अस्तित्व !!! (भाग ८ )  

Submitted by Sujata Siddha on 21 January, 2020 - 05:38

अस्तित्व !!! ( अंतिम  भाग)

बाकींच्यांबरोबर बोलत बोलत जेवण झालं, गुरूजींशी तिला बोलायचं होतं पण आत्ता नाही संध्याकाळी बोल असं हर्षाने तिला संगितलं , गुरुजी आत्ता ऑफिसला जाणार आहेत. हे ऐकून तिला नवल वाटलं ,”अगं बघतेस काय अशी ? ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत .आत्ता ऑफिसला जाऊन संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील , म्हणून प्रवचन पण संध्याकाळी ठेवलंय , तुला काय वाटलं ते आश्रमात वैगेरे राहतात ? नाही आता घरी जाऊन मस्त सूट-बुटात किंवा जीन्स मध्ये ऑफिसला जातील ‘कूल ‘आहेत एकदम. तुला माहितीये रिटायर्ड झाल्यावर पण ऑफिस ने त्याना re-join करून घेतलय “ हर्षाच्या चेहऱ्यावर गुरूजींबद्दलचा अभिमान आणि प्रेम दिसत होतं . तितक्यात गुरूजी निघाले, त्याबरोबर सर्वजण त्यांना पोहोचवायला खाली निघाले, नील पुढे आला आणि त्यांच्या पायाशी वाकला , त्याच्या खांद्यावर त्यांनी थोपटलं , “ नील ,तुम आ रहे हो ना बेटा हमे छोडने ? “
“नही गुरूजी कभी नही ,आपको क्यू छोडेंगे ?पकड के रखेंगे हमेशा “ तो त्याच्या नेहेमीच्या स्टाईलने त्याना मिठी मारत म्हणा ला आणि सगळे हसले. गुरूजींनीही हसत हसत त्याच्या खांद्यावर थोपटलं , “बदमाश ! “ ते म्हणाले आणि सर्वजण निघाले , तो आता अगदी तिच्या जवळून पुढे गेला तरी त्याचं लक्ष गेलं नाही, ड्रायव्हिंग सीट वर तो जाऊन बसला गुरूजी त्याच्याशेजारी बसले , अजून तीन शिष्य मागे बसले आणि सगळे बघता बघता निघून गेले. त्याना निरोप देऊन बाकीचे निघाले , शुभ्रतानेही मग तिची स्कुटी काढली, खूप रिकामं रिकामं वाटत होतं तिला. भ्रमनिरास झाल्यावर जसं होतं तसं काहीसं , सारा रस्ताभर मन शांत (की खिन्न ?) होतं , घरी आल्यावर , कपडे बदलून, हातपाय धुवून ती बेड वर थोडा वेळ लवंडली ,बाहेरून रणरणत्या उन्हातून आल्यानंतर घरातला गारवा तिला हवाहवासा वाटला , जेवण’ पलाश ‘मध्ये झालं होतं आता काही करायचं नव्हतंच , बेडवर पडल्या पडल्या डोक्यावर हात ठेऊन तिचं मन झालेल्या घटनांचा आढावा घेऊ लागलं . ‘पलाश ‘ मध्ये नील दिसल्यापासून ती खूप अस्वस्थ झाली होती . कॉलेज मध्ये तिची आणि नील ची गाठ पडणं , एवढ्या मुलांमधून फक्त तिचे आणि त्याचे बंध जुळु पहाणं, त्याच्याशी आपणहोऊन ते बंध तोडल्यानंतर काही वर्षांनी अचानक त्याचं असं आयुष्यात येणं आणि ज्या घटनेने तिच्या आयुष्याची दिशा बदलू पाहत होती ,किंबहुना ज्या दिशेला तिच्या आयुष्याचं वळण जात होतं अनपेक्षित पणे त्याच वळणावर तो तिला पुन्हा भेटणं ,परवा त्याचा फोटो पाहून तिच्या मनात पहिला विचार आला होता , कोण असेल याच्या पाठीशी ? सरप्राइजिंगली आज तीही त्याच परिवारात सामील होणं , त्याचे सद्गुरू तिला लाभणं , जणू काही सर्व सुसंगतपणे कोणीतरी ठरवून ठेवलंय , तिचे आजोबा तिला लाडाने बापू म्हणायचे , त्यांचं वाक्य तिला आठवलं “ बाप्प्या