अस्तित्व !!! (भाग ७ )
पहाटे पाच वाजता अलार्म च्या आवाजाने शुभ्रता जागी झाली , आवरून execrcize , प्राणायाम वैगेरे झाल्यावर ,तिने स्वतःचं आवरायला घेतलं , खास दिक्षेसाठी म्हणून तिने पांढऱ्या शुभ्र रंगाचा पंजाबी ड्रेस आणला होता , तो घातल्यावर आज प्रथमच ती जरा आरशा पाशी रेंगाळली , तो रंग तिला खूप खुलून दिसत होता , सुडौल बांधा , मुलींना शोभून दिसते तशी ५’६ उंची , लांब सडक दाट केस , तांबूस केशरी छटा असलेला नितळ गोरापान रंग मोठे मोठे, निष्पाप डोळे ,आणि गालावरच्या दोन खळ्या ,त्यामुळे तिला एकदा पाहिलेला माणूस परत वळून बघितल्या शिवाय पुढे जात नसे , कॉलेज मध्ये रोझ डे च्या दिवशी सगळ्यात जास्त गुलाब तिच्यापाशी असायचे , आणि सर्वात जास्त प्रपोजल्स ही , वयस्कर बायका अडून अडून स्थळांचं विचारत असत त्याला मधुराची मावशीही अपवाद नव्हती , पण तिने अजून तो विचारच केला नव्हता . पुढे काय करायचं हे ठरलं नसलं तरी लग्न , संसार या टिपिकल वर्तुळात स्वतः:ला अडकवून घेणं तिला मुळीच मान्य नव्हतं , आरशात स्वतः:चं प्रतिबिंब बघताना तिला ‘सुप्रियाचं वाक्य आठवलं “तू एवढी तरुण आणि सुंदर आहेस , प्रेमात पडायचं सोडून , हे काय करत बसलीयेस ? म्हातारपण आहेच कि राखीव त्यासाठी “ क्षणभरासाठी ती स्तब्ध झाली, आपण बरोबर करतोय की चूक? तिला प्रश्न पडला. पण कोणाला विचारणार ? आणि हीच काय आपल्या आयुष्यत आपण करत असलेल्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला जाब विचारायला किंवा चूक कि बरोबर हे सांगायला आहेच कोण आपलं हक्काचं ? तिला आधीच्या अनेक वर्ष तळमळून घालवलेल्या रात्री आठवल्या , काहीही झालं तरी पुन्हा तिला ते दिवस नको होते , कोणास ठाऊक आपण इथे यावं यात परमेश्वराचा काही हेतू असेल . आवरून ती निघाली , दीक्षा विधी सकाळी सात ला सुरू होणार होता , ती ‘ पलाश अँबियन्स ‘ मध्ये पोहोचली तेव्हा सात वाजून गेले होते , सगळे साधक जमले होते , डॉ बॅनर्जींनी दार उघडच ठेवलेलं होतं , सगळा परिसर फुलांनी सजवलेला होता आणि सर्वत्र धुपाचा सुंगध दरवळत होता . समोरच्या आसनावर बाबाजींच्या मूर्तीच्या खालच्या चौथऱ्या जवळ , एका उच्चासनावर भगवी वस्त्र परिधान केलेले शांत , प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे वयस्कर गृहस्थ बसले होते , शुभ्रा च्या लक्षात आलं ते गुरूजी होते , त्यांच्या समोरच्या पहिल्या रांगेत डॉ बॅनर्जी आणि त्यांची पत्नी ज्यांना सगळे ‘शारदा माँ ‘म्हणत असत , दोघेही अतिशय विनम्र चेहेऱ्याने बसले होते आणि ...आणि ..एक क्षण , दोन क्षण ती बघतच राहिली , किती तरी वेळ तिचा तिच्या डोळ्यांवर विश्स्वास बसेना , पण हो शारदा माँ च्या शेजारी चक्क नील बसला होता .!!!! पांढरा झब्बा , ब्लू जीन्स , कानात भीकबाळी , अगदी परवा वर्तमानपत्रात पाहिला होता तस्साच .
हा इथे कसा काय ? .. तिच्या छातीत धडधड सुरू झाली . इतकी की आजूबाजूला ऐकू जाईल असं तिला वाटलं . कशी बशी ती सावरली आणि दरवाजाजवळ थोडी जागा होती तिथेच बसली .
