिग्राफी सुंदर आहे.

स्वाती२ यांची पोस्ट आवडली.

> Submitted by टोच्या on 24 January, 2020 - 21:55 > हा प्रतिसाद नवीन लेख स्वरुपात यायला हवा होता.

टोच्या, बोकलत, सस्मित, हरिहर सर्वांच्या सुंदर हस्ताक्षराचं कौतुक वाटलं. टोच्या यांनी लिहिलेले नियम सोपे वाटले तरी जलद आणि रेखीव लिहिण्यासाठी हाताला सवय असायला हवी Happy

माझ्या हस्ताक्षराचा मला फार फार न्यूनगंड वाटत आला आहे. मी रजेचा अर्ज देखील टाईप करून देत होतो. मात्र मी बुध्दिमान आहे हे मला माहित आहे, पण इतर लोक माझ्या अक्षराला पाहून जी नाकं मुरडत असत त्यानं खूप वेदना व्हायच्या. प्राथमिक शाळेत असताना गुरुजी पाढे किंवा बाराखडी लिहायला सांगत तेव्हा गुरुजींचे सांगून होईपर्यंत मी दोन तीन वेळा फास्ट लिहून त्यांना दाखवायचो व ते मला शाबासकी देत, या घाईनं लिहिण्यानंच माझं हस्ताक्षर बिघडले असावं. त्यातल्या त्यात इंग्रजी अक्षर बरं आहे.

ज्याचें अक्षर सुंदर त्याची दानत छान... इयत्ता ७वी किंवा ८ वी च वाक्य लक्ष्यात आले...
आणि गुरुजी आठवले...
छान....

सुलेखा पाटी ज्यांनी वापरली आहे, त्यांना त्याचं महत्त्व आहेच >>>> १.

टोच्या यांनी जे नियम सांगितले ते नियम आमच्या वर्गातील मुलगी पाळत होती की काय माहित नाही,पणव्पहिल्या ओळीतील अक्षराची लांबी रुंदी,तिसर्‍या चौथ्या ओळीतील अक्षराशी मॅच व्हायची.छोटे अक्षर असायचे पण एकसलग.नेहमी तिचा पहिला क्रमांक ठरलेला असायचा.तरीही का कोण जाणे मला तिचे अक्षर तेवढेसे आवडायचे नाही.तिचे अक्षर निर्जिव वाटायचे.प्रत्येक अक्षराला एक व्यक्तिमत्व असते असं मला तरी वाटते.मला मोकळे,गोलसर आवडते.

सुलेखा पाटीचे माहित नव्हते,माझे अक्षर ठीकठाक, वाचनीय होते.आता मात्र बरीच वाट लागली आहे. मधे मी इंग्रजी आणि मराठी परिच्छेद लिहित होते.कारण हात थरथरायला लागतात लिहायला लागले की.सहीदेखील बदलत चालली.

सुलेखा पाटी अजूनही मिळते का ? असल्यास मुंबईत कुठे मिळेल?

देवकी,
मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या दुकानात मिळेल. दादरला आयडिअलकडे चौकशी करा . माझ्या भाचीसाठी गेल्यावर्षी मावशीने ठाण्यात गावात जी अभ्यासाच्या पुस्तकांची दुकाने आहेत तिथून घेतली.

धन्यवाद स्वाती 2 !
मुदलात अशी पाटी असते हे इथे वाचून कळले.हा माबुदो.

आता दादरला जाऊन पहाते.

खरोखरच पहा देवकी, ते सुलेखा पाटी वरील वळणदार अक्षरे गिरवता गिरवता लहान मुलांच्या हाताला खरोखरच चांगले वळण लागते

हा लेख वाचून शाळेचे दिवस आठवले. सुंदर अक्षर हाच खरा दागिना हा सुविचार शाळेच्या फळ्यावर आठवड्यातील एक दिवस तरी प्राथमिक शाळेतील बाई लिहायच्या. नंतर माध्यमिक वर्गात ज्याचे अक्षर सुंदर असेल त्या मुलांना शाळा भरायच्या आधी हे काम मिळायचे. माझे हस्ताक्षर पुर्वी एकदम छान नव्हते आणि अगदीच वाईटही नव्हते. घरातून वळणदार अक्षर/सुंदर अक्षर असावे असा काही आग्रह सुध्दा नव्हता. पण इयत्ता पाचवीला माझ्या शेजारी जो वर्गमित्र होता त्याचे अक्षर खुपच छान होते. हस्ताक्षर स्पर्धेत त्याचे बक्षीस ठरलेले असायचे. त्यातच ज्यांचे अक्षर सुंदर असेल त्याला फळ्यावर दिवस/वार, तारीख आणि सुविचार लिहायला मिळायचे व तो एका अर्थाने शिक्षकांच्या मर्जीतला व्हायचा.
इथूनच आपले अक्षर सुंदर असावे हा विचार पहिल्यांदा मनात डोकावला. आणि मग सुंदर हस्ताक्षरासाठी प्रयत्न करणे सुरू झाले. त्यानंतर शाळेतील हस्ताक्षर स्पर्धेत मिळवलेली बक्षीसे, वर्गातील फळ्यावरील सुविचार ते शाळेच्या सुचना फलक लिहिण्यापासून, विभागातील सार्वजनिक उत्सवांचे फलक लिहिण्या पर्यंतचा प्रवास हा लेख वाचून डोळ्यासमोर तरळला.

माझ्या शाळेत वार्षिक हस्तलिखित असायचे.
सुंदर हस्ताक्षर असणार्या मुलांकडुन रंगीत पानावर लिहुन घ्यायचे. मस्तच कल्पना. माझाही सहभाग असायचा.
आता मुलांना प्रिंटेड अ‍ॅनुअल मॅगझीन मिळतं.

नरेश माने

आपले अक्षर सुंदर व्हावे ही इच्छा मनात निर्माण झाली, आणि तुम्ही ते सुंदर केलेत. ग्रेट

Pages