भगवंताने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक आणि एक क्षण प्लॅन केलेला असतो बरं , आपल्या आयुष्यात येणारा रिक्षेवाला सुद्धा काहीतरी देणं घेणं असतं म्हणून येतो , उगाच नाही येत . “ “आजोबा मग ते दरोडेखोर ज्यांनी तुमच्या थकल्या देहाची पण पर्वा न करता तुमच्यावर असंख्य घाव घातले , त्यांचं आणि तुमचं काय देणं -घेणं होतं एकमेकांशी ? इतकं हिंस्त्र -पशुवत वागताना त्यांना जराही लाज कशी वाटली नाही ? आणि मग बाबाजी तेव्हा आपल्याला लाभले असते तर ते भीषण हत्याकांड टळलं असतं का हो ? “ शुभ्राचे डोळे पुन्हा अश्रूंनी डबडबले ,दोन्ही बाजूंनी कढत पाण्याची धार उशीवर ओघळायला लागली . किती तरी वेळ ती अशी रडत होती . पलाश मध्ये जायला लागल्यापासून आज प्रथमच ती पुन्हा अशी व्याकूळ झाली होती , आणि ह्याच कारण तिचं तिलाच उमजत नव्हतं , संध्याकाळच्या प्रोग्रॅम ला जाण्याचा तिचा उत्साह एकदम थंड झाला , मी येत नाही हे शारदा माँ ना कळवावं असं वाटून तिने फोन हातात घेतला आणि चमकली , एकाच नंबरवरून ५-६ मिस्ड कॉल दार १० मिनिटांच्या अतंरावर होते . नंबर बघून तो नील चा असावा असं तिला वाटून गेलं, एवढे फोन येऊन गेले , आपल्याला कळलं कसं नाही ? मग तिला आठवलं सकाळी दीक्षेच्या वेळी तिनेच नाही का फोन सायलेंट मोड वर ठेवला होता ., धडधडत्या अंत:करणाने तीने फोन लावला .पहिल्या रिंग मध्येच फोन उचलला गेला “हॅलो “ पलीकडून आवाज आला , नील चाच होता
“हाय , “ तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके तिलाच ऐकू येऊ लागले .
“संध्याकाळी येणार आहेस ना ? “
“ अं ? हो..म्हणजे नाही .. बहुतेक नाही.. .i mean ठरवलं नाही अजून काही “ ती कशीबशी बोलली . (तिला स्वतः:च्या बावळट्पणाचा राग आला )
“हाहाहाहा SSSSSS “ पुढची ,५ मिनिटं त्याने हसण्यात घालवली आणि मग म्हणाला “ ये मी वाट बघतोय ! “ पुन्हा तोच कॉन्फिडन्ट आवाज, ऑर्डर सोडल्यासारखा, तो ऐकून ती मनातल्या मनात तणतणली “,मुळीच नाही येणार जा !.. “
“असं नको करूस शुभु ये… , मला खूप बोलायचंय तुझ्याशी , प्लीज ये “ फोन कट झाला . त्याचा हा आर्जवी स्वर तिला सर्वस्वी नवीन होता. “शुभु ? “ तिच्या चेहेऱ्यावर तिच्या नकळत लाली आली , श्रावणातल्या ऊन-पावसारखं , मघाशी खिन्न झालेलं तिचं उदास मन एका क्षणात प्रफुल्लीत होऊन गेलं ,तिने मोबाईल मध्ये पाहिलं संध्याकाळचे पाच वाजत आले होते ती उठून बसली ,लगेच निघालो तर सात पर्यत पोहोचता येईल , असा विचार करून ती उठली , बेडवरच पर्स वैगेरे पडली होती, तो सारा पसारा आवरला आणि स्वतः:चं आवरायला आत पळाली.पुढच्या दहाव्या मिनिटाला तिच्या आवडीचा आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ती तयार होती, आरशासमोर उभं राहून आवरताना तिच्या डोळ्यासमोर सारखा ‘नील’ येत होता . ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून , पर्स घेऊन ती निघणार तोच बेल वाजली , “आत्ता या वेळी कोण? “ मनाशी विचार करत तिने दार उघडलं आणि उडालीच, दारात ‘नील ‘ उभा होता.