समोरच्या अष्टकोनी पात्रात काही समिधा टाकल्या होत्या , आणि अग्नी प्रज्वलित केलेला होता , ज्यांचा दीक्षाविधी होता अशा सर्व साधकांनी आणलेली फळे , बाबाजींपुढे ठेवलेली होती (ते सप्त चक्राचं प्रतीक होतं हे तिला नंतर गुरूजींच्या बोलण्यातून कळलं ) अग्नीच्या साक्षीने प्रत्येकाचा दीक्षाविधी होत होता , सर्व कार्यक्रम अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध चालू होता , शुभ्रताचे नाव घेतल्यावर ती उठली आणि उठताना हळूच एक कटाक्ष ‘नील ‘ कडे टाकला , तो ही तिला तिथे बघून चांगलाच हबकला होता . गुरूजींच्या समोर बसल्यावर मात्र ती थोड्या काळापुरती सगळं विसरून गेली .
आधी बाबाजींना वंदन करून मग ती गुरूजींसमोर बसली , “execrszie और प्राणायाम regularly कर रही हो ना बेटा ?,” गुरूजींच्या प्रेमळ आवाजाने गरम उबदार मुलायम दुलई पांघरल्यासारखं वाटलं तिला . गुरूजींनी आधी करत असलेल्या प्राणायामाला जोडूनच तिला मूलबंध लावून महमुद्रा शिकवली आणि मग क्रिया braething , आणि सर्वात शेवटी ज्योतिमुद्रा . ती लक्षपूर्वक गुरूजींनी सांगितलेल्या क्रिया करत होती , दीक्षाविधी झाल्यावर ती तिच्या जागे वर जाऊन बसली , एक एक करत सर्व साधकांचा दीक्षा विधी पूर्ण झाला , मग प्रसाद म्हणून सर्वाना दूध दिलं गेलं आणि सर्वात शेवटी जेवण .बॅनर्जी पती पत्नी स्वतः: उभे राहून सर्वाना प्लेट्स भरून देत होते . तीही मग त्यांच्या बरोबर मदतीला उभी राहिली . प्लेट्स भरत असताना एकीकडे तिची नजर ‘नील ‘ला शोधत होती . तो सगळ्यांच्या घोळक्यात होता , त्याच्या नुकत्याच पेपर मध्ये छापून आलेल्या बातमीची चर्चा सर्वत्र चालूं होती , निरनिराळ्या चॅनेल्स ने मुलाखती देखील घेतल्या होत्या , शुभ्रता ला T.V चं फारसं वेड नसल्यामुळे तिने त्या पहिल्या नव्हत्या पण त्यांच्या चर्चेतून तिला ते कळलं ( T.V. फारसा कधी न बघितल्याची पहिल्यांदाच तिला खंत वाटली . तसंही तिच्याकडे T.V. कुठे होता ?. )आणि हेही कळलं कि तो इथे खूप आधीपासून येतो , गुरुजींच्या सुरुवातीच्या साधकांच्या बॅच मधला पहिला साधक होता तो, त्याला इथे सगळेच ओळखत होते . त्याला कोणी एकटं सोडत नव्हतं आणि शुभ्रता त्याच्याशी आपणहोऊन बोलायला गेली नव्हती , नक्कीच त्याच्यात काहीतरी बदल झालाय तिला वाटलं, पूर्वीचा ‘नील’ असता तर ती दिसल्याबरोबर सगळयांना सोडून आधी तिच्याकडे धावला असता . थोडासा अहंकार दुखावला गेला तिचा , आधी ज्या गोष्टीचा राग यायचा ,त्याच्या त्याच वागण्याची तिला आत्ता मनापसून अपेक्षा होती , जसा जसा वेळ जाऊ लागला ती अस्वस्थ होत गेली , पण त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही , बदलला तो, शिष्ट झालाय तिला वाटून गेलं . जमलेल्या साधकांमध्ये काही तरुण आणि सुंदर मुलीही होत्या , सगळ्या त्याच्याभोवती उभ्या होत्या , त्याला निरनिराळे प्रश्न विचारत होत्या . तो सर्वांशी अत्यंत अदबीने बोलत होता , हे सगळं लांबून शुभ्रता पहात होती .पूर्वीच्या फ्लर्ट नील चा मागमूसही तिथे दिसत नव्हता .