“तु ? “ तिच्या चर्येवर प्रचंड आश्चर्याचे भाव आले .
तो हसत आत आला , आणि दरवाजा जवळच्या खुर्चीवर बसला तरी ती त्या धक्क्यातून अजून सावरली नव्हती . अचानक तिला जाणीव झाली,आपल्या अंगावर ओढणी नाहीये, ती लगबगीने कपाटात ओढणी शोधायला लागली , मग त्याचवेळी तिला आठवलं कि या ड्रेस वर ओढणी नव्हतीच , तोच तिला आठवलं आपण अजून त्याला पाणीही विचारलं नाही, “बस हं पाणी आणते” , असं पुटपुटत ती पुन्हा लगबगीने आत गेली, माठाजवळ ग्लास नेल्यावर तो आत न जाता जेव्हा माठावरच आपटला तेव्हा मात्र ती एकदम थांबली , काय होतंय आपल्याला ?आपण एवढे overcautious का होतोय ??? … तिच्या स्वतः:च्या स्वभावाशी हे विसंगत होतं , कायम ताठ राहायची सवय होती तिला . मग पाच मिनिटे थांबून तिने स्वतः:ला शांत केलं पाणी घेऊन वळली , आणि पुन्हा एकदा स्तब्ध झाली ‘नील ‘ तिच्या समोर उभा होता ,हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत . मागे पाण्याचा माठ आणि पुढे नील !! मघाशी प्रयत्नपूर्वक मिळवलेला संयम पुन्हा गेला आंणि तिचा हात थरथरायला लागला , त्याने शातंपणे तिच्या हातातला ग्लास काढला , बाजूला ठेवला ,काही कळायच्या आत , तिच्या नाजूक कमरेला एका हाताने विळखा घालून जवळ ओढलं , तिच्या केसांवरून हात फिरवला आणि आवेगाने घट्ट मिठीत घेतलं , तिच्या संपूर्ण अंगातून सुखाची एक लहर सळसळत गेली . त्याच्या त्या उबदार आणि आश्वासक मिठीत तिला खूप सुरक्षित आणि शांत वाटलं , वर्षानुवर्षांचा एकांतवास आज संपला असं वाटून गेलं तिला , तिच्या डोळ्यातून पुन्हा झरझर अश्रू वाहू लागले आणि त्याचा झब्बा चिंब भिजून गेला .तिची निमुळती हनुवटी आपल्या मजबूत हाताने किंचित वर उचलून तिचे डोळे पुसत तो म्हणाला ,
“ मी फक्त आणि फक्त तुझा आहे शुभ्रता , आधीही तुझाच होतो आणि आताही , पण हे कळायला तुला सहा वर्ष लागली !” !!!!..” काही क्षण शांततेत गेले, तिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घेऊन त्याने तिच्या गालावर किंचित थोपटलं, “चल निघूया “!..
डॉ . बॅनर्जींची स्कूल मुलांच्या किलबिलाटाने बहरली होती , सगळ्यांची लगबग चालली होती , कोणी प्रोग्राम च्या तयारीत वेगेवेगळ्या कॉस्ट्यूम्स मध्ये फिरत होतं , कोंणी भाषण पाठ करत होतं , मुख्य हॉलपाशी आल्यावर , त्याला बघून तिथे एकच गलका झाला , ‘नील ‘ आजच्या कार्यक्रमाचा ‘chief guest ‘ होता, त्याला मानाने स्थानापन्न करतात तोच गुरुजीही आले ,ते होते आजचे ‘ Guest Of Honour “ .
. सुरूवातीला स्वागत ,परिचय आणि मग त्या दोघांच्या हस्ते ‘अकॅडेमिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला , ‘नील बोलायला उभा राहिला आणि बघता बघता त्याने शाळेतील सर्व मुलांची तसे त्यांच्या पालकांची मनं जिंकून घेतली , टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओव्हेशन घेत घेतच तो खाली बसला . त्यानंतर गुरूजींचं प्रवचन आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण भोजनगृहाकडे वळले , काही साधक गुरूजींच्या भोवती रेंगाळले होते , तर काही ‘नील शी गप्पा मारत होते , हर्षा तिला गुरूजींजवळ घेऊन गेली , “अरे आओ बेटी शुभ्रता, कैसी हो ? खाना खाया ?”
“नही गुरूजी , ऊसे आपसे मिलाना था इसलिये मै ही उसको यहा ले आई , लेकिन आप तो उसे पहचानते हो ? “ हर्षा चकीत होऊन म्हणाली .
“मा-बाप अपने सभी बच्चो को पहचानते है बेटी “
शुभ्रा त्यांच्या पायाशी वाकली , त्यांनी दोन्ही हातांनी तिला धरून उठवलं आणि आपल्या जवळ बसवलं , तिचा हात हातात घेत म्हणाले “ नील एक अच्छा लड़का है बेटा , मन मे कुछ मलाल मत रखना और तुम दोनो को तो बाबाजी ने चुना है , अपने कार्य के लिये , तो मन मे कोई शंका मत रखना ,you are a darling daughter of Babaji ,हमेशा हसते रहेना , पुरानी बातो को भूल जाना ही अच्छा है , समझ लो वो हत्यारे नही थे , उनका कुछ कर्ज था तुम्हारे घरवालो के उपर, वो वसूल करने आए थे , तुम दोनो पे नही था इसलिये , तुम दोनो बच गये , अब भगवान ने तुम्हे क्यू बचाया ये सोचो और उसपे ध्यान दो , ठीक है ? “ भरलेल्या डोळ्यांनी शुभ्रताने मान हलवली . ते हर्षा कडे वळून म्हणाले “जाओ बेटा , इसे लेके जाओ , खाना खालो और हा आईस्क्रीम जरूर खाना “ ते हसत म्हणाले .
“जी गुरूजी !..” हर्षा आदबीने म्हणाली आणि त्या दोघी तिथून निघाल्या .सगळ्यांबरोबर गप्पा मारत जेवण झालं , फक्त शुभ्रता मात्र गप्प गप्प होती , गुरूजी जे काही बोलले ते हर्षा किंवा तिथे असलेल्या साधकांपर्यत पोहोचलं नव्हतं .
“गप्प का आहेस शुभ्रता ? “ हर्षाने विचारलं .
“ए शुभ्रता अगं कुठे होतीस ? चल तुझी ‘नील ‘ शी ओळख करून देते ,” हि उल्का होती , गुरूजींच्या जुन्या साधकांपैकी एक , आणि एका ‘IT ‘ कंपनीची मॅनेजर .
“अं हो , चल .. “ शुभ्रता तिच्याबरोबर निघाली .
“तू गुरूजींना भेटलीस ? कसे वाटले गुरूजी ? “ उल्का च्या डोळ्यातून गुरुजींबद्दलच कौतुक ओसंडत होतं.
“आपले वाटले “ शुभ्रताने दोन शब्दात उत्तर दिलं . ती आणखीन खूष झाली .
“हो ना, अगं गुरूजी आहेत ते , त्याच्यासमोर बसलं कि आपलं भूत , भविष्य , वर्तमान , इतकंच काय आपल्या मागच्या जन्माचं हि स्कॅनिंग होतं, तिकडे काही सांगायची किंवा मागायची गरजच उरत नाही .”
“खरं आहे उल्का तुझं , मी घेतला अनुभव आत्ताच .”
“काय सांगतेस ? “ उल्का तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिली .
“त्यात एवढं नवल वाटण्यासारखं काय आहे उल्का ?आत्ताच तर तू म्हणालीस कि त्याना सगळं कळतं , उलटं त्यामुळे तर मला माझ्या प्रश्नांच उत्तर मिळालं “
“अगं कारण त्यांना सगळं कळत असलं तरी ते बोलून दाखवत नाही कधी ”
बोलता बोलता त्या दोघी ‘नील ‘ जिथे होता तिथे आल्या .
“नील भैय्या !.. SSS “ उल्काने हाक मारली तसा तो गर्रकन मागे वळाला .
“ही शुभ्रता , आजच तिची दीक्षा झाली , आपली नवीन गुरूभगिनी “ उल्का उत्साहाने तिची ओळख करून देत म्हणाली .
‘गुरूभगिनी ? “ शुभ्रताला एकदम कानकोंडं झालं .
तो मात्र जोरात हसला , आणि तिला म्हणाला “ Oh!..Glad to meet you miss. Shubhrta !.. welcome to Kriya yoga family !.. so from today onwards you are a Kriyaban , isn’t it ? “
“ yes..certainly it is … “ ती कसबसं हसून पुटपुटली .
“चल तुझी आणखी एक ओळख करून देतो सर्वांना “ त्याने तिचा हात धरला आणि तो झपाटयाने गुरूजींच्या दिशेने निघाला .
गुरूजी, डॉ बॅनर्जीं पती पत्नी आणि इतर लोकांशी चर्चेत रंगले होते , नील तिथे पोहोचल्यावर त्यांनी एकदम चर्चा थांबवली ,आणि ते सगळेच उत्सुकतेने त्यांच्या जोडी कडे बघायला लागले .
“गुरूजी आशीर्वाद दिजिये , हम दोनो को “ तिचा धरलेला हात तसाच धरून तो त्यांच्या पायाशी वाकला . गुरूजींनी जोरात त्याच्या पाठीवर थोपटलं , आणि दोघांना दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिले ,
“सुखी रहो बेटा , बाबाजी का आशीर्वाद तुम दोनो के साथ हमेशा रहेगा !..
तिथे उभ्या असलेल्या डॉ बॅनर्जींनी लगेच पत्नीला माईक वर त्याच्या एंगेजमेंटची अनाऊंसमेंट करायला सांगितली . अनाउन्समेंट होताच सर्वांनी टाळयांच्या कडकडाटात आपली पसंती दर्शवली आणि मग त्या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी तिथे एकच गर्दी उसळली . संध्याकाळ नंतर जे काही घडत होतं ते इतक्या वेगाने घडत होतं कि ते सगळं शुभ्रताच्या मनाला पेलणं कठीण जात होतं , पण सुखाच्या सरींनी चिंब भिजणं म्हणजे काय हे तिला आत्ता कळालं , खूप मनापासून आनंदली ती ,बाबाजींच्या साक्षीने सुरूवात झालेल्या नव्या ‘अद्भुत ‘दुनियेत आज तिचा खऱ्या अर्थाने प्रवेश झाला होता !...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मन्या ऽ मनापासून धन्यवाद !.. हा भाग अंतिम होता .कथा जरूरीपेक्षा जास्त रेंगाळू नये म्हणून या भागात  संपवली आहे .

ओह्ह !! अंतिम होता का ... गुड़ Happy
इतक्या छान वळणावर आणि लागोपाठ सुखाच्या सरी कोसळत असताना मन आपसूक थोडं कातर झालेलं की शुभ्रतावर काही भयंकर संकट तर नाही नं वाढून ठेवलंय नियतीने. निल आणि त्याच्या ग्रुपचे /रॅकेटचे काही वाईट ईरादे तर नसावेत ना असेही क्षणभर वाटून गेले पण हां सुखांत पाहुन खरंच खुप बरे वाटले.

अहा..
दोन्ही भाग लागोपाठ वाचले, सुखांत वाचून खरंच बरं वाटलं Happy
मस्त कथा!!!

PradnyaW ,मीनाक्षी कुलकर्णी,या विषयावरचं लेखन आवडेल की नाही या बद्दल मी साशंक होते , पण तुमच्या सर्वांच्या  कंमेंट्स ने  मनाची उमेद वाढवली . खूप मनापसून धन्यवाद !..
@अज्ञानी  :  तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे , कारण आसपास इतकी निगेटिव्हिटी भरली आहे कि काही pure , divine आणि आयुष्य बदलवून टाकणाऱ्या सुंदर गोष्टी आजूबाजूला असतात हे आपल्याला मान्य करताना देखील भीती वाटते , पण विश्वास ठेवा या जगात आपल्या कल्पनेपेक्षाही नि:स्वार्थी , चांगली आणि अद्भुत माणसं  आहेत . हा माझा अनुभव आहे .